.
अनुभव Experiences

प्लंबरशूळ


तीन चार महिन्यांपूर्वी आमच्या घरात असा ठराव पास झाला की आपल्याला आणखी एका स्वच्छतागृहाची गरज असल्याने ते घरात बांधून घ्यावे. अर्थातच कार्यवाहीची जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली. आपण आपल्या कल्पनेने आणि डोक्याने काहीतरी चांगले करायला जायचे पण नंतर जे काय बनेल त्याच्याबद्दल, काय भिकार डिझाईन केले आहे असे टोमणे जन्मभर ऐकायचे, हे टळावे म्हणून मी ओळखीतल्याच एका आर्किटेक्टकडून एक स्वच्छतागृहाचा आराखडा बनवून घेतला. त्याला घरातून मान्यता मिळाल्यावर एक चांगला (माझ्या मते) प्लंबिंग कॉंन्ट्रॅक्टर शोधला.

स्वच्छतागृहाचे बांधकाम आमच्या ओळखीतल्या एका व्यावसायिकाकडून करून घेतले. नंतर प्लंबिंग कॉ न्ट्रॅक्टर किंवा नळतज्ञाकडून आवश्यक त्या सामानाची यादी करून घेतली. कोणतीही काटकसर न करता बाजारात मिळत असलेल्या अत्यंत महाग ब्रॅन्डचे नळ जोड व इतर सामुग्री खरेदी केली. नळतज्ञाने सर्व नळ जोड तत्परतेने मझ्या मनासारखे बसवून दिले. त्यानंतर सिरॅमिक टाईल्स बसवणे वगैरे कामे झाल्यावर आमचे नवीन व झकपक स्वछतागृह तयार झाले. मी एक जबाबदारी संपल्याच्या आनंदात तो दिवस घालवला व गाढ झोपी गेलो.

सकाळी पहाटेच टपटप अशा आवाजाने जागा झालो. प्रथम काही कळेना पण नंतर लक्षात आले की कोठेतरी पाण्याचे थेंब पडत आहेत. अवकाळी पाऊस कसा काय पडतो आहे बुवा? असे आश्चर्य प्रथम वाटले पण घराचे दार उघडून बघितल्यावर लक्षात आले की दाराजवळ नवीनच बसवलेल्या एका सांडपाण्याच्या नळातून हा अभिषेक होतो आहे. नळ तज्ञांना दूरध्वनी केला पण ते भेटले नाहीत. बरेच फोन व शेरभर रक्त आटल्यावर व हा अभिषेक 15 ते 20 दिवस सतत चालू राहिल्यावर नळतज्ञ उगवले. या पाणी गळण्याशी आपल्या कामाचा काही संबंध नसल्याची त्यांनी ग्वाही दिली. पण हे पाणी बंद न झाल्यास त्यांचे बिल चुकते करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात हे त्यांच्या नजरेस आणून दिल्यावर त्यांनी त्वरेने हा अभिषेक बंद करण्याचे वचन दिले.

पुढचा पंधरवडा माझे नळ तज्ञांना अनेक फोन होण्याशिवाय दुसरे काहीच घडले नाही. शेवटी फारच तगादा लावल्यामुळे नळतज्ञ एकदाचे उगवले व एवढ्या बारक्या गोष्टीसाठी मी फारच कटकट करतो आहे अशा अविर्भावात त्यांनी कार्यवाही केली. परंतु या मधल्या काळात नवीन स्वच्छतागृहाचे उदघाटन होऊन वापर सुरू झाला होता. स्वच्छतागृहातला प्रत्येक नळजोडातून तो बंद केल्यावरही पाणी बाहेर कसे काय येते ? असा प्रश्न माझ्यासारखाच घरातल्या इतरांनाही पडला असल्यामुळे नळतज्ञांना परत दूरध्वनी करणे ओघानेच आले. मध्यंतरी स्वच्छतागृहाच्या एका कोपर्‍यात सतत पाणी साचून रहाते आहे असे दृष्टोत्पत्तीस आले.ज्या गृहस्थांनी बांधकाम व टाईल्सचे काम केले होते त्यांना पाचारण केले.

त्यांनी चूक आपली नसून नळतज्ञांनी सांडपाण्याची मोरी उंच बसवली असल्याने असे होते आहे हा खुलासा दिला. माझ्या कळकळीच्या विनंतीचा आदर करून त्यांनी हा प्रश्न आपण आठ दहा दिवसात सोडवू असे आश्वासन मला दिले व ते पूर्णही केले.

हे झाले तरी कळीचा मुद्दा तसाच राहिला. अनेक फोन व बिल चुकते करण्याची लालूच दाखवून जे वरवर दिसत होते असे पाणी गळणे तरी थांबवण्यात मी सध्या यशस्वी झालो आहे. तरीही प्रश्न संपूर्ण सुटलेलाच नाही. शेवटी मास्टरकॉक बंद करून ठेवणे एवढा एकच मार्ग मला दिसला व तो मी अंमलात आणला आहे. मात्र नवीन स्वच्छतागृहाचे काम मी अत्यंत हलगर्जीपणाने करून घेतले आहे असा शिक्का माझ्या माथी कायमचाच बसला आहे.

अलीकडे नळ, प्लंबर वगैरे शब्द सुद्धा माझ्या कानावर आले की माझ्या मस्तकातून एक कळ जाते व मस्तकशूळ उठतो. पूर्वीचे लोक सुखी का होते? त्याचे इंगित आता माझ्या चांगलेच लक्षात आले आहे. आंघोळ करायची असली तर नदीवर किंवा विहिरीवर जायचे आणि बहिर्दशेला जावे वाटले तर शेतात किंवा समुद्रकिनार्‍यावर जायचे. नळ जोड, प्लंबर वगैरे मंडळींशी ओळखच नाही किंवा हे शब्द माहित असण्याची गरजच नाही. सुखी आयुष्य म्हणतात ते हेच याबद्दल माझी खात्रीच पटली आहे.

11 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “प्लंबरशूळ

  1. हा हा.. एकदम मस्त लिहिलंय.. पुलंच्या ग्रहयोगांमध्ये नळगळं योग किंवा मठ्ठप्लंबर योग म्हणून add करायला हरकत नाही..

    Posted by हेरंब | फेब्रुवारी 11, 2010, 12:11 pm
  2. जगाच्या पाठीवर कुठेही जा हे प्लंबर-इलेक्ट्रिशिअन्स-टाईलींगवाले-एकजात हे असेच. मठ्ठ आणि अडमुठे व दिल्या शब्दाला हमेशा टांग मारणारे. अगदी झकास उठलाय प्लंबरशूळ. 🙂

    Posted by bhaanasa | फेब्रुवारी 12, 2010, 7:41 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: