.
History इतिहास

रेशीम मार्गाचा उत्खननशास्त्रज्ञ


एशिया खंडातले चीन, भारत, इराण या सारखे देश आणि भूमध्य युरोपियन देश यांच्यामधे जी काही व्यापारी व सांस्कृतिक देवाणघेवाण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात होत असे ती 7000 मैल लांबवर पसरलेल्या एका मार्गानेच प्रामुख्याने होत असे. व्यापारी, धर्मप्रचारक, भटके टोळीवाले आणि सैनिक याच मार्गानेच जा ये करत. निरनिराळ्या प्रकारची मालवाहतुक या मार्गावरून होत असली तरी प्रामुख्याने रेशमी वस्त्र, कस्तुरी, सुगंध, औषधे,, रत्ने, मसाले, काच सामान वगैरेसारख्या ऐषारामाच्या वस्तूंचा व्यापार या मार्गावरून होत असल्याने या मार्गाला रेशीम मार्ग किंवा Silk Road असे नाव पडले. हा रेशीम मार्ग किमान 3000 वर्षे तरी वापरात होता. चीनमधल्या शियान या गावापासून सुरू होणारा मार्ग चीन, कझागस्तान, इराण, इराक या मार्गे रोमन साम्राज्याच्या सीमेपर्यंत पोचत असे तर दुसरा फाटा इराण, अफगाणिस्तान या मार्गाने भारतापर्यंत पोचत असे. या मार्गाने प्रवास करणारे व्यापारी वगैरेंच्या सोईसाठी ठिकठिकाणी सराया, पाणपोई वगैरे गोष्टी निर्माण केल्या गेल्या होत्या.

नवी दिल्ली मधल्या मौलाना आझाद मार्ग या रस्त्यावर भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आहे. या संग्रहालयात मध्य एशियामधल्या प्राचीनवस्तूया नावाने ओळखले जाणारे एक प्रसिद्ध दालन आहे. या दालनात 600च्या वर अतिशय उत्कृष्ट स्वरूपातल्या प्राचीन वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत. यापैकी बहुतेक वस्तू चीनमधल्या शिंजियांग किंवा चिनी तुर्कमेनिस्तान या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशातल्या आहेत. ज्या ठिकाणी या वस्तू उत्खननात सापडल्या त्यातली बहुतेक ठिकाणे रेशीम मार्गावरची असल्याने या वस्तूंना अनन्यसाधारण महत्व आहे. रेशीम मार्गामुळे बौद्ध धर्माचा प्रचार मध्य एशियामधे कसा होत गेला त्याच्या या पुराण वस्तू साक्षीदारच आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये.


1900-01, 1906-08 आणि 1913-16 या वर्षांमधे केलेल्या तीन प्रमुख उत्खनन मोहिमांमधे या सर्व वस्तू मिळालेल्या आहेत. या तिन्ही मोहिमा त्या काळचा सर्वात नावाजलेला व प्रसिद्ध उत्खननशास्त्री(Archaeological explorer) सर ऑरेल स्टाइन याच्या नेतृत्वाखाली अतिशय यशस्वी रित्या आखल्या गेल्या व पार पाडल्या गेल्या होत्या.


सर ऑरेल स्टाइन हा मुळात हंगेरीचा. राजधानी बुडापेस्ट मधे त्याचा जन्म झाला. तो व त्याचा मोठा भाऊ यांच्यात बरेच अंतर असल्याने, ऑरेलचे शिक्षण, त्याचा मोठा भाऊ व मामा यांच्या सूचनेनुसार व इच्छेनुसार चालू होते. या दोघांचीही इच्छा ऑरेलने एखाद्या विद्यापीठात संशोधक व्हावे अशी होती. परंतु ऑरेलने ती धुडकावून लावली व ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारतात त्याने नोकरी पत्करली. त्याच्या अगदी लहानपणापासून त्याला मध्य एशियाबद्दल प्रचंड आकर्षण होते व अलेक्झांडर द ग्रेट च्या पावलावर पाउल ठेवून संपूर्ण मध्य एशिया पायाखाली घालण्याची त्याची मनोमन इच्छा होती.

भारतातल्या नोकरीमुळे त्याला भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या वेळी गांधार संस्कृतीचा बौद्ध तत्वज्ञानावर व संस्कृतीवर पडलेल्या परिणामाचा तो अभ्यास करू लागला. या अभ्यासानंतर त्याला असे वाटू लागले की या प्राचीन तत्वज्ञानाचा प्रभाव चीनमधील संस्कृतीवर, मुख्यत्वे रेशीम मार्गावरील गावांच्यावर, खचितच पडलेला असणार. आपल्या या विचारांनी तो अक्षरश: झपाटला गेला. व आपली नोकरी सांभाळून तो भारतातील ब्रिटिश सरकारच्या मागे, रेशीम मार्गावर उत्खनन मोहिमा काढाव्या यासाठी एकांगीपणाने प्रयत्नशील राहला. त्याच्या चिकटपणाला व अथक प्रयत्नांमुळे ब्रिटिश भारत सरकार व ब्रिटिश म्युझियम यांनी त्याला तीन वेळा या मोहिमा काढण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले.


या तिन्ही मोहिमा मिळून ऑरेलने 25000 मैलांची पायी भ्रमंती केली. काश्मिर, अफगाणिस्तानमधल्या हिमालयांच्या रांगा किंवा Takalamakan’, ‘Lop-Nor’ आणि ‘Gobi’ यासारखी भयानक वाळवंटे त्याने व त्याच्या टीमने अनेक वेळा ओलांडली. अनेक जीवघेण्या प्रसंगातून तो पार पडला. या सगळ्यातून अनेक कलाकुसर केलेल्या वस्तु, रेशमी फलक, पुस्तके आणि रंगवलेली लाकडी पॅनेल्स त्याने शोधून काढली. ऑरेलचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे मोगाओकिंवा 1000 बुद्धांच्या गुहा. चीमधल्या गान्सू प्रांतातले दुनहुआंग हे शहर रेशीम मार्गावर आहे. या ठिकाणी असलेल्या या प्राचीन गुहांची माहिती ऑरेल स्टाइनला मिळाली. त्यावेळी वांग युआन्लू नावाचा एक भिक्खू या ठिकाणाची देखभाल करत असे. ऑरेलने या भिक्खूला आपलेसे केले व केवळ 220 ब्रिटिश पौंडांना या ठिकाणी असलेले अनेक दस्ताऐवज, चित्रे, रेशमी फलक खरेदी केले.


चिनी कम्युनिस्ट सरकार ऑरेलला आपल्या देशातल्या महत्वाच्या वस्तू चोरणारा सर्वात मोठा वसाहतवादी चोर म्हणून मानते. व डुआनहुआंग मधल्या गुहांत आजही तशा पाट्या लावलेल्या सापडतात.


रेशीम मार्गावर असलेल्या गावांच्या सांस्कृतिक वैभवाची, जगाला प्रथम ओळख करून देणारा म्हणून सर ऑरेल स्टाइन याचे नाव जगप्रसिद्ध आहे. पुन्हा कधी नव्या दिल्लीला गेलात तर हे भांडार पहायला विसरू नका.

4 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “रेशीम मार्गाचा उत्खननशास्त्रज्ञ

  1. फारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

    Posted by निरंजन | मार्च 4, 2010, 6:48 pm
  2. sir very informative ,will you please post about the Gautam Buddha’s life history .and Ancient people living style,agriculture,life style,revenue,etc.

    Posted by panjabrao bhagat | एप्रिल 29, 2014, 7:42 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: