.
ताज्या घडामोडी Current Affairs

जर्मन बेकरी


काल संध्याकाळचीच गोष्ट! आमच्या ओळखीच्या एक बाई माझ्या पत्नीला सांगत होत्या की काल मुद्दाम गाडी काढून ती जर्मन बेकरी पाहून आले. सारख्या बातम्या येत आहेत आणि मला हे दुकान माहित पण नव्हते.” पुण्यातला अगदी यंग क्राऊड सोडला तर बहुतेक पुणेकरांची हीच प्रतिक्रिया असावी असे मला तरी वाटते. मागच्या शनिवारी झालेल्या बॉम्ब स्फोटाची बातमी टी.व्ही. वाहिन्यांनी जसजशी प्रसृत करायला सुरवात केली तेंव्हा बहुतेक दर्शकांना हाच प्रश्न पडला असावा की ही जर्मन बेकरी आहे तरी कोठे? व त्या बेकरीला हे नाव का दिले आहे?

आधी बहुतेक पुणेकरांची पूर्व दिशेची धाव कॅंटोन्टमेंट मधल्या मेन स्ट्रीटच्या पुढे फारशी जात नाही. कोरेगांव पार्क हे नाव ऐकलेले असले तरी विमानतळाकडे जाताना हा भाग लागतो एवढीच बहुदा त्याची ओळख. या भागात तीस चाळीस वर्षांपूर्वी किर्लोस्करांनी पुण्यातले पहिले पंचतारांकित हॉटेल चालू केले होते तेंव्हा अनेक पुणेकर पुण्याची ही शान बघायला आवर्जून गेले होते. त्या वेळेस त्यांचे पाय कोरेगाव पार्कला लागले असले तर असतील. नाहीतर बहुतेक पुणेकरांसाठी हा भाग आऊट ऑफ बाऊंड्सच म्हणायचा. या भागात दिसणारे कफन्या घातलेले गोरे लोक, गल्ल्यांच्यात दिसणारे मोठमोठे बंगले, गाड्या आणि ओळखीची न वाटणारी नावे असलेली हॉटेले यामुळे कोरेगाव पार्कशी सर्व साधारण पुणेकरांची फारशी जवळीक कधीच झाली नाही. त्यानंतर आचार्य रजनीश या गृहस्थांनी येथे आपला आश्रम सुरू केला. या आचार्यांचे बहुतेक शिष्य़ परदेशी आणि कफन्या घातलेले. प्रथम प्रथम तर पुणेकर या मंडळींच्या कडे अतिशय संशयाने हा कोण प्राणी आहे बुवा? या अविर्भावानेच बघत. पण हळू हळू ही मंडळी निरुपद्रवी व खिश्यात डॉलर्स असल्याने चांगली गिर्‍हाईके आहेत हे आजूबाजूच्या दुकानदारांना आढळून आले व ही शिष्य मंडळी पुणेकरच बनली. असे जरी असले तरी सर्व साधारण पुणेकर अगदी तरूण पुणेकरही, या भागापासून दूरच रहात. आमच्या पिढीतल्या तरूणांसाठी लकी व गुडलक या इराणी उपहारगृहांना जे महत्व होते तेच नंतर रूपाली, वैशाली या उडपी उपहारगृहांना आले. पण तरी कोरेगाव पार्क पासून तरूण मंडळी चार हात दूरच राहिली.

या भागाशी माझी ओळख दहा एक वर्षांपूर्वी झाली. माझ्या मुलीने या भागात असलेल्या एका IT कंपनीत नोकरी घेतली. ती दिवसाचे आठ दहा तास याच भागात घालवत असल्याने या भागात असलेली सर्व उपहारगृहे, गप्पा मारण्याची ठिकाणे तिला चांगलीच परिचित झाली. त्यामुळे वीक एन्डला बाहेर जेवायला जायचा बूट निघाला की तिचे प्राधान्य कोरेगाव पार्कला जाण्याचे असे. त्यामुळे आमचेही कोरेगाव पार्कला जाणे येणे वाढले. त्यामुळे या भागात असलेल्या जर्मन बेकरी सारख्या अनेक जागा निदान परिचित तरी झाल्या.


मागच्या तीस वर्षात पुण्यात दोन प्रमुख बदल झाले. यापैकी पहिला बदल म्हणजे सुरू झालेली खाजगी संस्थांनी चालू केलेली अभियांत्रिकी व वैद्यकीय कॉलेजे. या कॉलेजातील जागांपैकी काही जागांसाठी जरी या संस्था सरकारने आखून दिलेले शुल्क घेत असल्या तरी बाकीच्या आणि मुख्यत्वे व्यवस्थापनासाठी राखीव असलेल्या जागांसाठी खूप मोठी रक्कम विद्यार्थ्यांकडून घेण्यात येते. उत्तर हिंदुस्थानातील विद्यार्थी बहुतांशी एवढी मोठी रक्कम भरून प्रवेश घेण्यास तयार असल्याने उत्तर हिंदुस्थानी मुले व मुली ही खूप मोठ्या प्रमाणात पुण्यात शिक्षणासाठी आली. ही बहुतेक मुले अतिशय श्रीमंत घरांच्यातून येत असल्याने या मुलांच्या हातात सर्वसाधारण पुणेकर कल्पनाही करू शकणार नाही एवढा पैसा खेळत असतो. या शिवाय पुण्यात शिक्षणासाठी येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली असल्याने हातात पैसे असणार्‍या तरूणात आणखी भर पडत चालली आहे. याच काळात पुण्यात झालेला दुसरा बदल म्हणजे अनेक IT व इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आगमन.या कंपन्यांच्यातील नोकर वर्ग हा सबंध देशभरातून भरती केलेला असल्याने अनेक प्रांतातील तरूण पुण्यात आले. या कंपन्या भरपूर पगार देत असल्याने हातात भरपूर पैसे असलेला आणखी एक वर्ग पुण्यात निर्माण झाला आहे. या सर्व तरूण मंडळींना तसा भरपूर वेळ असल्याने जर्मन बेकरी सारख्या उपहारगृहांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. वीक एन्डस ना तर ही उपहारगृहे एवढी खचाखच भरलेली असतात की विचारू नका. या सर्व तरूण मंडळींना कोरेगाव पार्क भागाचा जो आंतर्राष्ट्रीय ऍम्बियन्स आहे तो चांगलाच भावतो. त्यामुळे धडपडत ही मुले व तरूण पुण्याची बेशिस्त वाहतुक सहन करत कोरेगाव पार्कलाच जातात.


ही जर्मन बेकरी चालू केली श्री नानू खरोसे यांनी. हे श्री. खरोसे आधी रजनीश आश्रमाच्या बाहेर सिगारेट्सची विक्री करण्याचा व्यवसाय करत. रजनीश आश्रमातील एक जर्मन भक्त श्री. वूडी यांच्या भागीदारीत खरोसे यांनी हे उपहारगृह 1988 मधे चालू केले. आपल्या उपहारगृहाचे नाव काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असावे अशी श्री. खरोसे यांची इच्छा होती. श्री वूडी जर्मन असल्याने या उपहारगृहाचे नाव जर्मन बेकरी असे ठेवण्यात आले. श्री.वूडी हे सॅन्डविचेस बनवण्यात मोठे वाकबगार असल्याने, जर्मन बेकरी थोड्याच दिवसात रजनीश आश्रमातील लोकांच्यात लोकप्रिय झाली. श्री वूडी जर्मनीला परत गेल्यावर उपहारगृहाची मालकी खरोसे कुटुंबाकडे आली. सध्या हे उपहारगृह श्रीमती खरोसे व त्यांची मुलगी या चालवतात. काही वर्षांपूर्वी हेल्थ फूडचे फॅड आल्यावर जर्मन बेकरीने आपल्या पदार्थांचे स्वरूपच बदलले व जर्मन बेकरी एक हेल्थ फूड उपहारगृह झाले.

कोरेगाव पार्कच्या एकूण आंतर्राष्ट्रीय ऍम्बियन्सचा जर्मन बेकरीला चांगलाच फायदा झाला व पुण्यात बाहेर गावे व देश यांच्यातून आलेल्या तरूण वर्गामधे हे उपहारगृह अतिशय लोकप्रिय झाले आहे. दहशतवाद्यांना आपल्या कृत्याला आंतर्राष्ट्रीय प्रसिद्धी नेहमीच हवी असते. त्यामुळे बहुदा हे उपहारगृह त्यांनी निवडले असावे.

काहीही असो! जर्मन बेकरीच्या मालकांच्या निवेदनाप्रमाणे, जर्मन बेकरी परत पूर्वीच्याच स्वरूपात उभी रहाणार आहे. आता सुरक्षाविषयक बदल मात्र केले जाणार आहेत. पुण्यातल्या तरूण वर्गासाठी, ज्यांच्या दिनक्रमाचे, जर्मन बेकरी हे अविभाज्य अंग बनले आहे, त्यांना ही गोष्ट मोठी दिलासा देणारी असणार आहे हे नक्की.

18 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “जर्मन बेकरी

 1. Itarapramane majhya manatalehi anek samaj-gairsamaj dur zale German Bakery baabtit….Dhanywad…Punha navyane Bakery chalu hotiye he aikun chaan vatala…

  Posted by Ashish | फेब्रुवारी 18, 2010, 2:55 pm
 2. चंद्रशेखर, तुमच्या ब्लॉगला दाद द्यावीशी वाटते. ही एवढी माहिती तुम्ही कोठून मिळवता?
  तुमचे लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात. कोरेगाव पार्क हे खरेच पुण्यात असूनही पुणेकरांपासून तसे लांबच राहिले आहे.

  उत्तम लेखाबद्दल धन्यवाद!

  एक छोटीशी दुरुस्ती:
  “सध्या हे उपहारगृह श्रीमती खरोसे व त्यांच्या पत्नी चालवतात.” या वाक्यात थोडी गडबड झाली आहे. सध्या श्रीमती खरोसे या एकट्याच दुकान चालवतात वाटतं. असेच सकाळमध्ये वाचल्याचे आठवते.

  Posted by सौरभ | फेब्रुवारी 18, 2010, 3:02 pm
  • सौरभ

   लेखातील चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. हे वाक्य खरे म्हणजे श्रीमती खरोसे व त्यांची मुलगी चालवतात असे पाहिजे. लेखात मी बदल केला आहे.

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 18, 2010, 3:08 pm
 3. छान लेख आहे. वर्णन चांगले केलेत.

  Posted by हेमंत आठल्ये | फेब्रुवारी 18, 2010, 4:53 pm
 4. येथे मृत्यूची चाहूल याविषयी लिहिलेय. जर्मन बेकरी चा संबंध येथे पण आहे. आपण छान माहिती दिली आहे. धन्यवाद !

  Posted by savadhan | फेब्रुवारी 19, 2010, 7:55 सकाळी
 5. tumache lekh mi nehami vachto.
  tunchyakade aashi kiti mahiti aahe.
  u r great.
  leka aarthpurn aastat.
  mala khup aavadtat.
  mi ek 18 varshncha mulaga aahe.malahi barechse lihayache aahe mi lihitohi.pan te tevadhe khas naste.kahi margadarshan kara.please.
  thank you.
  Abhijit M.
  malkhare_555@yahoo.com.

  Posted by abhijit | फेब्रुवारी 22, 2010, 9:13 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: