.
अनुभव Experiences

ब्रॅन्ड्सचा बिझिनेस


काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी व माझी पत्नी एक नवा दूरदर्शनसंच खरेदी करण्यासाठी म्हणून एका मोठ्या दुकानात गेलो होतो. या दुकानात अनेक मेक व ब्रॅन्डचे टी.व्ही. उपलब्ध होते. आम्ही बरेच टी.व्ही. बघितले व शेवटी तीन संच, शॉर्ट लिस्ट केले. या पैकी जरा अनोळखी ब्रॅन्डच्या टीव्ही मधे सर्वात जास्त सुविधा उपलब्ध होत्या व त्याची किंमतही बरीच कमी होती. दुसरा टी.व्ही. जरा जास्त ओळखीच्या ब्रॅन्डचा होता. तोही किंमतीने कमीच होता पण त्याला सुविधा कमी होत्या. आवाजाची गुणवत्ता जास्त चांगली वाटली. तिसरा टी.व्ही. एका प्रसिद्ध जपानी कंपनीचा, अतिशय माहितीतला ब्रॅन्ड होता. त्याची आवाजाची गुणवत्ता नक्कीच इतर दोन टी.व्ही. पेक्षा कमी दर्जाची वाटली. या टी.व्ही.ला सुविधाही कमी होत्या व त्याची किंमतही सर्वात जास्त होती. आम्ही थोडा वेळ विचार केला व रिस्क़ नको म्हणून सर्वात जास्त किंमत असलेला व कमी सुविधा असलेला पण प्रसिद्ध ब्रॅन्डचा टी.व्ही. खरेदी केला व घरी आलो.

आम्हाला आलेला हा अनुभव, आपल्या सगळ्यांनाच नेहमी येत असणार. आपण असे का वागतो? याचे कारण, मानसशास्त्रज्ञ काय देतील ते देवोत. मला तरी याची दोन कारणे दिसतात. एकतर आपल्या सगळ्यांनाच अज्ञाताची भिती नेहमीच वाटत असते त्यामुळे आपण ज्ञात गोष्टींच्या वर्तूळाच्या बाहेर पडायला सहसा धजावत नाही. दुसरे म्हणजे समाजात आपण इतर ज्या लोकांशी, आपली स्वत:ची तुलना नेहमी मनात करत असतो त्या सगळ्यांच्या कडे जो ब्रॅन्ड आहे तोच आपल्याला subconsciously हवा असतो. हे peer pressure आपल्याला असे निर्णय घेण्यास भाग पाडते.

हा ब्रॅंड महिमा अक्षरश: अगाध आहे. महिलांची जी पर्स चार पाचशे रुपयाला मिळते त्याच पर्सवर लुई व्ह्यूटॉन किंवा प्राडा नाहीतर गुच्ची असे लेबल असले तर तीच पर्स, बायका चार पाच हजार रुपयाला सुद्धा आनंदाने खरेदी करतील. अगदी चांगल्या दर्जाचा सुती शर्ट सुद्धा सात आठशे रुपयाच्या खालीच मिळतो पण याच शर्टावर एक छोटेसे पोलो खेळणार्‍या घोडेस्वाराच्या चित्राचे भरतकाम केलेले असले की त्याच शर्टाची ब्रॅन्ड व्हॅल्यू अनेक हजाराच्या घरात जाते. ब्रॅन्ड व्हॅल्यू हा प्रकार कोणत्याही तर्कशास्त्रात बसूच शकत नाही.


सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ब्रॅंडचे मूळ परदेशी उत्पादक काल ओघात केंव्हाच नष्ट झाले आहेत आणि अशा ब्रॅन्डच्या वस्तू, ज्या आता पूर्णपणे भारतीय उत्पादकांनी बनवलेल्या आहेत त्यांनाही मोठी ब्रॅन्ड व्हॅल्यू आहे. या वस्तू खरेदी करण्यास ग्राहक का प्राधान्य देतात याचा काही खुलासा करणे अशक्य आहे. पण ही वस्तुस्थिती आहे. अशा काही ब्रॅन्ड्सची नावे व त्यांचा इतिहास खरोखरच मनोरंजक आहे.


सर्वात प्रथम डोळ्यासमोर येते रॉयल एनफिल्ड मोटर सायकल. या फटफटीच्या मूळ ब्रिटिश उत्पादकाने आपल्या कारखान्याला कायम स्वरूपी टाळे ठोकल्याला सुद्धा आता पन्नास वर्षे होऊन गेली. भारतात मात्र बुलेट मोटर सायकलच्या ब्रॅन्डला जबरदस्त व्हॅल्यू आहे. मर्दानी किंवा पुरुषी सामर्थ्याचे, ही मोटर सायकल म्हणजे, एक गौरवचिन्ह मानले जाते. ब्रिटिश सैनिक पूर्वी एनफिल्ड तोफ़ा व बंदुका वापरत असत. त्यामुळे ही मोटर सायकल एखाद्या बंदुकीसारखी बनवली आहे असे मानले जात असे.. ब्रिटिश सैनिक आणि त्यांच्या बंदुका जाऊन 60 वर्षे झाली तरी बुलेट अजून आहे तिथेच आहे.

ज्यांचे ब्रॅन्ड्स परदेशी वाटतात अशा अनेक वस्तूंची नावे सहज घेता येतील. या अशा आपल्या अगदी रोजच्या वापरातल्या अनेक वस्तूंच्या ब्रॅन्ड्सचे मालक पूर्णपणे भारतीय कंपन्या आहेत, पिअर्स साबण, रेमंड सूटचे कापड, हॉर्लिक्स, ऍम्बॅसॅडर गाडी, एक्झाईड बॅटरी, विल्ल्स सिगारेट, ब्रूक बॉन्ड चहा. ही त्याची काही उदाहरणे. काही काही परदेशी भासणार्‍या भारतीय कंपन्या आता स्वदेशीच आहेत. उदाहरणार्थ कॉक्स ऍन्ड किंग्स, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्स वगैरे.


क्रॉम्प्टन कंपनीची स्थापना इंग्लंडमधे 1937 मधे झाली होती तर स्पेन्सर्स ही ग्रोसरी चेन 1867मधे स्थापन झाली होती. या दोन्ही कंपन्यांचा त्यांच्या मूळ देशात आता मागमूसही लागत नाही पण भारतात या दोन्ही ब्रॅन्ड्सची चलती आहे. अगदी वूडवर्ड्स ग्राईप वॉटरही आपल्याकडे अजून विकले जाते.

खरी ब्रॅन्ड व्हॅल्यू म्हणजे काय हे बघायचे असेल तर भारतातील बाजारपेठेतच दिसते यात शंकाच नाही. मात्र याचे कारण आपली मानसिकता हेच आहे.

5 जानेवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “ब्रॅन्ड्सचा बिझिनेस

  1. अतिशय सुरेख लेख. ग्राहकांच्या मनावर ब्रँडसचा खरोखर खूपच पगडा आहे. मी कित्येक वर्ष arrow, louis phillip, van hussen असेच ब्रँडस वापरायचो. नंतर कळल कि ती भारतातील मदुरा मिल्स, अरविंद मिल्सचीच उत्पादने आहेत 🙂

    Posted by हेरंब ओक | जानेवारी 6, 2010, 2:26 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: