.
Environment-पर्यावरण

वांग्यांचा फालुदा


खमंग फोडणी घातलेले वांग्याचे भरीत किंवा चटकदार भरली वांगी या पदार्थांची नावे ऐकून तोंडाला पाणी सुटणार नाही असा माणूस विरळाच. पण वांग्याचा फालुदा हा काय प्रकार आहे? हा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. सध्या वांग्याच्या एका नवीन प्रजातीबद्दल जे काय चर्चाचर्वण मध्यमांच्यातून चालू आहे त्याला दुसरे नाव तरी काय द्यायचे? या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे Bt, Brinjal या नावाने विकसित केलेली वांग्यांची एक प्रजाती.


हे बीटी ब्रिंजल किंवा वांगे हा काय प्रकार आहे? नेहमीच्या इतर वांग्यांप्रमाणेच ते दिसते व चवीला लागते. या प्रजातीमधे फरक आहे तो त्याच्या जनुकांमधे. वांग्याचे पारंपारिक पीक घेणारे शेतकरी या पिकावर पडणार्‍या एका किडीबद्दल नेहमीच धास्तीत असतात. ही कीड वांग्याची फळे व रोपाचे खोड यावर हल्ला चढवते व ते फस्त करते. या किडीबद्दल संशोधन करणार्‍या कृषीशास्त्रज्ञांनी हे शोधून काढले होते की जमिनीत सापडणारा एक बॅक्टेरिया bacterium bacillus thuringiensis याच्या अंगभूत एक असे विषारी रसायन तयार असते जे या किडीची हकालपट्टी नैसर्गिक रित्याच करते. या बॅक्टेरियावर संशोधन केल्यावर या अंगभूत विषारी रसायनाला कारण असलेला या बॅक्टेरियाच्या DNA मधला एक जीन शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. हा जीन वांग्याच्या DNA मधे घालण्यात आला व वांग्याची ही नवीन प्रजाती निर्माण झाली. या बॅक्टेरियाच्या नावावरून Bt वांगे असे याचे नामकरण शास्त्रज्ञांनी केले. या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे वांग्यावर पडणार्‍या किडीला ही प्रजाती अजिबात दाद देत नाही. या प्रजातीच्या संशोधकांच्या मताने शेतकर्‍यांनी जर या प्रजातीचे वांग्याचे पीक घेतले तर त्यांना सहजरित्या दुप्पट उत्पादन घेता येईल.


भारतातील या विषयाच्या, जनुकतंत्रज्ञान नियंत्रक (biotechnology regulator ) आणि जनुक अभियांत्रिकी मान्यता समिती(Genetic Engineering Approval Committee) या दोन्ही महत्वाच्या नियंत्रक अधिकार्‍यांनी, काही महिन्यांपूर्वी हे Bt. Brinjal मानवी वापरासाठी योग्य असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम सापडले नाहीत असे प्रमाणपत्र दिले व हिरवा कंदील दाखवला. हे झाल्याबरोबर एका मोठ्या वादाला तोंड फुटले. हे वांगे मानवी वापरासाठी योग्य असे प्रमाणपत्र मिळालेले पहिलेच खाद्य आहे. अशा खाद्यांना GM Foods किंवा जनुकबदल केलेले अन्नपदार्थ असे साधारण नाव आहे. या वांग्यांच्या निमित्ताने मग अशा जनुकबदल केलेल्या खाद्यांच्या अनुकुलतेपासूनचे सर्व विषय पुन्हा एकदा चर्चिले जाऊ लागले.


हे वांगे जनुकबदल केलेले असे काही पहिलेच भारतीय पीक नाही. या आधीपासून भारतातले शेतकरी Bt. Cotton या कापसाच्या प्रजातीचे पीक घेतच आहेत. हे पीक घेण्यास सुरवात केल्याबरोबर मध्य भारतातील शेतकर्‍यांचे कापूस उत्पादन एकदम वाढले आहे. हे कापसाचे पीक काय किंवा वांगी काय, या दोन्ही प्रजातीचा विकास करण्यात एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी Monsanto व त्यांचे भारतीय भागीदार Mahyaco हेच मुख्य आहेत. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीने काहीही केले तरी साप साप म्हणून भुई धोपटणारी मंडळी भारतात भरपूर आहेत. त्यांना आयतेच खाद्य मिळाले आहे. भारतातील अन्न धान्य उत्पादनासंबंधीचा कोणताही धागा किंवा शोध एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या हातात जातो आहे अशी नुसती शंका जरी आली तरी ही मंडळी त्याला कडक विरोध करण्यास तत्पर असतात. साहजिकच या वांग्याच्या प्रजातीला त्यांचा प्रचंड विरोध आहे.

जनुक बदल करून तयार केलेल्या अन्नधान्यांना अनेक कृषीतज्ञांचाही विरोध दिसतो. त्यांच्या मते अशी अन्नधान्ये मानवी जीवन व पर्यावरणाचा समतोल यात मोठी ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. त्यांच्या मताने आपल्याला आणखी वीस पंचवीस वर्षे तरी जनुक बदल केलेली अन्नधान्ये वापरण्याची गरज दिसत नाही. काही कृषीशास्त्रज्ञ, हा bacterium bacillus thuringiensis जेंव्हा चांचण्यामधे जनावरांना टोचण्यात आला होता त्या वेळेस त्यांच्या शरीरात नंतर विषारी पदार्थ आढळून आले होते या घटनेकडे आपले लक्ष वेधतात. त्यांच्या मताप्रमाणे मानवी शरिरातही असेच विषारी पदार्थ राहू शकतात व त्यांचे नंतर काय दुष्परिणाम होतील ते आता सांगता येणे शक्य नाही. अर्थात या मंडळींचा पिकावर जंतुनाशके फवारण्यासही विरोध असतो ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

ग्रीनपीस या आंतर्राष्ट्रीय संस्थेचाही या वांग्याच्या प्रजातीला विरोध आहे. त्यांच्या मताने या वांग्यांचे मानवी शरिरावर काय दुष्परिणाम होतील याच्या पूर्ण चाचण्या अजून झालेल्या नाहीत. अशा वेळेस घाईघाईने जर या वांग्याच्या उत्पादनाला परवानगी दिली तर थोड्याच कालात याच्या पाठोपाठ सध्या विकसित होत असलेली केळी ,बटाटे, छोले,शेंगदाणे, भेंडी ,टोमॅटो यासारखी Bt. प्रजातीची पिके बाजारात येतील व यांचे काय दुष्परिणाम होतील ते सांगता येणार नाही.

या उलट Bt. वांग्यांचे उत्पादन त्वरीत सुरू करावे असे मत असलेला कृषीशास्त्रज्ञांचा मोठा गट आहे. त्यांच्या मताने ही वांगी हे भारतात येणार्‍या नवीन जैविक तंत्रज्ञानाची नुसती चाहूल आहे. ही नवीन उत्पादने भारतातील वाढणारी लोकसंख्या, पिकाखाली असलेल्या जमिनीमधे सतत होणारी घट या सगळ्या अडचणीवर मात करून भारतातील सर्वसामान्यांना रास्त किंमतीत अन्न पुरवठा करू शकतील.

जनुक बदल केलेल्या पिकांचे विरोधक एक महत्वाची गोष्ट विसरत आहेत असे वाटते. भारतातील वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य जर भारतात पिकवायचे असेल तर प्रती हेक्टर जास्तीत जास्त उत्पादन देतील अशा प्रजाती विकसित करणे आवश्यक आहे. हे झाल्याशिवाय दुसरी हरित क्रांती भारतात येणे शक्य नाही. अशा प्रजातीं, पिकावरील किडींना दाद लागू देत नाहीत व यामुळे जंतूनाशकांचा वापर कमी होतो व त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही टाळता येणे शक्य होते. अशा प्रजाती अमेरिकन कंपनीने विकसित केल्या म्हणून त्यांना विरोध करावयाचा हे तर अत्यंत हास्यास्पद आहे. आपले लक्ष गाठण्यासाठी कोणत्याही मार्गाने गेले तरी काहीच बिघडत नाही. मॉंसूनचा बेभरवशाचा पाऊस व इतर अशा अनेक गोष्टींमुळे भारतीय शेतकरी कर्जबाजारी बनत चालले आहेत. त्यांना यातून बाहेर काढायचे असेल तर कर्जमाफीचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. त्यांना आवश्यक आहे दुसरी हरित क्रांती.

1970 च्या दशकातल्या पहिल्या हरित क्रांतीचा शिल्पकार नॉर्मन बॉरलॉग याने म्हटले आहे की निसर्गाने निरनिराळ्या गवतांपासून संकर करून तर गव्हासारखी पिके तयार केली आहेत. तेंव्हा हे काम मानवाने केले म्हणून काहीच बिघडत नाही. नॉर्मनचे असे स्पष्ट मत होते की सर्व देशांनी या प्रकारचे संशोधन करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले तर2025 साली जगात असणार्‍या 8 बिलियन लोकांना अन्नधान्याची ददात भासणारच नाही. याच पद्धतीने थोडा विचार केला तर हे लक्षात येईल की जनुक बदल पिकातही तसे अनैसर्गिक असे काहीच नाही. ही प्रक्रिया निसर्ग सतत करतच असतो.

सध्या तरी असे दिसते की एका बाजूला संभाव्य दुष्परिणामाची अगदी अल्प अशी शक्यता व दुसर्‍या बाजूला वाढती लोकसंख्या, कुपोषण व शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा या वादात हे वांगे सापडले आहे. जनुक बदल पिकांच्या बाजूचे व विरोधी या दोघांनी आपल्या चर्चाचर्वणाने या Bt. वांग्यांचा मस्तपैकी फालुदा केला आहे हे मात्र नक्की. या वांग्याच्या उत्पादनाला परवानगी द्यायची किंवा नाही याचा निर्णय आता पर्यावरण मंत्री स्वत:च घेणार आहेत.

29 डिसेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “वांग्यांचा फालुदा

 1. GM biyannana wirodh agadich niradhhar dekhil naahi. Ya purvi shtkari swatache biyane swatah sathwun thewat hot, pudhchya warshichya pikansathi. aata GM biyane he tyala ya company kadunach ghyawe laagte. tasech jantunaashake dekhil yach companychya hatat aahet. mhanje te niwadak prakarchi jantunaashake tayaar kartaat ji tyanchya biyanansathich upyogi aahet. ya saglyanmule tyanche khise bharale jatat pan shetkari parawlambi aani karjbaajari hot jato. tyapeksha shetkaryanna adhikadhik utaam prashikshan dewoon wrashala 2-3 pike ghenyas shikawane, paani sathwanyache aani jaiwik khatanche prashikshan dene tyasathi anudaan dene, aani fakt tharawik yogy thikani navin tantradyanacha wapar karane yacha samtol asayla hawa.

  Posted by sonalw | डिसेंबर 29, 2009, 1:22 pm
  • sonal
   what you say is quite right. However to get on with rapid increase in food production is of paramount importance in India. It is really up to the Government and regulatory bodies to see that no one, in particular any multinational, is taking undue advantage. In short we need another Norman Borlog and another green revolution.

   Posted by chandrashekhara | डिसेंबर 29, 2009, 1:32 pm
 2. किडीसाठी विषारी असलेले वांगे माणसाकरिता बिनविषारी ठरेल याची हमी नाही. डीडीटी प्रकरणावरून धडा घेण्याची गरज आहे.

  Posted by मनोहर | डिसेंबर 29, 2009, 7:25 pm
 3. hi paryavaranas ghatak prajat aahe………………….

  Posted by dnyanesh takale | फेब्रुवारी 1, 2010, 1:32 pm
  • ज्ञानेश

   ही प्रजाती पर्यावरणास घातक आहे हे कोणत्या आधारावर आपण म्हणता ते समजत नाही. त्याचा खुलासा केला तरच आपले हे म्हणणे मान्य होईल. त्याचप्रमाणे जनुकबदल पिके घेण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग कृषि उत्पन्न वाढवण्यासाठी भारताला उपलब्ध नाही हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे.

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 1, 2010, 4:46 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक पुराणातली बीटी वांगी(BT Brinjal) « अक्षरधूळ(Akshardhool) - फेब्रुवारी 10, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: