.
अनुभव Experiences

साठवणीतले स्वर


एकोणिसशे सहासष्ट सदुसष्ट मधली गोष्ट आहे. मी नुकतीच पदवी परिक्षा उत्तीर्ण झालो होतो व नोकरीच्या शोधात होतो. माझे वडील, त्यावेळी संपूर्ण भारतीय बनावटीच्या टेप रेकॉर्डर्सचे उत्पादन, स्वत:च्या कारखान्यात करत असत. मला बाकीचा काहीच उद्योग नसल्याने, वडीलांच्या कारखान्यात जाऊन त्यांना काही मदत करणे शक्य असल्यास, मी करत असे. एक दिवस असाच मी कारखान्यात गेलो असताना, वडील मला म्हणाले की तू थांबशील का? मास्टर कृष्णराव येणार आहेत. आता या सुप्रसिद्ध गायक व संगीतकाराचे माझ्या वडीलांकडे काय काम असावे बरे? या कुतुहलाने मी थांबलो. जरा वेळाने मास्टर कृष्णराव एक अत्यंत जुनाट व धुळीने भरलेली लाकडी पेटी व पुठ्याच्या दोन्ही बाजूंनी बंद असलेल्या सात आठ नळ्या घेउन आले. त्या नळ्यांच्या आत मेणाच्या नळ्या होत्या. त्या आम्हाला दाखवून, “अबदुल करीम खानसाहेब यांच्या गायनाचे अतिशय दुर्मिळ असे साठवण त्या नळ्यांच्यावर आहे. पण आता ते नीट ऐकू येत नाही” त्यामुळे आम्ही काही करू शकतो का? हे बघण्यासाठी मास्टर कृष्णराव आले होते.

जगाच्या इतिहासात प्रथम, ज्यात स्वरांची साठवण करता येईल असा, मेणाच्या नळीचा फोनोग्राफ, थॉमस एडिसन या सुप्रसिद्ध संशोधकाने मध्ये तयार केला होता. त्याच्याच आराखड्यावर आधारित असे हे यंत्र, मास्टर कृष्णराव घेऊन आले होते व मला केवळ नशिबानेच ते बघायला मिळाले होते.

edison phono

थॉमस एडिसनने प्रथम 1877 मध्ये हा फोनो संशोधित केला होता परंतु त्याचे व्यापारी उत्पादन चालू होण्यास तब्बल 10 वर्षे लागली. या फोनोमध्ये दोन्ही बाजूंना बेअरिंग्स बसविलेल्या एका लोखंडी रॉडवर एक धातूचाच सिलिंडर बसवण्यात आलेला असे. हा धातूचा सिलिंडर, घड्याळ्याच्या स्प्रिंगसारख्या एका यंत्रणेने, त्या स्प्रिंगला किल्ली दिल्यावर, एका ठाराविक गतीने फिरत रहात असे. या धातूच्या सिलिंडरवर एक पुठ्याची नळी सरकवून बसवता येईल अशी सोय केलेली असे. पुठ्याच्या या नळीवर मेण आणि इतर काही रसायने यापासून बनवलेल्या एका रसायनाचा पातळ लेप दिलेला असे. या मेणाच्या लेपाला जेमतेम स्पर्श करत नळीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत सरकत जाईल अशी एक लोखंडी सुई बसवण्यात आलेली असे. या सुईची आंदोलने ऐकू येण्यासाठी त्याच्यापुढे एक कर्णा लावलेला असे.

कोणत्याही आवाजाचे रेखन करण्यासाठी प्रथम सुई, पुठ्याच्या नळीच्या एका टोकाला नेऊन ठेवली जात असे. यानंतर किल्ली देऊन, फोनोचा सिलिंडर फिरता व त्यावर सुई हळू हळू सरकती ठेवण्यात येई. रेखन करण्याचा आवाज, उदा. गाणे, कर्ण्यासमोर म्हणले, की आवाज लहरींमुळे, सुई आंदोलित होत असे. या आंदोलनांमुळे व सिलिंडर आणि सुई यांच्या एका विविक्षित गतीच्या फिरण्या-सरकण्यामुळे, एक सर्पिल (हेलिकल) आकाराचा ओरखडा मेणाच्या लेपावर उठत जाई.

wax roles

हा आवाज परत ऐकण्यासाठी सुई परत मूळच्या जागी आणून फोनो चालू केला की सुई मेणाच्या लेपावरील ओरखड्यातून फिरताना आंदोलित होई व ती आंदोलने आवाजाच्या स्वरूपात कर्ण्यातून ऐकू येत. त्या काळात, कोणत्याही आवाजाचे पुनरुत्पादन, हे अक्षरश: जादूसारखे लोकांना वाटत असे.

या फोनोला प्राथमिक स्वरूपाच्याच खूप अडचणी होत्या. थोड्या वापरानंतर मेणाचा लेप मऊ होत असे. त्यामुळे आवाज फाटू लागे. ओरखड्यात धूळ जाऊन बसल्याने खरखर ऐकू येई. एम.पी 3 च्या आजच्या जमान्यात हा फोनो म्हणजे एक खेळणे वाटेल कदाचित. पण त्या काळात हे एक आश्चर्य होते.

मास्टर कृष्णरावांनी मग फोनो आम्हाला चालू करून दाखवला. मेणाच्या नळीची रेकॉर्ड वापराने पूर्ण झिजली होती. त्यामुळे अब्दुल करीम खानसाहेबांचा आवाज ऐकू येणार्‍या इतर खरखरीत लपूनच जात होता. फारसे काही करण्याजोगे नसल्याने आम्हाला मास्टर कृष्णरावांची निराशाच करावी लागली होती.

मला मात्र मास्टर कृष्णरावांची भेट झाली व अब्दुल करीम खान साहेबांचे स्वर खरखरीसह का होईना कानावर पडले याचेच अप्रूप, खूप दिवस वाटत राहिले.

21 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “साठवणीतले स्वर

 1. तंत्रात कितीही बदला झाला तरी मुळ शोधाचे महत्व अनन्यसाधारण आहे. असा फॉनो होता हे सुद्धा मला माहीत नव्हत. आभारी.

  Posted by Narendra | सप्टेंबर 2, 2009, 1:45 pm
 2. The first record in India was made in 1901. Between 1905 and 1907, Abdul Karim Khan Saheb recorded quite a few 78 rpm discs; a compilation of them was issued on a CD sometime within last 20 years. After this activity, Abdul Karim did not record anything until (I think) 1933. The recordings he made from 1933 up to his death in 1937 were later re-issued on LP(s) and cassettes, and have been easily available to those who seek. It is these later-day records which hypnotised the young Bhimsen, prompting him to run away from home to study classical music. Khan Saheb’s earliest recordings were not easily available until they were released on CD.

  As a young man, Master Krishnarao had this reputation of being irrepressibly impish with his elders. How was your experience with him?

  Posted by Anonymous | सप्टेंबर 2, 2009, 3:20 pm
 3. खरेच तुम्ही भाग्यवान. खूपच इंटरेस्टींग माहीती दिलीत.

  Posted by bhaanasa | सप्टेंबर 21, 2009, 4:52 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: