.
History इतिहास

दक्षिणा फेलोशिप


महाराष्ट्र शासन दरवर्षी पदवी परिक्षा,. पदव्युत्तर परिक्षा, यांच्यात अच्चुत्तम यश मिळवणार्‍या किंवा उच्च दर्जाचे संशोधन करणार्‍या संशोधकांना दक्षिणा फेलोशिप नावाची एक शिष्यवृत्ती देत असते. ही शिष्यवृत्ती मिळालेले संशोधक आपल्या बायोडेटा मधे आपण दक्षिणा फेलो आहोत हे मोठ्या गर्वाने सांगतात. सध्या जरी ही शिष्यवृत्ती कोणत्याही क्षेत्रात कार्य करणार्‍या अभ्यासकाला मिळत असली तरी मुळात ही शिष्यवृत्ती संस्कृत वाङ्‌मय किंवा तत्वज्ञान या विषयांच्या अभ्यासकांना देण्यात येत असे. या शिष्यवृत्तीला हे असे असाधारण नाव का देण्यात आले आहे असे कुतुहल कोणासही वाटल्यावाचून रहाणार नाही. पण या नावामागे अडीचशे वर्षांचा तरी इतिहास आहे.


पहिल्या किंवा बाजीराव बाळाजी या पेशव्यांनी, 1731 मधे त्र्यंबकराव दाभाडे यांच्याबरोबर झालेल्या युद्धात विजयश्री प्राप्त झाल्यानंतर, दख्खन, कर्नाटक, आणि भारतातील इतर ठिकाणे, येथून पुण्यात येणार्‍या, ज्ञानी, व्यासंगी, निर्मळ चारित्र्याच्या व आपले ज्ञान व व्यासंग यांचा मान राखणारे वर्तन असलेल्या ब्राम्हणांना, दर वर्षी श्रावण महिन्यात, दक्षिणा देण्याची प्रथा सुरू केली होती. नंतर या दक्षिणा वाटपासाठी, बाजीराव पेशव्यांचे पुत्र, बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशवे यांनी, पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी. एक मोठा कक्ष बांधून घेतला होता. या कक्षाला रमणा असे नाव होते.


.. 1737 मधे वाटण्यात असलेली एकूण दक्षिणा 17731/- रुपये असली तरी थोड्याच वर्षात जसजसे मराठी साम्राज्याचे वैभव वाढू लागले तसतशी दक्षिणेची रक्कम लाखात पोचली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात 5 लाख रुपये दक्षिणा म्हणून वाटण्यात आले. या दक्षिणेसाठी पार तंजावर ते बनारस, मथुरा येथून शास्त्री पुण्यात येत असत. आलेल्या पंडितांच्यात वैदिक ब्राम्हण, व्याकरणकार, ज्योतिषी, कवी, वेदांत ज्ञानी, तर्कतीर्थ, वैद्य आणि साधू या सर्व प्रकारचे ज्ञानी पंडित असत. आलेल्या पंडितांना पुण्यातील प्रभुणे शास्त्री, बाळ शास्त्री, आर्य शास्त्री आणि काशिनाथ शास्त्री यांच्या समोर आपल्या ज्ञानाची परिक्षा द्यावी लागत असे. त्या नंतर त्यांचा व्यासंग व ज्ञान यानुसार त्यांना दरबारात किंवा रमण्यात पाचारण करण्यात येई त्यांना भोजन विडा व दक्षिणा देण्यात येत असे.


रमण्याच्या कक्षाला चार द्वारे होती व या चार द्वाराजवळ स्वत: पेशवे, नाना फडणवीस, प्रभुणे शास्त्री व अमृतराव त्यांच्या शरीर संरक्षकांसमवेत बसलेले असत व दक्षिणा वाटत. दक्षिणा मिळालेल्या प्रत्येक पंडिताच्या कपड्यांवर किंवा अंगावर लाल रंगाची खूण करण्यात येत असे. दक्षिणा वाटण्याचे कार्य तसे खूप जिकिरीचे व धोक्याचे होते. परंतु पुण्यातील पेशव्यांचे पोलिस दल व मराठी सैन्य यांच्या कडक बंदोबस्ताखाली ते सुलभतेने पार पाडण्यात येई. पुण्याच्या या दक्षिणा समारंभाची ख्याती एवढी पसरली होती की ब्रिटिश रेसिडन्सी मधले गोरे अधिकारी हा समारंभ बघण्यास येत असत.

1797 मधे कॅप्टन मूर या ब्रिटिश अधिकार्‍याने आपल्या काही सहकार्‍यांबरोबर हा दक्षिणा समारंभ पाहण्यासाठी रमण्याला भेट दिली. त्याने या दक्षिणा समारंभाचे मोठे तपशीलवार वर्णन लिहून ठेवले आहे. दुसर्‍या बाजीरावाच्या कारकिर्दीपर्यंत हा दक्षिणा समारंभ चालू राहला. पण त्या वेळी पंडितांची परिक्षा घेणे वगैरे गोष्टी बंद होऊन आलेल्या सर्व ब्रम्हवृंदाला दक्षिणा वाटप करण्यात येऊ लागले. 1818 नंतर इंग्रज सरकारने दक्षिणा समारंभ बंद केला. परंतु थोड्याच दिवसात त्यांना या दक्षिणा समारंभामुळे राज्यातील व राज्याबाहेरच्या ज्ञानी व पंडितांना पेशवे दरबार केवढे प्रोत्साहन देत होता याची कल्पना आली. 1821 मधे माऊंट स्ट्यूअर्ट एल्फिस्टन याने लिहून ठेवलेल्या एका पत्रात या दक्षिणा समारंभाचे महत्व त्याने मान्य केले. या समारंभामुळे, भारतातील ज्ञानोपासकांना मोठे प्रोत्साहन मिळत होते हे त्याने मान्य केले. हा समारंभ बंद केल्याने पुण्यातील ब्राम्हण समाजाचे, इंग्रज सरकारबद्दलचे मत आणखीनच कलुषित होते आहे व नाराजी पसरत चालली आहे याची जाणीवही त्याला झाल्याचेही तो मान्य करतो.

दुसर्‍या बाजीरावाच्या कारकिर्दीत दक्षिणा समारंभावर जेवढा खर्च होत असे तेवढीच रक्कम इंग्रज सरकारने दक्षिणा ग्रॅन्ट म्हणून देण्यास सुरवात केली. या दक्षिणा ग्रॅन्ट मधून एक संस्कृत पाठशाला चालू करण्यात आली शिष्यवृत्या देण्यात येऊ लागल्या व संस्कृत भाषा व तत्वज्ञान याच्या अभ्यासासाठी व प्रचारासाठी हे पैसे खर्च केले जाऊ लागले.

इंग्रज सरकार नंतर मुंबई सरकारने व नंतर महाराष्ट्र शासनाने दक्षिणा ग्रॅन्टची परंपरा चालूच ठेवली व त्याचेच सध्याचे स्वरूप दक्षिणा फेलोशिप हे आहे.पेशवे दरबार, आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा, ज्ञानी व पंडितांचा योग्य आदर राखला जाऊन त्यांच्या चरितार्थाची सोय व्हावी या साठी किती प्रयत्नशील होता याची या दक्षिणा समारंभाच्या वर्णनावरून योग्य कल्पना आल्याशिवाय रहात नाही.

10 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: