.
Health- आरोग्य

अस्थिभंग


सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी सकाळी माझ्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे फिरून येत होतो. आमची सदनिका ज्या संकुलात आहे त्या संकुलात जाण्याचा रस्ता चांगला सिमेंट कॉंक्रीटने बांधून काढलेला आहे. या रस्त्याला, संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच एका ठिकाणी जरा जास्त उतार आहे. या ठिकाणी कसा कोणास ठाऊक पण मी पाय घसरून पडलो. पडताना बहुदा सर्व भार माझ्या मनगटावर आला व डाव्या मनगटाचे एक हाड मोडले. अर्थातच मग पुढचे सगळे सोपस्कार करणे भाग पडले. काही आठवडे कोपरापर्यंतचा हात प्लास्टर मधे घालावा लागला. हे सगळे झाल्यावर डॉक्टसाहेबांनी एक निराळेच फर्मान काढले. मी पडलो, ते पाय घसरून की माझी हाडे, वयोमानाने ठिसूळ झाल्यामुळे? हे शोधून काढण्यासाठी ‘अस्थि घनता चाचणी’(Bone Density Test) करणे आवश्यक आहे. मग ही चाचणी करून घेण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. अर्थात ही चाचणी तशी सोपी असते. एका मशिनच्या टेबलावर उताणे पडून रहायचे. यंत्राचाच एक भाग तुमच्या शरीरावरून दीड फूट अंतरावरून कंबरेपासून पावलांपर्यंत सरकत जातो. संगणक पडद्यावर या यंत्राचा चालक ‘अस्थि घनता’ बघत रहातो. शेवटी या घनतेची सरासरी, तुम्हाला संगणक काढून देतो.

bone density test

माझी ही ‘अस्थि घनता’ माझ्या वयाच्या एशियन लोकांची, सरासरीने असते, तेवढीच आहे असे संगणकाने सांगितल्यामुळे, मी पाय घसरूनच पडलो असे निदान झाले. म्हणजे पुढे विशेष काळजी घेण्याची काही गरज नाही असे ठरले. पण या निमित्ताने ह्या हाडे ठिसूळ होण्याच्या व्याधीबद्दल मी थोडेफार वाचन केले व माहिती मिळवली. एखाद्या चोराने तुमच्या घरात अलगद प्रवेश करावा तशी आधी कोणतीही भयसूचक घंटा न वाजवता ही व्याधी तुमच्या शरीरात प्रवेश करते. जेंव्हा आपण व्याधीग्रस्त आहोत असे समजते तेंव्हा शरीरातील एक दोन अस्थिंचा भंग झालेलाही असतो व तसा उशिरच झालेला असतो. त्यामुळेच या व्याधीला मौनधारी मारेकरी म्हणतात ते उगीच नाही. बहुतेक वृद्ध माणसांत हा अस्थिभंग, पाठीच्या मणक्याच्या किंवा ढुंगणाच्या हाडांचा होतो व तो सर्वात गंभीर असतो. असा अस्थिभंग झालेल्या व्यक्तींपैकी 25 टक्के लोकांना उर्वरीत आयुष्य चाकाच्या खुर्चीवर काढावे लागते तर 25 टक्क्यांना अंथरूणनिवासी व्हावे लागते. एक चतुर्थांश लोक परलोकवासी होतात म्हणजे बरे होण्याची शक्यता फक्त 25 टक्केच उरते. मागच्या 30 वर्षात या व्याधीचे बळी ठरणार्‍या व पन्नाशीच्या पुढे वय असणार्‍या स्त्रियांची संख्या पाचपटीने वाढली आहे तर पुरुषांची दीडपटीने.

डॉक्टरांच्या मते कोणत्याही व्यक्तीच्या हाडांची घनता सर्वात जास्त, 20 ते 30 या वयोगटातच असते. त्यानंतर या घनतेचा प्रवास खालच्या दिशेनेच सुरू रहातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या वयोगटापासूनच आपल्या हाडांचा दणकटपणा कसा टिकून राहिल याची काळजी घेणे आवश्यक बनते. आपण तरूण वयापासून निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जसा धनसंचय करतो तसाच म्हातारपणासाठी हाडांच्या बळकटपणाचा संचय करणे आवश्यक असते. या साठी शरीराला पुरेसे कॅल्शियम आणि त्याच्या शरीरात शोषणासाठी जीवनसत्व ड मिळाले पाहिजे व हाडांच्या मजबूतीसाठी वजने उचलण्याचा काहीतरी व्यायाम केला पाहिजे. आहारात दूध, दही, मासे, पालक व ब्रोकोली सारख्या भाज्या असल्या पाहिजेत. आपले शरीर सूर्यप्रकाशात ड जीवनसत्व तयार करते त्यामुळे रोज थोडा वेळ तरी सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडणे आवश्यक असते.

कॅफिन, तंबाखू व मद्यार्क यांचे प्रमाणाबाहेर सेवन हाडांसाठी हानीकारक असते. स्त्रियांच्या शरीरात असलेल्या ऑस्ट्रेजेन या हार्मोनचे प्रमाण मेनोपॉजच्या कालानंतर झपाट्याने कमी होऊ लागते. याचाही विपरित परिणाम अस्थि घनतेवर होतो.

शिर सलामत तर पगडी पचास अशी एक म्हण आपल्याकडे आहे त्या धर्तीवर, हाडे दणकट तर आयुष्य बळकट अशी एखादी म्हण रूढ केली पाहिजे. हाडांचा दणकटपणा इतका महत्वाचा आहे.

23 ऑक्टोबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “अस्थिभंग

 1. आपण पाय घसरून (अगदी गूढ पद्धतीने म्हणजे कसे ते स्वतःलाही माहित नाही) पडलो असताना हाडाच्या ठिसूळपणाची चाचणी आपल्यावर आपण लादून घेतलीत आणि त्यातून सहिसलामत सुटल्यावर केलेले चिंतन आपला स्वतः वरचा अविश्वासच दर्शवते.
  बाकी अलाहिदा

  Posted by मी कोण | ऑक्टोबर 23, 2009, 5:43 pm
 2. Thanks for this excellent article and thanks for bringing attention to this major problem which is more often overlooked by the patients and their caregivers as well as doctors.

  After each fall however a thorough evaluation is necessary to prevent future falls and fall related morbidities and mortality.

  i would suggest you look at this following link and ask your healthcare provider to incorporate this evaluation during future visits.

  http://www.aafp.org/afp/20000401/2159.html

  Posted by Harsha deo | ऑक्टोबर 23, 2009, 8:39 pm
 3. अस्थिभंग टाळण्यासाठी हालचालीत किमान संथपणा आवश्यक आहे.

  Posted by मनोहर | ऑक्टोबर 24, 2009, 1:09 सकाळी
 4. माझ्या आईचे दोनदा पडल्यामुळे Hip Joint Fracture झाले होते. मग त्याची मोठी शस्त्रक्रिया. त्याआधी एकदा पडल्यानंतर पाठीचे मणक्यांचे अस्थीभंग झाले होते.

  त्यात परत शस्त्रक्रियेनंतर काही कालावधीने त्यात Infection झाल्याने मग शस्त्रक्रिया करुन तो पार्ट काढुन टाकला. एक-दीड वर्षाने परत त्याच जागी infection परत झाल्याने आणाखीन एक मोठी शस्त्रक्रिया.

  हा सारा Osteoporosis चा परिणाम.

  Posted by harekrishnaji | ऑक्टोबर 25, 2009, 3:35 pm
 5. आपले वाचन सर्वांसाठी खुले केल्याबद्दल अनेक आभार. अश्याच महत्वाच्या विषयांवर सगळ्यांनी लिहित राहिल्यास सगळ्यांना फायदा होईल.

  धन्यवाद.

  Posted by प्रशांत | नोव्हेंबर 9, 2009, 6:20 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: