.
Environment-पर्यावरण

नो टॉयलेट? नो ब्राईड!


भारताच्या 120 कोटी जनसंख्येपैकी जवळ जवळ निम्मे म्हणजे साडेसहासष्ट कोटी लोक ग्रामीण भागात रहातात. शहरी भागात जरी कितीही प्रगती झालेली असली तरी ग्रामीण भागात अजुनही मूलभूत सुविधांचा अभावच आहे. घरात स्वच्छतागृह असणे ही यापैकीच एक अत्यंत मूलभूत व आवश्यक सुविधा. दुर्दैवाने ग्रामीण मंडळींना या सुविधेचे महत्व अजुन तितकेसे कळलेले नाही हेच खरे. या सुविधेच्या अभावाचा सर्वात त्रास जर कोणाला सहन करावा लागत असेल तर तो ग्रामीण महिलांना. या स्त्रीला, चार चौघांच्या नजरा चुकवण्यासाठी, आपले प्रार्तविधी पहाटेच्या अंधारातच उरकावे लागत असल्याने हा साधा देहधर्म सुद्धा एक अत्यंत लाजिरवाणा, अस्वच्छ व किळसवाणा अनुभव बनतो. ग्रामीण भागात काम करणार्‍या एका डॉक्टरच्या मताप्रमाणे, ग्रामीण स्त्रियांच्यात, स्वच्छतागृहाच्या अभावामुळे, मूत्रविकार, अतिसार, टायफॉइड व यकृत आणि मूत्रपिंडांच्या आजाराचे प्रमाण अतिशय जास्त आहे.

ही परिस्थिती सुधारण्याचे आताप्रर्यंतचे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत. इ.स. 2001 मधे वर्ल्ड बॅन्केच्या मदतीने सुरू केलेला लॅट्रिन बांधण्याचा प्रकल्प पूर्णपणे अयशस्वी ठरला. यात बांधण्यात आलेली शौचकूपे लोकांनी धान्य साठवण्यासाठी किंवा पडवी म्हणून वापरली.

स्वच्छतागृहांच्या या अभावाचा सर्वात मोठा त्रास जर कोणाला होत असला तर तो ग्रामीण स्त्रियांना होतो ही गोष्ट लक्षात घेतली तर या भागात स्वच्छतागृहे बांधण्याची कोणतीही चळवळ आतापर्यंत यशस्वी का होऊ शकली नाही याचे कारण सापडते. या चळवळीत स्त्रियांचा सहभागच नसल्याने ही चळवळ पुढे कधीच जाऊ शकली नाही. हरयाणा राज्यात मात्र आता या सुधारणेसाठी ग्रामीण स्त्रियाच पुढे झाल्याने या चळवळीने चांगलाच जोम धरल्याचे दिसते आहे.

08

हरयाणामधल्या आधुनिक पिढीतल्या कोणत्याही ग्रामीण मुलीला, जर आज तिच्या जोडीदाराबद्दलच्या कल्पना विचारल्या तर तो निर्व्यसनी, शाकाहारी, चांगली नोकरी मिळवण्याची कुवत असलेला असावा अशा पारंपारिक अपेक्षांबरोबरच, त्याच्या घरी स्वच्छतागृह असायलाच हवे अशी एक नविन अपेक्षा दिसून येते. दोन वर्षांपूर्वी हरयाणा सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मदतीने ‘मुलाचे लग्न करायचे आहे? घरी स्वच्छतागृह हवेच हवे!’ अशी घोषणा असलेली एक ग्रामीण चळवळ काही स्वयंसेवी संघटनांनी चालू केली. या चळवळीला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व मिळतो आहे.

हरयाणामधे भ्रूणहत्येमुळे, स्त्रियांची संख्या पुरुषांच्या मानाने आधीच कमी आहे. व या मुली व त्यांचे आई-वडील स्वच्छतागृह नसलेल्या घरी सून म्हणून जाण्यास किंवा आपली मुलगी देण्यास, तयार नसल्याने ही चळवळ फोफावू लागली आहे.

ज्यांचे मुलगे लग्नाचे आहेत अशी कुटुंबे मुलाचे लग्न व्हावे म्हणून पैसे साठवून घरात स्वच्छतागृह बांधण्याच्या मागे आहेत कारण या शिवाय मुलाचे लग्न होणार नाही हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे.

हे परिवर्तन काही आपोआप घडून आलेले नाही. याला परोक्ष व उपरोक्ष अनेक कारणे आहेत. मुलींना शालेय शिक्षण पूर्णपणे मोफत असल्याने आज ग्रामीण भागातल्या मुली निदान शाळा तरी शिकलेल्या असतात. बर्‍याच प्रमाणातल्या मुलींनी व्यवसायाभिमुख शिक्षणही घेतलेले असते. यांच्या अपेक्षा साहजिकच वाढलेल्या असतात. या शिवाय टी.व्ही वर दाखवण्यात येणार्‍या मालिका आणि जाहीराती यांचाही मोठा परिणाम मुलींच्यावर होतो आहे. आंतरजाल आता बहुतेक गावातून उपलब्ध असल्याने, माहितीचे एक मोठे दालन या शिकलेल्या मुलींसाठी उघडले गेले आहे. टी.व्ही. वरच्या मालिकांतून दिसणार्‍या, रेशमी वस्त्रे परिधान करणार्‍या, जीन्स व टी शर्ट घातलेल्या व ऑफिसला जाणार्‍या मुली बघून या ग्रामीण मुलींना आपले आयुष्य़ सुधारावे असे वाटल्यास काही नवल नाही. हरयाणाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर, दहा वर्षांपूर्वी नवरा किंवा बाप यांच्यामागे बसलेल्या व मोटर सायकलवरून जाणार्‍या मुली दिसत. आता त्या स्वत:च स्कूटी चालवताना दिसतात.

‘स्वच्छतागृह नाही तर लग्न नाही’ ही सामाजिक चळवळ आता हरयाणात चांगलीच फोफावते आहे. ‘सुलभ इंटरनॅशनल’ या शौचकूप बांधणार्‍या संस्थेचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक तर या चळवळीला रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली क्रांतीच मानतात.

ग्रामीण स्त्रियांना आत्मप्रतिष्ठा व आत्मविश्वास मिळवून देणारी ही चळवळ खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे हे नक्की.

13 ऑक्टोबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: