.
Musings-विचार

काल चक्र व काल ओघ


आपल्या रोजच्या आयुष्यातली अशी कोणती गोष्ट आहे जी आपला पिच्छा कधीच सोडत नाही असे तुम्हाला वाटते? आपण सर्वजण रोज वर्तमान पत्रे चाळतो . ते वर्तमान पत्र कोणच्या तारखेचे आहे, कोणत्या वर्षातले आहे हे तर मुखपृष्ठावरच सुरवातीलाच छापलेले असते. आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमधे सतत लुडबुड करत असलेली हीच ती तारीख जी आपला एखाद्या सावलीसारखा सतत पाठपुरावा करत राहते. जन्मतारीख म्हणून ही तारीख आपल्याला अगदी जन्मापासून चिकटते. त्यानंतर बाल व तरूण वयातील शिक्षण, पुढे केलेला व्यवसाय, मनोरंजनार्थ केलेला सुट्टीतील प्रवास, नोकरी किंवा व्यवसायातून घेतलेली निवृत्ती या सर्व गोष्टी सुध्दा या तारखेच्या आधिपत्याखालीच केल्या जातात. मृत्युतारीख म्हणून एकदा शेवटचा शिक्का या तारखेने आपल्याला मारला की मगच ही आपल्याला सोडते.

ही तारीख म्हणजे असते तरी काय ? दिसायला तरी हा अंकाचा हा एक सट भासतो. हे अंकांच्या सटाचे पदक आपण आपल्या अंगा खांद्यावर का बाळगतो ? हा सट आपणाला खरोखरच काही उपयुक्त माहिती देतो का ? जरा विचार केल्यावर मनाला चालना मिळाली व असे हजार प्रश्न समोर उभे ठाकले.

अंकांच्या या सटातले पहिले तीन किंवा चार अंक हे दिनांक व महिना यांचे निदर्शक असतात. दिनांक म्हणजे काय ? मास किंवा महिना म्हणजे तरी काय ? आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की पृथ्वीचा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा एक निश्चित कालखंड आहे. हा कालखंड संपला की पृथ्वी परत त्याच स्थानावर येते. परत तोच ॠतु येतो. परत तोच दाहक उन्हाळा आपल्याला भाजून काढतो किंवा वर्षा ॠतु त्याच शीतलतेचा शिडकावा करतो. तीच फुले फुलतात किंवा मनात काहूर माजवणारी तीच पानगळ सुरु होते. तीच मधूर फळे तोच रसास्वाद आपल्याला देतात. कालखंडाचे हे चक्र निदान पृथ्वीवर राहणार्‍या आपल्यासारख्यांसाठी तरी मूलभूत आहे. पण आपल्या सरासरी आयुष्यमानाचा विचार केला तर हा पृथ्वीच्या सूर्याभोवती एक फेरी मारण्याचा कालखंड आपल्या रोजच्या व्यवहारांसाठी तरी फार विस्तीर्ण आहे.

त्याच्यापेक्षा पृथ्वीच्या स्वत:च्या आसाभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारा दुसरा एक काल खंड आपल्या आवाक्यातला आहे. अगदी रोजच्या व्यवहाराला साजेसा आहे. या दुसर्‍या कालखंडाचे चक्र आपल्याला ढोबळपणे पुनरुक्तीचा तोच अनुभव देते. तशीच आल्हाददायक सकाळ रोज येते.व दिवसभर कष्ट केलेल्या शरीराला आराम देणारी रात्र तशीच असते. पण अडचण अशी आहे की या छोटया कालखंडाचे, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फेर्‍याच्या मोठया कालखंडाशी, तीनशे पासष्टला एक असे प्रमाण येते. साधारण माणसाला हे प्रमाण लक्षात ठेवणे फारच कठीण आहे.

नीच दर्जाचे प्राणी, कीटक, पक्षी यांच्यासाठी दिवसरात्रीचा छोटा कालखंड पुरेसा होतो. अन्न मिळवण्यासाठी वणवण करावा लागणारा दिवस व आराम करण्यासाठी आवश्यक ती रात्र एवढीच गरज असल्याने त्यांची कालगणना येथेच संपली तरी चालते. पुनरुत्पादनाच्या चक्रासाठी मात्र थोडया मोठया कालगणनेची गरज असते पण पशु व पक्षी यांच्या जनुकात निसर्गाने कालगणनेचे ते चक्र विचारपूर्वक लिहूनच ठेवलेले असल्याने व प्राण्यांना स्वत:ला विचार करण्याची कुवत व गरजही नसल्याने पुनरुत्पादनाचे चक्र अविरत चालू राहते.मानवाच्या बाबतीत मात्र निसर्गाने जनुकात काहीच लिहून ठेवलेले नसल्याने आयुष्यातील कालगणनेची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर पडते व कालमापनाची गरज मानवाला भासू लागते.

वर निर्देश केलेल्या दोन कालखंडांशिवाय निरिक्षण करता येण्यासारखा आणखी एक कालखंड अगदी सुरवातीपासून मानवाच्या लक्षात आला होता. चंद्र पृथ्वीभोवती घालत असलेल्या प्रदक्षिणेमुळे ,दिवसरात्रीचे तीस छोटे कालखंड गेले की चंद्र परत तसाच दिसत असे. म्हणजे मोठया पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फेर्‍याच्या कालखंडात चंद्राचे हे बारा कालखंड होत होते. मानवाच्या दृष्टीने ही तर फार सोईची गोष्ट होती. शेतीची कामे, पेरणी, कापणी, एक विशिष्ट कालसमयीच करणे आवश्यक होते. तो कालसमय चुकला की तीनशेपासष्ट छोटे कालखंड परत थांबावे लागत होते. असे थांबायला लागले तर एवढे दिवस खायचे काय असा यक्ष प्रश्न निर्माण होत होता. काल गणनेची आवश्यकता यामुळेच खरेतर मानवाच्या लक्षात आली होती. दिनांक, मास आणि वर्ष हे तीन कालखंड यामुळेच महत्वाचे झाले होते. तीस दिनांक गेले की एक मास होत होता तो चंद्राच्या पुनरागमनामुळे लगेच कळत होता. चंद्राची अशी बारा पुनरागमने झाली की काल चक्र एक पूर्ण फेरा करत होते. आजूबाजूल दिसणारी प्रत्येक गोष्ट परत नव्याने सुरु होत होती. पुन:प्रत्यय किंवा पुर्नजन्माची प्रतिभूती प्रत्येक वर्षी येत होती. दिनांक आणि मास या दोन कालखंडाचे मापन म्हणूनच मानवाच्या दृष्टीने महत्वाचे होते आपल्या राशीला लागलेल्या या तारखेच्या पहिले तीन किंवा चार अंक हा दिनांक व मास आपल्याला सांगत असल्याने त्यांना आपल्या आयुष्यात खचितच महत्व आहे.

काल गणना तर करता येऊ लागली पण एखादा दिनांक किंवा मास ओळखायचा कसा? क्षय पावणार्‍या किंवा वर्धित होणार्‍या चंद्राच्या स्वरूपाप्रमाणे, मासाचे दोन भाग कल्पले गेले .प्रत्येक भागातील दिनांकांना एक ते पंधरा असे अंक देऊन हा प्रश्न काही प्रमाणात सुटला. मास ओळखण्यासाठी मानवाने आकाशाची मदत घेतली. आकाशात दिसणारे तारे किंवा तारका समूह वर्षभर तसेच दिसत नाहीत हे मानवाच्या केंव्हाच लक्षात आले होते.या तारकांचे अठ्ठावीस समूह किंवा नक्षत्रे कल्पली गेली होती . सूर्य मावळण्याच्या वेळी जे नक्षत्र क्षितिजावर दिसेल त्याचा तो मास अशी कल्पना पुढे आली व चित्रेचा तारा दिसू लागला की चैत्र मास सुरु झाला हे ठरले. पूर्वाषाढा नक्षत्र दिसले की पेरणी करायची. उत्तर भाद्रपदा किंवा अश्विनी दिसली की कापणी.

कालचक्राचा (Cyclic Time) हा वार्षिक फेरा सुरु झाला असे कधी मानायचे ? प्रथम मासाचा प्रथम दिनांक कोणता? हे ठरविण्यासाठी सुगीचा महिना प्रथम मास घ्यावा अशी कल्पना आली. त्यामुळे अश्विन किंवा भगवद्गीतेत वर्णन केलेला मासांच्यामधे सर्वोत्तम असा मार्गशीर्ष ,हा प्रथम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. पण सर्वसामान्यांनी हे लक्षात कसे ठेवायचे ? यासाठी धार्मिक कालचक्राची (Religious Time ) कल्पना पुढे आली. यज्ञामधे देवतेला हर्विभाग देण्याची पध्दत रूढ होतीच. ज्या पंच महाभूतांच्या कृपेने आपणास हे जीवन मिळाले आहे त्यांना आपल्या प्राप्त संपत्तीचा एक भाग अर्पण करण्याची ही मूळ कल्पना. कालांतराने त्याची , देवा तू माझे काम कर मग मी तुला एकवीस मोदक किंवा नारळ देईन ही लाचलुचपतीचा वास येणारी भ्रष्ट नक्कल झाली. याच कल्पनेचा वापर करून कोणत्या मासात कोणत्या देवतेला हर्विभाग द्यायचा हे रूढ झाले. व पूर्ण वर्षाचे धार्मिक पंचांग समाजाने अंगिकारले. वसंत संपात आणि शरद संपात बिंदूंची जरी कल्पना असली तरी हे बिंदू मागे सरकत राहतात ही कल्पना नव्हती. त्यामुळे काही कालानंतर त्या मासात पूर्वीचीच ऋतुजन्य परिस्थिती रहात नाही हे लक्षात आले. शेवटी कालमापनासाठी गणितावर आधारित पंचांग तयार झाले व अधिक महिन्याची संकल्पना रुढ झाल्याने काल गणनेचे एक मानक तयार झाले. चित्रेच्या तार्‍याच्या बरोबर एकशे ऐंशी अंश पुढे सूर्य आला की नवीन वर्ष सुरु झाले असे मानले गेले.

या उलट ,पाश्चिमात्य देशांत पूर्णपणे सूर्याच्या स्थितीवर आधारित कालमापन सुरु झाले. प्रथम ज्यूलियस सीझरने व नंतर धर्मगुरू पोपने पाश्चिमात्य पंचांग तयार केले. मासात एक ते तीस किंवा एकतीस दिनांक घेतले गेले व आधिक मासाची गरज राहिली नाही. वसंत आणि शरद संपात बिंदू एका विविक्षित दिवशीच येऊ लागले. कालगणना एका मजबूत पायावर उभी राहिली.

हे जरी सगळे ठीक असले तरी तारखेत आणखी चार अंक शेवटी असतात त्याचे काय ? हे चार अंक म्हणजे वार्षिक कालचक्राचे किती फेरे झाले याची एक मोजणी असते. अर्थात कधी काळी राज्यावर आलेल्या विक्रमादित्य राजाच्या राज्याभिषेकापासून किती काळ लोटला किंवा एखाद्या प्रेषिताच्या जन्मकालापासून किती काळ लोटला हे आपण दिवस रात्र एकमेकास का सांगत असतो याचे काहीही स्पष्टीकरण देणे कठिण आहे. असे म्हणता येईल की काळाच्या ओघातील या दोन घटना हे नुसते संदर्भ बिंदू आहेत. त्यांना तसा काही अर्थ नाही. पण हे चार अंक ज्या कालाच्या ओघाचे निर्देशक आहेत असे आपण मानतो तो कालाचा ओघ (Linear Time) म्हणजे आहे तरी काय ? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर देणे अशक्यप्राय आहे. कालचक्र हे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या एकमेकाभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या कालाशी निगडित असल्याने त्याचे स्पष्टीकरण देता येते. पण पार्श्वभूमीवरील मायक्रोवेव्ह उत्सर्जनाच्या तपमानामधे कालानुसार होणारा बदल सोडला , तर विश्वामधील कोणत्याही घटनेशी कालाच्या ओघाचा संबंध जुळवता येत नाही. आणि सर्वात गंमत म्हणजे सापेक्षतावादाप्रमाणे ,या कालाचा ओघाचे मापन करण्याचा प्रयत्न केल्यास , येणारे एकक(Unit) हे कोणतेही विशिष्ट असे नसते . हे एकक जेथे त्याचे मापन केले जाते ते स्थान आणि त्या स्थानाची असलेली गती यावरही अवलंबून असते. ब्रम्हदेवाचा क्षण मानवाच्या युगासारखा असतो असे म्हणतात त्यातलाच हा प्रकार.

असे असले तर आपण हे अनावश्यक ओझे आपल्या खांद्यावर घेउन का फिरतो आहोत ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ,आपल्याच जन्मकालापर्यंत जाणे आवश्यक आहे. मूल जेंव्हा जन्म घेते तेंव्हा त्याच्या मेंदूत असलेला स्मृती कक्ष जवळपास रिकामाच असतो.त्याच्या जनुकांत निसर्गाने भरून ठेवलेल्या संगणक प्रणालीच फक्त कार्यरत असतात. जसजसे मूल मोठे होते तसतसे ते आपले अनुभव या स्मृती कक्षात भरण्यास सुरवात करते. ही माहिती स्मृती कक्षात कोणत्या जागी ठेवली आहे हे माहित होण्यासाठी , स्मृती कक्षातील त्या त्या जागेच्या पत्याचा संदर्भ मेंदू निराळा ठेवतो. कोणता अनुभव आधी व कोणता नंतर हे कळण्यासाठी कालमापनाचाही संदर्भ ठेवला जातो. या संदर्भासाठी ठेवलेल्या कालमापकाचा तारखेतल्या शेवटच्या चार अंकांशी सरळ संबंध आहे.

कालाच्या ओघाचे मापन त्यामुळेच अतिशय व्यक्तीनिष्ठ होते. व्यक्ती गेल्यावर तिच्याबरोबरच मेंदूमधील कालमापन संपते. कालओघ मापन कोणत्याही वैश्विक घटनेशी संबंधित नसल्यानेच हे मापन (Arbitrary) झाले आहे. कोणी म्हणेल की इतिहासाचे काय ? इतिहास तर सनावळया व तारखांच्यात गुंतलेला आहे. पण थोडा बारकाईने विचार केला तर हे लक्षात येईल की शिवाजी महाराज हे मोठे लोकोत्तर पुरुष होते. त्यांनी राष्ट्राची अस्मिता जागृत केली होती हे समजण्यासाठी, ते कार्य, जीझस ख्राइस्ट यांचा जन्म झाल्यानंतर ,सोळा शतकांनी घडले की सतरा शतकांनी , ही माहिती मिळून फारसा काही फरक पडत नाही. असे म्हणले तरी चालेल की इतिहासासारखा रम्य विषय सनावळयांनी अत्यंत रुक्ष केला आहे. कदाचित शास्त्रीय संशोधनात या कालमापनाची गरज भासत असेल. विश्वाची सुरवात महास्फोटाने झाली असे मानतात. म्हणजे त्या बिंदूपासून हा काल ओघ सुरू झाला असे म्हणता येईल.या महास्फोटानंतर श्वेत तेज़ाचे उत्सर्जन होऊ लागले. या उत्सर्जनाचे सध्या मायक्रोवेव्ह्जच्या स्वरूपात निरिक्षण करता येते. म्हणजेच श्वेत तेज प्रकाश लहरी व मायक्रोवेव्ह्ज यांच्या शिखरांतरामधील फरक हा या काल ओघाचा निर्देशक मानता येतो. पण विश्व महाआकुंचन होऊन नष्ट पावणार असले तर हा कालओघ नसून एक महा विशाल प्रमाणातले कालचक्रच आहे असेच म्हणावे लागेल.

पण या वैश्विक गोष्टींशी सर्वसामान्याचा संबंध तरी काय ? आपण हे कालाच्या ओघाचे जोखड खांद्यावरून फेकून दिले व आपले आयुष्य फक्त कालचक्राच्या फेर्‍यावरच अवलंबून ठेवले तर प्रत्येक वर्ष हे नवीन आयुष्य सुरु करण्याप्रमाणे होईल. आधीच्या कालचक्रातील चुका दुरुस्त करता येतील. नवीन कालचक्राचा प्रत्येक क्षण आनंदाने जगता येईल. आपल्याला निसर्गाच्या जास्त जवळ जाता येईल. आयुष्यातील कृत्रिमपणा कमी होईल. आपला वाढदिवस आपण किती म्हातारे झालो याचा निर्देशक न बनता प्रत्येक नवीन कालचक्राचा, नवीन आयुष्याचा प्रथम दिन बनेल.

पंधरा ऑगस्ट

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “काल चक्र व काल ओघ

 1. Kharay Kaka! Mast vatala post vachun.

  Posted by Ashish | मार्च 9, 2010, 1:35 pm
 2. I liked the treatment of time you have done here.
  I would just like put forward a thought – the universe has been ever existing and would ever exist (There was no big or small bang). Time is the description of two states of universe – state1 and state2. Curiously, there are infinite states between each state1 and state2. For example. State 1: A tree was 2 m tall. State2 A tree was 2.2 m tall.
  Between these two tree was 2.1, 2.05, 2.15, 2.100005, 2.000000000000001 and 2.1999999999999999999999999999 etc etc m tall. Like there is infinite space, one must appreciate that time passes at infinite speed, because it has to cover the infinite intermediate states to reach state2. What we call time is not time. It is description of states and there are references to other states.

  Posted by Arun | मार्च 11, 2010, 3:23 pm
  • Arun

   well! this is another way of looking at time. What I really want to say is that the concept of time is completely and totally created by human brain for it’s convenience and smooth functioning. In the universe there is no concept of time at all. Thanks for your remarks

   Posted by chandrashekhara | मार्च 11, 2010, 3:59 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: