.
ताज्या घडामोडी Current Affairs

द ग्रेट गेम-भाग 2


पंधरा महिन्यांच्या कालावधीनंतर, अफगाणिस्तानमधल्या भारतीय दूतावासावर, काल परत एकदा त्याच पद्धतीचा बॉम्ब हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जुलै 2008 मधल्या बॉम्बहल्ल्यात दूतावासाचे बरेच नुकसान झाले होते व 58 भारतीय व अफगाण कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर या हल्ल्यापासून धडा घेऊन दूतावासाने सभोवती कडेकोट बंदोबस्त केला होता. या बंदोबस्तामुळे कालच्या हल्ल्यात, संरक्षक भिंतीचे थोडेसे नुकसान व दोन सुरक्षा जवानांना झालेल्या किरकोळ दुखापती यावरच निभावले. परंतु दूतावासाच्या बाहेर असलेल्या अनेक निरपराध अफगाणी नागरिकांचा बळी गेला.

मागच्या वेळेप्रमाणे या वेळेसही तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाने 2008 च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला जबाबदार मानले होते. अफगाणिस्तानमधल्या भारतीय दूतावासावर हे हल्ले परत परत का होत आहेत? याच्यात नुकसान तर निरपराध अफगाणी लोकांचेच होते आहे. या हल्ल्यांमागच्या कारणमीमांसा स्पष्ट करण्याचा हा एक प्रयत्न.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात युरोपमधली सर्वात प्रबळ दोन राष्ट्रे, इंग्लंड व रशिया यांच्यात, भारतावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा होती. भारतात पाय रोवलेल्या इंग्रजांना तेथून हुसकावून लावून तेथे आपले वर्चस्व स्थापन करावे अशी रशियाच्या राज्यकर्त्यांची मनीषा होती. हा हेतू साध्य करण्यासाठी या देशाने अनेक डावपेच वापरून व युद्धे लढून मध्य एशिया पादाक्रांत केला होता व आपले नियंत्रण पार अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत नेले होते. इंग्रजांना रशियन डावपेचांची चांगलीच कल्पना असल्याने ते अफगाणिस्तानमधे पाय रोवून होते. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानवरचे नियंत्रण ही या सर्व डावपेचांची किल्ली होती. शेवटी रशियन राज्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की आपल्याला अफगाणिस्तानवर नियंत्रण करणे शक्य नाही व पर्यायाने भारतीय उपखंडही आपल्या हातात येणे शक्य नाही तेंव्हा त्यांनी ब्रिटिशांबरोबर तह केला व अफगाणिस्तान हे या दोन प्रबळ शक्तीमधील एक बफर राज्य करण्यास मान्यता दिली. दोन शतके चाललेल्या या डावपेचांना ‘द ग्रेट गेम’(The Great Game) असे नाव इतिहासकारांनी दिले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, ब्रिटिशांच्या अफगाणिस्तान बरोबरच्या उत्तम संबंधाचा वारसा भारताला मिळाला होता. भारताने तो 1979 पर्यंत चांगला संभाळला होता. या वर्षी, शीत युद्धाच्या कालात, रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. भारताने एक अतिशय व्ह्युहात्मक चूक करून रशियाच्या आक्रमणाला संपूर्ण पाठिंबा दिला. हा पाठिंबा रशियाच्या फौजा अफगाणिस्तान सोडेपर्यंत कायम राहिला होता. या कालात अफगाणी नागरिकांचे भारताबद्दलचे मत अतिशय कलुषित झाले. रशियन फौजा अफगाणिस्तान मधून निघून गेल्यावर भारताने आपली चूक बर्‍यापैकी सुधारली व नॉर्दर्न अलायन्सच्या फौजांना आपला पाठिंबा देण्यास सुरवात केली.

भारताच्या या व्ह्युहात्मक चुकीचा फायदा पाकिस्तान सरकारने उत्तम रितीने उठवला. रशियनांच्या विरूद्ध लढणार्‍या फौजांना त्याने अमेरिकेच्या मदतीने उत्तम पाठिंबा दिला. तालिबानचे सैन्य पाकिस्तानमधूनच हालचाल करत असल्याने, तालिबान सरकार व पाकिस्तान सरकार यांचे उत्तम सांटेलोटे जमले. तालिबानच्या सरकारबरोबर उत्तम संबंध असलेला पाकिस्तान हा एकुलता एक देश बनला. अफगाणिस्तानला मालवाहतुकीसाठी आवश्यक असा समुद्र मार्ग केवळ पाकिस्तानच्या मधून उपलब्ध असल्याने तो देश पाकिस्तानवर जास्त जास्त अवलंबून राहू लागला. परिणामी पाकिस्तानचे सरकार अफगाणिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग असल्यासारखे समजू लागले. या उलट भारताचे तालिबानबरोबरचे संबंध, विमान अपहरणाची घटना घडल्यावर आणखीनच बिघडले.

2001 मधे नॉर्दर्न अलायन्सच्या फौजांनी अमेरिकेच्या मदतीने तालिबानचे उच्चाटन केले व भारताला अफगाणिस्तानमधे परत प्रवेश करण्याची संधी मिळाली. या वेळी मात्र कोणतीही व्ह्युहात्मक चूक न करता व वेळकाढूपणा न करता अतिशय धोरणीपणाने भारताने आपले महत्व अफगाणिस्तानमधे वाढवण्यास सुरवात केली. 1979 पासून बंद असलेले कंदहार व जलालाबाद येथील दूतावास परत चालू करण्यात आलेच पण या शिवाय हेरात आणि मझर-ई-शरीफ या ठिकाणीही नवीन दूतावास सुरू करण्यात आले. सततच्या युद्धामुळे अफगाणिस्तानमधील सर्व यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस आल्या होत्या. भारताने 1.2 बिलियन यू.एस. डॉलर्स मदत अफगाणिस्तानला देऊ केली. ही मदत शिक्षण, आरोग्य, उर्जा व टेलेफोन वगैरे क्षेत्रातल्या प्रकल्पांसाठी होती. सर्व जिल्ह्यांमधे ट्यूब विहिरी खणणे, ड्रेनेजसाठी नळ टाकणे, आरोग्य सेवा सुधारणे या सारखे प्रकल्प सुरू करण्यात आले. अफगाणिस्तानच्या विमान कंपनीला 3 एअरबस विमाने देण्यात आली. या सर्व प्रकल्पावर काम धडाक्याने सुरू करण्यात आले.

_44810960_women226.jpg

या शिवाय झरंज-डेलाराम हा 200 कि.मी. चा रस्ता भारताने पूर्ण केला व इराणच्या मार्फत अफगाणिस्तानला मालवाहतुकीचा एक मार्ग खुला करून दिला. या मार्गामुळे अफगाणिस्तानचे पाकिस्तानवरचे अवलंबित्व खूपच कमी होण्यास मदत झाली. मे 2009 मधे काबुल शहराला विद्युत पुरवठ्यासाठी एक नवीन वाहिनी व सब-स्टेशन भारताने सुरू केले व काबुल शहरात 17 वर्षांनंतर प्रथम 24 तास वीज पुरवठा सुरू झाला. अफगाणिस्तानच्या पार्लमेंटची इमारत व हेरात येथील धरण 2010 मधे पूर्ण होईल.

Afghanistan2

या शिवाय ज्याला मृदु ताकद म्हणता येईल अशा अनेक गोष्टी भारताने सुरू केल्या. अफगाणी विद्यार्थ्यांना भारतात शिष्यवृत्या देण्यात आल्या. अफगाणिस्तानात बॉलीवुडचे सिनेमे अतिशय लोक प्रिय आहेत. ते सिनेमे, टी.व्ही. वरच्या सिरीयल्स मोठ्य प्रमाणात अफगाणिस्तानमधे जाऊ लागल्या व त्या अतिशय लोकप्रिय बनल्या. अफगाणी उत्पादनांना खास आयात सवलती दिल्या गेल्या व परिणामी 2007-2008 मधे दोन्ही देशातील व्यापार 258 मिलियन यू.एस. डॉलर्स एवढा वाढला.

या सर्व गोष्टींमागचे भारताचे धोरण अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक क्षेत्रात अफगाणिस्तानला मदत देऊन अफगाणी लोकांच्यात आपली प्रतिमा उजळ करणे, लोकांच्या मनात भारताबद्दल आपुलकी निर्माण करणे व पाकिस्तानचा त्या देशातील प्रभाव कमी करणे हे हेतु या धोरणामागे आहेत.

पाकिस्तान सरकार अर्थातच यामुळे अतिशय नाखुष आहे. भारत अफगाणिस्तानचा वापर बलुचिस्तानमधे ढवळाढवळ आणि दंगेधोपे करण्यासाठी वापरतो आहे. असा पाकिस्तानचा आरोप अफगाण सरकारनेच फेटाळून लावला आहे. अफगाणिस्तानचे सध्याचे अध्यक्ष श्री. करझाई यांनी भारतातून शिक्षण घेतलेले आहे त्यामुळे भारताला ते प्रत्येक बाबतीत झुकते माप देतात असे दिसते.

या सर्व कारणांमुळे पाकिस्तान सरकारची गुप्तचर संघटना व त्यांचे पित्ते तालिबान हे अतिरेकी कारवाया करून भारताच्या या प्रयत्नांत खीळ घालण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. भारतीय दूतावासांपुढे बॉम्बस्फोट करणे, निरनिराळ्या प्रकल्पातील भारतीय अभियंत्यांचे अपहरण व खून या सारख्या कारवाया त्यांनी सतत चालू ठेवल्या आहेत. पाकिस्तानमधील राजकारणी आता असे मानू लागले आहेत की भारत पाकिस्तानच्या हातातून अफगाणिस्तान हिसकावून घेत आहे.

अठराव्या व एकोणिसाव्या शतकातल्या इंग्लंड व रशिया यांच्यातल्या ‘द ग्रेट गेम’ प्रमाणेच एकविसाव्या शतकात भारत व पाकिस्तान परत एकदा ‘द ग्रेट गेम-भाग 2’ खेळत आहेत असे दिसते. या गेमचे बक्षिस मात्र तेच, म्हणजे अफगाणिस्तानच राहिले आहे.

9 ऑक्टोबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “द ग्रेट गेम-भाग 2

 1. अभ्यास पूर्ण निरीक्षण. चुकून कुणाचा ब्लॉग आहे ते न पाहताच लेख वाचायला सुरुवात केली आणि मग मजकूर पाहून वाटलंच की आंतरराष्ट्रीय घडामोडींवर ’अक्षरधूळ’ खेरीज कोण इतक्या अधिकाराने लिहू शकणार!

  आपली अशी धोरणे जे मुत्सद्दी ठरवितात व राबवितात त्यासाठी काय क्वालिफ़िकेशन लागते? आय ए एस?

  Posted by आरती | ऑक्टोबर 9, 2009, 6:33 pm
  • सरकारी यंत्रणेमधे धोरणे कोण ठरवते हे सांगणे कठिण आहे. पण पंत प्रधान, परराष्ट्रमंत्री व त्यांच्या मंत्रालयातील अधिकारी वर्ग धोरणे ठरवण्यात सहभागी असावा.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 10, 2009, 9:51 सकाळी
 2. Great Analysis!!!

  Posted by Abhi | ऑक्टोबर 9, 2009, 11:29 pm
 3. dear shekhar,
  great gamecha part 2 tu mhantos tyapramane suru aahe pan outcome kay sangane kathin

  Posted by ashok | ऑक्टोबर 11, 2009, 7:07 pm
 4. आपले सूर नक्कीच जुळतील ह्याच विषयांवर आधारित पुस्तके लेख आणि सगळ्यात महत्वाचे जर्मनीत अफगाण ,पाक इराण असे अनेक पंथीय निर्वासित आमच्या हॉटेलात मिळेल ती कामे करतात. त्यांच्या देशातून त्यांचे जर्मनीत येणे म्हणजे प्रत्येकाच्या चित्तरकथा आहेत. एखाद्या मुद्यावर व वाचलेल्या लेखावर त्यांची मते त्या देशातील सामान्य नागरिक म्हणून मला महत्वाची वाटतात.

  ह्या विषयाला आधारीत सदर माझ्या ब्लॉग मध्ये लवकरच सुरु करेन
  सध्या तुमच्या लेखातून एक महत्वाचा विषय मला मिळाला आहे त्या संबंधी मिळेल ते वाचून काढेन
  ग्रेट गेम
  क्या बात हे

  Posted by ninad kulkarni | जून 16, 2012, 1:19 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: