.
Musings-विचार

इंटरनेटवरचे गुन्हेगार व अतिरेकी


दहा पंधरा दिवसापूर्वी माझ्या मेल बॉक्समधे एक अतिशय असाधारण वाटणारी अशी मेल मला दिसली. ती मेल आली होती माझ्या चांगल्या परिचित असलेल्या एका डॉक्टर विदुषींकडून. त्या मेलचा गोषवारा साधारण असा होता की त्या विदुषी परदेश प्रवासात असताना त्यांचे पैसे व पासपोर्ट चोरीला गेले होते व त्यांना 2000 अमेरिकन डॉलर्सची अगदी लगेच नितांत गरज होती. मी तेवढे ,किंवा जमतील तेवढे, पैसे लगेचच त्यांना सांगितलेल्या पत्यावर वायर करावे अशी त्यांची इच्छा होती.

ही मेल बघून मी जरा चक्रावलोच. कारण दोन दिवसापूर्वीच या महिला मला एका सभेत भेटल्या होत्या. व त्या वेळी आपण परदेशाला जाणार असल्याचे वगैरे त्या काहीच बोलल्या नव्हत्या. मी ताबडतोब त्यांना मोबाईलवरून फोन केला. त्या तर भारतातच होत्या. त्यांना मेलबद्दल सांगितले. तेंव्हा त्या म्हणल्या की बरे झाले तुम्ही फोन केला ते, कारण त्यांचा मेल अकाऊंट त्यांना उघडताच येत नाहिये.” त्यांनी ताबडतोब सर्व ओळखीच्या लोकांना दूरध्वनी करून आपला मेल अकाऊंट हॅक झाल्याचे कळवले. त्यानंतर आणखी दोन दिवसानी दुसर्‍या एका परिचितांचा अकाऊंट पण असाच हॅक झाल्याचे समजले.

इंटरनेटवर गुन्हेगारी व दुष्ट प्रवृत्तीची किती माणसे दुसर्‍याला लुबाडण्याच्या संधी शोधत फिरत असतात? याची एक चुणूकच मला त्या दिवशीच्या या मेल मुळे मिळाली. अर्थात तसे बघायला गेले तर यात आश्चर्य वाटण्यासारखे असे काहीच नाही. इंटरनेट हे शेवटी माणसेच वापरतात त्यामुळे मानवी मनाचे प्रतिबिंब त्यात पडणारच. समाजात वावरताना आपण अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपासून स्वत:चा बचाव दर क्षणाला करत असतोच. त्याच पद्धतीने इंटरनेटवर वावरताना पण स्वत:चा बचाव करणे आवश्यकच आहे.

इंटरनेटवर जसे गुन्हेगार वावरत असतात तसे अतिरेकी मनोप्रवृत्तीचे लोकही वावरत असतात. मात्र हे लोक तुम्हाला फसवायचा प्रयत्न न करता आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकारच्या लोकांनी चालवलेल्या संकेत स्थळांची सफर करताना सावधपणा अंगी बाळगणे जरूरीचे असते.

मध्यंतरी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीराबद्दल इंटरनेटवर माहिती शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. या शोधात मला काही छान फोटो व उल्लेखनीय माहिती सापडली ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या बरोबरच अशी अनेक संकेत स्थळे सापडली ज्यावर लिहिलेला मजकूर संपूर्णपणे एकांगी व एका विशिष्ट दृष्टीकोनाचा प्रचार आणि पाठपुरावा करण्यासाठी लिहिलेला आहे हे स्पष्टपणे कळत होते. ज्या वाचकांना या विषयाबद्दल काहीच माहिती आधी नाही अशा वाचकांची मने व मते कलुषित करण्यासाठी या संकेतस्थळांचा प्रपंच केला जात आहे हे अगदी उघडपणे कळत होते. या अशा संकेतस्थळांच्या लेखकांना इंटरनेटवरचे अतिरेकीच म्हणले पाहिजे.

अलीकडेच, भारत सोडून दुसर्‍या एका देशाचे नागरिक बनलेले एक सुप्रसिद्ध चित्रकार किंवा दुसर्‍या एका देशातील पण भारतात आश्रय घेऊन रहाणार्‍या एका लेखिकेबद्दल, ट्विटर सारखी इंटरनेटची जी सोशल नेट्वर्किंग माध्यमे आहेत त्यावरून, जो तिरस्कारयुक्त संदेशांचा लोंढा पाठवला गेला होता तो याच म्हणजे अतिरेकी मनोवृत्तीचाच निदर्शक आहे.

इंटरनेट हे माध्यम खरे म्हणजे अत्यंत शक्तीमान असे माध्यम आहे. एकाधिकार राज्यपद्धतीचे भोक्ते असलेल्या चीन किंवा इराण यांच्यासारख्या देशांना सुद्धा या माध्यमाने अक्षरश: पळता भुई थोडी केली आहे. इंटरनेटच्या या शक्तीचा दुरुपयोग आपल्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी अनेक लोक करू बघत आहेत व सध्या तरी त्यांना त्यांच्या या उद्योगांपासून परावर्तीत करता येईल अशी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे सतर्क राहून अशा लोकांच्या उद्योगापासून स्वत:चे वैचारिक किंवा आर्थिक नुकसान होणार नाही ना या कडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

इंटरनेटचा अतिरेकी उपयोग तर केला जातो आहेच. पण याचे अतिशय सौम्य व निरुपद्रवी असे स्वरूपही काही वेळा दृष्टीस येते. मी माझे काही ब्लॉग वर्डप्रेस च्या माध्यमातून लिहित असतो. त्यावेळी मनुष्य स्वभावाचे काही गमतीचे नमुने अनुभवण्यास मिळतात. वर्डप्रेस डॅशबोर्डवर, नुकतेच पोस्ट झालेले ब्लॉग म्हणून 15 किंवा 20 ब्लॉग्सची एक यादी प्रसिद्ध केली जाते. त्या यादीत फक्त आपलेच नाव दिसत रहावे म्हणून दोन दोन ओळींची दहा, पंधरा ब्लॉगपोस्ट एका पाठोपाठ पाठवणे हा उद्योग काही ब्लॉगर करताना दिसतात. नसेच नवर्‍याचा (किंवा बायकोच्या) ब्लॉगपोस्टला खूप प्रतिसाद आलेले दिसावे म्हणून बायकोचा प्रतिसाद व नवर्‍याचे तिला परत उत्तर अशी साखळी चालू ठेवण्याचा प्रकारही दिसतो. अर्थात या असल्या माकडचेष्टांनी ब्लॉगची गुणवत्ता सुधरत नसते व इतर वाचकांना हे लोकप्रियता वाढवण्याचे प्रकार फक्त केविलवाणे व हास्यास्पद वाटतात हे लक्षात ठेवले पाहिजे.

इंटरनेटवरच्या अतिरेक्यांचा बंदोबस्त कसा करता येईल या विषयी गूगल किंवा याहू सारख्या कंपन्या सतत प्रयत्न करत आहेत. परंतु जो पर्यंत असे काही प्रभावी उपाय सापडलेले नाहीत तोपर्यंत प्रत्येक वाचकानेच स्वत:ची काळजी घेणे जरूरीचे वाटते.

14 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “इंटरनेटवरचे गुन्हेगार व अतिरेकी

 1. चंद्रशेखरजी
  बाकी सगळे मुद्दे पटले पण “अलीकडेच, भारत सोडून दुसर्‍या एका देशाचे नागरिक बनलेले एक सुप्रसिद्ध चित्रकार किंवा दुसर्‍या एका देशातील पण भारतात आश्रय घेऊन रहाणार्‍या एका लेखिकेबद्दल, ट्विटर सारखी इंटरनेटची जी सोशल नेट्वर्किंग माध्यमे आहेत त्यावरून, जो तिरस्कारयुक्त संदेशांचा लोंढा पाठवला गेला होता तो याच म्हणजे अतिरेकी मनोवृत्तीचाच निदर्शक आहे. ”

  हे जे काही लिहिले आहे त्याबद्दल मतभेद आहेत. मला वाटतं की हुसेन यांनी जी बिभत्स चित्र काढलीत, तिच चित्र पुन्हा त्यांचे पुन्हा बारसे करुन – म्हणजे एका चित्राला हुसेनची आई, दुसऱ्याला हुसेनची मुलगी, आणि अशी नावं दिलेली त्याला चालतील कां?

  हुसेनची सगळी चित्रं मी पाहिली आहेत, आणि प्रत्येक चित्र पाहिल्यावर मस्तकात एक तिडीक उठते. तो असंही म्हणतो की मंदिरामधे नग्न देवी देवतांचे चित्रं कोरलेले आहेत, तर मग मी नग्न चित्र काढली तर काय बिघडलं?? इतका मस्तवाल पणा असेल तर प्रोफेटचं चित्रं का नाही काढलं त्याने नग्न??

  असो….

  Posted by महेंद्र | मार्च 14, 2010, 6:24 pm
  • महेन्द्र
   मी एम एफ हुसेन यांची किंवा त्यांच्या चित्रांची अजिबात तरफदारी करत नाहिये. आपण म्हणता तशी चित्रे जर त्यानी काढली असली तर ते निंद्यच आहे आणि त्याबद्दल लोकमताचा क्षोभ हो ऊन त्यांना देश सोडायला लागला असेल तर ते ही योग्यच म्हणता ये ईल. मला फक्त ट्विटरवरून तिरस्कारयुक्त ट्वीट्सचा लोंढा पाठवला गेला तो योग्य नाही असे वाटते. ट्विटर या माध्यमाचा हा असा उपयोग हा अतिरेकीपणाच आहे असे मला वाटते.

   Posted by chandrashekhara | मार्च 14, 2010, 8:22 pm
 2. I want to know why the cybercrime dept. of police doesn’t take actions against such letters? They may not be able to persue the criminal, but it will certainly help them to enrich their database.

  Posted by manohar | मार्च 14, 2010, 10:43 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: