.
Musings-विचार

अतिक्रमण


माझ्या घराची मागची बाजू व शेजारची इमारत यांच्यामधे आम्ही एक काम्पाउंडची भिंत बांधून घेतली आहे. ही भिंत सुमारे पाच फूट उंचीची तरी असेल. या भिंतीच्या वर फ्रेममधे बसवलेल्या लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. या लोखंडी जाळ्यांवर, फुले येणारे वेल चढवले तर छान दिसेल या कल्पनेने आम्ही तीन चार वेलांची रोपे आणून लावली. यापैकी एक वेल मधुमालतीचा आहे. त्याच्या एका बाजूला जाई व दुसर्‍या बाजूला एक पिवळी फुले येणारा वेल लावला आहे. या तीन वेलांपैकी, मधुमालतीचा व पिवळी फुले येणारा हे वेल बर्‍याच आधी लावल्यामुळे चांगलेच फोफावले आहेत तर जाईच्या वेलाची वाढ हळू हळू होते आहे.

वेल लावताना मी असे ठरवले होते की प्रत्येक वेलाला, दोन लोखंडी फ्रेम्स एवढीच जागा, पसरायला द्यायची. आमचा पिवळ्या फुलांचा वेल तसा आज्ञाधारक आहे. त्याने आपली वाढ त्याला आखून दिलेल्या सीमेतच ठेवली आहे. पण डावीकडचा मधुमालतीचा वेल मात्र एकदम बंडखोर आणि आगाऊ आहे. त्याने त्याला आखून दिलेली जागा तर केंव्हाच पादाक्रांत केली आहे आणि आता हा बेटा आजूबाजूच्या वेलांच्या जागेवर पण आक्रमण करू बघतो आहे. दर आठवड्याला या मधुमालतीच्या वेलाच्या आडव्या तिडव्या व बेबंद वाढणार्‍या फांद्या छाटून त्याच्या सततच्या अतिक्रमणावर नियंत्रण किंवा अंकुश ठेवावा लागतो.

मी लहान असताना आमचे एक मामा मुंबईला चर्नी रोड स्टेशनच्या जवळ ताराबाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका चाळीत रहात असत. या चाळीत रहाणार्‍या प्रत्येक बिर्‍हाडाला दोन मोठ्या व प्रशस्त खोल्या दिलेल्या असत. या खोल्यांच्या समोर जाण्यायेण्यासाठी म्हणून एक लांब रूंद असा व्हरांडा असे. आमच्या मामाच्या बिर्‍हाडाशेजारी एक पाटसकर म्हणून शेजारी रहात. या पाटसकरांचे बरेचसे घरसामान कॉमन व्हरांड्यातच ठेवलेले असे. व्हरांड्यामधे, त्यांच्या घरात जाण्याच्या दारालगत, एक लांब पेटीवजा स्टूल असे. यावर पाटसकरांचा भाऊ रात्री झोपत असे. तर खालच्या पेटीत अनेक गोष्टी ठेवलेल्या असत. या शिवाय कोळशाची पोती, चूल पेटवण्यासाठी लागणार्‍या लाकडाच्या भुश्याची पोती,स्वयंपाक करण्या आधी व नंतर स्वैपाकाच्या शेगड्या, केरसुण्या, केरभरणी, चपला, बूट, छत्र्या, रेनकोट, पाटणकरांची सायकल अशा असंख्य गोष्टी त्या व्हरांड्यात रचलेल्या असत. दर आठ पंधरा दिवसांनी या गोष्टी हळूहळू आमच्या मामाच्या बिर्‍हाडाच्या दरवाज्यापर्यंत पोचत. आमची मामी आणि पाटसकर बाई यांच्यात मग एक तात्विक चर्चा रंगे. या चर्चेचे फलित म्हणून पाटसकरांचे सामान मागे हटे. परत आठ पंधरा दिवसानी बघावे तो सामान परत पुढे आलेलेच असे.

दुसर्‍याच्या किंवा सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करण्याची वृत्ती आपल्या मातीतच असावी. कोणत्याही वाण्याचे दुकान बघा. दुकानाच्या बाहेर शेल्फ मांडून त्यावर माल हा मांडलेलाच असतो. रस्त्यावरचे कॅफे बघा. इमारतीच्या आराखड्यात वाहने ठेवण्याची जागा म्हणून मान्यता घ्यावयाची व नंतर खुशाल तिथे टेबले खुर्चा मांडून धंदा सुरू करायचा. म्युन्सिपालिटीच्या अतिक्रमण विभागाचे लोक आले की तेवढ्यापुरती टेबले हटवायची. ते लोक गेले की ये रे माझ्या मागल्या! अशा सार्वजनिक जागा बळकावल्यामुळे, पदपथावर चालणार्‍या पादचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागतो हे या लोकांच्या खिजगणतीतही नसते. आपला स्वार्थ आणि त्यासाठी अधिकार्‍यांना मॅनेज करण्याची तयारी यापुढे पादचार्‍यांना त्रास झाला काय किंवा नाही हे या मंडळींच्या दृष्टीने फारसे महत्वाचे नसते. पदपथावर पथारी मांडून बसलेले विक्रेते, सायकली दुरूस्त करणारे मेकॅनिक किंवा भेळ पाणीपुरीचे गाडीवाले यांनी आपल्या गरीबपणाच्या आणि गरजूपणाच्या छत्रीखाली पदपथ व्यापून टाकला तरी चालते. ते गरीब असल्याने त्यांना दुसरीकडे धंदा कसा परवडणार? पदपथ आहेच.

आपण जसे सहजपणे दुसर्‍या माणसाच्या किंवा सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू शकतो तसेच दुसर्‍याच्या वैयक्तिक आयुष्य़ावरही अतिक्रमण करू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र मते असतात व त्या मताप्रमाणे जगण्याचा त्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे याची जाणीवच आपल्याला नसते. आई देवभोळी असली की घरातील सर्वांनी बाहेर जाताना देवाला नमस्कार करूनच बाहेर पडावे अशी तिची अपेक्षा असते. मग घरातल्या इतरांचा त्यावर विश्वास असो वा नसो. घरात दोन तीन जावा असल्या आणि त्यातली एखादी देवावर विश्वास न ठेवणारी असली तर बाकीच्या जावांची अशी प्रामाणिक समजूत असते की तिला सुधारण्यासाठीच आपला जन्म झाला आहे. घरात नवीन आलेल्या सुनेला तर हा त्रास फारच सहन करावा लागतो. अलीकडे घटस्फोटांचे प्रमाण वाढते आहे याचे दुसर्‍याच्या वैयक्तिक अवकाशाबद्दल(Individual Space) असलेला अनादर हे एक प्रमुख कारण असावे असे मला वाटते.

अतिक्रमण, मग ते एखाद्या जागेवर असो किंवा दुसर्‍या माणसाच्या मनावर, हे सहिष्णुतेचे लक्षण आहे असे काही म्हणता येणार नाही. कदाचित बाबा आदमच्या जमान्यात माणूस एकमेकावर कुरघोडी करूनच जगत असल्यामुळे. ही वृत्ती ही आपल्या रक्तातच तेंव्हापासून आलेला असा एक गुण असावा. या वृत्तीचे नियंत्रण करण्यासाठी त्यावर निरंतर अंकुश ठेवणे हा एकच मार्ग मला दिसतो. अर्थात मी मधुमालतीच्या वेलावर नियंत्रण ठेवू शकतो. माणसाच्या मनावर कसे ठेवणार? त्यामुळेच स्वत:च्या मनाचा अंकुश हाच महत्वाचा ठरतो व अशी स्वत:चे मन नियंत्रित करू शकणारी माणसे ज्या समाजात असतात तोच समाज नागरी समाज म्हणून गणला जाऊ शकतो.

27 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “अतिक्रमण

  1. स्वत:च्या मनाचा अंकुश हाच महत्वाचा ठरतो व अशी स्वत:चे मन नियंत्रित करू शकणारी माणसे ज्या समाजात असतात तोच समाज नागरी समाज म्हणून गणला जाऊ शकतो.

    hmmmm
    विचार करतोय!

    Posted by आल्हाद alias Alhad | मार्च 27, 2010, 8:27 pm
  2. आपला मीपणा, मोठेपणा सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारांचा आधार घेतला जातो. उपद्रवीपणा म्हणजे मोठेपणा ही समाजवाद्यानी रूढ केलेली समजूत यामागे आहे.

    Posted by मनोहर | मार्च 29, 2010, 7:59 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: