.
Travel-पर्यटन

आड रस्ते


1975 सालात मला युरोपला जाण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. भारत त्यावेळी खादीच्या पडद्याआड लपलेला देश होता. परदेश प्रवास हा त्या वेळी अनावश्यक चैन आराम समजला जात असे. खोट्या समाजवादी कल्पनांच्या बुरख्याआड, डोळे मिटून बसलेल्या शासनाने, बाहेरची कवाडे बंदच करून टाकली होती. युरोपच्या या भेटीमुळे माझे डोळे खरोखरच उघडले. पाश्चिमात्य जगतात लोक रहातात कसे? ते आपले उद्योग धंदे कसे चालवतात? याचे जवळून निरिक्षण मला करता आले होते. या पाश्चिमात्य जगताच्या झगमगाटाची मोहिनी माझ्यावर निश्चितच पडली होती. परंतु त्याच वेळी तिथले काही विसंवादी सूरही मला खटकले होते.

मला वाटते की मी त्या वेळी फ्रॅंकफुर्ट शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन किंवा ‘Hauptbahnhof’ च्या जवळपासच्या रस्त्यांच्यावर, भारत सरकारच्या कृपेने खिशात डॉलर्सचा पूर्ण अभाव असल्याने, विंडो शॉपिंग करत भटकत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, संपूर्ण काचांच्या भिंती असलेली भव्य दुकाने होती. या दुकानांच्यात मला कल्पनाही करता येणार नाही इतक्या विविध प्रकारच्या अगणित ग्राहकोपयोगी वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. त्यातल्या वस्तू मजेत बघत मी आरामात फिरत होतो. त्याच वेळी एका कॉर्नरवरच्या दुकानाची काच ही बाजूच्या गल्लीपर्यंत वाढवलेली असल्याने मी त्या छोट्या गल्लीत शिरलो. त्या गल्लीत शिरल्यावर माझ्या लक्षात आले की ती छोटी गल्ली या मुख्य रस्त्याला समांतर असलेल्या एका दुसर्‍या रस्त्यावर पोचते आहे. जरा कुतुहलानेच मी त्या गल्लीतून त्या बाजूच्या रस्त्यापर्यंत चालत गेलो. त्या रस्त्यावर गेल्यावर माझ्या लक्षात आले की आपण एका दुसर्‍याच दुनियेत पोचलो आहोत. या बाजूच्या रस्त्याच्या दोन्ही बाजू, मंद प्रकाशाचे दिवे लावलेले दारुचे गुत्ते, पार्लर्स यांनी भरलेल्या दिसत होत्या. आजूबाजूला अनेक संशयास्पद मंडळी फिरत असताना दिसत होती. हे सांगायला नकोच की मी तिथून लगेच काढता पाय घेतला. शहरातील अतिशय प्रसिद्ध उच्च फॅशनच्या दुकानांच्या रांगा ज्या रस्त्यावर लागल्या आहेत त्या मुख्य रस्त्याच्या मागील बाजूस काही मीटर अंतरावर, जुगार व वेश्या व्यवसायासारख्या अनैतिक व्यवहारांचे केंद्र असलेला रस्ता असू शकतो हे माझ्या तरी कल्पनाशक्तीच्या बाहेरचे होते.

मी वाढलो होतो ते पुण्यात. त्या वेळचे पुणे हे काही म्हटले तरी एक परंपरावादी शहरच होते. पुण्यामधे बडे बडे लोक त्यावेळी कॅम्पातल्या मेन स्ट्रीटवर खरेदीवर जात असत. या मेन स्ट्रीटला पण दोन बाजूचे रस्ते आहेत. हे रस्ते मेन स्ट्रीटला जवळ जवळ समांतरच जातात. या रस्त्यांना ईस्ट स्ट्रीट व सेंटर स्ट्रीट अशी योग्य नावेही होती. हे दोन्ही रस्ते मेन स्ट्रीटच्या मानाने लहान आहेत आणि त्यांच्यावरची दुकाने पण छोटी आहेत. असे असले तरी हे दोन्ही रस्ते अतिशय सभ्य व कुटुंबाना फिरून खरेदी करता येईल असेच आहेत. या रस्त्यांच्यावरच्या दुकानांत तुम्हाला कपडे किंवा इतर घरगुती सामान मेन स्ट्रीटपेक्षा स्वस्तात पुष्कळदा मिळते. ईस्ट स्ट्रीटवर तर काही अतिशय छान हॉटेल्स पण आहेत. संपूर्ण कुटुंबे भोजनाचा आस्वाद घेताना येथे नेहमीच दिसतात. शहरातला मुख्य रस्ता असलेल्या लक्ष्मी रोडच्या दोन्ही बाजूंना पण असेच समांतर रस्ते आहेत. हे दोन्ही रस्ते असेच डिसेंट आहेत. या रस्त्यावर भरगच्च वस्ती आहे. त्यामधे असलेली छोटी दुकाने व हॉटेल्स ही पुण्यात नावाजलेली आहेत.

पुढच्या काही वर्षांत मला जगातली अनेक प्रसिद्ध शहरे बघायला मिळाली. त्यानंतर मला एक सत्य उमगले. कोणत्याही शहराचे व्यक्तीमत्व किंवा Character हे कसे आहे हे तुम्ही मुख्य रस्त्याच्या बाजूंना असलेल्या रस्त्यांच्यावरून एक फेरफटका मारलात की लगेच कळते. फ्रॅन्कफुर्ट शहर हे आज जरी गजबजलेले असले तरी त्याची वाढ दुसर्‍या महायुद्धातल्या संपूर्ण विनाशानंतर झालेली आहे. या शहराच्या आजूबाजूला अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिकांच्या युद्धानंतरच्या छावण्या अनेक वर्षे होत्या. व त्या वेळेस सबंध जर्मनीतच व्यापक अशी बेरोजगारी होती. या सर्व परिस्थितीतून आजचे फ्रॅन्कफुर्ट शहर निर्माण झालेले आहे. त्यामुळेच त्याचा विकास असा काहीतरी विचित्र स्वरूपात झालेला आहे. युरोपमधल्या, युद्धात नष्ट होऊन परत विकास झालेल्या इतर अनेक शहरांच्यात सुद्धा, फ्रॅन्कफुर्ट सारखीच परिस्थिती आहे.

मात्र ज्या शहरांना काहीतरी स्वत:चा म्हणून इतिहास असतो अशी शहरे बहुदा स्वत:ची Character कायम राखतात. याची उत्तम उदाहरणे म्हणजे जर्मनीतलेच म्युनिख किंवा इटलीमधले रोम ही शहरे. रोम मधे मोठे सुंदर बाजूचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्यावर असलेली छोटी दुकाने व कॅफेटेरिया नेहमीच पर्यटकांचे लक्ष खेचून घेतात. रोममधला असाच एक छोटा बाजूचा रस्ता तुम्हाला एका मोकळ्या चौकात घेऊन जातो. या चौकाचे नाव आहे ‘Piazza Novena’. हा चौक पर्यटकांमधे अतिशय लोकप्रिय आहे. यात मध्यभागी असलेले एक कारंजे, आजूबाजूला ऑइल किंवा वॉटर कलर्सनी चित्रे रंगवणारे कलाकार, वाद्ये वाजवणारे कलावंत आणि पर्यटकांची गजबज यामुळे हा चौक इतका नयनमनोहर दिसतो की विचारू नका. चौकाच्या चारी बाजूंना असलेले कॅफे गर्दीने नुसते फुललेले असतात.

तरी मला सर्वात भावतात व रूचीपूर्ण वाटतात ते विद्यापीठांच्या कॅम्पसच्या भोवतीच्या गावांमधले आड रस्ते. अमेरिकेतल्या शिकागो शहराचे इव्हॅन्स्टन म्हणून एक उपनगर आहे. या उपनगरातच नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाचा कॅम्पस आहे. या उपनगरातील आडरस्त्यांवर, दुर्मिळ जुन्या पुस्तकांची दुकाने, कॅमेरे विकण्याची दुकाने आहेत. या दुकानांचा फेरफटका अतिशय रोचक असतो. या इव्हॅन्स्टनमधे येण्याच्या आधी मी शिकागो डाउनटाउनचा भाग बघितला होता. हा भाग मला तर इतका संशयास्पद वाटला होता की सारखा जीव मुठीत घेउनच मी तेथे फिरत होतो. इव्हॅन्स्टन हे किती छान उपनगर आहे याची जाणीव तिथल्या आडरस्त्यांवरून चक्कर मारली की लगेच येते. या उपनगरासारखाच एक छान रस्ता स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेला युनिव्हर्सिटी ऍव्हेन्यू हा आहे. पालो अल्टो गावातला हा रस्ता मला अतिशय आवडतो. हा खरे म्हणजे आडरस्ता नाही आणि त्याच्या एका टोकाला म्हणजे पूर्व पालो आल्टोमधे झालेल्या आयकिया सारख्या भव्य दुकानांमुळे त्याचे स्वरूप आता बदललेही आहे. तरी या रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या इन्ट्रेस्टची खूप छोटी दुकाने या रस्त्यावर अजून आहेत.

माफिया किंवा दादा लोकांच्या अंमलाखाली असलेले आडरस्ते बहुतेक मोठ्या गावांच्यात असतातच. परंतु हे रस्ते शहराच्या मुख्य भागात सहसा असत नाहीत. या ठिकाणी शहरामधले सभ्य नागरिक फारसे फिरकत नाहीत. पण अतिशय वेगाने होणार्‍या नगरीकरणामुळे , काही शहरांचा विकास फ्रॅन्कफुर्टसारखा विचित्र होतो हे मात्र खरे.

बाजूच्या किंवा आडरस्त्याचे मला अजूनही विलक्षण आकर्षण आहे. कुठल्याही नव्या शहरात गेलो की मी या आडरस्त्यांवरून एखादी चक्कर तरी टाकतोच. या रस्त्यांनी, ते शहर पन्नास किंवा सत्तर वर्षापूर्वी कसे होते ते जुनेपण राखून ठेवलेले असते. त्या जुनेपणाची मजा चाखणे काही औरच असते. तुम्हाला कोणत्याही शहराच्या आत्म्याची ओळख करून घ्यायचे असेल तर मुख्य रस्ते विसरा, ते सर्व शहरांच्यात एकसारखेच असतात, आणि आडरस्त्यांची वाट धरा.

14 मार्च 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “आड रस्ते

  1. तुमचा ब्लॉग नेहमीच वाचतो. अतिशय उत्कृष्ट लिहिता तुम्ही…

    Posted by Nikhil Sheth | मार्च 21, 2010, 9:52 pm
  2. आपले निरिक्षण आवडले.

    Posted by shrirang Khandekar | मार्च 23, 2010, 7:39 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: