.
People व्यक्ती

दूध पण उंटीणींचे!


राजस्थानमधल्या एका डेअरी कडून, रोज सकाळी, दुधाचे दोन कॅन दिल्लीतल्या बिकानेर हाऊस जवळच्या एका बूथवर येतात. या कॅनमधे साधे व स्ट्रॉबेरीच्या स्वादाचे दूध असते. याच डेअरीकडून, रोज आणखी एक दुधाचा ट्रक, दिल्लीतल्याच मदर डेअरीकडे दूध घेऊन येतो. मदर डेअरी हे दूध अर्ध्या लिटरच्या पिशव्यांत पॅक करून विकते. हे वर्णन वाचून कोणालाही प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही की यात विशेष असे काय आहे. भारतात असे लाखो ट्रक देशभर दुधाची ने आण करत असले पाहिजेत. पण बिकानेरहून दिल्लीला येणारे हे दूध विशेषच असते. ते असते उंटीणीचे दूध. दिल्लीच्या दूरवर पसरलेल्या भागांच्यातून सुद्धा लोक हे दूध विकत घ्यायला या बूथवर येतात.

थोडीशी खारट चव असलेले हे दूध, आरोग्यास अत्यंत हितकारक असल्याचे मानले जाते. काविळ, क्षय, दमा, पंडूरोग व मूळव्याध यासारखे रोग झालेल्यांना, हे दूध गुणकारी असते असे सांगतात. या दूधसेवनाने मधुमेहावर थोडाफार ताबा मिळवता येतो असेही मानले जाते. इजिप्तच्या सायनाई वाळवंटात रहाणार्‍या बेदुईन या भटक्या जमातीच्या लोकांच्या मते, हे दूध शरीरातील सर्व रोगांवर रामबाण उपाय असून ते शरीरातील बॅक्टेरियांची हकालपट्टी करते. या समजुती खर्‍या की खोट्या, हे सांगणे कठिण आहे पण राष्ट्रसंघाच्या आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे रशिया व कझागस्तान येथील डॉक्टर, मोठ्या आजारानंतर, तब्येत पूर्ववत होण्याच्या काळात, उंटीणीचे दूध घेण्याचा सल्ला देतात.

हॉलंड देशातील एक शेतकरी फ्रॅन्क स्मिट्स याने, या दुधाबद्दलची माहिती वाचून, युरोपातील पहिली, उंटीणींच्या दुधाची, डेअरी सुरू केली आहे. फ्रॅन्कचे वडील मज्जासंस्थेचे डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने, उंटीणींचे दूध आरोग्यास खरोखर हितकारक असते का हे शोधून काढण्याचा एक प्रकल्प चालू केला आहे. काही मधुमेहींना हे दुध देऊन त्यांच्या रक्तातील शर्करा दर अर्ध्या तासाने मोजली जाते. या प्रयोगाच्या फलिताबद्दल त्यांनी सध्या मौन बाळगलेले असले तरी त्यांनी 200 मधुमेही घेऊन नवीन प्रकल्प चालू केला आहे. या लोकांचा मधुमेह कमी झाला आहे किंवा नाही हे सांगणे जरी सध्या कठिण असले तरी या रोग्यांच्या आयुष्य़ाची गुणवत्ता निश्चितच सुधारली आहे.

_46479447_camels_466

फ्रॅन्कने ही डेअरी फक्त 3 उंट आणून चालू केली. त्याला हे प्राणी आयात करण्यात बर्‍याच अडचणी आल्या. उंट हा प्राणी डेअरी संबंधित प्राणी नसल्याचे सरकारी अधिकार्‍यांचे मत पडले. त्याने युरोपातूनच प्राणी आणावे असा हास्यास्पद सल्ला ही त्याला देण्यात आला. त्याच्याकडे सध्या 40 उंटीणी आहेत पण त्यापैकी फारच थोड्या दूध देऊ शकतील एवढ्या मोठ्या असल्याने त्याला अजून या प्रकल्पात फायदा होत नाहिये. आचळांचा आकार, दूध ओढून घेण्यासाठी आवश्यक निर्वाततेची क्षमता व किती सेकंदानंतर दूध ओढत रहायचे याचे चक्र या गोष्टी, उंटीणी व गाई यांच्यामधे भिन्न असल्याने, गाई म्हशींचे दूध काढणारी यंत्रे उंटीणींना चालत नाहीत त्यामुळे फ्रॅन्कला दूध काढणारी यंत्रे नवीन बनवून घ्यावी लागली.

_46479449_camels3_226

अर्थातच सुरवातीला या दुधाला कोणीच ग्राहक नव्हते. फ्रॅन्कने यासाठी एक युक्ती योजली. मोरोक्को आणि सोमालिया या देशांच्यातून आलेले लोक जिथे रहातात त्या भागाच्या जवळ असलेल्या मशिदींमधे त्याने हे दूध फुकट वाटण्यास सुरवात केली. हळू हळू लोकांना हे दूध उपलब्ध आहे हे माहिती झाले आणि आता 50 दुकाने तरी हे उंटीणींचे दुध स्टॉकमधे ठेवतात. आता हे दूध जर्मनी आणि इंग्लंडला निर्यातही होते.

फ्रॅन्कला या डेअरीमधे एक विशेष प्रकारची अडचण भासते. गाई म्हशी या प्राण्यांपेक्षा, उंटीणींचा स्वभाव निराळा व तिरसट असल्याने, मोठ्या प्रमाणावर ही डेअरी चालवणे अवघड काम बनते.

जयपूरच्या, राजस्थान डेअरी डेव्हलपमेंट फेडरेशन कॉर्पोरेशन (Rajasthan Dairy Federation Cooperative Ltd) (RDFC) यांनी भारतात, उंटीणींच्या दुधाचा प्रकल्प हातात घेतला आहे. ते ‘सारस’ या नावाखाली हे दूध विकतात. त्यांचा हा प्रकल्प यशस्वी झाला तर थोड्याच दिवसात, चितळ्यांचे उंटीणीचे दुध आपल्याकडे मिळू लागले तर आश्चर्य मानायला नको.

3 ऑक्टोबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “दूध पण उंटीणींचे!

 1. मुंबईत काही ठिकाणी उंटिणीचे तूप विकले जाते. पण ही विक्री घाउक प्रमाणावर होत असल्याने त्याचा स्वाद घेता आला नाही.

  Posted by मनोहर | ऑक्टोबर 3, 2009, 6:32 pm
 2. मुंबईत क्रॉफर्ड मार्केटला युएईतून आयात केलेले उंटीणीच्या दुधाचे चीज मिळते. चवीला छान असते.

  Posted by अमोल | ऑक्टोबर 6, 2009, 7:45 pm
 3. उंटाच्या चरबीत शिजवलेल्या बिर्याणीपेक्षा हे बरं!

  या दुधाचा चहा कसा लागेल??

  Posted by आल्हाद alias Alhad | ऑक्टोबर 8, 2009, 4:02 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: