.
ताज्या घडामोडी Current Affairs

विस्थापित गाढवे


तीस चाळीस वर्षांपूर्वी, पुण्याच्या रस्त्यांवरून जाताना एक दृष्य अगदी नेहमी दिसे. रस्त्यावरून जाताना , पुढे खूप धुरळा उडलेला अचानक दिसायला लागायचा. सायकलवरून खाली उतरून बाजूला गप्प उभे रहाण्याशिवाय गत्यंतरच नसायचे. हळूहळू, पाठीवर माती किंवा मुरुम लादलेली चाळीस पन्नास गाढवे व त्यंच्या मागून है हैयो चा पुकारा करत येणारे वडार दिसू लागत. अर्ध्या एक मिनिटात ही वरात पुढे गेली की कपड्यांवरची धूळ झटकत झटकत मार्गक्रमण करता येई. आता माती किंवा वाळूची वाहतुक करण्यासाठी ट्रक किंवा टेंम्पो आले आणि गाढवे रस्त्यावरून दिसेनाशीच झाली.

India_11_04_09_Donkeys

पुण्याच्या रस्त्यांवरून ती गाढवे जरी अदृष्य झालेली असली तरी त्यांचे भाऊबंद अजूनही भारताच्या राजधानीच्या म्हणजे दिल्लीच्या रस्त्यांवरून विटा, वाळू यासारखे बांधकाम साहित्य इकडून तिकडे नेताना बर्‍याच वेळा दिसतात. दिल्लीमधे पाडलेल्या जुन्या इमारतीचे बांधकाम साहित्य, नवीन बांधकामात पुष्कळ ठिकाणी, म्हणजे मुख्यत्वे करून गरीब वस्तींच्यामधे वापरले जाते. या साहित्याची ने आण करण्यासाठी गाढवे हे वाहतुक माध्यम, सर्वात स्वस्त असल्याने बरेच लोकप्रिय आहे. जुन्या दिल्लीच्या बाहेरच्या भागात, जवाहरलाल नेहरू मार्गाच्या आसपास कधीही फेरफटका मारला तरी भिंतीच्या सावलीला उभी असलेली गाढवे व वर्दीची वाट बघत असलेले त्यांचे कुडतापायजमा व डोक्याला घट्ट टोपी घातलेले त्यांचे मालक हे हमखास दिसतातच. हे लोक व त्यांचे आजे पणजे याच भागात हा धंदा गेली चारशे वर्षे तरी करत असावेत. अजूनही दीड दोनशे गाढवांचे तबेले या भागात आहेतच.

नवी दिल्लीमधे पुढच्या ऑक्टोबर महिन्यात एकोणिसाव्या आंर्तराष्ट्रीय कॉमनवेल्थ खेळांचे आयोजन केले जाणार आहे. त्या निमित्त, दिल्लीचा काया पालट करण्याचा मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावित बदलांमुळे दिल्लीच्या गाढववाल्यांच्यावर मात्र संक्रांत येऊ घातली आहे. या भागात काही नवीन रस्ते बांधण्यात येणार असल्याने या गाढववाल्यांना येथून हुसकावून देण्यात येणार आहे व हा परिसर एकदम स्वच्छ करण्यात येणार आहे. हे गाढववाले व त्यांची गाढवे यांना यमुना नदीच्या पार घालवण्यात येणार असल्याने त्यांच्यात अतिशय अस्वस्थता आहे. गाढवांचा वापर मुख्यत्वे गरीब भागातल्या बांधकामांच्यात केला जातो. हे गाढववाले यमुनापार झाले तर त्यांचा कामधंदा बसणार आहे व दुसरे कोणतेच काम त्यांनी कधीच केलेले नसल्याने दिल्लीच्या बेकार गरीबांच्या संख्येत फक्त भर पडणार आहे.

सध्या दिल्लीच्या सरकारपुढे ऑलिंपिक खेळांसाठी तयार झालेल्या बिजिंग शहराचा आदर्श आहे. बिजिंगमधे केल्या गेलेल्या शहर सुधारणांमधे, मानवी हाल अपेष्टा यांना काही किंमत असते असा विचार सुद्धा तिथल्या कम्युनिस्ट सरकारने कधीच केलेला नाही. लेखणीच्या एका फटकार्‍याने, हजारो लोक तिथे विस्थापित होतात व देशोधडीला लागतात. त्यांना कुठेतरी जागा देण्यात येते व जीवन कसबसे जगावे लागते. या विस्थापितांच्या हाल अपेष्टांचे सोयरसुतकही तिथल्या सरकारला नसावे असे वाटते.

भारतातली परिस्थिती खूपच निराळी आहे. स्थानिक लोकांना नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादणे हे येथे इतक्या सहजा सहजी शक्य होत नाही. अशा परिस्थितीत जर या गाढववाल्यांवरच्या संकटाचा फायदा जर कोणत्या दुसर्‍या राजकीय पक्षाने करून घेतला तर त्यात नवल वाटू नये. शहरात सुधारणा करायच्या म्हणजे त्या शहराच्या सर्व परंपरा नष्ट करावयाच्या असे ठरवले तर ते योग्य होणार नाही. त्यामुळे दिल्लीच्या गाढववाल्यांना पर्यायी रोजगाराचे साधन उपलब्ध करून न देता त्यांचे विस्थापन करणे कितपत जमेल याची शंकाच वाटते.

6 नोव्हेंबर 2008

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “विस्थापित गाढवे

  1. यांच्या पुनर्वसनासाठी आधी प़यत्न झाले नव्हते असे मला वाटत नाही.

    Posted by मनोहर | नोव्हेंबर 7, 2009, 1:21 सकाळी
  2. श्री आठवले: तुमची कमाल आहे; कुठून हे सगळे विषय शोधून आणता देव जाणे. अभ्यासपूर्ण आणि वाचनीय स्तंभलेखकांत तुमचा नंबर फार वरचा. पहिलाच. पण माझं विज्ञानाशी वाकडं असल्यामुळे मी बरेचदा तुमच्या लेखनाचा आनंद घेऊ शकत नाही.

    महाराष्ट्र टाइम्समधे ‘आयफेल टॉवर’ आणि ‘धावते जग’ ही सदरे येत असत. त्यांची आठवण तुमची ही लेखमाला ज़ागवते. त्या सदरांतच २०-२५ वर्षं आधी स्वित्झर्लंडमधल्या सैन्यातल्या कबुतरांवर असाच लेख होता. निरोप पाठवायला म्हणे त्यांचा उपयोग करत. ‘जा रे पंछी जा रे; कागा देस हमारे’ हे लताचं ‘गरम कोट’मधे गाणं आहे किंवा नलदमयंतीआख्यानातला कलहंस आहे, त्याप्रमाणे. अत्याधुनिक निरोपाच्या साधनांमुळे कबुतरांचा वापर बंद करावा, असा प्रस्ताव होता. त्याला कबुतरे पाळणारांचा अर्थातच विरोध होता. पुढे काय झालं कल्पना नाही. भारतात तरी माणसाला स्वतःसाठी संततिनियोजन ज़मलेलं नसलं तरी काही प्राण्यांची संख्या कमी करण्यात मानवज़ातीला घवघवीत यश मिळालं आहे.

    एके काळी माणसाची एका दिवसातली हालचाल ही घोडे आणि बैल यांच्या गतीवर अवलंबून होती. सायकलमुळे वेग वाढला पण वज़न नेण्याची सोय तितकीशी झाली नाही. आगगाडी आणि मोटरमुळे या प्राण्यांचं महत्त्व एकदम नष्टप्राय झालं.

    Posted by Anonymous | नोव्हेंबर 7, 2009, 7:58 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: