.
अनुभव Experiences

विस्कटलेला दिवस


काल सकाळी थोडी उशीराच जाग आली. गेले तीन चार दिवस चाललेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमामुळे, सगळे रूटीन बिघडलेलेच होते. कधीही आणि काहीही जेवणे व खाणी, जागरणे ही चाललेलीच होती. त्यामुळे कदाचित असे झाले असावे नाहीतर अलीकडे पहाटे झोप ही उडतेच. डोळे उघडल्या बरोबर पलीकडच्या बाजूला नजर टाकली व गेल्या दीड दोन महिन्याच्या सवईप्रमाणे धाकट्या नातीला गाढ झोपलेली बघितली आणि एखादा काटा रुतावा तसे एकदम लक्षात आले की अरे उद्या आपल्याला ही अशी झोपलेली दिसणार नाहीये. तिची आई म्हणजे माझी मुलगी व या दोन्ही नाती आज संध्याकाळीच त्यांच्या घरी जायला निघणार आहेत. मुलगी माहेरपणाला आली की तिचा परत जाण्याचा दिवस कधी उगवूच नये असे आईवडीलांना वाटत रहाते, त्यात ती मुलगी जर परदेशात रहात असली तर विचारूच नका, पण तो दिवस शेवटी उगवतोच.

ती रूखरूख मनात ठेवूनच उठलो. का कोण जाणे पण आज काही करण्यात उल्हासच वाटत नव्हता. धाकटीला जवळ घेउनच बसावे असे सारखे वाटत होते. पण नाती उठल्या व त्यांचा रोजचा दंगा, दूध पिण्यासाठी नकार मग त्यांच्या आईचे रागावणे वगैरे सुरू झाले. रोज करतो तसा सकाळी संगणकही चालू करावा असे आज का कोण जाणे वाटलेच नाही.धाकटीला कडेवर घेऊन अंगणात खूप वेळ उभा राहिलो. असे सारखे वाटत होते की आता उद्यापासून हिला कडेवर घेणे शक्य नाही. मन आणखीनच खिन्न झाले. प्रवासाला निघण्याचे असल्याने घरात गडबड चालू होती. साहजिकच बेबी सिटींगचे काम माझ्या डोक्यावर येऊन पडले होते. त्यामुळे नातीबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवणे शक्य होत होते पण त्याच बरोबर मनाची घालमेलही होत होती. अर्थात हे सर्व नातीला समजणे शक्यच नव्हते. ती आनंदात होती.

असाच दिवस पार पडला. संध्याकाळ उगवली आणि विमानतळावर मंडळींना घेउन जाण्यासाठी गाडी पण आली. त्यात एवढे थोरले सामान भरणे, आयत्या वेळचे गोंधळ आणि घाई यात माझ्या नाती आणि मुलगी गाडीत बसले कधी आणि गाडी निघाली कधी हे कळलेच नाही. पण गाडी वळणावरून दिसेनासी झाली आणि मन एका अंधार्‍या रिकामपणाने भरून गेले. काही करावेसेच वाटेना. शेजारच्या आजींचे शब्द कानात गुंजत राहिले. “बाकी काही चालते पण हा विरहाचा क्षण सोसणे फार कठिण असते.” संध्याकाळ रात्र तशीच वाट पहाण्यात गेली. गाडीतून, विमानतळावरून मुलीच्या फोनची व त्यावरून नातींचे हसणे कधी ऐकता येईल याची वाट बघण्यात गेली.मध्यरात्र उलटून गेल्यावर कधीतरी मुलीचा विमानात बसल्याचा एस.एम.एसआला व त्यानंतर कधीतरी डोळ्याला डोळा लागला.

सकाळी उठल्यावर घर अगदी रिकामे वाटते आहे हे प्रकर्षाने जाणवले. गेले दीड दोन महिने घरात सतत चाललेली गडबड आणि गोंधळ मुळी आता विझूनच गेला होता. काही केलेच पाहिजे असे काहीच नव्हते. शेवटी मुलीचा परदेशातून आलेला फोन वाजला. आतुरतेने फोन उचलला. नाती त्यांच्या घरी पोचल्यामुळे, त्यांचे खेळ पुस्तके सगळे त्यांना परत मिळाल्यामुळे प्रचंड खुष होत्या. आमच्याशी बोलण्यात त्यांना आता काही फारसे स्वारस्यच नव्हते. फोनवर ऐकू येणारे त्यांचे खिदळणे ऐकले आणि मनाला खूप बरे वाटले. सगळे जण आपापल्या जगात परत पोचले होते.

आजीआजोबा मात्र अजून कालच्याच आठवणीत, मनाचा खिन्नपणा कसा घालवायचा याच्याच प्रयत्नात होते. कालचा विस्कटलेला दिवस अजून तसाच विस्कळितच होता त्याची घडी अजून बसलेलीच नव्हती.

9 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “विस्कटलेला दिवस

 1. हम्म्म..दोनच आठवडे झालेत आई परत मायदेशात गेली. तिनेच शिकवलेला आज्जी शब्द माझा मुलगा सक्काळपासुन घोकतो तेव्हा आपण त्याची अपराधी आहोत असं फ़ार वाटतं..खरंच विरहाचा हा क्षण येऊच नये असंच वाटतं…

  Posted by Aparna | फेब्रुवारी 9, 2010, 12:22 pm
 2. ह्या वेळी मी माझी मुलीला पहिल्यांदाच भारतात घेऊन जाणार आहे. तिकडे आजी आजोबा त्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की! विरहाचा क्षण ह्यापूर्वी ही अनुभवला पण आता तो जास्त गहिरा असेल. काळजाला घर लावणारा!

  Posted by शब्दांकित | फेब्रुवारी 9, 2010, 10:55 pm
  • नातवंडांना पहिल्यांदा बघण्यासाठी आजी-आजोबा किती आतूर असतात त्याची आई-वडीलांना कधीच कल्पना येत नाही. त्यातून ती नातवंडे परदेशात असली तर विचारूच नका. पण नातवंडे भेटतात न भेटतात तर त्यांचा जाण्याचा दिवस येतो.

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 10, 2010, 3:26 pm
 3. दरवेळी मायदेशातून निघताना माझ्या आणि आईबाबांच्या जीवाची घालमेल…. हा विरहाचा क्षण कधीही येऊच नये कधी. प्रत्येकवेळी तोंडात येत राहते, अग आई….. पण ती मात्र माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. पोस्ट वाचता वाचता गलबलून आले.

  Posted by bhaanasa | फेब्रुवारी 12, 2010, 7:47 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention विस्कटलेला दिवस « अक्षरधूळ(Akshardhool) -- Topsy.com - फेब्रुवारी 9, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: