.
ताज्या घडामोडी Current Affairs

झांझिबार ! ! झांझिबार ! !


मागचा संपूर्ण आठवडा, विजेचा सतत लपंडाव चालू ठेवून, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आम्हाला अगदी घामाघूम करून सोडले होते. काहीही काम करायला घ्यावे किंवा टीव्हीवर आयपीएल ची मॅच लावावी, तर एकदम मधेच वीज गायब होई. कंपनीला फोन करून करून अगदी कंटाळा आला होता. खरे म्हणजे ही कंपनी आमच्याकडून विश्वासार्हता शुल्क म्हणून दर युनिटमागे 41 पैसे वसूल करत असते. तरी सुद्धा विजेच्या या अनियमितपणाला तोंड द्यायला लागतच होते. या विद्युत वितरण कंपनीची परिस्थिती अंधेर नगरी चौपट राजाअशीच आहे पण सर्वसाधारण माणूस करणार तरी काय? माझ्या मनाच्या या धारणेमुळे का होईना! आज जेंव्हा झांझिबार बेटावरच्या वीज पुरवठ्याबद्दल एक बातमी वाचली तेंव्हा तिथल्या जनतेचे मागचे 3 महिने, काय हाल झाले असतील याची पुरेपूर कल्पना मला आली.


1950च्या दशकात राजा परांजपे यांनी पेडगांवचे शहाणे म्हणून एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात असलेले दुनिया वेड्यांचा बाजार!! झांझिबार!! झांझिबार!!’ असे एक प्रसिद्ध गाणे माझ्या स्मरणात आहे. तेवढाच काय तो झांझिबार बेटांशी आलेला माझा संबंध. बाकी ही बेटे कुठे आहेत वगैरे मला तरी काहीच माहिती नव्हते.

आफ्रिका खंडाच्या पूर्व किनार्‍यापासून 25 मैलावर ही झांझिबार बेटे आहेत. सध्या ही बेटे टान्झानिया या देशाचा भाग असली तरी स्वायत्त आहेत. या बेटांवरची लोकसंख्या 10 लाखाच्या आसपास असली तरी 1 लाख पर्यटक या बेटांना दर वर्षी भेट देत असतात. या बेटांच्यावर वीज उत्पादनाची कोणतीच केंद्रे नसल्याने, वीज पुरवठा 25 मैलावरच्या टांझानिया देशाच्या मुख्य भूमीपासून, समुद्रतळावर टाकलेल्या एका वाहिनीमधून केला जातो. ही वाहिनी किंवा केबल 40 वर्षांपूर्वी एका नॉर्वेजियन कंपनीने टाकलेली होती. या केबलसाठी नॉर्वेजियन सरकारनेच आर्थिक मदत दिली होती. या केबलची पुरेशी देखभाल झांझिबार सरकारने न केल्याने, ती 2008 साली प्रथम तुटली. ही केबल दुरुस्त करण्यासाठी नॉर्वेहून सुटे भाग व तंत्रज्ञ बोलवावे लागले. झांझिबार देशाच्या स्थानिक लोकसंख्येपैकी फक्त 10 टक्के लोकांना वीज पुरवठा होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेतली तर या वीज वाहिनीवर केवढा ताण येत असेल याची कल्पना करता येते.


ही वीज वाहिनी 2009 च्या डिसेंबरमधे परत एकदा तुटली. या वेळेस केबलची दुरुस्ती होण्यास 3 महिन्यांहून जास्त वेळ लागला व 9 मार्चला अखेरीस झांझिबारच्या घरांच्यातून विजेचे दिवे परत दिसू लागले. मागच्या 1 महिन्याच्या वीज नसलेल्या कालात झांझिबार मधल्या जनतेवर जे दुष्परिणाम झाले ते बघता या वेळेस स्थानिक जनतेला खूपच त्रास झालेला असणार आहे हे नक्की.

या 3 महिन्याच्या कालात डिझेलचे दर लिटरला 130 रुपयापर्यंत वाढले होते. अनेक छोट्या उद्योगधंद्यांना स्वत:चे ऍसेट्स विकून डिझेल विकत घ्यावे लागले. पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी आयोजित केलेले अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. या सगळ्या कारणांमुळे येणार्‍या पर्यटकांची संख्या प्रचंड घटली आहे. साहजिकच याचा विपरित परिणाम स्थानिक उद्योग धंद्यांच्यावर झाला आहे. झांझिबारची निम्मी जनता दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. 2008च्या वीज नसण्याच्या कालात ज्या स्त्रिया प्रसुत झाल्या होत्या त्यांना पुरेसे अन्न उपलब्ध न झाल्याने, त्यांच्या बालकांची वजने सरासरी 100 ग्रॅमने तरी कमी भरली होती. या वेळची माहिती अजून उपलब्ध झालेली नसली तरी नवजात अर्भकांची वजने कमी असणे आणि प्रजननदरात बेसुमार वाढ होणे हे दोन्ही दुष्परिणाम अपेक्षित आहेतच.

झांझिबारमधली 90% जनता वीज वापरतच नाही. त्यामुळे या लोकांना मोबाईल फोन चार्ज न करता येणे व नळाला पाणी नसणे एवढेच त्रास सहन करावे लागले. टांझानियाच्या मुख्य भूमीपासून वीज वाहिनी टाकणे झांझिबारला परवडण्यासारखे नाहीच. त्यामुळे त्यांना परदेशी मदतीवरच अवलंबून रहावे लागणार आहे. पर्यायी उर्जा स्त्रोतांची झांझिबार सारख्या बेटांना किती गरज आहे हेच यावरून दिसून येते.

झांझिबारी लोकांचे खरे दुख: एकच आहे. या 90 दिवसाच्या कालात त्यांना त्यांच्या लाडक्या मॅन्चेस्टर युनायटेड चेलसी या फूटबॉल क्लब्सच्या मॅचेस काही बघायला मिळाल्या नाहीत.

2 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “झांझिबार ! ! झांझिबार ! !

  1. Thank झाझिबार हे गाने आठवते बालपनी रेडिओ वर ऐकलेले पण तेवढिच माहिती होती…:)

    Posted by Shekhar | एप्रिल 9, 2010, 10:19 सकाळी
  2. changali mahiti ahe tumhala…mi sadhy tanzania madhe ahe…..wachun bare watale….mi jenva zanzibar madhe gelo hoto tenva power cha kahi problem novhata mi 2008 pasun ithe ahe..

    Posted by narayan | एप्रिल 26, 2010, 3:37 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: