.
अनुभव Experiences

माझ्या मना!


मागच्या आठवड्यात एका विवाह समारंभाला गेलो होतो. तिथे मला माझ्या एका शाळासोबत्याचा धाकटा भाऊ अचानक भेटला. या माझ्या शाळा सोबत्याला मी भेटल्याला निदान आठ दहा वर्षे तरी नक्कीच होऊन गेली होती. साहजिकच मी या शाळा मित्राची खुशाली त्याच्या भावाला विचारली. तो एकदम गंभीर झाला व मला म्हणाला की तुला माहिती नाही का? तुझा मित्र वर्षापूर्वीच गेला.” क्षणभर काय बोलावे ते मला सुचेना. या माझ्या शाळासोबत्याला मेंदूचा काहीतरी विकार झाला होता म्हणे.

अलीकडे या असल्या बातम्या फार ऐकू लागल्या आहेत. दोन महिन्यापूर्वी माझा एक समवयस्क नातलग एकदमच गेला. त्याला कर्करोग झाल्याचे समजले. व तीन महिन्यात सगळे संपले देखील. आजच एका समवयस्क परिचिताबद्दलची हीच बातमी समजली. त्याचेही कर्करोगाचे निदान झाले होते. परंतु शल्यचिकित्सेनंतर तो ठीक आहे असे समजले होते. परंतु एकदम गाडे फिरले. रोज संध्याकाळी आम्ही काही मित्र गप्पा गोष्टी करण्यासाठी जमतो. तेथेही मधून मधून अशा बातम्या समजतातच.

कल्पना करा की आपण लांबच्या ठिकाणी जाणार्‍या एखाद्या बसने प्रवासाला निघालो आहोत. जरा वेळाने शेजारच्या, अलीकडच्या, पलीकडच्या सीटवर बसलेले चेहेरे आपल्याला ओळखीचे वाटू लागतात. मधेच घंटी वाजते, बस थांबते व जवळच्या सीट्वरचा एखादा बस सोडूनच जातो. क्षणभर का होईना त्या सहप्रवाशाचे हे जाणे आपल्या मनाला रुचत नाही. हे समवयस्क नातलग, परिचित, मित्र असेच आयुष्याची बस सोडून एकदम गेले की मनाला मोठी चुटपूट लागते. त्यांच्याबरोबर आपल्या आयुष्यातले काही क्षण आपण घालवलेले असतात त्यांचे स्मरण होते. आपले दैनंदिन व्यवहार काय चालूच रहातात. ते काही कोणासाठी अडून रहात नाहीत. पण मधूनच एखाद्या बेसावध क्षणी अशा कोणत्या तरी सोबत्याची कोणतीतरी आठ्वण मनात एक असह्य कळ उमटवते ही गोष्ट मात्र खरी.

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर असलेल्या एका लोकप्रिय हॉटेलमधे कॉफी आणि गप्पा यासाठी जमायचे असा आम्हा काही मित्रांचा निदान गेल्या पंचवीस तीस वर्षांचा तरी परिपाठ आहे. आमच्या मूळ ग्रूपमधले फार थोडेजण आता रोज भेटतात. त्यातले काही जण शारिरिक व्याधींनी आता पिडीत आहेत. एकजण तर अंथरूणावरच आहेत. या मित्रांचे न भेटणे मनाला असह्यकारक होत नाही कारण मनाला हे माहीत असते की गाडी बाहेर काढून चार मैल गेले की तो स्नेही परत भेटणार आहे. पण हे आयुष्याची बस सोडून गेलेले नातलग, स्नेही आता परत भेटणारच नाहीत ही भावनाच मोठी क्लेशदायक असते हे मात्र खरे. कदाचित असेही असेल की असे समवयस्क आपल्याला सोडून जाऊ लागले की आपणही ज्येष्ठ नागरिक झालो आहोत हे सारखे मनाला जाणवू लागते.

महर्षि अण्णासाहेब कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र रघुनाथराव जेंव्हा कालवश झाले तेंव्हा अण्णांचे वय शंभरीच्या घरात होते. कोणीतरी त्यांच्या समाचाराला गेले असता अण्णांनी त्यांना सांगितले होते त्याचे वय आता झालेच होते तेंव्हा त्यात दु:ख काय मानायचे? ” मनाचा हा कणखरपणा व आयुष्याकडे तटस्थपणे बघण्याची वृत्ती अंगी बाणणे म्हणूनच महत्वाचे.

एक गोष्ट मात्र खरी की आयुष्याच्या बसची घंटी वाजून आपला स्टॉप आला आहे की नाही ते आपल्याला तो कंडक्टर सांगेपर्यंत तरी माहितच नसते. एवढे लक्षात ठेवायचे की तो सांगेल तेंव्हा लगेच उतरावेच लागते. तुमची इच्छा असो वा नसो.

14 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “माझ्या मना!

 1. > महर्षि अण्णासाहेब कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र रघुनाथराव जेंव्हा कालवश झाले तेंव्हा अण्णांचे वय शंभरीच्या पुढे होते.
  >—-

  Ra Dhon Karve died in 1953. Annasaheb Karve completed 100 in 1958. It’s a nitpick. Dhondo Keshav was indeed very old when RDK passed away.

  – dn

  Posted by Naniwadekar | फेब्रुवारी 15, 2010, 1:57 pm
 2. Excellent..

  A few ramdom thoughts..

  When the time comes one has to leave the bus, this is so true and one does get the strength to bear this loss when the happening is natural..or lets say anticipated.

  I shudder to imagine the plight of many a people in recent times who have had to see some of their near and dear ones depart because they jumped off the running bus…..

  Posted by Jitendra Gokhale | फेब्रुवारी 15, 2010, 9:27 pm
 3. श्रीपाद महादेव माटे यांनी या विषयावर एक रुपकात्मक कथा लिहिली होती. गणू हलवाई एका जत्रेला ज़ातो, पण कोडताचं समान (court-summons) आल्यावर त्याला निघावंच लागतं. त्याचा छकडा म्हणून यमाच्या रेड्यासारखाच काळा रंग वापरलेला आहे. या कथेचं आणि माट्यांच्या शैलीचं छोटंसं रसग्रहण त्यांची आवडती विद्‌यार्थिनी शान्ताबाई शेळके यांनी केलं आहे. ते शान्ताबाईंच्या ‘एक पानी’ या सुंदर पुस्तकात आहे.

  – डी एन

  Posted by नानिवडेकर | फेब्रुवारी 16, 2010, 8:59 सकाळी
 4. चंद्रशेखर, प्रत्येकाच्याच मनातले विचार तुम्ही मांडले आहेत. धन्यवाद.

  “एक गोष्ट मात्र खरी की आयुष्याच्या बसची घंटी वाजून आपला स्टॉप आला आहे की नाही ते आपल्याला तो कंडक्टर सांगेपर्यंत तरी माहितच नसते. एवढे लक्षात ठेवायचे की तो सांगेल तेंव्हा लगेच उतरावेच लागते. तुमची इच्छा असो वा नसो. ”

  एकदम पटले!

  Posted by सौरभ | फेब्रुवारी 16, 2010, 12:11 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: