.
अनुभव Experiences

इये मराठीचिये नगरी


मार्च महिन्याच्या अखेरच्या एखाद्या दुपारी, मोकळ्या पटांगणावर भरलेले एखादे प्रदर्शन बघायला जायची नुसती कल्पना जरी कोणी काढली तरी माझ्या अंगावर काटाच येईल. धुळीने भरलेले एक पटांगण, त्यावर बांधलेला व सर्व बाजूंनी कापड व कनाती गुंडाळलेला एक मांडव. खाली धुळीने भरलेले जाजम. छत व बाजू यामधे असलेल्या फटींमधून येणारे गरम वारे, गर्दी, अगदी कल्पनेत सुद्धा नकोसे वाटते. एवढे वाटत असतानाही का कोण जाणे? मला 83व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भरलेल्या पुस्तक प्रदर्शनाला काल जावेसे वाटले आणि मी गेलोही. शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेचे पुण्यात एक प्रसिद्ध कॉलेज आहे. त्या एसपी कॉलेजच्या पटांगणावर हे प्रदर्शन आहे एवढी माहिती मला होती. परंतु आत जायचा मार्ग कोठून आहे हे प्रत्यक्ष जाऊनच शोधून काढावे असे मी ठरवले व चारचाकीत बसून निघालो. तसा मी पुण्याचाच असल्याने या संमेलनाचे प्रवेश द्वार तर मला लगेचच सापडले. परंतु अपेक्षेप्रमाणे गाड्या ठेवण्याची जागा मात्र प्रदर्शन स्थळापासून बरील लांब आयोजित करण्यात आली होती. प्रेक्षकांना अनायसे व्यायाम पण व्हावा ही या मागची कल्पना असावी अशी मी मनाची समजूत करून घेतली. व चालत चालत प्रदर्शन स्थळी तर पोचलो.

धातू शोधक यंत्रामधून आत प्रवेश केल्यावर त्या यंत्रातून बरेच चित्र विचित्र आवाज आले. मी हळूच इकडे तिकडे चोरून नजरा टाकल्या पण आजूबाजूस असलेले समस्त पोलिस कर्मचारी बंदोबस्तात गुंग असल्याने माझ्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. पण माझ्या मागून आलेल्या लोकांच्या प्रवेशाच्या वेळीही त्या धातू शोधक यंत्राने तसेच चित्र विचित्र आवाज काढले आणि असे आवाज, गंमत म्हणून ते यंत्र काढते आहे हे मला उमजले. जरा पुढे आल्यावर उजव्या बाजूला, भेळपुरी, बर्फ गोळे, वगैरेंचे बरेचसे स्टॉल दृष्टीक्षेपात आले. क्षणभर आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात न येता खाऊगल्लीत पोचलो आहोत की काय असे वाटले खरे! पण जवळपास उभे असलेल्या मंडळींच्या एकूण अवताराकडे बघता आपण साहित्यिकांच्या नगरीतच आल्याचे पटले.

मला जायचे होते पुस्तक प्रदर्शनाला. ते या पटांगणावर कोठे असावे? याचा अंदाज, इथे कोणत्याही प्रकारच्या पाट्यांचा पूर्ण अभाव असल्याने, बांधणे अशक्यप्राय होते. खरे म्हणजे पुण्यातल्या पाट्या एवढ्या प्रसिद्ध आहेत की आतापर्यंत दहा पंधरा तरी पाट्या बघायला मिळायला हव्या होत्या.’ साहित्य पंढरीत आपले स्वागत असो ‘ , रस्त्यावर रेंगाळू नका ‘ ‘पुस्तके विकत घेऊन वाचा वगैरे, वगैरे.पण इथे तर एकही पाटी नव्हती. शेवटी एका पोलिस हवालदारालाच विचारले झाले. पुण्यातले पोलिस असल्या शंकांचे सर्वसाधारणपणे कधीच निरसन करत नाहीत. ” हवालदार पार्किंग कुठे करायचे?” अशी पृच्छा केल्यावर ते माहित नाही पण इथे करायचे नाही. पुढे बघा.” अशा प्रकारच्या उत्तरांची सवय मला असल्याने, या हवालदारांकडून माहिती मिळण्याची फारशी अपेक्षा मला नव्हती. परंतु हवालदार साहेबांनी हे काय डावीकडे वळून सरळ जा की प्रदर्शनाला.” असे सांगून मला आश्चर्याचा एक सुखद धक्का दिला.

डावीकडे समोर एक भव्य मंडप दिसत होता. त्याच्या कडेच्या एका छोट्या दारातून मी प्रवेश तर केला. कोपर्‍यावर एक आईस क्रीमचा स्टॉल दिसला परत मनात थोडा गोंधळ उडाला पण तसाच थोडा पुढे गेलो आणि समोर दिसणारे दृष्य बघितल्यावर अक्षरश: हबकलो. कित्येक हजार चौरस फूट आकाराचा एक मंडप माझ्या समोर होता. त्यात परदेशातील आधुनिक प्रदर्शनात असतात तसे आखीव रेखीव स्टॉल्स, पायाखाली कार्पेट आणि बर्‍यापैकी वायुविजनाची सोय हे सगळे तर होतेच पण त्या पेक्षा महत्वाचा होता तो म्हणजे समोर दिसणारा जनसागर. एवढा मोठा मंडप, हजारो पुस्तक वेड्या मराठी माणसांनी नुसता फुलुन गेला होता.

गेली कित्येक वर्षे मी वर्तमान पत्रांच्या साप्ताहिक किंवा रविवार पुरवण्यांमधून वाचत आलो आहे की इंग्रजीने मराठीवर कसे आक्रमण केले आहे किंवा मराठीला वाचवा ‘.त्यामुळे माझी आपली माफक अपेक्षा होती की शे पाचशे उच्च्भ्रू मंडळी मला इथे दिसावीत. पण समोर तर दिसत होती हजारो अगदी सर्व साधारण माणसे. कदाचित या माणसांपैकी अनेकांजवळ पुस्तके विकत घेण्यासाठी पैसेही कदाचित नसतील. तरी ती माणसे मराठी पुस्तके बघण्यासाठी, हाताळण्यासाठी आली होती. माझ्या मनातले मराठीच्या भविष्याबद्दलचे संशय धुक्यासारखे विरून गेले आणि क्षणभर डोळ्यात पाणी उभे राहिले. कालच मी वाचले होते की 6.8 कोटी लोक मराठीला आपली मातृभाषा मानतात. हा आकडा फ्रेंच मातृभाषा मानणार्‍यांच्या एवढाच आहे. तरीही आपली वर्तमानपत्रे मराठीच्या भविष्याबद्दल आपल्या मनात असले विभ्रम का निर्माण करतात हे मला तरी उलगडत नाही.

प्रदर्शनात मोठ्या पुस्तक प्रकाशकांचे व विक्रेत्यांचे स्टॉल साहजिकच होते. पण मला विशेष उल्लेखनीय वाटलेली बाब म्हणजे धुळे, नाशिक, कोल्हापुर, नागपुर, या सारख्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या प्रमुख शहरांच्यातले पुस्तक प्रकाशक इथे होते. त्यांच्या स्टॉलवर बरीच गर्दी होती. आणि पुस्तकांची विक्रीही होताना दिसत होती. काही मोक्याच्या ठिकाणी संयोजकांनी मोठ्या कल्पकतेने थंड पेये व स्नॅक्स मिळतील अशी सोय केली होती. पुस्तके चाळून आणि बघून थकलेले पुस्तक वेडे आपले तोंड या स्टॉल्सवर जाऊन ओले करताना दिसत होते. मला विचारलेत तर या जिल्ह्याच्या ठिकाणांहून आलेल्या पुस्तक प्रकाशकांच्याकडची पुस्तके मला जास्त जमिनीला पाय टेकलेली वाटली. धुळ्याचे असेच एक प्रकाशक, ‘ संशोधकम्हणून एक त्रैमासिक चालवतात. ते मला एवढे भावले की मी त्याची वर्गणी भरूनच टाकली. शासकीय मुद्रणालयाचा एक छोटासा स्टॉल होता पण त्यांच्याकडची पुस्तके आणि विषयांचा आवाका मात्र चकीत करणारा वाटला. मात्र कोणत्याही स्टॉलवर डेबिट/क्रेडिट कार्ड स्वीकरण्याची तांत्रिक सुविधा नसल्यामुळे ज्यांच्याजवळ पुरेशी रोख रक्कम नव्हती अशा अनेकांना पुस्तक खरेदीपासून वंचित रहावे लागले. माझा असा अंदाज आहे की या प्रदर्शनातून झालेली विक्री जर ही सुविधा उपलब्ध असती तर याच्या दुप्पट तिप्पट तरी झाली असती. पुढच्या साहित्य संमेलनापर्यंत तरी ही सुविधा पुस्तक विक्रेत्यांना मिळावी. पुढचे 2 तास मी मन तृप्त होईपर्यंत पुस्तके चाळीत राहिलो. आता आपल्या पायाचे तुकडे पडणार आहेत ही जाणीव शेवटी इतकी त्रासदायक होऊ लागली की नाईलाजाने व अनिच्छेने या सावित्रीबाई फुले ग्रंथनगरीमधून मला पाय आवरता घ्यावाच लागला.

मराठीला भविष्य नाही असल्या वेडगळ कल्पनांना आता मी माझ्या मनात परत कधी थारा देईन असे मला तरी वाटत नाही.

28 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “इये मराठीचिये नगरी

 1. खूप दिवसाने मराठी बाबत चांगल बोलणारा लेख वाचनात आला…
  धन्यवाद

  Posted by Sak | मार्च 28, 2010, 11:59 pm
 2. चुकीची मराठी लिहिण्याच्या आरोपाचे समर्थन करण्यासाठी पत्रकार अशी ओरड करतात.

  Posted by मनोहर | मार्च 29, 2010, 8:06 pm
 3. छान. वृत्तांत आवडला.
  चंद्रशेखरजी, एक विनंती आहे…लेखातले आकडे तेवढे मराठीत कराल काय? 🙂

  Posted by प्रमोद देव | एप्रिल 26, 2010, 8:56 सकाळी
  • प्रमोद देव

   लेखातले आकडे मी मुद्दामच देवनागरीमधले टाकत नाही. मी मंगल हा फॉ न्ट वापरतो. या फॉ न्टमधले देवनागरी आकडे एकतर चांगले दिसत नाहीत व दुसरे म्हणजे गोंधळ निर्माण करणारे मला वाटतात.

   Posted by chandrashekhara | एप्रिल 26, 2010, 8:59 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: