.
People व्यक्ती

अन्नदाता


1968 साली पॉल.आर. एरलिश या लेखकाने, अतिशय गाजलेले असे एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाचे नाव होते ‘पॉपुलेशन बॉम्ब’. या पुस्तकात, लेखकाने भारताबद्दल अत्यंत निराशाजनक अशी भविष्यवाणी वर्तवली होती. या भविष्यवाणीप्रमाणे, 1970 आणि 1980 च्या दशकात अनेक कोटी लोक भारतात मृत्युमुखी पडणार होते. भारतीय शेतीउद्योग वाढ्त्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नउत्पादन करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरणार होता.

आपल्यापैकी ज्या लोकांनी 1960च्या आधीची अन्नधान्यांची परिस्थिती अनुभवली आहे त्यांना चांगलेच आठवेल की त्यावेळी अतिशय नित्कृष्ट दर्जाचा व अमेरिकन सरकारकडून फुकट मिळालेला गहू, रेशनच्या दुकानात मिळत असे. सर्वच अन्नधान्यांचा तुटवडा असल्याने धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालत असे. एकंदरीत परिस्थिती एरलिश च्या भविष्यवाणीनुसारच होती.

पण 1970च्या दशकात असे घडले तरी काय? की ज्याच्या योगे परिस्थिती एखाद्या जादूच्या कांडीने बदलावी तशी बदलली. 1965 ते 1970 या पाच वर्षात भारतातले गहू उत्पादन 12 मिलियन टनावरून 20 मिलियन टनावर गेले. 1975पर्यंत भारत गव्हाचा निर्यातदार देश बनला. इ.स. 2000 मधे भारताचे गहू उत्पादन 75 मिलियन टनावर गेले. उत्पादनातली ही 600% ची वाढ, ज्याला आता ‘हरित क्रांती’ किंवा (Green Revolution) या नावाने ओळखले जाते ती  घडली तरी कशी? व ती कोणी घडवली?

हा जादूगार होता एक साधासुधा अमेरिकन कृषी तज्ञ. त्याचे नाव होते ‘नॉर्मन बॉरलाग’(Norman Borlaug). नॉर्मनला  जगाचा अन्नदाता या नावानेच खरे तर संबोधले पाहिजे. भारताबरोबरच पाकिस्तान आणि त्याच्या आधी सर्वात प्रथम मेक्सिको, या देशात त्याने ही हरित क्रांती घडवून आणली होती. 1970 साली, नॉर्मनला नोबल शांती पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या वेळी जगातल्या कोट्यावधी भुकेल्या मानवांना, दोन वेळची भाकरी ज्याने एकट्याने पुरवली असा माणूस हे गौरवोद्गार त्याच्याबद्दल काढले गेले.

Borlaug-360_613373a

नॉर्मनचा जन्म 1914 साली, अमेरिकेतल्या आयोवा राज्यातल्या क्रेस्को गावाजवळच्या एका शेतकरी कुटुंबात झाला. मिनिओसोटा विद्यापीठातून त्याने फॉरेस्ट्री विषयातून पदवी प्राप्त केली व थोडी वर्षे त्याने फॉरेस्ट विभागात काम केले. यानंतर प्लॅन्ट पॅथॉलॉजी या विषयात त्याने पुढे शिक्षण घेतले व डॉक्टरेटही घेतली. 1944 मधे ड्यूपॉन्ट कंपनीतील चांगली नोकरी सोडून त्याने मेक्सिकोमधे अन्नधान्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नव्या जाती शोधून काढण्याचे काम हातात घेतले. पुढची 10 वर्षे त्याने प्राथमिक स्वरूपाच्या सोई असलेल्या संशोधन केंद्रात अपार कष्ट करून नवीन संकरित गव्हाच्या जाती तयार करण्यात यश मिळवले. या काळात ट्रॅक्टर उपलब्ध नसल्यामुळे स्वत: नांगर ओढण्यापासून कामे केली. 12 तास शेतात स्वत: उभे राहून तो गव्हाच्या फुलांमधून पूं केसर काढून दुसर्‍या जाती संकरित करण्याचे काम करत असे. नॉर्मनच्या अथांग परिश्रमांना 1956मधे यश आले. मेक्सिकोचे गहू उत्पादन दुप्पट झाले आणि तो देश स्वयंपूर्ण बनला.

1965मधे भारत सरकारच्या निमंत्रणामुळे नॉर्मन भारतात आला व इथल्या शास्त्रज्ञांच्या मदतीने त्याने अनेक संशोधन केंद्रे स्थापन केली. भारत पाकिस्तान युद्ध चालू असतानाच त्याने पंजाब व हरयाणा मधील हजारो शेतकर्‍यांना या नव्या संकरित तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दिली व पुढे या शेतकर्‍यांनी नॉर्मनच्या संशोधनाचे सोने केले. तो भाग आपल्याला माहितीच आहे. 1984मधे निवृत्त झालेला असूनही त्याला आफ्रिकेतून बोलावणे आले. तिथली परिस्थिती बघून त्याने निवृत्तीचा विचार सोडून दिला आणि तो बियांची पेरणी करण्याकडे परत वळला.

लहान असताना नॉर्मनला मानवी भूक(Hunger) म्हणजे काय याची कल्पनाच नव्हती.  1933 मधे अमेरिकेत आलेल्या मंदीत त्याने प्रथम एक माणूस अन्नाची भीक मागताना बघितला. या प्रसंगाने त्याच्या लक्षात आले की पोटे रिकामी असली तर देशात शांतता कधीच नांदणार नाही. प्रथम त्याने पिकांवरील रोगांवर संशोधन केले. गव्हावरील तांब्या हा रोग सर्वात धोकादायक मानला जात असे. या रोगाला टक्कर देऊ शकेल अशी गव्हाची संकरित जाती त्याने प्रथम तयार केली. जपानमधे पिकवण्यात येणार्‍या ‘नोरिन’ या खुजा जातीशी संकर करून त्याने जी नवी गव्हाची जाती तयार केली तीच जात भारतातील हरित क्रांतीला कारणीभूत ठरली.

55687371.pbasefeb2006greenrevolutionricefields

पाकिस्तान व त्यानंतर सूदान हे देशही भारतानंतर गव्हाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. ज्या ज्या देशात हरित क्रांती झाली तिथली लोकसंख्या वाढण्याच्या ऐवजी कमी होऊ लागली आणि त्याचबरोबर रोगराईही कमी झाली. एरलिशच्या भविष्यवाणीतील मृत्युघंटा कधी वाजलीच नाही.

पर्यावरणवाद्यांना नॉर्मनचे संशोधन कधीच पसंत पडले नाही. तो करत असलेले प्रयोग अनैसर्गिक आहेत असे त्यांचे म्हणणे होते. नॉर्मनच्या मताप्रमाणे निसर्गाने निरनिराळ्या गवतांपासून संकर करून तर गव्हासारखी पिके तयार केली होती. तेंव्हा हे काम मानवाने केले म्हणून काहीच बिघडत नव्हते. नॉर्मनचे असे स्पष्ट मत होते की सर्व देशांनी या प्रकारचे संशोधन करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले तर2025 साली जगात असणार्‍या 8 बिलियन लोकांना अन्नधान्याची ददात भासणारच नाही.

पर्यावरणवादी जी काय ओरडाआरडी करत आहेत ती त्यांना करूदे. प्रगतीशील देशांतल्या कोटी कोटी लोकांचे प्राण वाचवणारा हा संशोधक खराखुरा अन्नदाता आहे व आपण सर्व जण त्याचे शतश: ऋणी आहोत.

मागच्या आठवड्यात, 12 सप्टेंबरला, हा आपल्या सर्वांचा अन्नदाता, वयाच्या 95व्या वर्षी निधन पावला

22 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “अन्नदाता

  1. AADHUNIK RUSHI.

    Posted by sadanand | सप्टेंबर 22, 2009, 8:22 pm
  2. अपशकून करण्यासाठीच पर्यावरणाविषयी काळजी दाखविली जाते.

    Posted by मनोहर | सप्टेंबर 23, 2009, 1:03 सकाळी
  3. It is a real Hero………..

    Posted by vishal | जानेवारी 20, 2011, 11:33 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: