.
Science

एक आगळावेगळा वाढदिवस


मागच्या आठवड्यात म्हणजे बरोबर 25 ऑगस्टला, जगभरातील शास्त्रज्ञांनी व शास्त्रविषयाबद्दल रुची असलेल्या लोकांनी, एक आगळावेगळाच वाढदिवस साजरा केला. हा होता जगातल्या पहिल्या दूरादर्शाचा किंवा दुर्बिणीचा, 400 वा वाढदिवस. प्रख्यात इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली याने इ.स. 1609 मधे त्याची प्रख्यात व क्रांतीकारी दुर्बिण तयार केली होती व या दुर्बिणीचे पहिले सार्वजनिक प्रात्यक्षिक त्याने 25 ऑगस्ट 1609 मधे केले होते. या प्रात्यक्षिकाला 400 वर्षे पूर्ण होत आहेत हे जगभरच्या लोकांच्या नजरेसमोर आणण्याचे बरेच श्रेय गूगल या संस्थेला जाते.

telescope

गॅलिलिओची ही दुर्बिण, एखाद्या बारीकशा व लालसर ब्राउन रंगाच्या काठीसारखी दिसत होती. य़ा दुर्बिणीतून दिसणारी प्रतिमा उलटी न दिसता सरळच दिसत असे व तिचे मॅग्निफिकेशन, फक्त 8 पट एवढेच होते. सध्या कोणत्याही छंदविषयक दुकानात, मुलांसाठी विकत मिळणार्‍या दुर्बिणींचे मॅग्निफिकेशन याहून बरेच जास्त असते. तरीही या दुर्बिणीने  केलेल्या निरिक्षणांच्यामुळे, थोड्याच दिवसात, पूर्वी कधी कल्पनाही करता आली नसती अशी कितीतरी नवीन माहिती मिळवण्यात गॅलिलिओ यशस्वी ठरला. चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले खाचखळगे, गुरूचे चंद्र, याचे त्याने निरिक्षण केले.

Reconstruction-of-Galileo-001

त्या वेळी, पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी असून सूर्य व बाकी ग्रह तारे पृथ्वीभोवती फिरतात अशी समजूत होती. गॅलिलिओला, शुक्राला, चंद्राप्रमाणेच कला आहेत असे निरिक्षण केल्यावर आढळून आले. जर सूर्य आणि शुक्र दोन्ही पृथ्वीभोवती फिरत असले तर हे शक्य नव्हते. यामुळे गॅलिलिओचे मतपरिवर्तन झाले व सूर्याभोवती पृथ्वीसह सर्व ग्रह फिरत असले पाहिजेत या कोपर्निकस या शास्त्रज्ञाने मांडलेल्या अनुमानाला, तो आला. त्याचे अनुमान कॅथॉलिक चर्चच्या अधिकृत अनुमानाच्या विरूद्ध असल्याने तो पाखंडी ठरला.

galileo

गॅलिलिओचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 ला, इटलीमधील पिसा या गावाजवळ झाला. त्याचे वडील संगीतकार होते. प्रथम त्याने वैद्यकीय अभ्यासक्रम निवडला होता परंतु नंतर त्याने गणित व तत्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला व इ.स. 1589मधे पिसा विद्यापीठात तो गणिताचा प्राध्यापक बनला. 1592 ते 1610 या कालात तो पादुआ विद्यापीठात गणिताचा प्राध्यापक होता. या कालातच भौतिकीमधले, यांत्रिकी, लंबक आणि वस्तूंचे अनियंत्रित पतन या संबंधींचे त्याचे अतिशय प्रसिद्ध असे प्रयोग त्याने केले.

इ.स.1614 पासून कॅथॉलिक चर्चने, गॅलिलिओला त्याचे पाखंडी विचार मांडण्यास मनाई केली होती. तरीही त्याने ‘जगाच्या बांधणीचे दोन सिद्धांत’ या नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकात गॅलिलिओने, कोपर्निकसचा सिद्धांत कसा जास्त योग्य वाटतो हे अप्रत्यक्षरित्या सूचित केले होते. स्वत: पोप, गॅलिलिओचा उत्तम मित्र होता. तरीही त्याला  पकडून आरोपी म्हणून रोमला नेण्यात आले. त्याच्यावर खटला चालवण्यात आला व शेवटी, जगाची बांधणी कशी असणार याच्या बद्दलच्या चर्चच्या अधिकृत विचारांच्या विरुद्ध विचार प्रसिद्ध करण्याबद्दल, 1632 मधे, आयुष्यभराची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली व कोपर्निकसच्या सिद्धांताला असलेला त्याचा पाठीनामा जाहीर रित्या मागे घेउन चर्चच्या अधिकृत विचारांना पाठिंबा देण्यास त्याला भाग पाडले.

मानवाच्या आधुनिक इतिहासात, दोन प्रकारच्या नव्या शोधांच्यामुळे क्रांतीकारक बदल घडून आले असे मानले जाते. त्यापैकी एक प्रकार म्हणजे शास्त्रज्ञांनी लावलेल्या नवीन संकल्पनांचाच शोध. कोपर्निकस, न्यूटन, डार्विन, फ्रॉइड, मॅक्सवेल आणि आइनस्टाईन या शास्त्रज्ञांची नावे अशा प्रकारच्या संशोधित संकल्पनांचे जनक म्हणून घेता येते. दुसर्‍या प्रकारचे शोध हे कोणतेतरी नवीन उपकरण विकसित करून त्याचा वापर करून लावलेले आहेत. या उपकरणांची उदाहरणे द्यायची म्हटली, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, एक्स-रे ट्यूब, ट्रांझिस्टर अशी काही नावे सहज डोळ्यासमोर येतात. या प्रकारच्या शोधात, गॅलिलिओची दुर्बीण हे सर्वप्रथम विकसित झालेले उपकरण असे मानता येईल. य़ा दुर्बिणीच्या शोधाने, मानवाला एक दिव्य चक्षूच मिळाल्यासारखे झाले. म्हणूनच गॅलिलिओच्या दुर्बिणीच्या शोधाला अनन्यसाधारण महत्व आहे.

3 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “एक आगळावेगळा वाढदिवस

  1. १९९२ च्या सुमारास तत्कालीन पोपने गॅलिलिओ गॅलिलीचे शोध बरोबर असल्याची कबुली दिली; त्यातही माझ्या आठवणीनुसार त्याला क्षमा केल्याचा आव होता. या घटनेवर गोविंदराव तळवलकरांनी महाराष्ट्र टाइम्समधे एक खुसखुशीत अग्रलेख लिहिला होता.

    १६४२ साली सुरवातीला गॅलिलिओचा मृत्यु झाला, आणि जुन्या कालगणनेनुसार त्याच वर्षी २५ डिसेंबरला इंग्लंडमधे न्यूटनचा जन्म झाला. गॅलिलिओची शेवटची वर्षे चर्चच्या दडपशाहीपुढे नाइलाजाची गेलीत. वस्ताद न्यूटननी शेवटची ३०-४० वर्षं विशेष शोधकार्य न करण्यात, चमच्यांकडून किंवा स्वतःच टोपणनावांनी स्वतःचीच स्तुती करण्यात, आणि इतर काही शास्त्रज्ञांवर खरीखोटी टीका करण्यात घालवली, हा मजेदार योगायोग आहे.

    Posted by Anonymous | सप्टेंबर 3, 2009, 3:04 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: