.
अनुभव Experiences

हलती -फिरती क्रांती


मध्यंतरी, अमेरिकेला स्थायिक असलेले माझे एक स्नेही, भारत भेटीसाठी आले होते. मागच्या वेळेस ते भारतात आले होते त्याला जवळ जवळ दहा वर्षे तरी उलटून गेली असावीत. ते आल्यामुळे, आम्ही काही जुने मित्र त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी करत बसलो होतो. त्यांना सहज कोणीतरी विचारले की मागच्या दहा वर्षात त्यांना भारतात सर्वात मोठा असा कोणता फरक जाणवला? मला वाटले होते की ते बराच विचार करून उत्तर देतील. पण त्यांना क्षणाचाही वेळ उत्तर द्यायला लागला नाही कारण त्यांना अगदी विमानतळावर उतरल्यापासूनच हा फरक जाणवला होता. हा फरक होता मोबाईल फोन्सचा भारतात आता दिसणारा सुळसुळाट.

मागच्या महिन्यात मी माझ्या घरामधे काही बदल करून घेतले. त्यावेळी बांधकाम करणार्‍या मिस्त्रीला मदत करणार्‍या बिगार्‍यापासून ते प्लंबर, रंगारी, सुतार किंवा वायरमन कोणाकडेही बघितला तरी त्याच्याकडे मोबाईल फोन हा दिसेच. या लोकांच्याकडे जे मोबाईल फोन दिसत त्यात एक खास सुविधा होती. एक बटन दाबले की हा फोन टॉर्च किंवा फ्लॅशलाईट सारखा वापरता येत होता. त्यामुळे कोणत्याही अंधार्‍या कानाकोपर्‍यात बघणे या लोकांना सुलभ जात होते. ही सुविधा ज्या मोबाईल फोनमधे असते ते सर्वात कमी किंमतीचे मोबाईल असतात म्हणे! अशीही माहिती मला कळली. यातली काही मंडळी फोनवरून सतत गाणी ऐकत असत. मी त्यांना सहज विचारल्यावर मला अशी नवीन ज्ञानप्राप्ती झाली की त्यांच्या फोनमधे एफ. एम. रेडिओ सेवा पण ऐकू येते. आता घरातले काम संपल्यामुळे या मंडळींचे फोन व गाणी हे सर्वच बंद झाले आहे.


मागच्या आठवड्यात, एका वर्तमानपत्रात आलेली मुंबईतल्या एका मासे विक्रेत्याची मुलाखत मी वाचली. हे विक्रेते आता सर्रास मोबाईल फोनचा वापर करत असल्याने डॉकवर कोणते ताजे मासे येणार आहेत ते गलबते बंदराला लागण्याच्या आधीच त्यांना एक फोन केला की कळते. हे मासे निर्यात करणार्‍या कंपन्या, आता या विक्रेत्याला त्याच्या या माहितीमुळे लगेच ऑर्डर देतात. ती मिळाली की हा विक्रेता तीच ऑर्डर डॉकवरच्या कोळ्य़ांना देतो. पूर्वी हेच सव्यापसव्य करण्यासाठी त्याला स्वत: डॉकवर जावे लागे व बस आणि ट्रेनच्या प्रवासात चार ते पाच तास खर्च करावा लागे.

भारतातल्या जनसामान्यांच्या विश्वात रेडिओ किंवा टी.व्ही. नंतर आलेले, मोबाईल हे दुसरे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. या मोबाईलने याच जनसामान्यांना, आधुनिक तंत्रज्ञानाच्या एकदम शिखरावर नेउन ठेवले आहे. याला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच भारतीय मोबाईल फोन कंपन्यांची दूर दृष्टीही आहे यात शंका नाही. एका सेकंदाला एक पैसा या सारखा जगातील सर्वात कमी दर, येणारा कोणताही फोन फुकट, अशासारख्या सुविधांनी ही मोबाईल सेवा अतिशय लोकप्रिय झाली आहे. आज भारतात 55 कोटी मोबाईल कनेक्शन्स तरी असावीत म्हणजे प्रत्येक दुसर्‍या माणसाजवळ मोबाईल आहेच.


भारतात मिळणारे मोबाईल फोन, ऍपलच्या आयफोन सारखे उच्चतंत्रज्ञानविभूषित नाहीत पण 2G सारख्या जुन्या सेवेचे स्टॅन्डर्ड वापरून सुद्धा भारतीय मोबाईल कंपन्या ग्राहकांना गाणी व व्हिडियो डाउनलोड्स, रिंगटोन्स, बॅन्केची सुविधा, मार्केटमधले व शेअर्सचे भाव अशा अनेक सेवा पुरवत आहेत. टाटा मोटर्सने उत्पादन सुरू केलेल्या नॅनो मोटरगाडीचा खूप उदोउदो झाला पण भारतीय मोबाईल कंपन्या ग्राहकांना या सेवा ज्या स्वस्त दरात पुरवत आहोत ते बघता ही सेवा म्हणजे सुद्धा एक त्याच पद्धतीची क्रांतीच आहे हे लक्षात येईल. अनेक परदेशी कंपन्या या क्षेत्रात उतरण्यास उत्सुक आहेत. त्यांना यश मिळवायचे असले तर भारती किंवा रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांशी टक्कर देऊनच या क्षेत्रात उतरावे लागणार आहे.


भारतातला इंटरनेटचा वापर आणि प्रसार हा इतर देशांच्या मानाने अजून कमी आहे. याचे एक प्रमुख कारण सर्वसामान्यांना न परवडणार्‍या संगणकांच्या व ब्रॉडबॅन्ड सेवेच्या किंमती हेच आहे. भारतात तिसर्‍या पिढीची किंवा 3G मोबाईल सेवा आता येऊ घातली आहे. ती आली व त्यावर आधारित स्वस्त ब्लॅकबेरी सारखे मोबाईल फोन भारतात कंपन्यांनी उपलब्ध करून दिले तर इंटरेनेट ग्राहकांची संख्याही कोटी कोटी होईल याबद्दल माझी तरी खात्री आहे. ही मोबाईल सेवा जर स्वस्तात उपलब्ध झाली तर काही व्यवहार अगदी सुलभपणे होऊ शकतील. या प्रकारच्या व्यवहारांचे अगदी सहज लक्षात येऊ शकणारे उदाहरण म्हणजे बॅंक व्यवहार किंवा शेतमालाचे व्यवहार.

वर उल्लेख केलेल्या मासे विक्रेत्याला, मोबाईल फोनचे फक्त फायदेच झाले आहेत असे मात्र नाही. त्याच्याप्रमाणेच त्याची गिर्‍हाईके सुद्धा आता कोणते मासे डॉकवर येत आहेत हे फोन करून माहिती करून घेऊ लागले आहेत. त्यामुळे गिर्‍हाईक टिकवून ठेवण्यासाठी त्याला आता बरेच जास्त प्रयत्न करावे लागत आहेत.

मोबाईल काय किंवा इंटरनेट काय? त्यांच्या उपयोगाने व्यवहारात जी पारदर्शकता येते तीच खरे म्हणजे सर्वात महत्वाची आहे आणि त्यांचा वापर लोकप्रिय होण्याचे तेच खरे कारण आहे.

28 जानेवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: