.
Musings-विचार

टोकाचा अचरटपणा


असे म्हणता येईल की की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील रेषा फार पुसट असते. पण श्रद्धा म्हणजे तरी काय? असाही प्रश्न आहेच. श्रद्धेची व्याख्या करणे फार अवघड काम आहे. श्रद्धा ही कशावरही असू शकते. दगडाच्या देवावर असू शकते, एखाद्या पवित्र समजल्या जाणार्‍या पुस्तकावर असू शकते, एखाद्या क्रूसासारख्या सांकेतिक चिन्हावर असू शकते किंवा अल्लाह सारख्या संकल्पनेवर असू शकते. इतरांना निरर्थक वाटणार्‍या एखाद्या कर्मकांडावरही श्रद्धा असू शकते. श्रद्धा एखाद्या माणसावरही असू शकते. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी केलेल्या बालविधवांच्या उद्धाराच्या कार्यामुळे स्वत:चे सर्व जीवनच बदलून गेलेल्या काही महिलांना त्यांच्याबद्दल वाटणारी श्रद्धा मी माझ्या लहानपणी बघितली आहे. ही श्रद्धा परमेश्वराबद्दल एखाद्याला वाटणार्‍या श्रद्धेपेक्षा रतीभरही कमी असेल असे मला वाटत नाही.

श्रद्धा ठेवणारा माणूस किंवा श्रद्धाळू तसा एक प्रकारे निष्काळजीच असतो. त्याच्यावर आलेल्या कोणत्याही संकटातून त्याची श्रद्धा असलेली संकल्पना किंवा व्यक्ती त्याला तारून नेईल असा त्याचा गाढ विश्वास असतो. त्यामुळेच श्रद्धाळू माणसाची श्रद्धा जोपर्यंत श्रद्धाच राहते तोपर्यंत त्याचे जीवन सुखी समाधानी राहते. काही व्यक्तींची श्रद्धा एखाद्या बाबा किंवा महाराज या नावाने वर्गीकरण करता येईल अशा व्यक्तींच्यावर असते. ही श्रद्धा का बसते हे मला कधीही न समजलेले आश्चर्य आहे. परंतु ती बसते हे मात्र सत्य आहे. यातले काही बाबा किंवा महाराज यांच्यात काहीतरी असमान्यत्व असू शकते. पण बरेचसे बाबा दुनिया झुकती है. झुकानेवाला चाहिये.” या तत्वाचे पालन करणारे असतात. थोडे फार दिवस त्यांची चलती असते. मग कधीतरी त्यांचे भांडे फुटते. त्या बाबाचे फारसे वैयक्तिक नुकसान होत नसावे. परंतु त्यांच्या भक्तगणांना मात्र अनाथतत्व प्राप्त होते. ढोबळ मानाने असे म्हणता येईल की श्रद्धेमधे कोणतेही कर्मकांड घुसले की त्या श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. एखाद्या दगडाच्या मूर्तीबद्दल, ते जागृत दैवत आहे म्हणून श्रद्धा असू शकते व काही मर्यादेपर्यंत अशी कोणतीतरी श्रद्धा माणसाच्या आयुष्याला मानसिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदतही करते. परंतु त्याच मूर्तीसमोर ठेवलेला अन्नपदार्थ म्हणजे काहीतरी दैवी गोष्ट आहे असे मला वाटू लागते तेंव्हा या श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत झालेले असते यालाच इंग्रजीत प्लॅसेबो (Placebo) परिणाम असे नाव आहे.

वैयक्तिक अंधश्रद्धा एक वेळ मान्य करता येते कारण त्या अंधश्रद्धेने होणारे नुकसान त्या माणसाचेच होत असते. परंतु जेंव्हा हीच अंधश्रद्धा एखाद्या समाजाच्या वर्तनाचा भाग होते तेंव्हा त्याला मूर्खपणा किंवा अचरटपणाचेच स्वरूप प्राप्त होते. भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तरेस असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यात, सुंगठण या नावाचे एक गाव आहे. या गावात सिद्धप्पा मुट्या या बाबाने बांधलेले एक मंदीर आहे. हा बाबा मुळात गुलबर्गा जिल्ह्यातल्या बिडनुर या गावचा होता. तो तेथून निघून सुंगठण या गावात येऊन राहिला होता. या मंदीरातल्या मूर्तीची पालखी यात्रा दरवर्षी या महिन्यात होणार्‍या मंदीराच्या वार्षिक महोत्सवात निघते. ही पालखी यात्रा सुंगठण गावापासून निघते व 70 किलोमीटर वर असलेल्या मुद्देबिहाळ तालुकातल्या, तांगडगी या गावातील एका मंदीरापर्यंत जाते. ही गाव कृष्णा नदीच्या काठावरच वसलेले आहे.


ही पालखी यात्रा तांगडगी गावाच्या जवळच व कृष्णा नदीच्या काठावरच असलेल्या कुंचागुनुर या गावाजवळ पोचली की पालखीतल्या मूर्तीला स्नान घालण्यात येते. यानंतर पूजा होऊन मूर्तीला दारुचा नैवेद्य दाखवण्यात येतो. नंतर ही दारू सर्व पालखी वाहून नेणार्‍यांना व भक्तगणाना वाटण्यात येते. अगदी लहान मुले सुद्धा ही दारू, तीर्थ म्हणून प्राशन करतात. त्या नंतर अर्थातच सर्व जण याच गावात मुक्काम करतात. दुसर्‍या दिवशी सकाळी ही पालखी पुढे जाण्याच्या वेळी, पंचक्रोशीतल्या स्त्रिया तिथे जमा होतात. या सगळ्या महिलांनी या पालखी यात्रेसाठी लवकर उठून स्नान केलेले असते व ठेवणीतले कपडे नेसून त्या जमा झालेल्या असतात.

यानंतर जमा झालेल्या या सर्व स्त्रिया, पालखीच्या मार्गावर ओळीने पालथ्या झोपतात व पालखीवाहक तरूण पुरुष या महिलांच्या अंगावरून पाउले टाकत पालखी पुढे तांगडगी गावापर्यंत नेतात. ज्यांच्या पाठीवरून हे तरुण चालत जातात त्या बायकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते व कोणतेही लज्जास्पद कृत्य केल्यासारखे वाटत नाही किंवा शारिरीक दुख: जाणवत नाही.


आता हे वर्णन वाचून हसावे का रडावे असे वाटणे साहजिकच आहे. लोकसभेत स्त्रियांना 33% आरक्षण देण्याच्या एकीकडे चर्चा चालल्या आहेत.तर दुसरीकडे सुंगठणकुंचागुनुर परिसरातल्या स्त्रिया आपल्या अंगावरून पालखीवाहकांनी चालत जावे म्हणून धडपडत आहेत. धन्य त्या सिद्धप्पा मुट्या बाबाच्या भक्त स्त्रिया आणि धन्य त्यांचे गाव. एवढेच म्हणणे मला तरी शक्य आहे.

17 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “टोकाचा अचरटपणा

 1. धन्य त्या सिद्धप्पा मुट्या बाबाच्या भक्त स्त्रिया आणि धन्य त्यांचे गाव. एवढेच म्हणेन मी हि

  Posted by vikram | मार्च 17, 2010, 2:43 pm
 2. खरेच, लोक एखाद्या बुवा-महराज यांच्या नादी का लागत असावेत, किंवा त्यंच्यावर का श्रद्धा ठेवत असावेत हे मलाही न उल्गडलेले कोडे आहे!
  मी असे बरेच जवळचे लोक बघितलेले आहेत्, जे डोळे मिटून विश्वास ठेवायला तयार ज़ाले, कुठलाही किम्तु मनात न आणता!

  वरील प्रकार त्याचेच टोकाचे उदाहरण मानावयास हवे!

  Posted by Ashwini | मार्च 17, 2010, 3:21 pm
 3. आता तर रामदेव बाबा पक्ष काढताहेत आता हा आचरट पणा आणखी बोकाळेल. आसाराम बापूंनी लाटलेली‌ जमीन सरकार ने परत त्याब्यात घेतल्याचे नुकतेच् वाचनात आले आहे. त्यांची‌ नवा पक्ष स्थापन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

  Posted by Mahendra Paranjp | मार्च 17, 2010, 6:11 pm
 4. श्रद्धेचा आधार आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी घेतला जातो. तो आधार विचासरणी बंदिस्त करण्यासाठी घेतला की श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होते. अगदी अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ घेतलेल्यांनीदेखील आपल्या श्रद्धेचा वापर विचारसरणी बंदिस्त करण्याकरिता केल्याने कोणी कोणाला हसावे हा प्रश्र्नच आहे.

  Posted by मनोहर | मार्च 17, 2010, 10:44 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: