.
अनुभव Experiences

खरेखुरे सुपरस्टार्स


कल्पना करा की तुम्ही अतिशय कंटाळलेल्या किंवा वैतागलेल्या अवस्थेत तुमच्या घरात शिरत आहात. हॉलमधे तुम्हाला टीव्ही चालू दिसतो त्यावरून तुम्हाला आरडाओरडा व किंचाळ्य़ा ऐकू येतात. तुम्ही नक्की घरातल्या मंडळींच्यावर चिडून, काय त्रास आहे म्हणून टीव्ही बंद करण्यासाठी रिमोट हातात घेता. पण समोर नजर टाकल्यावर, टीव्हीवर जे चित्र दिसते आहे ते बघितल्यावर तुमच्या चेहर्‍यावरची चीड, वैताग, जादूची कांडी फिरवल्यासारखी गायब होते व तिथे मनमोकळे हास्य उमटते. तुम्ही असाल तसेच व तिथेच थबकता. हातातला रिमोट खाली ठेवून देता. टीव्हीवर समोर दिसणार्‍या दोन खर्‍याखुर्‍या सुपरस्टार्सना, तुम्ही पूर्वी शे पाचशे वेळा तरी बघितलेले असते. त्यांचा सध्या चालू असलेला शो सुद्धा तुम्ही तेवढ्याच वेळा बघितलेला असतो. तरीसुद्धा परत एकदा तेवढ्याच तल्लीनतेने तुम्ही त्या शो मधे परत एकदा गुंगून जाता, बुडून जाता.

या वर्णनावरून हे सुपरस्टार्स कोण असावेत? याचा अंदाज बांधणे काही फारसे कठिण नाही. असे म्हटले तरी चालेल की परंतु यासम हे‘, असे दोनच सुपरस्टार आतापर्यंत निर्माण झाले आहेत आणि या दोघांच्या शिवाय आणखी कोणी परत निर्माण होतील असे वाटत नाही. या वर्षी या दोन सुपरस्टार्सना ते चलच्चित्र पडद्यावर प्रथम अवतीर्ण झाले त्याला तब्बल सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजे एका अर्थाने आपले लाडके टॉम व जेरी यांचा या वर्षी सत्तरावा वाढदिवसच आहे. एखाद्या दीड ते दोन वर्षाच्या बाळापासून ते कानाने काहीही ऐकू न येणार्‍या व अंधुक अंधुक दृष्टी असणार्‍या नव्वदीतल्या आजींपर्यंतच्या सर्वांवर, आपली मोहिनी टाकणारे हे दोन सुपरस्टार्स खरोखर अजरामजरच आहेत.


टॉम व जेरी रुपेरी पडद्यावर 1940 साली पहिल्यांदा अवतीर्ण झाले. हॉलीवूड मधल्या MGM या स्टुडियो साठी William Hanna and Joseph Barbera या दोन प्रोड्युसर्सनी प्रथम या दोन कार्टून व्यक्तीरेखा निर्माण केल्या. त्या लवकरच इतक्या लोकप्रिय झाल्या की पुढच्या एकोणीस वर्षात म्हणजे 1959 सालापर्यंत या दोघांनी मिळून तब्बल 114 टॉम व जेरीच्या कार्टून फिल्म्स तयार केल्या. यानंतर पूर्व युरोपमधे व परत हॉलीवूडमधे मिळून थोड्याफार फिल्म्स तयार केल्या गेल्या. आज एकूण 161 टॉम व जेरीच्या फिल्म्स अस्तित्वात आहेत.


मांजर व उंदीर यातल्या चिरंतन भांडणाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या कार्टून व्यक्तीरेखांना थोडेफार निराळे व्यक्तीमत्व आहे. टॉम मांजर आपल्या शक्तीच्या जोरावर, जेरीवर कुरघोडी करण्याच्या सतत प्रयत्नात असतो पण आपल्या अफाट बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर जेरी उंदीर टॉमचे प्लॅन्स नेहमीच उधळून लावण्यात यशस्वी होतो. आपल्या लढाईसाठी दंडुक्यापासून ते तोफगोळ्यापर्यंतचे कोणतेही हत्यार त्यांना चालते. त्या लढाईत घर उध्वस्त होते, रस्ते उखडतात. या लढाईसाठी दोघेही दुष्टपणाचे प्रथम क्रमांकाचे जागतिक पारितोषिक मिळू शकेल अशा क्लुप्त्या सतत लढवत असतात. या क्लुप्त्यांमुळे या फिल्म्समधे प्रचंड व्हायोलन्स दिसतो अशी काही लोकांची तक्रार असते. पण कोणत्याही लहान मुलाला या व्हायोलन्सचे काहीच सोयर सुतक वाटलेले मी कधीच बघितलेले नाही. उलट ती मुले नेहमीच अशी दृष्ये कमालीची एन्जॉय करताना दिसतात.


या फिल्म्स्मधे काही इतर पात्रेही दिसतात. त्यापैकी एक म्हणजे फिल्ममधे फक्त बूट व पाय दिसणारी टॉमची मालकीण. या मालकीणीला टॉम कमालीचा घाबरतो. बर्‍याच फिल्म्समधे, जेरीच्या उद्योगांमुळे मालकीणीने टॉमला घरातून हाकलून दिलेले दिसते. या शिवाय स्पाईक किंवा किलर या नावाचा एक बुलडॉग काही फिल्म्समधे दिसतो. हा कुत्रा मठ्ठपणाचा आदर्श समजावा. त्याचे अर्थातच टॉमशी हाडवैर असते. त्याला फसवण्याचा टॉमचा प्रयत्न अनेक फिल्म्समधे दिसतो तर त्याला वापरून टॉमवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात जेरी नेहमीच असतो. या सर्व फिल्म्सना परिणाम साधण्यासाठी संगीत व आवाज घातलेले असतात. प्रत्यक्षात टॉम व जेरी कधीच काही बोलत नाहीत. मात्र काही वेळेला प्रसिद्ध गाणी पार्श्वसंगीत म्हणून वापरलेली आढळतात. ” ऑलिव्हेत्त, जन्तील, ऑलिव्हेत्त!” हे असेच एका फिल्ममधले मला आठवणारे गाणे. टॉम व जेरी यांच्यात तुंबळ युद्ध नेहमीच चालू असले तरी फिल्मच्या टायटलमधे ते दोघे एकमेकाकडे हसून बघताना दिसतात. कोणी कॉमन शत्रू आला की दोघे मिळून त्याचा निप्पात करतात. एका फिल्ममधे तर टॉम जखमी झाला म्हणून जेरी त्याला फर्स्ट एड देताना दाखवला आहे.

मी टॉम व जेरीला प्रथम बघितले ते 16 मिमि च्या फिल्ममधे. भिर्र भिर्र आवाज करत चालणार्‍या प्रोज़ेक्टर्सवरून या फिल्म तेंव्हा दाखवल्या जात. आज आपण डीव्हीडी प्लेयर्समुळे या फिल्म्स घरी कधीही बघू शकतो. दृष्य माध्यम कोणतेही असले तरी फिल्म्सची गोडी तशीच अवीट राहली आहे याबद्दल वादच नाही.

माझ्या चार वर्षाच्या नातीला, जेवताना टॉम ऍन्ड जेरी हे लागतातच. समोर या दोघांची धावपळ चालू असली की जेवण कसे बिनबोभाट, कोणतीही खळखळ न होता पार पडते. पण एवढे मात्र खरे की नात जेवायला लागली की आजी आजोबांची पाउले हातातले काम टाकून आपसुकच हॉलकडे वळतात. कोणाच्या लक्षात येण्याच्या आधीच ते दोघेही कोचावर हळूच विराजमान होतात व नातीच्या जोडीने टॉम व जेरीबरोबर हसू खिदळू लागतात.

14 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: