.
ताज्या घडामोडी Current Affairs

विश्वास उद्याबद्दलचा


माणूस आशेवर जगत असतो असे म्हणतात. त्याची सद्यस्थितीतली परिस्थिती कशी का असेना जर त्याला ती उद्या नक्की बदलेल अशी आशा वाटत असली तर तो आजच्या कितीही निराशाजनक परिस्थितीत, उत्साही असतो व उद्याची वाट पहात रहातो.

हे आशेवर जगणे देश, काल व परिस्थितीची तमा न बाळगता सर्व मानवजातीसाठी समानच असणार अशी निदान माझी तरी आजपर्यंत समजूत होती. ए.सी.नीलसन या कंपनीने जगभरच्या ग्राहकांपर्यंत पोचून एक पाहणी नुकतीच केली. या पाहणीचे निष्कर्ष मोठे इंटरेस्टिंग व विचारांना चालना देतील असे आहेत. जगातील 281 देशांमधे केलेल्या या पाहणीप्रमाणे, भारतातील ग्राहक, उद्याबद्दल सर्वात जास्त आत्मविश्वास असलेल्या, पहिल्या दोन देशात आहेत. इंडोनेशिया मधल्या ग्राहकांना उद्याबद्दल जगात सर्वात जास्त आत्मविश्वास आहे व त्याच्या खालोखाल भारतातील ग्राहकांना आहे. यानंतर फिलिपाइन्स, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया, चीन, अरब अमिराती आणि कॅनडा यांचा क्रमांक लागतो. या पाहणीनुसार 66 % भारतीयांनी पुढच्या एक वर्षात, भारतातील आर्थिक परिस्थिती परत पूर्ववत होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. याच कंपनीने मार्च महिन्यात अशीच पाहणी केली होती. त्या पाहणीपेक्षा आज भारतीय ग्राहकांचा आत्माविश्वास 13 टक्क्यांनी तरी वाढलेला दिसतो आहे. तैवान, तुर्कस्तान, फ्रान्स, जपान व कोरिया या देशातले लोक सगळ्यात कमी आशावादी दिसतात.

Untitled

तसे बघायला गेले तर इंडोनेशिया आणि भारत या दोन्ही देशात बरीच साम्ये आहेत. इंडोनेशियात पूर्वी जरी हुकुमशाही असली तरी आता हा देश भारताप्रमाणेच, दक्षिण पूर्व एशियामधे, लोकशाहीचा एक खंदा पुरस्कर्ता बनला आहे. दोन्ही देशांची लोकसंख्या अफाट आहे आणि ती वाढते आहे. बहुसंख्य जनता गरीब, अशिक्षित आणि शेतीवर पोट भरणारी आहे. दोन्ही देशांना अतिरेक्यांची समस्या सारख्याच प्रमाणात भेडसावते आहे. तरी सुद्धा हे दोन देश भविष्याबद्दल सर्वात जास्त आशावादी आहेत ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणखी एक महत्वाचे साम्य म्हणजे या दोन्ही देशांत, नुकत्याच निवडणूका होऊन लोकप्रिय शासने सत्तेवर आली आहेत.

भारताबद्दल बोलायचे, तर मार्च आणि जून या कालात भारतीयांच्या आत्मविश्वासात एवढा फरक पडण्याची दोन कारणे मला दिसतात. एक तर, मे महिन्यामधे झालेल्या निवडणुकीमध्ये, श्री. मनमोहनसिंह यांचे सरकार परत निवडून आल्याने खूपच भारतीयांनी अक्षरश: सुटकेचा निश्वास टाकला होता. त्याच्या आधीच्या कालात, जे विषय देशाच्या सरळ सरळ हिताचे दिसत होते. (उदा.न्यूक्लियर डील, एसियान बरोबरचा मुक्त व्यापार करार) त्या विषयांना केवळ पक्षीय राजकारण म्हणून ज्या पक्षांनी विरोध केला होता, त्यांच्या या र्‍हस्व दृष्टीला, खरे म्हणजे सर्वच जण कंटाळले होते. या सर्व मंडळींना मतदारांनी जवळपास दाराबाहेरच केल्याने आणि श्री. मनमोहनसिंह यांच्याबद्दल पूर्ण खात्री असल्याचे मतांद्वारे दर्शविल्यामुळे भारतीय नागरिकांचा उद्याबद्दलचा आत्मविश्वास दृढ झाला असावा. देशातली शेअर मार्केट्स ही नेहमीच जनमानसाच्या एकत्रित भावना सूचित करत असतात. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याक्षणी शेअर मार्केट्सनी अकल्पनीय अशी उसळी घेतली होती. ही उसळी या आत्मविश्वासाचेच द्योतक होते.

दुसरे एक महत्वाचे कारण म्हणजे श्री. मनमोहनसिंह यांनी, बहुतांशी अतिशय लायक अशा लोकांची, मंत्रीपदी केलेली नियुक्ती. राजकारणातील अपरिहार्यता म्हणून पूर्वी कराव्या लागलेल्या काही नियुक्त्या, ही मंडळी निवडूनच न आल्याने आपोआपच रद्दबादल झाल्या. त्यामुळे, ज्यांची जागा खरे म्हणजे राजकारणाच्या बाहेरच आहे, अशा काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या मंडळींना दिलेली मंत्रीपदे सोडली, तर बाकी महत्वाच्या जागा, काहीतरी करून दाखवतील, अशा लोकांच्या हातात गेल्यासारखे दिसते तरी आहे.

हे सगळी मंडळी, त्यांच्याबद्दल भारतीयांनी दाखवलेल्या या विश्वासाला जागतील अशी आशा आपण करू शकतो असे मला वाटते. या लोकांनी सुरवात चांगली केल्याचे दिसते. परंतु घोषणा केलेल्या योजना, जर त्यांनी पुढच्या दोन चार महिन्यात कार्यवाहीत आणल्या नाहीत तर जनसामान्यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला नक्कीच तडा जाईल. दुर्दैवाने असे जर घडले तर नीलसन कंपनीच्या पुढच्या पाहणीत, भारत कदाचित   उद्याबद्दल कमीतकमी आत्मविश्वास असलेला देश म्हणून शेवटच्या क्रमांकावरही जाऊ शकतो.

27 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: