.
Environment-पर्यावरण

सायकलच पण बांबू व अंबाडीची!


क्रेग कॅल्फी हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात रहाणारा एक इंजिनीअर. शर्यतीत भाग घेण्यासाठी ज्या खास सायकली वापरल्या जातात त्या बनवणारा तो एक कुशल तज्ञ आहे. कार्बन फायबर व अल्युमिनियम वापरून बनवलेल्या त्याच्या सायकली, Tour de France सारख्या जगप्रसिद्ध सायकल रेसमधे वापरल्या गेलेल्या आहेत. प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरच कॅलिफोर्नियामधे या क्रेग कॅल्फीचे स्वत:चे सायकली बनवण्याचे एक वर्कशॉप आहे. गेली 20 वर्षे हा सायकलतज्ञ एका नवीनच वेडाने झपाटलेला आहे. जगात सगळीकडे वाढणार्‍या व गवत या प्रजातीत मोडणार्‍या, बांबू या वनस्पतीपासून क्रेग सायकली बनवतो आहे. क्रेगने बांबूची फ्रेम असलेली पहिली सायकल 20 वर्षांपूर्वीच बनवली होती. ही सायकल जरा जास्तच हेलकावे खात असे.


बांबूची सायकल फ्रेम बनवण्यात मुख्य अडचण ही येते की बांबू अतिशय सहजपणे मध्यभागी चिरला जातो. ही अडचण दूर करण्यासाठी क्रेग बांबूला धुरी देउन ते तापवू लागला. बांबूला धुरी देण्याची व तापविण्याची ही प्रक्रिया, तीन चार महिने तरी, योग्य प्रकारचा बांबू तयार होण्यासाठी करावी लागते. बांबूचे तुकडे एकमेकास जोडण्यासाठी क्रेगने एक खास पद्धत विकसित केली आहे.एपॉक्सी रेझिनने माखलेल्या अंबाडीच्या(Hibiscus cannabinus ) दोर्‍यांनी तो बांबूचे तुकडे एकमेकास जोडतो. अशा शंभराहून आधिक बांबू फ्रेम बनवल्यावर त्याची योग्य बांबू फ्रेम अखेरीस तयार झाली. क्रेगच्या मते ही फ्रेम, कार्बन फायबर फ्रेमपेक्षा जास्त दणकट आहे व ती तुटण्याची शक्यताही कमी आहे. या फ्रेमला समोरून दणका बसला तरी ती उत्तम टिकाव धरते व रस्त्यावरील खाचखळग्यांमुळे बसणार्‍या धक्यांना चांगलेच तोंड देते. जर्मनीमधल्या EFBe bicycle testing laboratory या संस्थेने ही फ्रेम तपासून त्याची गुणवत्ता चांगली असल्याचे प्रमाणपत्र नुकतेच दिले.


ही बांबू फ्रेम कितीही गुणवान असली व तिचा कार्बन ठसा कितीही छोटा असला तरी ती प्रचंड महाग आहे(US$ 2700) व त्यामुळे ती विकसनशील देशांना परवडणारी नाही.ही गोष्ट लक्षात आल्यामुळे क्रेगने Bamboosera या नावाचा एक प्रकल्प, कोलंबिया विद्यापीठाच्या सहकार्याने चालू केला आहे. या प्रकल्पांतर्गत विकसनशील देशातील लोकांना स्वत:ची सायकल कशी बनवावी याचे शिक्षण देण्यात येत आहे. एकदा हे लोक या कलेत कुशल झाले की ते स्वत:चा सायकल बनवण्याचा छोटा उद्योगही सुरू करू शकतात. मागच्या वर्षी बांबूसेरा प्रकल्पाने घाना देशातल्या तीन गटांना सायकल बनवण्याचे शिक्षण दिले. आता हा प्रकल्प युगांडा, लायबेरिया, फिलिपाईन्स व न्यू झीलंड देशांमधे असे शिक्षणवर्ग चालू करणार आहे. सध्या क्रेग बांबूच्या फ्रेमचीच पण एक प्रौढ माणूस व चार पाच मुले जाऊ शकतील अशी सायकल विकसित करण्याच्या मागे आहे.


हरित सायकल निर्माण करण्याच्या मागे क्रेग हा काही एकटाच नाही. स्लोवाकिया मधला एक इंजिनीयर ब्रेनो मेअर्स, कॅलिफोर्नियामधलाच निकोलस फ्रे आणि जर्मनीतला निकोलस मेयर हे ही अशा हरित सायकली बनवण्याच्या मागे आहेत. डेन्मार्कमधल्या बायोमेगा या कंपनीने बर्लिन विद्यापीठाच्या सहकार्याने दिसण्यात अतिशय सुंदर अशी बर्लिन बांबू सायकलबनवली आहे. निकोलस फ्रे ची कंपनी बू सायकल्स बांबूच्या सायकली आता नियमितपणे बनवते.


जर्मनीतला निकोलस मेयर हा खरे तर हरित सायकल बनवण्याच्या उद्दिष्टात आणखी पुढे गेला आहे असे दिसते. मेयरची ही सायकल, अंबाडीचे वाख(दोरे), बांबू, कार्बन फायबर व अल्युमिनियम यांपासून बनते. त्यात 60 % अंबाडी, 15% बांबू व बाकीच्या इतर गोष्टी आहेत. या सायकलची फ्रेम बनवण्यासाठी मेयर एका स्टायरोफोम फ्रेमच्या भोवती एपॉक्सी रेझीनने माखलेले अंबाडीचे वाख गुंडाळत जातो. मेयरची सायकल, फ्रेम बनवण्याच्या या पद्धतीमुळे जरा ढब्बी दिसत असली तरी ती अतिशय दणकट आहे व तिचे वजन फक्त 1.4 किलोग्रॅम आहे. सायकल चालवणार्‍याची सीट जिथे बसते तिथे या फ्रेमला दोन नळ्या बसवलेल्या असतात व त्या वाखाने मजबूत बांधलेल्या असतात. या रचनेमुळे ही फ्रेम अजिबात वाकत नाही.


सायकल हे सर्वात कमी प्रदुषण करणारे वाहन समजले जाते. आता ते बनवण्याच्या प्रक्रियेत सुद्धा कमीत कमी उर्जा वापरली जात असेल आणि पुनर्निर्माण होणार्‍या गोष्टीतून ती बनत असेल तर या सायकली एक आदर्श वाहन बनतील यात शंकाच नाही.

9 जानेवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “सायकलच पण बांबू व अंबाडीची!

 1. अशा बांबूपासून बनव्लेल्या सायकली लवकरच जगभर पोचायला वेळ लागनार नाही खर म्हणजे असले निसर्गाशी जवळिक साधनारे प्रकल्प आपल्याकडे शाळेतून राबवायला हवेत. मी४-५ वीत असताना म्हणजे साधारणतः १९५७-५८ ची गोष्ट असावी.आम्हाला दंत मंजन करायला शिकवले होते शाळेतल्या शिक्षकंनी.आणि ते स्वतः साठीच वाप्रत होतो त्यावेळी.

  Posted by savadhan | जानेवारी 9, 2010, 7:59 pm
 2. खुपच छान माहीती, लय आवडली बघ आपल्याला. धन्यवाद ह्याबद्दल

  Posted by अनिकेत | जानेवारी 9, 2010, 10:09 pm
 3. इवढी सुंदर माहिती आणि फोटो पाहून हि सायकल चालवायची इच्छाच झाली.. 🙂 खूप खूप धन्यवाद काका

  Posted by mandar joshi | जानेवारी 10, 2010, 12:38 सकाळी
 4. अतिशय छान माहिती आणि तीही सोप्या शब्दात

  मस्तच 🙂

  Posted by vikram | जानेवारी 10, 2010, 1:08 सकाळी
 5. खुपच छान माहिती, मस्तच

  धन्यवाद.

  Posted by Swapnil Kolhe | जानेवारी 12, 2010, 3:22 सकाळी
 6. Very Nice article.
  I always find your articles immensly informative. Really Good.

  Posted by Salil Chaudhary | जानेवारी 20, 2010, 10:03 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: