.
ताज्या घडामोडी Current Affairs

डायनॉसॉरसच्या प्रदेशातील वृक्ष


काही महिन्यांपूर्वी बीबीसी वृत्त वाहिनीने बनवलेली Walking with Dinosaurs ही ऍनिमेशन फिल्म मी बघितली. ही फिल्म अतिशय मनोरंजक व माहितीपूर्ण आहे यात शंकाच नाही. यातले ऍनिमेशन बघून तर मी आश्चर्यचकीतच झालो होतो. या फिल्ममधे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी नष्ट झालेले डायनॉसॉरस प्राणी, त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही फिल्म बघत असताना माझ्या मनात सहज विचार आला होता की डायनो या प्राण्यांच्या विविध जाती प्रजातींची माहिती, भूस्तरामधे सापडलेल्या त्यांच्या जीवाष्म ठश्यांमुळे आपल्याला बर्‍याच अचूकतेने प्राप्त झालेली आहे. परंतु या फिल्म मधे जी अनेक प्रकारची झाडे झुडपे दाखवलेली आहेत ती काल्पनिकच असणार कारण त्या काळात कोणती झाडे झुडपे होती हे आपल्याला कुठे माहिती आहे? परंतु गंमतीची गोष्ट अशी की डायनॉसॉरस प्राण्यांचा कालाच्या आधीपासूनच्या कालापासून अव्याहत पृथ्वीतलावर वाढणारी ही झाडे झुडपे अजुनही अस्तित्वात आहेत.


सायकॉड (Cycad) या नावाने ओळखली जाणारी ही झाडे झुडपे अजुनही थोड्या प्रमाणात बघायला मिळतात. डायनॉसॉरस प्राण्यांच्या किंवा जुरॉसिक (Jurassic) कालात ही झाडे पृथ्वीवर सगळीकडे विपूल प्रमाणात पसरलेली होती. फलधारणा व त्यापासून बिया तयार होऊन पुनरुत्पादन करणारी ही झाडे आता फक्त काही विषुववृत्तीय देशांच्यात आढळतात. जगभरच्या मोठ्या वृक्ष उद्यानांच्यात(Botanical Gardens) या झाडांचे वर्धन मुद्दाम केले जाते. या शिवाय जगातल्या मोठ्या विद्यापीठांच्यात सुद्धा सायकॅडची झाडे जतन केलेली आढळतात.


सायकॅड झाडांच्या दुर्मिळतेने, या झाडाची बाजारात आजमितीला असलेली किंमत 10000 अमेरिकन डॉलर्स पर्यंत सुद्धा जाऊ शकते. यामुळे सर्व देशातल्या गुन्हेगारांचे व चोरांचे लक्ष, आपल्याकडच्या चंदनाच्या झाडासारखे, या झाडाकडे वेधले गेले नसते तर नवलच होते. दक्षिण आफ्रिकेमधे डरबान बोटॅनिकल गार्डन म्हणून एक मोठी बाग आहे. या ठिकाणी सायकॅड वृक्षांचा एक मोठा संग्रह आहे. या संग्रहात 150च्या वर तरी निरनिराळ्या जाती प्रजातींची सायकॅड आहेत. मागच्या आठवड्यात चोरांनी या संग्रहावर डल्ला मारला व अत्तिशय दुर्मिळ असलेली 20 झाडे चोरून नेली. या झाडांची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे किंमत 65000 अमेरिकन डॉलर्स तरी होती. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरांना कोणती झाडे चोरायची हे बरोबर माहित होते किंवा या चोरीत कोणा तरी जाणकार माणसाचा हात होता. दक्षिण आफ्रिकेमधे सरकारी परवाना असल्याशिवाय सायकॅड झाड तुमच्या परसात किंवा बागेत लावता येत नाही. त्यामुळे हे चोर कोणत्यातरी आंतर्राष्ट्रीय टोळीचे सभासद असावेत असे दक्षिण आफ्रिकेतील पोलिसांचे म्हणणे आहे. अमेरिका किंवा एशिया मधल्या कोणासाठी तरी ही झाडे चोरली गेली असावीत असे पोलिसांना वाटते.


ही झाडे तशी दुर्मिळ असल्यामुळे त्यांची प्रजाती ओळखणे अतिशय तज्ञ वनस्पतीशास्त्रज्ञ असला तरच त्याला शक्य होते. या कारणामुळेच या झाडांची तस्करी करणे सोपे होते. तस्कर या झाडाची पाने तोडून टाकतात व बाकी झाड आपल्या सामानात सुलभतने लपवून नेऊ शकतात. Convention on International Trade in Endangered Species (CITES) या आंतर्राष्ट्रीय करारानुसार सायकॅड झाडांच्या कोणत्याही स्वरूपातल्या व्यापाराला जगभर बंदी घालण्यात आलेली आहे. या कराराचा भंग करून या झाडांची तस्करी करणार्‍या चोरांना पकडण्य़ात मुख्य अडचण येते ती ही झाडे ओळखण्याची.


युनिव्हर्सिटी ऑफ जोहान्सबर्ग मधल्या वनस्पतीशास्त्र विभागाने, सायकॅड झाडे सुलभरित्या ओळखता यावीत म्हणून त्यांच्या DNA Bar coding चा एक प्रकल्प हातात घेतला आहे. या प्रकल्पान्वये प्रत्येक सायकॅड प्रजातीच्या DNA साखळीला एक बारकोड देण्यात येत आहे. अशा सर्व बारकोड्सचा एक डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. ही झाडे कोणत्याही देशाच्या सरहद्दीवरच्या कस्टम्स अधिकार्‍यांना ओळखता यावी म्हणून हा डेटाबेस तयार करण्यात येत आहे. कोणत्याही झाडाचा DNA तपासून त्याची या डेटाबेसशी तुलना केली की हे झाड ओळखता येईल. परंतु DNA तपासण्याची मशीन्स अतिशय महाग असतात व त्यांना DNA तपासण्यासाठी वेळही खूप लागतो. त्यामुळे एखादे सोपे उपकरण कोणी तयार केले तर त्याची आवश्यकता आहे. जर असे उपकरण त्या झाडाच्या कोणत्याही भागाचा तुकडा तपासून त्याचा बारकोड सांगू शकले तर झाडांच्या एकूणच आंतर्राष्ट्रीय तस्करीला बर्‍याच प्रमाणात आळा घातला जाईल.


डरबान मधली झाडे 75 वर्षे तरी जुनी होती. सायकॅड हे झाड फार हळूहळू वाढते. झाड उंच होण्यासाठी किमान 800 ते 1000 वर्षांचा अवधी जावा लागतो. त्यामुळेच ही झाडे आपल्या पूर्वजांशी असलेला आपला दुवा आहे. आपल्या या अमूल्य ठेव्याची, सर्वच राष्ट्रांनी जतन करण्याची गरज आहे.


पृथ्वीच्या पाठीवर झालेल्या प्रचंड स्वरूपाच्या भौगोलिक उलथापालथीत सुद्धा सायकॅड झाडांनी तग धरला आहे. मात्र मानवी हावरेपणाला ती तोंड देऊ शकतील का? हा खरा प्रश्न आहे.

12 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “डायनॉसॉरसच्या प्रदेशातील वृक्ष

 1. khup chhan mahiti dili ahe.

  Posted by anju | मार्च 12, 2010, 4:39 pm
 2. The botanical garden of Darjiling hosts one type of these so called tree.

  Posted by manohar | मार्च 12, 2010, 10:23 pm
 3. भविष्यात असे सुंदर झाड , वनस्पती फक्त फोटोतच दिसेल असे वाटते .
  एमदम सुरेख !!

  संजय बरबडे

  Posted by SANJAY BARBADE | जून 16, 2010, 1:33 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: