.
ताज्या घडामोडी Current Affairs

अजब चोरी !


चोरीच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये तशा नेहमीच वाचतो. कोणाचे मंगळसूत्र ओढले, कोणाची सदनिका फोडली वगैरे आणि वगैरे. कधीमधी बॅंकांच्यावर डाके पडतात, दुकाने फोडली जातात. बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर इंटरनेटवरून दुसर्‍याचे पैसे स्वत:च्या खात्यात जमा करणे, दुसर्‍याचे क्रेडिट कार्ड चोरून वापरणे वगैरे गुन्हे करणार्‍या बुद्धीमान चोरट्यांबद्दल आपण नेहमीच वाचतो. क्क़चित मौल्यवान रत्ने चोरीला जातात. परंतु विमानाच्या इंजिनाची चोरी झाली आहे असे कोणी सांगितले तर विश्वास ठेवणेही कठिण आहे.

परंतु ही चोरी झाल्याची गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. शाही मलेशियन वायुदलाच्या सुंगाई बेसी या विमान तळावरून F5E या लढाउ विमानांची दोन इंजिने चोरीला गेली आहेत. ही लढाउ विमाने अमेरिकेतील Northrop Grumman या कंपनीने बनवलेली असून ही विमाने मलेशियन वायुदल अजूनही वापरत आहे. या दोन इंजिनांची किंमत 29 मिलियन य़ू.एस. डॉलर्स एवढी आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात मलेशियन वायुदलाने एका खाजगी ठेकेदाराला या इंजिनांची देखभाल करण्यासाठी सुंगाई बेसी विमानतळावर पाठवले तेंव्हा ही इंजिने जागेवर नसल्याचे प्रथम आढळून आले. ज्या जेट लढाऊ विमानांवर ही इंजिने बसवण्यात आलेली होती ती F5E विमाने प्रथम 1963 मधे वापरली जाऊ लागली होती व त्यांचे उत्पादन 1989 मध्ये बंद करण्यात आले होते.


साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की एवढ्या जुनाट विमानांची इंजिने चोरण्यात चोराला काय स्वारस्य असावे. या बाबतीतील तज्ञांचे असे म्हणणे आहे की इराण, सूदान, व्हेनेझुएला सारखे काही देश, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा पुरवठा करण्यास अमेरिकन सरकारने बंदी घातलेली आहे, ते अजूनही ही F5 लढाऊ विमाने वापरतात. यासारख्या देशांना, ही इंजिने खरेदी करण्यात स्वारस्य असावे म्हणूनच ही इंजिने चोरीला गेलेली असावी.

तब्बल एका वर्षानंतर, मलेशियन पोलिसांना या प्रकरणातील काही धागे दोरे मिळाले आहेत. नवीन माहिती प्रमाणे ही इंजिने पोर्ट क्लांगया मलेशियातील बंदरावरून प्रथम एका अज्ञात देशाकडे पाठवण्यात आली होती व तिथून ती दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना या देशाकडे पाठवण्यात आली. ती इंजिने अजून तिथेच आहेत का? हे मात्र समजले नाही. या प्रकरणाशी अर्जेंटिना वायुदलाचा संबंध नसावा कारण हे वायुदल अमेरिकन बनावटीची विमाने वापरत नाही. ही इंजिने कोणत्या तरी व्यक्तीच्या ताब्यात असावीत असा अंदाज आहे. चार व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती परंतु त्यांची जामिनावर आता सुटका झाली आहे. या प्रकरणात बर्‍याच लोकांचे हात गुंतलेले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. एवढी मोठी इंजिने आवश्यक कागदपत्राशिवाय विमान तळाच्या बाहेर नेणे त्याशिवाय शक्य होणार नाही.

या चोरीनंतर मलेशियन सैन्य दलांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या शस्त्रास्त्रांची तपासणी सुरू केली असून मलेशियाचे एक जनरल या चोरीला हिमनगाचे टोक मानतात. या इंजिनांशिवाय याच विमानांचे इतर काही भाग सुद्धा गहाळ झाल्याचे आढळले आहे. मलेशिया मधे पसरत असलेल्या भ्रष्टाचारामुळेच अशा घटना घडत आहेत असे काही जणांना वाटते.

26 डिसेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “अजब चोरी !

  1. ही चोरी म्हणजे अगदी पाणी डोक्यावरून हो! अंतर्गत फितुरीशिवाय अशा चो-या होऊ शकत नाहीत.

    Posted by Kanchan Karai | डिसेंबर 26, 2009, 10:24 pm
  2. ही चोरी म्हणजे चोरीचा शिखर गाठल्यागत आहे. चोरांच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल.

    Posted by ravindra | डिसेंबर 28, 2009, 2:39 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: