.
Musings-विचार

नावात एवढे आहे तरी काय?


मराठीत एक म्हण आहे वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो.’ कोणत्याही गोष्टीला आलेला नाम महिमा खरे तर हा त्या गोष्टीच्या इतिहासावर किंवा महत्वावर अवलंबून असतो. आणि व्यक्तींच्या बाबतीत तर केवळ त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर हा नाममहिमा अवलंबून असतो. एखाद्या फडतुस गोष्टीला मोठे नाव दिल्याने तिचे महत्व वाढत नाही. एखाद्या भर रस्त्यावर असलेल्या व अगदी बारिकशा व एकंदरीत गचाळ स्वरूप असलेल्या खाणावळीला ताज मटन हाऊस असे नाव दिल्याने तिचे ताज महाल हॉटेल होत नाही.

पण नावाच्या बाबतीत माणसेच काय, देश सुद्धा मोठे संवेदनाशील असतात हे ही खरेच आहे. काही दिवसांपूर्वी तेहरान मधल्या एका बजेट विमान कंपनीत काम करणार्‍या विमान कर्मचार्‍याने इराणच्या किनार्‍याला लागून असलेल्या पर्शियन खाडीला चुकून अरबी खाडी या नावाने संबोधले. या त्याच्या साध्या चुकीमुळे एवढा गदारोळ उडाला की या विमान कर्मचार्‍याची नोकरी जाण्याची वेळ आली. इराणी सरकारने एक फर्मान काढले. त्यात स्पष्ट सांगण्यात आले की या पुढे जर अशी चूक कोणी विमान कंपनी कर्मचार्‍याने केली तर त्या कंपनीला 30 दिवस इराणी वायुहद्दीत येता येणार नाही आणि जर परत अशी चूक झाली तर त्या विमान कंपनीची इराणमधे जमीनीवर उभी असलेली विमाने जप्त करण्यात येतील आणि त्यांचे सर्व परवाने रद्द करण्यात येतील. या एवढ्या किरकोळ बाबीला एवढे मोठे स्वरूप देण्यात आले याच्या मागे एक कारण आहे.


..पूर्व500 या कालात ग्रीक भूगोलतज्ञांनी प्रथम इराणला पर्शिया व इराणच्या खाडीला पर्शियन खाडी या नावाने संबोधण्यास सुरवात केली होती. व ही नावे अजुनही रूढ आहेत. या खाडीच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या सौदी अरेबिया, कातार, यूएई आणि कुवेत सारख्या देशांना हे नाव अजिबातच पसंत नाहिये. त्यांच्या मताने या खाडीला अरबी खाडी म्हणणेच योग्य होणार आहे. इराणच्या अधक्षांनी यावर टीका टिप्पणी करताना हे सगळे देश म्हणजे देश आहेत का? ही तर छोटी छोटी पिल्ले आहेत असे उदगार काढले. ते या देशांना साहजिकच रुचलेले नाहीत. या वर्षीच्या सुरवातीला तेहरानमधे इस्लामिक सॉलिडॅरिटी खेळ होणार होते. त्या खेळात जी पदक़े देण्यात येणार होती त्यावर पर्शियन खाडी हे शब्द घातले होते. त्याच्या निषेधार्थ या सर्व देशांनी खेळावर बहिष्कार घातला व शेवटी खेळ रद्द करावे लागले.


खाडीच्या नावाचा चटका नॅशनल जिओग्राफिक सोसायटीलाही बसला आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या जगाच्या नकाशात या खाडीला दिलेल्या नावात पर्शियन या प्रमुख नावाबरोबरच अरेबियन असेही अल्टरनेट नाव दाखवण्यात आले होते. त्यामुळे इराणी सरकारचा भडका उडाला. त्यांनी नॅशनल जिओग्राफिक मॅगेझिनच्या इराणमधल्या विक्रीवर बंदी घातली व त्यांच्या वार्ताहरांना इराणमधे येण्यास बंदी घातली. शेवटी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने माघार घेतली व पुन्हा आपण असे करणार नाही असे इराणी सरकारला सांगितल्यावर हा वाद मिटला. या नंतर प्रसिद्ध झालेल्या नकाशांच्यात या खाडीला नावच दाखवण्यात येत नाही. अमेरिकन सरकार इराणच्या कितीही विरोधी असले तरी खाडीच्या नावाच्या बाबतीत मात्र त्यांचे मत हे नाव पर्शियन खाडी असेच असल्याबद्दल पक्के आहे. गूगल मात्र त्यांच्या नकाशात दोन्ही नावे इराणने कितीही आग पाखडली तरी अजून दाखवतो. संयुक्त राष्ट्र संघटना सुद्धा इराणच्या बाजूनेच आहे. त्यांनीही या खाडीचे नाव पर्शियन खाडी असेच असल्याचे सांगितले आहे.


इराण सरकार या खाडीच्या नावाबद्दल इतके संवेदनाशील आहे की त्यांनी 29 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पर्शियन खाडी दिवसअसल्याचे घोषित केले आहे व त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी दिली आहे. गूगलवर अरेबियन खाडी असा शोध घेतला तर फार रोचक संकेतस्थळे उपलब्ध होतात. त्यावरूनच या प्रश्नाची गंभीरता लक्षात येते. विमान कंपन्यांनी तर आता या खाडीला द गल्फया नावानेच संबोधण्यास सुरवात केली आहे. या सगळ्या वादात कुठेतरी धार्मिक असहिष्णुता पण लपली आहे असा मला तरी संशय येतो. इराण हा देश शिया मुसलमानांचा आहे तर खाडीपलीकडले देश सुन्नी मुसलमान आहेत. या दोन्ही पंथाचे काही आपापसात बरे नाही. हा धार्मिक विसंवाद पण बहुदा या वादाच्या मागे असावा.

काही वर्षांपूर्वी इंडोनेशियन सरकारने आपल्या देशाचा समुद्रकिनारा भारतापेक्षा जास्त मोठा असल्याचे हिंदी महासागराचे नाव Indian Ocean आहे ते बदलूनIndonesian Ocean करावे म्हणून एक आंतर्राष्ट्रीय मोहीम चालू केली होती परंतु बाकीच्या कोणत्याच देशांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांना ती सोडून द्यावी लागली होती या घटनेची आठवण मला या इराणच्या खाडीच्या वादामुळे झाली.

आपल्याकडच्या एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राच्या राजधानीसाठी मुंबई हेच नाव सर्वांनी वापरले पाहिजे यासाठी जे आंदोलन चालवले आहे ते बघता नावाला किती महत्व आहे हे लक्षात येते. इंग्रजीमधे नावात एवढे आहे तरी काय?’ असा एक वाक्प्रचार आहे. प्रत्यक्षात मात्र नावातच सर्व काही आहे (आणि ते कोणत्या लिपीमधे लिहावयाचे त्यातसुद्धा.) असेच म्हणावेसे वाटते.

16 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “नावात एवढे आहे तरी काय?

 1. Nice subject…nice pics

  Posted by Arun | मार्च 16, 2010, 3:33 pm
 2. हिंदी महासागर, किंवा इंडिया अस आपण म्हणतो. पण अनेक देशात अजूनही आपण ‘हिंदुस्तानच’ आहोत. आपण अस शेळीच कातड का पांघरतो कुणास ठाऊक. नावात खरंच खूप काही आहे. चांगला विषय निवडलात. आणि लेखही मस्त झाला आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. नव्या वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा….

  Posted by हेमंत आठल्ये | मार्च 16, 2010, 4:24 pm
 3. ajun ek reason mhanaje sassanid empire chi legacy iran madhye ajun strong ahe…despite being muslims,
  they know that they belong to a civilisation superior to that of arabs. Ferdowsi ne Shahnama lihun ji jagruti keli ticha yat motha wata ahe.

  mi jithe shikto tithe eka irani mulisobat asech bolane zale ani arabian sea cha vishay nighala tar ti mhanali ki tyache nav arabian sea ase nasun persian sea ase pahije..tevha lakshat nahi ale pan ata ale..thanx for reminding me of it, though by chance only.

  Posted by nikhil bellarykar | जुलै 11, 2010, 5:17 सकाळी
  • निखिल

   काही राष्ट्रांना त्यांच्या इतिहासातल्या काहीतरी असामान्य घटनांमुळे आपला देश कसा सर्वश्रेष्ठ आहे असे निष्कारण वाटत असते. त्यातलाच हा प्रकार आहे. मला असे वाटते की भारताचा अरबस्थानाशी व्यापार इ.स.पूर्व 3000 (मोहेंजोदाडो काल) पासून चालू आहे. हा व्यापार करण्यासाठी अरबी व्यापारी भारताच्या किनार्‍यावर पडावांच्यातून येत राहिले आहेत. या अरबी व्यापार्‍यांच्यामुळे या समुद्राला अरबी समुद्र असे नाव भारतात पडले असावे व ते नंतर रूढ झाले असणार. इराणी लोकांची या बाबतीतली भूमिका अतिशय भिन्न असू शकते.

   Posted by chandrashekhara | जुलै 11, 2010, 10:13 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: