.
अनुभव Experiences

अनिश्चित संध्याकाळ


काही दिवसांपूर्वीची घटना आहे. एक म्हातारे जोडपे, पुण्यातला एक रहदारीने गजबजलेला व वर्दळीचा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. बर्‍याच प्रयत्नानंतर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकापर्यंत ते पोहोचले. हा दुभाजक म्हणजे उभ्या बसवलेल्या फरशांच्या तुकड्यांची एक रांग होती. दोन्ही बाजूंनी अतिशय वेगाने जाणार्‍या वहानांच्या मधे हे जोडपे कसेबसे जीव मुठीत धरून उभे असताना, एका वेगाने जाणार्‍या मोटर कारचा म्हातारबुवांना धक्का लागला व ते जमिनीवर पडले. त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणूनच ते दुसर्‍या कुठल्या वहानाच्या खाली आले नाहीत. रस्त्याने जाणार्‍या काही सह्रुदय लोकांनी त्यांना बाजूला नेले, रिक्षात बसवून दिले. नशिबाची केवळ खैर होती म्हणूनच हे जोडपे धडधाकट घरी पोचले.

मी ही बातमी जेंव्हा प्रथम वाचली तेंव्हा माझ्या मनात आधी विचार हा आला की या ज्येष्ठ जोडप्याने झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता न ओलांडता असाच कुठेतरी का ओलांडला? त्यांच्या या चुकीच्या वर्तनाने त्यांना अपघात झाला तर त्या वाहन चालकाचा यात काय दोष? पण मी जेंव्हा बारकाईने ही बातमी वाचली तेंव्हा काही निराळेच चित्र समोर आले. या म्हातारबुवांना दिसेनासे  झाले होते व म्हणून त्यांनी या रस्त्यावर असलेल्या डोळ्यांच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती. त्यांच्या बरोबर जाण्यास जाण्यासाठी कोणीच तरुण वयातील व्यक्ती उपलब्ध नसल्याने त्यांच्या ज्येष्ठ वयाच्या पत्नी त्यांच्या सोबत आल्या होत्या. डोळे तपासून बाहेर आल्यावर त्यांनी बर्‍याच रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला होता. अनेक मग्रूर रिक्षावाले त्यांच्याकडे लक्ष ही न देता निघून जाताना त्यांना दिसत होते. सर्वात जवळचे झेब्रा क्रॉसिंग बर्‍याच अंतरावर दिसत होते व त्या पती-पत्नीची शारिरिक अवस्था तेथपर्यंत चालत जाण्याची नव्हती. आहे त्या जागेवर उभे राहून रिक्षाची वाट पहाणे हे त्यांना कडक उन्हामुळे अत्यंत अवघड वाटू लागले होते. अशा केविलवाण्या अवस्थेत त्यांनी रस्ता क्रॉस करण्याचा निर्णय घेतला होता.

हे सगळे वाचल्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. रिक्षा थांबवण्यासाठी कोणी हात दाखवला तर रिक्षा ड्रायव्हर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकतो का? सोईच्या जागी झेब्रा क्रॉसिंग का आखण्यात आलेली नव्हती? एवढ्या रहदारीच्या रस्त्यावर एकही पोलिस या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी का नव्हता? सार्वजनिक जागी एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला मदत हवी असली तर त्याने काय करावे? पण यातल्या एकाही प्रश्नाला मला उत्तर मिळाले नाही.

एकत्रित कुटुंबपद्धतीकडून विभक्त कुटुंबपद्धतीकडे होणार्‍या संक्रमणाच्या या कालखंडातील सामाजिक बदलांची किंमत, फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच मोजावी लागणार आहे असे दिसते. मागच्या पिढीत कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला असे आपआपले डॉक्टरकडे जाण्याची कधीच गरज भासली नाही. विजेची किंवा फोनची बिले भरणे, वाणी सामान आणणे या सारख्या गोष्टीही ज्येष्ठ नागरिकांना कधी एकट्याला कराव्या लागल्या नाहीत. तरूण पिढीतले कोणी ना कोणी त्यांना मदत करण्यास उपलब्ध असे. समाजात होत असलेल्या या बदलांनी ज्येष्ठ नागरिकांचा गट हा एकटा पडल्यासारखा झाला आहे व या गटाची परिस्थिती केविलवाणी होत चालली आहे.

परदेशातील ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारच्या परिस्थितीला शतकाहून जास्त काल तोंड द्यावे लागले आहे असे कोणी म्हणू शकेल व ते ही खरेच आहे. भारतातील ज्येष्ठांना आता प्रथम या परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे तेंव्हा त्यात विशेष बाऊ करण्यासारखे काही नाही असेही म्हणता येईल. परंतु परदेशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत त्या बघितल्या तर परदेशातील व भारतातील ज्येष्ठ यांच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचे अंतर आहे हे लक्षात येईल. रस्त्यावर असलेले फिरते जिने किंवा सार्वजनिक वाहनात चढ-उतार करता यावी म्हणून ज्येष्ठांसाठी केलेल्या सुविधा यामुळे, परदेशांतील ज्येष्ठांचे कोणत्याही कामासाठी बाहेर पडणे हे सुरक्षित व सुलभ असते. तसेच ज्यांना परवडते ते फोन करून टॅक्सी बोलावू शकतात. कोणतीही आरोग्यविषयक अडचण आल्यास काही मिनिटात रुग्णसेवा हजर होऊ शकते. ज्येष्ठांसाठी बनवलेली खास वाहने सर्व प्रगत देशातील शहरात उपलब्ध असतात.

या उलट भारतातील ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरच्या अत्यंत धोकादायक परिस्थितीमुळे बाहेर जाण्यास घाबरतो. तो रहात असलेल्या इमारतीत जर लिफ्ट असला तर वीज कधी जाईल आणि तो बंद पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे बर्‍याच वेळा जिन्याने चढ-उतार करण्याची या ज्येष्ठावर वेळ येते. बहुदा सर्व ज्येष्ठांना गुढगे दुखी ही असतेच. त्यामुळे शक्यतो बाहेर जाणे टाळण्याचीच त्यांची वृत्ती असते.

अशा परिस्थितीमुळे, खूपसे ज्येष्ठ नागरिक एकाकी व असहाय्य बनलेले दिसतात. तरुणांना त्यांच्याशी गप्पा-गोष्टी करणे फारसे रुचत नाही. ज्येष्ठांना आपण समाजाचे हवे असलेले किंवा उपयोगी घटक आहोत असे वाटतच नाही. यामुळे त्यांचा एकाकीपणा आधिकच वाढत जातो. आपण एक पिढी जरी मागे गेलो तरी अतिशय निराळे चित्र दिसत होते. ज्येष्ठ नागरिक त्या वेळी कुटुंबाचा भाग असत व त्यांची काळजी घेतली जात असे. त्यामुळे ते बर्‍यापैकी आनंदी व उत्साही असत.

फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सदनिका आता मिळू शकतात. या ठिकाणी ज्येष्ठांसाठी आवश्यक अशा सर्व सुविधा असतात. परंतु अशा ठिकाणी रहाणार्‍या ज्येष्ठाला, सकाळ पासून रात्रीपर्यंत फक्त दुसरे ज्येष्ठ नागरिकच भेटणार असतील आणि गप्पा फक्त आजारपणी आणि तरूण पिढीची वर्तणुक यावरच केन्द्रित होणार असतील तर अशा ठिकाणी कोणत्या ज्येष्ठाला रहायला आवडेल असा प्रश्न पडतो.

जास्त चांगली वैद्यकीय मदत, चांगली औषधे व सुविधा यांनी सरासरी आयुष्यमान वाढत चालले आहे. घराच्या चार भिंतीत अडकून पडलेल्या एकाकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या त्यामुळे सतत वाढत चालली आहे. या ज्येष्ठांच्या मधे, खरे म्हणजे तर अजून जगण्याची, आयुष्यातला आनंद लुटण्याची भरपूर इच्छा आहे. त्यांना नाटक-सिनेमाला जाण्याची आवड आहे. गाण्याच्या मैफली ऐकायच्या आहेत. एखादा नवीन चवीचा पदार्थ चाखण्याची इच्छा आहे. नवीन फॅशनचे कपडे शिवायचे आहेत. थोडक्यात म्हणजे सर्व नवनवीन त्यांना अनुभवायचे आहे. परंतु शहरांच्यातली वाढती गर्दी, प्रदुषण आणि अंतरे त्यांना जास्त जास्त चार भिंतींच्या आत ढकलते आहे व एकाकी व असहाय्य बनवते आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे भविष्य, एकूण जास्त जास्त अंधकारमयच होत जाणार अशीच चिन्हे आहेत.

17 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “अनिश्चित संध्याकाळ

  1. छान मांडले आहेत मुद्दे

    Posted by अनिकेत | सप्टेंबर 17, 2009, 12:00 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: