.
Health- आरोग्य

बाटलीतला राक्षस


अलीकडे शाळेत जाणार्‍या सर्व मुलांच्या गळ्यात किंवा हातात पाण्याची बाटली ही असतेच असते. बाहेरचे कोणतेतरी अस्वच्छ पाणी आपल्या मुलामुलींनी न पिता घरचे उकळलेले किंवा फिल्टरमधून काढलेले निर्जंतुक पाणी प्यावे हाच पालकांचा यामागचा उद्देश असतो आणि तो स्तुत्य आहे यात शंकाच नाही. मी शाळेत असताना आमच्या शाळेत एक पाण्याचा हौद असे. त्याला आठ दहा तोट्या लावलेल्या असत. कॉर्पोरेशनचे पाणी टाकीत पडत असे. ते पाणी तोटीला तोंड लावून प्यावे लागे. आजूबाजूचा भाग नेहमी ओला रहात असल्याने फरशांच्यावर शेवाळे साठे व त्या हिरव्यागार दिसत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पाणी पिण्यामुळे आम्हाला कुठले साथीचे रोग झाल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. पण माझ्या लहानपणीच्या पद्धतीपेक्षा, पाण्याची बाटली नेण्याची आजची प्रथा नक्कीच खूपच जास्त आरोग्यसंवर्धक आहे. या पाण्याच्या बाटल्या असतात तरी किती छान! निरनिराळे मनमोहक रंग, पाणी पिण्यासाठी आतच बसवलेली नळी व चित्रविचित्र आकार यामुळे या बाटल्या आकर्षक दिसतात. काही बाटल्यांच्यावर मुलांना आवडणारी मिकी, टॉम किंवा डोरा यांची चिकटचित्रे डकवलेली असतात. थोडक्यात म्हणजे मुलांनी या बाटल्यांच्यातलेच पाणी प्यावे हा उद्देश या बाटल्या नक्कीच साध्य करतात.

बाटल्यांसारखाचे लोकप्रिय झालेले दुसरे उत्पादन म्हणजे पेयांचे डबे. हे डबे पत्र्याचे तरी असतात किंवा टेट्रॅपॅक पद्धतीनुसार पुठ्याचे बनवतात. पेय प्यावेसे वाटले की कॅन फोडायचा व कॅनला तोंड लावून सरळ पेय प्यायचे. ग्लास स्वच्छ धुतलेला आहे की नाही? वगैरे शंकाकुशंकांना वावच नाही. असे पेय पिणारी व्यक्ती दिसते सुद्धा आधुनिक.

पण या सर्व आकर्षक डबेबाटल्यांत एक छुपा राक्षस दडलेला आहे असे इंग्लंड व अमेरिकेमधल्या नवीन संशोधनावरून सिद्ध झाले आहे. या राक्षसाचे नाव आहे बिसफेनॉल ए.(bisphenol A) किंवा BPA . या रसायनाचा फवारा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पेयांचे डबे या सगळ्यांच्या आतल्या पृष्ठभागावर करण्यात येतो. या फवार्‍यामुळे डबा किंवा बाटलीला स्टिफनेस येतो व हाताळणीमधे ते खराब होत नाहीत. अमेरिकन सरकारच्या आरोग्य विभागाने 2006 साली केलेल्या एका पाहणीतून ( US government national nutrition survey in 2006) मिळालेल्या माहितीच्या आधारे संशोधकांना असे आढळून आले आहे की ज्यांना ह्रदयाचे विकार झालेले आहेत अशा लोकांच्या लघवीत बिसफेनॉल ए. किंवा BPA या रसायनाचे अंश जास्त प्रमाणात सापडतात. इंग्लंडमधल्या एक्सटर येथे असलेल्या Peninsula Medical School मधले epidemiology and public health या विषयाचे प्रोफेसर David Melzer आणि त्यांचे सहकारी यांनी 18 ते 74 या वयोगटातील 1493 व्यक्तींची तपासणी केली व त्यांना बिसफेनॉल ए. या रसायनाचा ह्रदरोगाशिवाय मधुमेह आणि यकृताचे विकार यांच्याशीही संबंध असल्याचे लक्षात आले. डॉक्टर मेल्झर यांच्या संशोधनाप्रमाणे ज्याच्या लघवीत या रसायनाचे अंश मिळतात अशा साठी ओलांडलेल्या एखाद्या पुरुषाला ह्रदयरोग जडण्याची निदान 45% तरी जास्त शक्यता दिसते.

बिसफेनॉल ए. हे रसायन नैसर्गिक रित्या कोठेच मिळत नाही. ते संपूर्णपणे मानवनिर्मित आहे. या रसायनाचे, शरीरातील पुनरुत्पादन संस्थेवर होणारे दुष्परिणाम शास्त्रज्ञांनी पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. परंतु ह्रदय व यकृत यावरील हे दुष्परिणाम नवीनच उघडकीस आले आहेत. कॅनडा मधल्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आदेशाप्रमाणे, हे रसायन विषारी व मानवी आरोग्यास घातक म्हणून घोषित करण्यात आले आहे व लहान बाळांच्या दुधाच्या बाटल्या वगैरे उत्पादनामधे BPA चा वापर आता पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे. आज अमेरिकेतील बहुसंख्य लोकांच्या लघवीमधे BPA चा अंश सापडतो. इतकेच काय तर बहुतेक अर्भकांच्या कॉर्ड ब्लडमधेही या रसायनाचे अंश सापडू लागले आहेत. अमेरिकेत हे रसायन बनवणार्‍या उत्पादकांच्या दबावामुळे तिथल्या आरोग्य विभागाला अजून या रसायनावर बंदी घालता आलेली नाही पण कदाचित 2010 मधे तसे होऊ शकते.

सिंगापूर सारख्या प्रगत देशात, जिथे लोक आरोग्याविषयी जागरूक असतात, BPA चा वापर न केलेल्या प्लास्टिक बाटल्या वगैरे उत्पादने मिळू लागली आहेत. भारतात मात्र ही जागरूकता नसल्याने छोटी मुले किंवा अर्भके जी प्लास्टिक उत्पादने वापरतात त्यात हे रसायन वापरले जाते की नाही याची आपल्या कोणालाच काही माहिती असेल असे वाटत नाही.

13 जानेवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

8 thoughts on “बाटलीतला राक्षस

 1. अतिशय महत्वपूर्ण माहिती
  धन्यवाद

  Posted by vikram | जानेवारी 13, 2010, 8:23 pm
 2. आपण कुठलंही पेय असो वा फळ असो ते नैसर्गिक रित्या तयार झालेल असेल असेच पिणे /खाणे जास्त श्रेयस्कर असते हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. थोडक्यात निसर्गात रमा, निसर्गात रहा, निसर्गाकडून जे मिळेल ते खा/प्या , तन्दुरुस्त रहाल हेच खरं

  Posted by savadhan | जानेवारी 13, 2010, 8:45 pm
 3. छान माहिती. बरोबर आहे.. अमेरिकेत लहान बाळांच्या दुधाच्या बाटल्यांवर “NO BPA” असं काही लिहिलेलं असतं. आज कळला त्याचा अर्थ.

  Posted by हेरंब | जानेवारी 13, 2010, 11:38 pm
 4. thanks for the information

  Posted by Innocent Warrior | जानेवारी 13, 2010, 11:50 pm
 5. बरेच दिवस टंगळमंगळ केली होती BPA याचा अर्थ शोधण्याचा…आज कळला…धन्यवाद…अमेरिकेत फ़्री बाटल्या इ. मिळतात तेवढं तरी बरं आहे…पण आपल्या देशात यासंबंधीचे कायदे कडक केले पाहिजेत..शिवाय उठसूठ प्लास्टिक बाटल्या वापरायचं अमेरिकन लोकांनी पण कमी केलं पाहिजे म्हणजे घरी फ़िल्टर ऐवजी बाजारात मिळणारे बॉटल्ड पाण्याचे क्रेट्स आणून मग एक एक बाटली वापरणे….

  Posted by Aparna | जानेवारी 14, 2010, 2:36 pm
 6. आधीच्या बाटल्यांत BPA हा अपायकारक घटक वापरत हे आत्ता कळतंय. लगेच बी पी ए पासून मुक्त बाटल्या बाज़ारात मिळू लागल्या आहेत. काही दिवसांनी या बाटल्यांतही नवीन कुठला CPA, DPA असला विषारी पदार्थ असल्याचं आढळलं तरी आश्चर्य वाटायला नको.

  आज़ एक नवीच बातमी आहे. धावण्यासाठी सोयीचे मानले ज़ोडे म्हणे पायांना इज़ा करतात, आणि अनवाणी धावलेलं उत्तम. मग इतके दिवस हे ज़ोडे कुठल्या चाचण्यांना उतरले होते, आणि आता अचानक कसे ते खराब सिद्‌ध झाले? इथले लोक जागरूक आहेत की त्या मिषानी त्यांच्या गळी सतत नवी खरेदी करायला लावणारे शोध मुद्‌दाम लावताहेत, काही कळत नाही.

  मी गेले १०-१५ महिने ऑफ़िसात एकच बाटली वापरतो आहे. त्यांपैकी पहिले २-३ आठवडे त्यातल्या अननसाच्या रसाची चव कायम होती; म्हणजे तेवढा वेळ कुठलं तरी विष माझ्या पोटात ज़ात होतं हे उघड आहे. अज़ूनही ज़ात असेल.

  गार्डियन पेपर म्हणतो की लंडनच्या नळांतलं पाणी शुद्‌ध बाटल्यांतल्या पाण्यापेक्षा जास्त शुद्‌ध आहे. तरी पाण्याच्या बाटल्या खपताहेत.

  भारतात प्रकृतीच्या गंभीर तक्रारी असलेले लोक प्रवासात पाण्याच्या बाटल्या घेतात, हे पाहता त्यात बनावट माल विकणं किती भयानक आहे, हे लक्षात येतं. चार लोक ऑलिम्पिकमधे धावण्याची शर्यत जिंकताहेत पण ८०% जनता लंगडते आहे, देशात खेळायला मुलांना ज़ागा नाही, प्यायला धड शुद्‌ध पाणी नाही, असं सर्व भारताच्या संपन्नतेचं लक्षण आहे.

  तुमच्या ब्लॉगसाठी तुम्ही निवडलेली पार्श्वभूमी (wallpaper) ‘लहान मुलांच्या कविता’ वगैरेसारख्या विषयाला सुसंगत ठरेल. ते चट्टेपट्टे पाहत गंभीर लेख वाचायचे म्हणजे वाजपेयीजी बर्म्युडा घालून भाषण करताहेत, असं काहीसं वाटतं. तुम्ही हा अनिष्ट बदल केलात, हे खरं मानायला मन तयार नाही.

  – डी एन

  Posted by नानिवडेकर | जानेवारी 14, 2010, 5:32 pm
  • तुमचा ब्लॉगच्या पार्श्वभूमीचा आक्षेप एकदम मान्य. मला पांढरी पार्श्वभूमी व त्यावर लिखाणाचा रूंद कॉलम, मोठी हेडिंग्स, अशी थीम माझ्या ब्लॉगसाठी हवी होती. तशी थीम फक्त हीच मिळाली. म्हणून सध्या वापरतो आहे. दुसर्‍या थीमचा शोध चालू आहे. मिळाल्याबरोबर बदलणार आहे. तोपर्यंत क्षमस्व.

   Posted by chandrashekhara | जानेवारी 14, 2010, 6:00 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention बाटलीतला राक्षस « अक्षरधूळ(Akshardhool) -- Topsy.com - जानेवारी 14, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: