.
अनुभव Experiences

ए स्कूल फॉर एटिकेट्स


मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना कॉलेजच्या वसतीगृहात रहात असे. वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दोन मोठे मेस असत. प्रत्येक मेसमधे, ज्याच्यावर एकावेळी 20 ते 25 विद्यार्थी बसून भोजन करू शकतील अशी, दहा बारा तरी लांब व रूंद टेबले सिमेंटमधेच बांधलेली होती. या टेबलांच्यावर पॉलिश केलेल्या टाईल्स बसवलेल्या असत. खाद्यपदार्थ टेबलांच्या मध्यभागी मोठ्या चिनी मातीच्या बोल्समधे ठेवलेले असत व प्रत्येकाने आपल्याला पाहिजे तेवढे वाढून घ्यावे अशी व्यवस्था असे. आमच्या कॉलेजात, भारतातल्या सर्व राज्यांमधून विद्यार्थी येत असत, त्यामुळे अतिशय भिन्न अशा वातावरणातून ही मुले एकत्र येत असत. काही मुलांना एवढ्या मोठ्या ग्रुपमधे कसे जेवणखाण करावे? हे अजिबात समजत नसे. जेवताना आपल्या थाळीत भरमसाठ अन्न वाढून घेणे, जेवताना मचमच आवाज करणे, भुरके मारणे, जेवण करताना ढेकरा देणे व अन्नाचे कण आसपास उडवणे अशा गोष्टी काही जण करत. त्या टेबलापाशी बसलेल्या इतर विद्यार्थ्यांना त्यावेळी अगदी नकोसे होई. अशा वेळी सिनिअर्सना या मुलाना समज देणे आवश्यक होत असे. टेबलापाशी बसलेले असताना टेबल मॅनर्सची किती आवश्यकता आहे हे त्या वेळी माझ्या मनावर जे ठसले ते नेहमीच कायम राहिलेले आहे.

दुसरा असाच एक प्रसंग आठवतो.. मी त्या वेळी एका मोठ्या कंपनीत काम करत होतो. एक नवीन अभियंत्याची नेमणूक करण्यासाठी मुलाखत घेणे चालू होते. मुलाखत घेणार्‍या पॅनेल मधे आठ दहा जण तरी होते. त्यातले माझ्यासह पाच जण तांत्रिक विषयातले तज्ञ म्हणून होतो तर इतर खात्यांचेही लोक होते. आमचे जनरल मॅनेजर साहेब त्या पॅनेलचे मुख्य होते. एक उमेदवार आम्हाला तांत्रिक दृष्ट्या एकदम योग्य वाटला होता. त्याचे त्याच्या विषयातले ज्ञान व अनुभव खरोखरच उत्तम होता. परंतु इतर लोकांचे मत मात्र एकदम प्रतिकूल होते. त्याचे मॅनर्स अगदी रफ व रूड आहेत. त्याला इतरांशी संवाद साधता येणार नाही असे इतरांचे मत पडले. शेवटी जनरल मॅनेजरवर आम्ही निर्णय सोडला. त्यांनी आपला निर्णय लगेच दिला की हा उमेदवार योग्य नाही. ही व्यक्ती कंपनीतील इतर लोकांशी कशी वागेल? बाहेरच्या लोकांशी कशी वागेल? त्याने कंपनीची इमेज तर खराब होणार नाही ना? या सर्व बाबतीत या उमेदवाराची योग्यतेबद्दल ते साशंक होते.

आपण कोणत्याही कार्यक्षेत्रात कार्यरत असलो तरी चार लोकांशी आपला संबंध येतच असतो. असा एखादा जॉब क्वचितच असेल जिथे दुसर्‍या कोणाशी कम्युनिकेशनच करावे लागणार नाही. त्यामुळेच चार लोकात असताना आपले मॅनर्स, आपली संभाषणपद्धती यांना महत्व असते. Information Technology या क्षेत्रात तर या गोष्टी फारच महत्वाच्या आहेत. या उद्योगामधे आता 20 लाखावर लोक तरी काम करत आहेत व आणखी कर्मचार्‍यांची या क्षेत्राला सारखी आवश्यकता भासते आहे. नवीन कर्मचारी निवडण्याची जबाबदारी असलेल्या Human Resources खात्यांना नवीन येणार्‍या उमेदवारांच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल तक्रार नसते. त्यांची मुख्य तक्रार असते या नवीन उमेदवारांच्या चार चौघातल्या वागण्याबद्दल आणि संभाषणकौशल्याबद्दल.

म्हैसूर मधल्या रामन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फरमेशन टेक्नॉलॉजी या संस्थेने IT उद्योगात जाऊ इच्छिणार्‍या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी एक खास कोर्स मागच्या दोन वर्षापासून चालू केला आहे.


या कोर्समधल्या लेक्चरर या पदवीधरांना ज्या गोष्टी सांगतात हे ऐकले तर या मुलांना चार लोकात वागावे कसे? याचे किती अज्ञान असते हे माहिती होते. कोणी रडत असेल तर त्याचे कारण विचारत बसू नका. कोणाच्या डोक्यात पांढरा केस दिसला तर त्या व्यक्तीला त्या संबंधी विचारू नका. इंडियन स्तॅ न्डर्ड टाईम हा इंडियन स्ट्रेचेबल टाईम नाही. दुसर्‍यांच्या वेळेचे महत्व पाळा. या सारखे अगदी बेसिक धडे या मुलांना द्यावे लागतात.

या कोर्सच्या व्याख्याता श्रीमती छाया श्रीवास्तव या मुलांना जे धडे देतात त्यात तुमच्या वरिष्ठांशी बोलावे कसे? ब्यावसायिक ईमेल, स्लॅन्ग शब्द न वापरता कशा लिहाव्या? या सारख्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणी तर असतातच पण या शिवाय कार्यालयातील एटिकेट्स, कम्युनिकेशन स्किल्स किंवा संभाषणकौशल्य या सारखे विषयही असतात. त्यांच्या मताने ही मुले नोकरीच्या वेळात संगणकासमोर बसलेली असल्याने इतर कर्मचार्‍यांबरोबर कसे वर्तन करावे? संभाषण कसे करावे? हे त्यांना समजत नाही. त्यांची देहबोली आणि आवाज योग्य नसतो. विशेषत: अशा कर्मचार्‍यांना परदेशात पाठवायचे असले तर त्यांना तिथल्या परिस्थितीशे जुळवून घेणे खूप जड जाते.

IIT सारख्या ख्यातनाम संस्थामधून पदवीधर झालेल्या मुलांना या अडचणी येत नाहीत. ती मुले या सर्व खात्यांच्यात तरबेज असतात. पण जी मुले छोट्या व कमी प्रसिद्ध कॉलेजांमधून पदवीधर होतात त्यांना या अडचणी मुख्यत्वे जाणवतात. या मुलांची कौटुंबिक परिस्थितीही बर्‍याच अंशाने याला कारणीभूत असते.

एखाद्या संगणक कंपनीच्या बॅक ऑफिसमधे काम करणार्‍या अभियंत्याला त्याच्या प्रॉजेक्टची चर्चा 10000 मैलावरच्या ग्राहकाशी फोनवर करायला लागणे ही गोष्ट आता अतिशय सर्वसाधारण झाली आहे. त्यामुळेच या अभियंत्याला मूलभूत संभाषणकौशल्य आणि दुसर्‍याला आपले मत पटवून सांगता येणे हे आवश्यकच बनले आहे.

शाळा कॉलेजातून बाहेर पडणार्‍या अशा सर्वसाधारण मुलांना घासून पुसून झळाळी किंवा उजाळी देऊन त्यांना IT उद्योगासाठी सक्षम बनवणार्‍या शाळांची गरज आता सगळीकडेच जाणवू लागली आहे. या शाळा काही नेहमीच्या शाळांच्या ऐवजी नसतात तर नेहमीच्या शाळांच्यात मुलांना जे मिळत नाही तेच फक्त या शाळा देत आहेत.

8 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “ए स्कूल फॉर एटिकेट्स

  1. I read your every post..all are wonderful..I always eager to read new post from you. Thanks for such wonderful posts.

    Posted by mahesh | मार्च 10, 2010, 10:10 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: