.
Environment-पर्यावरण

बॅटरी पॉवर


माझे एक मित्र आहेत. त्यांचा स्वत:चा मोठा व्यवसाय आहे. त्यांना कधीही भेटले तरी ते बहुदा त्यांच्या सेल फोनवर कोणाशीतरी बोलत असतात. त्यांच्याशी गप्पा मारायच्या असल्या तर दोन फोन कॉलच्या मधल्या वेळात, जो काय वेळ मिळेल तेवढ्यातच माराव्या लागतात. एकदा असेच ते फोनवर बोलत असताना, त्यांनी फोन एकदम बंद केला. मी साहजिकच त्यांना विचारले की काय झाले? फोनची बॅटरी डिसचार्ज़ झाली असे ते म्हणाले. मला साहजिकच असे वाटले की आता निवांत गप्पा मारता येतील. परंतु माझ्या स्नेह्यांनी खिशातून दुसरी बॅटरी काढली व फोन चालू केला. नंतर त्यांनी मला सांगितले की दिवसभरात त्यांना तीन तरी बॅटर्‍या वापराव्या लागतात. आणि या सर्व बॅटर्‍या ते स्वस्तातल्या, चिनी मेकच्या घेत असल्याने वर्षभरातच कचर्‍यात फेकून देतात.

भारतात म्हणे सध्या 40 कोटी पेक्षा जास्त मोबाईल फोन वापरात आहेत. यापैकी फक्त फोन म्हणून वापरले जाणारे आता थोडेच असावेत. लोक आता या फोन्सचा, कॅमेरा किंवा व्हिडिओ कॅमेरा म्हणून वापर करतात. अनेक जण आंतरजालावर हा फोन वापरून ई-मेल बघतात, शोधाशोध करतात, ई-पुस्तके वाचतात व यू-ट्युबवरची चित्रे, व्हिडिओही बघतात. काही लोक यावरून गाणी ऐकतात, रेडियो ऐकतात व सिनेमे सुद्धा बघतात. मुलांना या फोनवरून गेम्स खेळता येतात हे उमगले आहे त्यामुळे संधी मिळाली की ती फोन घेऊन गेम्स खेळणे सुरू करतात. थोडक्यात हा मोबाईल फोन आता फोन न रहाता एक सर्वव्यापी मदतनीस झाला आहे.

फोनचे ठीक आहे पण बॅटरीचे काय? फोनचे एवढे विविध उपयोग होत असले तर आतली बॅटरी कुठवर टिकाव धरेल? इतक्या गोष्टींसाठी फोन वापरायचा म्हणजे बॅटरी तशीच मोठी हवी. फोनच्या आत ठेवलेली बॅटरी तर लहान असते. त्यामुळे काही फोनना बाहेरून बॅटरी लावण्याची सोय आता केलेली असते.पण ही बाहेरची बॅटरी बरोबर घेऊन फिरायची म्हणजे त्रासदायक काम त्यामुळे ही फारशी काही वापरली जात नाही. आता कळस म्हणजे ऍपल कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमधली बॅटरी बाहेरच काढता येत नाही.

CELLULAR RECYCLING

या सगळ्या कारणांमुळेच फोनचा चार्जर आता अतिशय महत्वपूर्ण बनत चालला आहे. कुठेही जायचे असले की चार्जर घेतला आहे की नाही हे प्रथम बघावे लागते. प्रत्येक प्रकारच्या फोनला आता निराळा चार्जर लागतो. त्यामुळे फोन बदलला (सरासरीने दर 18 महिन्यानी लोक मोबाईल फोन बदलतात.) की चार्जर निरूपयोगी!

cell-phone-chargers-chris-jordanफेकून दिलेले फोनचे चार्जर्

जगभरात दरवर्षी 20 कोटी सेलफोनच्या बॅटर्‍या, लोक कचर्‍यात फेकून देतात आणि त्याचबरोबर त्यांचे चार्जरही, (जरा कमी प्रमाणात) फेकले जातात. या बॅटर्‍या तीन प्रकारच्या असतात. निकेल-कॅडमियम, निकेल-मेटल हायड्राइड व लिथियम-आयॉन, या तिन्ही बॅटर्‍यामधील सर्व पदार्थ अतिशय विषारीच आणि पर्यावरणास धोकादायकच असतात. आपण या बॅटरीचे वजन 20 ते 50 ग्रॅम आहे असे जरी धरले तरी काही कोटी किलोग्रॅम विषारी पदार्थ आपण कचर्‍यात टाकून देतो आहोत. या शिवाय चार्जरमधला ई-कचरा निराळाच. म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात हे विषारी पदार्थ आपण कचर्‍यात आणि पर्यायाने जमीनीत गाडून टाकत आहोत याची कल्पना येईल. या गाडलेल्या बॅटर्‍यांमधली हेवी मेटल्स, भूजलातले पाणी दूषित करतात आणि पर्यावरणाला व ते पाणी पिणार्‍या लोकांच्या आरोग्याला मोठी हानी पोचवतात.

बॅटर्‍या कचर्‍यात न फेकून देता त्याचे रीसायकलिंग करणे अतिशय महत्वाचे आहे. हे रीसायकलिंग करताना सर्व हेवी मेटल्स बाहेर काढून घ्यावी लागतात. ही हेवी मेटल्स जर शरीरात गेली तर कर्करोगापर्यंत वेळ येण्याची शक्यता असते.  रस्त्यावरच्या भंगारवाल्याकडे म्हणूनच बॅटर्‍या देणे चुकीचे आहे. पाश्चिमात्य देशात आता या बॅटर्‍या कशा रीसायकलिंगला द्यायच्या याची योग्य पद्धत तुम्हाला सांगितली जाते व त्यामुळे तेथे या फेकून दिलेल्या बॅटर्‍य़ांपासून पर्यावरणाला असलेला धोका बर्‍याच प्रमाणात कमी झाला आहे.

भारतात या बाबतीत अजून आनंदच असल्याने, फेकून दिल्या गेलेल्या बॅटर्‍या शेवटी भंगारवाल्यांकडे पोचतात. हे लोक त्या बॅटर्‍यांचे काय करतात हे शोधून काढणे खरोखरच कठिण आहे. या बाबतीत योग्य पावले सरकारी किंवा म्युन्सिपल पातळीवर जर लवकर उचलली गेली नाहीत तर भविष्यात याचे महाभयंकर परिणाम पुढच्या पिढ्यांना अनुभवायला लागणार आहेत.

मोबाईल फोन वापरायला मोठा छान वाटतो. पण याच मोबाईलमधल्या बॅटरीचे दुष्परिणाम, पुढच्या पिढ्यांना भोगायला लागू नयेत म्हणून आजच आपण काळजी घेणे जरूरीचे आहे.

21 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “बॅटरी पॉवर

 1. मोबाईल फोन हा मदतनीस असल्याचा आभास निर्माण करतो. प्रत्यक्षात कामे टाळण्यासाठी मोबाईलचा वापर होतो.

  Posted by Manohar W. Rawool | सप्टेंबर 21, 2009, 7:31 pm
 2. अरे बापरे! हे खूपच भयानक आहे.

  Posted by Kanchan | सप्टेंबर 23, 2009, 4:51 pm
 3. ह्या बॅटर्‍यांवर असे चिन्ह असते की कचर्‍याच्या पेटीत टाकू नका. (कचरापेटीवरती फुली).

  मग अश्या वस्तूंचे काय करायचे हे मी एकदा डीलरला (नोकिया प्रायोरिटी) विचारलं होतं, पण तिथल्या लोकांना काहीही कल्पना नव्हती.

  नंतर मला नोकियाच्या वेबसाईटवर दिसले:
  http://www.nokia-asia.com/get-support-and-software/repair-and-recycle/recycle

  नोकिया सर्विस सेंटरमधेच जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी जमा केल्या जातात. अर्थात नंतर त्याचं काय करतात हा एक मोठा प्रश्न आहेच. पण तरी, कोणीतरी सगळं एकत्र करून योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याबद्दल जागरूक आहे, यावंच समाधान.

  Posted by Prashant | सप्टेंबर 30, 2009, 2:40 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: