.
अनुभव Experiences

खरी स्त्री मुक्ती


मी लहान असताना, दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसांपैकी थोडे दिवस, मी माझ्या आईच्या मामांच्या घरी घालवत असे. त्यांचे घर म्हणजे जुन्या पद्धतीचे एकत्र कुटुंब होते. तीन भाऊ, त्यांच्या बायका, मुले व वृद्ध आई वडील एवढ्या व्यक्ती सतत घरात असत. या शिवाय पाहुणा राहुणा आणि नात्यातला कोणीतरी सतत मुक्कामाला असेच असे. घरात एवढ्या व्यक्ती रहात असल्याने घरातला सर्व स्त्रीवर्ग सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कामात असे. माझी पणजी व तिच्या दोन सुना या दिवसभर स्वैपाकघरात काही ना काही करतच असत. त्या वेळेस मला त्यांच्या या कष्टांची कधी जाणीव झाली नाही. पण आता मागे वळून पाहिले तर मनापासून असे वाटते की या तीन  बुद्धीमान आणि हुशार बायकांनी, आपले सर्व आयुष्य स्वैपाकघरात व्यर्थ घालवले. त्या ऐवजी जर त्यांनी दुसर्‍या कोणत्या क्षेत्रात काम केले असते तर त्यांच्या हातून कितीतरी जास्त उपयुक्त कार्य झाले असते.

पाश्चिमात्य देशातल्या लोकांना ही गोष्ट अनेक दशकांपूर्वीच लक्षात आली होती. दोन महायुद्धे लढण्याची वेळ आल्यामुळे बहुतेक पुरुषवर्ग लढाईत गुंतलेला होता. रोजची साधीसुधी कामे करण्यास, स्त्रीवर्गाशिवाय दुसरे कोणी उपलब्धच नव्हते. हे मान्य करावेच लागते की पाश्चिमात्य स्त्रिया या कसोटीला पुरेपुर उतरल्या. त्या स्वैपाकघरातून बाहेर आल्या व बस चालवण्यापासून, युद्धोपयोगी साहित्याच्या उत्पादन करणार्‍या कारखान्यांच्यात काम करण्यापर्यंत, सर्व कामे करू लागला. या स्त्रिया या वेळी स्वैपाकघरातून बाहेर पडल्या त्या कायमच्याच. युद्ध संपल्यानंतरही त्या सर्व प्रकारची बाहेरची कामे करतच राहिल्या. पाश्चिमात्य समाजात, स्त्रियांची खरी मुक्ती झाली ती यामुळेच.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात, भारतातल्या स्त्रीवर्गाची परिस्थिती फारच वाईट होती, असे म्हटले तरी चालेल. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या काही समाजसुधारकांनी या बाबतीत अतिशय परिश्रम करून समाजात जागृतीचे काम केले व त्यांच्याच कार्यामुळे, भारतातील स्त्रीवर्गाची परिस्थिती सुधारत गेली. आज शिक्षण, कायदेशीर हक्क, नोकरीची संधी वगैरे सर्व बाबतीत स्त्री आणि पुरुष यांत काहीच फरक केला जात नाही. जर एखादी स्त्री कर्तबगार आणि लायक असेल तर कोणतेही पद मिळविण्यास तिला स्त्री म्हणून अडचण येत नाही.

आता आपण एका सर्वसाधारण, आधुनिक व विभक्त कुटुंबाचा विचार करू. या कुटुंबातील पुरुष व स्त्री दोघेही सुशिक्षित व चांगल्या नोकरीवर आहेत असे धरू. अर्थातच त्यांचे उत्पन्न बरेच जास्त असल्याने सर्व सुख सोई त्यांना उपलब्ध आहेत. ते सुट्टीवर प्रवासाला जाऊ शकतात. त्यांच्याकडे चौचाकी किंवा दुचाक्या तर असणारच आहेत. थोडक्यात म्हणजे त्यांचे कुटुंब अगदी आदर्श कुटुंब वाटण्यासारखे आहे. परंतु या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कामाच्या व्याप्तीचा जर विचार केला तर प्रचंड असमतोल आहे असे दिसते. या घरातल्या स्त्रीला, कामाच्या ठिकाणी, आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी इतर पुरुषांच्या बरोबरीने कष्ट करावे लागत असतात. या शिवाय घरी, मुलांच्या जबाबदारीबरोबर, स्वैपाकपाण्याची व्यवस्था करून, घरातल्या सर्वांचे पोट भरण्याची जबाबदारीही तिच्याच माथ्यावर येऊन पडते.

भारतीय गावे किंवा शहरे यांच्यात, स्त्रीची ही स्वैपाकपाणी करून सर्वांचे पोट भरण्याची दुहेरी जबाबदारी कमी करू शकतील, अशा कोणत्याही सुविधा नसतात. चांगल्या दर्जाची उपहारगृहे एकतर अतिशय महाग असतात व त्यांच्या मेन्यूमधे बहुतांशी तेलकट पंजाबी पदार्थ उपलब्ध असतात. हे पदार्थ रोज आपल्या कुटुंबियांना कोणतीही स्त्री खाऊ घालू शकणार नाही. स्वस्त उपहारगृहे एकतर घाणेरडी असतात व त्यांच्यात मिळणारे पदार्थ बनवण्यासाठी जे अन्न घटक वापरले जातात त्यांची गुणवत्ता कशी असेल याबाबत कोणीही हमी देऊ शकत नाही.

मला असे वाटते की सिंगापूरमधे सर्वत्र असणारी फूड कोर्टस याबाबत आदर्श मानता येतील. शहरात पसरलेले सर्व मोठे वास्तुप्रकल्प, व्यापारी संकुले व बाजार यात असलेली ही मोठ्या आकाराची फूड कोर्टस, सिंगापूरच्या कोणत्याही कोनाकोपर्‍यात आपल्याला आढळतात. सर्वसाधारणपणे ही फूड कोर्टस म्हणजे मोठे हॉल्स असतात. हॉलच्या चारी बाजूंना, विविध प्रकारच्या जेवणांचे स्टॉल्स उपलब्ध असतात व मध्यभागी मोठ्या संख्येच्या लोकांना भोजन घेता यावे यासाठी खुर्च्या-टेबले ठेवलेली असतात. या जेवणांच्या स्टॉल्समधे, इतके विविध प्रकारचे भोजन उपलब्ध असते की थक्क व्हायला होते. चिनी, थाई,जपानी, इंडोनिशियाचे, दक्षिण व उत्तर भारतीय आणि पाश्चिमात्य प्रकारच्या अन्नाचे स्टॉल्स कमी जास्त प्रमाणात सगळीकडे आढळतात. या स्टॉल्सवरील अन्नपदार्थ ताजे, स्वच्छ, योग्य आणि परवडेल अशा किंमतीला असतात. सर्व अन्न पदार्थ आकर्षक रित्या मांडलेले असतात व एक चक्कर मारली की आपल्याला काय खावेसे वाटते ते लगेच ठरवता येते. अन्न पदार्थ स्वयंसेवा पद्धतीने मिळत असल्याने त्यांच्यावरचे ओव्हरहेड्स कमी असतात.  हे पदार्थ स्वच्छ व चांगल्या दर्जाचे असतील आणि फूड कोर्टसमधे सर्वसाधारण स्वच्छता पाळली जाईल याकडे सरकारी यंत्रणा बारकाईने लक्ष देते.

अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने, सिंगापुरी कुटुंबे घरात स्वैपाक करत नाहीत यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कामावरून परत येताना, स्त्री किंवा पुरुष यापैकी एक जण असे अन्न पदार्थ, जवळच्या फूडकोर्टस मधून घेऊन येतात. घरी पोचल्याबरोबर सर्व कुटुंब त्या ताज्या व गरम जेवणाचा आस्वाद घेते व अन्न ज्या डब्यांच्यातून आणलेले असते ते डबे कचर्‍याच्या डब्यात फेकून देते. घरातल्या सर्वात वेळखाऊ कामाचा असा निकाल लागल्याने, सिंगापुरी कुटुंबे इतर अनेक ऍक्टिव्हिटी एन्जॉय करू शकतात व मुलांच्याबरोबर आधिक जास्त व चांगला वेळ घालवू शकतात. एकटे रहाणारे लोक या फूडकोर्टसमधेच जेवतात व घरी जातात.

सिंगापूरभर पसरलेली ही फूडकोर्टस म्हणजे एक मोठा उद्योगच बनला आहे. हजारो लोकांना यातून काम मिळते व त्यांचा चरितार्थ या कामावरच चालतो. विशेषत: निवृत्त ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी काही ना काही काम करू शकतात. व त्यांनाही हक्काचे चार पैसे मिळवण्याची सोय होते.

अशा प्रकारची फूडकोर्टस, भारतातील शहरांच्यात जर तयार झाली तर भारतातील स्त्रियांना केवढी सुविधा मिळू शकेल याची कल्पनाच फक्त करता येते. अक्षरश: लाखो लोकांना या उद्योगातून कामधंदा व रोजगार मिळू शकेल आणि मुख्य म्हणजे असंख्य नोकरी धंदा करणार्‍या भारतीय स्त्रियांची, रोजच्या रांधा, वाढा या स्वैपाकाच्या कामातून सुटका होईल. त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य जास्त सुखकर बनेल.

भारतीय स्त्रियांसाठी हे खरेखुरे स्वातंत्र्य असेल. स्वैपाकापासूनचे स्वातंत्र्य.

8 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “खरी स्त्री मुक्ती

 1. कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी उपलब्ध असणाय्रा पोळी भाजी केंद्रांचा उल्लेख या बाबतीत महत्वाचा ठरतो.
  ह्या पोळी भाजी केंद्रात वाजवी किमतीत पोळ्या, भाजी, भात, आमटी येथे उपलब्ध असते. आपल्या आवडीप्रमाणे हवी ती भाजी घेउ शकतो. ( ३-४ भाज्या रोज तयार असतात). दर्जा चांगला असतो. जास्त तेल, मसाला नसतो. थोडक्यात घरगुती स्वरूपाचे जेवण असते.

  अनिकेत वैद्य.

  Posted by अनिकेत वैद्य | सप्टेंबर 8, 2009, 5:24 pm
  • चांगला उपक्रम आहे परंतु फार स्थानिक स्वरूपाचा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर असे प्रयत्न होणे आवश्यक आहे.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 8, 2009, 5:40 pm
 2. What you are saying is absolutely correct.

  Posted by blossomagain | सप्टेंबर 16, 2009, 11:09 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: