.
History इतिहास

मृत्युलेख


इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. Parting is always sad म्हणून. कोणत्याही विमानतळावर गेले तरी या म्हणीचे लगेच प्रत्यंतर येते. Departures विभागातील वातावरण नेहमीच गंभीर असते. प्रवासी आणि त्यांना पोचवायला आलेले लोक, यांच्या मनात असलेले शोकाचे अंत:प्रवाह लगेच जाणवतात. याउलट Arrivals विभाग नेहमीच आनंदाने व उल्हासाने गजबजलेला असतो.

1 एप्रिल या दिवशी अशाच एका आवडत्या गोष्टीला कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे. कालौघात बदल ही एकच गोष्ट स्थिर असते असे म्हणतात. त्याप्रमाणे ही गोष्ट कधी ना कधी आपल्या नजरेसमोरून कायमची जाणार आहे याची कल्पना असली तरी प्रत्यक्षात ती वेळ आल्यावर मनाला कुठेतरी रुखरुख जाणवते आहे हे नक्की. या दिवसापासून पुणे आणि भारतातली आणखी प्रमुख 12 शहरे, यांना गेली 30 वर्षे त्यांच्यावर अधिपत्य गाजविणार्‍या मारुती 800 या चौचाकीला कायमचा निरोप द्यावा लागतो आहे.

मारुती 800 आणि माझी मैत्री तशी माझ्या आयुष्यात फार पुढे जमली. फियाट आणि ऍम्बॅसाडर या गाड्यांशिवाय आमच्या पिढीच्या लोकांना तोपर्यंत दुसरा काही विकल्पच नसल्यामुळे तेच जुने खटारे आम्हाला विकत घ्यावे लागत आणि वापरावे लागत. त्या आधी कधीही परदेशात गेले की प्रथम काही नजरेत भरत असे ते म्हणजे तिथल्या, निरनिराळी डिझाईन्स असलेल्या विविध मॉडेल्सच्या गाड्या. या गाड्या आणि आमच्या फियाट, ऍम्बॅसाडरची मनात तुलना केली तरी इतके लाजिरवाणे वाटत असे की विचारू नका. पण या मारुती 800ने ही सगळी समीकरणे बदलूनच टाकली. या परदेशातल्या गाड्या आणि मारुतीचे अंतरंग यात एक आकार सोडला तर काही फरकच वाटत नसे. मारुती येण्याआधी ए.सी. गाडीतून प्रवास करणे किती सुखद असते हे आपल्याला माहितच नव्हते. मारुतीच्या त्या छोट्याशा मूर्तीत ए.सी. पण लावता येतो यावर माझा प्रथम तर विश्वासच बसत नव्हता. मारुतीचा पिकअप, ऍक्सिलरेशन आणि ही गाडी चालवण्यासाठी येणारा पेट्रोलचा खर्च हा अक्षरश. विस्मित करणारा होता.

शून्य दोष(Zero Defect) उत्पादन म्हणजे काय? ते मारुतीनेच भारताला दाखवून दिले यात शंकाच नाही. सत्तरीच्या दशकात मी एक ऍम्बॅसाडर गाडी विकत घेतली होती. आणल्यानंतर 1 महिन्यात तिच्या मागच्या पाटा स्प्रिंगा बदली कराव्या लागल्या होत्या आणि तिसरा गिअर स्लिप होतो म्हणून 2 महिन्यातच गिअर बॉक्स खोलावी लागली होती. पुढे व्यवसायाच्या निमित्ताने, फियाट आणि ऍम्बॅसाडर या दोन्ही गाड्यांच्या कारखान्यांना अनेक वेळा भेट देण्याचा मला योग आला. तिथल्या उत्पादनाची गुणवत्ता, मशीन्सची अचूकता वगैरे बघितल्यावर या कारखान्यांच्यातून तयार होणार्‍या गाड्या इतक्या कमी गुणवत्तेच्या का असतात हे माझ्या चांगलेच लक्षात आले होते.

मारुतीच्या आगमनाच्या आधी भारतात लोकांचे दोन गट होते. कारवाले श्रीमंत लोक व बाकीचे कार न परवडणारे गरीब. मारुतीची किंमत व ती चालवण्याचा खर्च इतका कमी होता की मध्यम वर्गालाही ती परवडू शकत होती. त्यामुळे आता नवीनच दोन गट तयार झाले. मारुतीवाले आणि खटारावाले. बाकीचे गाड्या चालवणारे लोक मारुतीकडे अतिशय असूयेने बघत असत. मारुती बनवण्याचा कारखाना भारत सरकारने सुरू केल्यामुळे त्या गाडीचे वितरण विचित्र पद्धतीने होत असे. पहिल्या टप्प्यात फक्त राज्यांच्या राजधान्यांमधे मारुती विकली जात असे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात, जिथे मारुतीला खूप गिर्‍हाईक होते, तिथे मारुती विकलीच जात नसे. पुण्यातल्या लोकांना फियाट ऍम्बॅसाडरवरच समाधान मानावे लागत असे किंवा भरमसाट प्रिमियम देऊन गाडी घ्यावी लागत असे.

मारुती गाडीचा आराखडा ज्या जपानी अभियंत्यांनी तयार केला त्या अभियंत्यांना कधी कल्पनाही आली नसेल की त्यांची ही गाडी एक क्रांती घडवून आणणार आहे. ज्या भारतात तांत्रिक सहयोग आणि आराखडा विकत घेतल्याशिवाय साधी स्कूटर किंवा मोपेडही बनवता येत नव्हती. त्याच भारतात चाळीस वर्षांनंतर जगातले सर्व स्वयंचलित गाड्या उत्पादक, स्वत:चे कारखाने टाकण्यासाठी व या कारखान्यांच्यातून गाड्या बनवून निर्यात करण्यासाठी तडफडणार आहेत. परदेशात आराखडे बनवलेल्या गाड्यांचे, सुटे भाग बाहेरून आणून, नुसते उत्पादन भारतात न करता, भारतातील फ्रुगल इंजिनियरिंगचे तंत्रज्ञान वापरून, कमीत कमी खर्चात नवीन डिझाईनच्या गाड्या बनवणार आहेत. आता नॅनो सारख्या जगातल्या सर्वात स्वस्त गाडीचा आराखडा भारतात बनू शकतो आहे. परंतु या सगळ्याचे मूळ, मारुती 800 ही गाडीच आहे हे कधीच विसरणे शक्य नाही.

आता या गाडीचा आराखडा जुना झाला आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी जे युरो 4 किंवा भारत 4, हे नवीन निष्कर्ष आता नवीन उत्पादन होणार्‍या वाहनांना लावण्यात आलेले आहेत. त्यात मारुती 800 चे हे जुने डिझाईन बसत नाही. त्यामुळे ही गाडी आता पुण्याच्या रस्त्यांवरून धावू शकणार नाही. पण ज्या कोणी लोकांनी ही गाडी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी खरेदी केली आहे व चालवली आहे, त्यांच्या मनात असलेला या गाडीबद्दलचा ओलावा कधीच पुसला जाणार नाही हे नक्की. Old warriors never die, just fed away, असे म्हटले जाते. मारुती 800 चे काहीसे तसेच असावे.

5 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: