.
अनुभव Experiences

आव्हान-1


कधीतरी 1968 किंवा 1969 मधली गोष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग मधली पदवी संपादन करून, त्या पदवीच्या जोरावर, मुंबईमधल्या एका अतिशय मोठ्या बिझिनेस ग्रूपच्या मालकीच्या एका कंपनीत मी रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेन्ट अभियंता म्हणून नोकरीला लागलो होतो. आमच्या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात टाकलेले हे पहिलेच पाऊल होते. त्यामुळे चार अभियंते, एक मॅनेजर, कंपनीच्याच कोणत्या तरी दुसर्‍या एका विभागाने खाली केलेली फोर्ट भागातली एक जागा व खर्चाला बर्‍यापैकी पैसे एवढाच आमचा सेट अप होता. अगदी मूलभूत उपकरणांपासून ते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्टस पर्यंत सर्व खरेदी करणे. यापासून ते नवीन प्रकल्पांचा विचार करून त्यावर काम करणे, वगैरे सर्व कामे आमच्या गटालाच करायची होती.

नोकरी सुरू झाल्यावर चार पाच दिवसांनी, आमच्या मॅनेजर साहेबांनी एक सभा घेतली. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मधलीच चार अशी ऍपलिकेशन्स आम्हाला सुचवली की ज्यात आम्हाला प्रकल्प सुरू करणे शक्य होते. ही चार ऍप्लिकेशन्स त्यांनी आम्हा सर्वांना वाटून दिली. व त्यावर अभ्यास करायला सांगून आठवड्याभरात अहवाल द्यायला सांगितला. माझ्या वाट्याला इलेक्ट्रिक मोटर्सची गती कमी जास्त करण्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण विकसित करण्याची जबाबदारी टाकण्यात आली.

मी इलेक्ट्रॉनिक्स मधली पदवी संपादन केली होती हे जरी खरे असले तरी माझ्या वाट्याला आलेल्या या कामाची मला ओ किंवा ठो सुद्धा माहिती नव्हती व मला त्या कामात रुचीही नव्हती. पण हे सगळे मॅनेजर साहेबांना सांगण्याचे धाडस माझ्या अंगी नसल्यामुळे मी नाईलाजानेच ही जबाबदारी अंगावर घेतली.

हा प्रकल्प त्यावेळी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा तसा नवीनच होता. मला माहिती असलेल्या पुस्तकांच्यातून, मासिकांच्यातून, फारशी काहीच माहिती मला मिळाली नाही. या प्रकल्पात थायरिस्टर नावाचा एक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्ट वापरला जातो एवढी माहिती मला आमच्या मॅनेजर साहेबांच्याकडून मिळाली होती. त्या वेळी कोणतीही गोष्ट आयात करायची असली तर परवाना घ्यावा लागत असे. त्यामुळे प्रथम थायरिस्टर हा काय प्रकार आहे हे समजावून घेण्याचे मी ठरवले. कोणाकडून तरी अशीच माहिती मिळाली की अमेरिकेत असलेली जनरल इलेक्ट्रिक ही कंपनी हे थायरिस्टर बनवते. या कंपनीचे भारतातले ऑफिस मुंबईत आमच्या ऑफिसच्या जवळच आहे असे मला टेलिफोन डिरेक्टरीवरून समजले. व त्या पत्यावर मी जाऊन धडकलो. आमच्या कंपनीच्या नावाचे पाठबळ माझ्या मागे असल्याने, मला हवी असलेली बरीचशी माहिती मला मिळाली. हा थायरिस्टर वापरायचा कसा या संबंधी काही ऍप्लिकेशन नोट्स मिळाल्या व थोडे थायरिस्टर नमुन्याखातर आयात करता येतील हे ही समजले.

पुढच्या मीटींगमधे मी मॅनेजर साहेबांना सर्व माहिती दिली. त्यांचा गो अहेड हा निर्णय घेतला. थायरिस्टरचे नमुने आयात करण्याची जबाबदारी त्यांनी स्वत:वर घेतली. पुढच्या चार महिन्यात एक हॉर्सपॉवरच्या एका मोटरची गती मला टेबलावर प्रायोगिक स्वरूपात ठेवलेल्या माझ्या नियंत्रकातून करता येऊ लागली. याच सुमारास आमच्या कंपनीचे जनरल मॅनेजर आमच्या विभागाला भेट द्यायला आले. सर्व प्रकल्प बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. पण जाताना ते एवढेच म्हणाले की या प्रकल्पातून कंपनीला पैसे कधी मिळतील हे बघण्यात त्यांना जास्त आवडेल. आता मी बनवलेले हे प्रायोगिक सांडगे, विकत तरी कोण घेणार या विचाराने मी जरा काळजीतच पडलो. पण त्याच सुमारास मला आश्चर्य वाटण्यासारखी एक घटना घडली. लार्सन ऍन्ड टुब्रो कंपनीच्या वेल्डिंग विभागातले दोन इंजिनीयर आमच्याकडे भेटीस आले. लोखंडी पाईप किंवा नळांच्या टोकांच्यावर वेल्डिंग करणार्‍या मशीनची त्यांना ऑर्डर मिळाली होती. हा गोल पाईप एका स्थिर गतीने फिरत ठेवून त्यावर वेल्डिंग करायचे होते व पाईपच्या जाडीप्रमाणे ही गती कमी जास्त करणे आवश्यक होते. मी बनवलेला नियंत्रक हे कार्य करण्याची शक्यता त्या इंजिनीयरना वाटली असावी कारण त्यांनी एका नियंत्रकाची मागणी आमच्याकडे लगेच नोंदवली. आमच्या इलेक्ट्रॉनिक विभागाला आलेली ही पहिलीच ऑर्डर असल्याने मॅनेजरसह सगळेच उत्साही बनले.

पुढचे काही महिने मी अतिशय मानसिक ताण तणावात काढले. आमच्या विभागाला आलेली पहिली ऑर्डर, त्यातून एवढ्या प्रथितयश कंपनीची. जर माझा नियंत्रक त्यांचा मनास आला नाही व नाकारला गेला तर आमच्या कंपनीची इभ्रत जाणार. म्हणजे माझी नोकरी पण या नियंत्रकावरच अवलंबून होती हे मला स्पष्ट दिसत होते. आपल्या ट्रान्झिस्टर रेडियोमधे जसा व्हॉल्यूम कंट्रोल असतो तसा एक कंट्रोल मी माझ्या नियंत्रकावर बसवला होता. अशी अपेक्षा होती की हा कंट्रोल एका विशिष्ट अंशातून फिरवला की मोटरची गती विशिष्ट प्रमाणात वाढावी किंवा कमी व्हावी. एक दिवस माझ्या असे लक्षात आले की असे होत नाहिये. सुरवातीस हा कंट्रोल अगदी थोडासा फिरवला तरी गती एकदम भर्रदिशी वाढते आहे तर नंतर ती वाढवण्यासाठी कंट्रोल बराच फिरवावा लागतो आहे. जंग जंग पछाडूनही ही अडचण मला सोडवता येईना. शेवटी मी एक बॅंड चेन्जिंग स्विच व एक कंट्रोल बसवून मला हवे ते साध्य करण्यात यशस्वी झालो. सगळे झाल्यावर हा नियंत्रक मी एल ऍन्ड टी कंपनीला देऊन आलो. त्यांनी आपण हा मशिनवर बसवून कळवू म्हणून सांगितले.

या दरम्यान मला नोकरीला लागून वर्ष होऊन गेले होते. पण व्यवस्थापनाकडून मला पुढे काहीच कळले नव्हते. त्यामुळे मी जरा काळजीतच होतो. वेळ पडली तर मुंबईतून गाशा गुंडाळावा लागेल ही कल्पना मला येऊ लागली होती. या दरम्यान एक दिवस आमच्या मॅनेजर साहेबांना एल ऍ न्ड टी च्या इंजिनीयरचा फोन आला. त्यांचे काय बोलणे झाले ते मला कळले नाही पण मॅनेजर मला एवढेच म्हणले की उद्या आपल्याला एल ऍ न्ड टी मधे जायचे आहे. मी तुला साकी नाक्याला पिक अप करीन. सकाळी 10 वाजता तयार रहा. त्या रात्री मला काही नीट झोप लागली नाही.

दुसर्‍या दिवशी दहा वाजता मॅनेजर साहेबांची गाडी साकी नाक्यापाशी आली. मी गाडीत पुढच्या सीटवर बसलो. मागच्या सीटवर आमचे मॅनेजर साहेब होते व त्यांच्या बरोबर मला अनोळखी असे दुसरी अशी एक व्यक्ती होती. आम्ही तिघेही एल ऍ न्ड टी च्या पवई येथील कारखान्यात गेलो. तिथल्या वेल्डिंग विभागात पाईप वेल्डिंगचे मशिन ठेवले होते तिथे गेलो. शेजारच्या एका पॅनेलमधे बसवलेला माझा नियंत्रक मला दिसला. आपला एखादा नातेवाईक खूप दिवसानी मला भेटल्यासारखे वाटले व अचानक मला प्रचंड हुरुप आला. तिथल्या इंजिनीयरने बटणे दाबली व लगेच त्या मशिनवर ठेवलेला एक अगडबंब पाईप चुटकीसरसा गोल फिरू लागला. नंतर एल ऍ न्ड टी च्या इंजिनीयरने त्या फिरणार्‍या पाईपची गती अगदी हळू पासून जोरात फिरण्यापर्यंत बदलून दाखवली. त्या इंजिनीयर्सच्या चेहर्‍यांवरून स्पष्ट दिसत होते की ती आमच्या नियंत्रकावर चांगलेच खुष होते. चहापान झाल्यावर आम्ही आमच्या ऑफिसमधे परत आलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी मॅनेजर साहेबांनी त्यांच्या केबिनमधे मला बोलावले. माझे अभिनंदन करून माझी नोकरी पक्की झाल्याचे पत्र त्यांनी माझ्या हातात ठेवले. मी नंतर त्यांना भितभितच विचारले की सर एक विचारू का?” त्यांची अनुमती घेतल्यावर काल गाडीत दुसरी व्यक्ती कोण होती म्हणून मी त्यांना विचारले. ती व्यक्ती आमच्या कंपनीतील एक अतिशय बडा अधिकारी म्हणजे डेप्युटी जनरल मॅनेजर होते असे साहेबांनी सांगितल्यावर हे बडे साहेब इतक्या फालतू व्हिजिट साठी स्वत: का आले होते हे मला काही उमजेना. पण मी गप्प राहिलो.

पुढे थोडे दिवसानी माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. या व्हिजिटमुळे काही फक्त माझी नोकरी पक्की झाली नव्हती तर माझ्या बरोबरच आमच्या मॅनेजर साहेबांचीही नोकरी पक्की झाली होती. व्यापारीकरण झालेला असा आमच्या विभागाचा हा पहिलाच प्रकल्प होता. आमचा विभाग, भविष्यामधे कंपनीचा फायदा होईल असे काही करू शकेल का नाही याची खात्री करून घेण्यासाठी डेप्युटी जनरल मॅनेजरसाहेब स्वत: आमच्या बरोबर आले होते. मी मला दिलेले आव्हान तर पेलले होतेच पण त्याबरोबरच, आमच्या विभागातल्या सर्वांचेच, पुढच्या थोड्या काळाकरता का होईना, भविष्यही उज्वल केले होते.

31 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “आव्हान-1

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: