.
अनुभव Experiences

रिकामटेकडेपणाची कला


काही दिवसांपूर्वी, माझ्या पत्नीने एक दिवसासाठी मुंबईला जाऊन येण्याचे ठरवले होते. सकाळी सातच्या सुमारास निघणार्‍या ‘दख:नची राणी’ किंवा डेक्कन क्वीनने निघून त्याच दिवशी, त्याच गाडीने, रात्री परतण्याचा तिचा बेत होता. दिवसाभरासाठी मी घरात एकटाच असणार या विचाराने तिने मला चार पाच तरी तुंबलेली कामे, मी करू शकतो असे सुचवून बघितले होते. आणि चार चौघांसारखा मी पण अत्यंत आज्ञाधारक नवरा असल्याने, ती सर्व कामे मी नक्की पूर्ण करून टाकीन याचे मी तिला आश्वासनही दिले होते. मी तिला सकाळी स्टेशनवर सोडून आलो व माझ्या डेली रूटिनला सुरवात केली. रात्री अर्थातच तिला घेण्यासाठी मी परत स्टेशनवर गेलो. घरी परत आल्यावर माझा दिवस कसा गेला? असे विचारायला ती विसरली नाही. माझा दिवस अत्यंत छान गेला व मला अजिबात कंटाळा आला नाही हे माझे (पूर्ण सत्य असलेले) उत्तर ऐकून ती सुखावली असावी.

दुसर्‍या दिवशी सकाळी जेंव्हा माझ्या पत्नीच्या लक्षात आले की तिने सुचवून ठेवलेल्या कोणत्याही कामाला मी हातही लावलेला नाही, तेंव्हा तिची अशी समजूत होणे साहजिकच होते की काल मला बहुदा खूपच कंटाळा आलेला असणार आणि त्यामुळे मी माझा वेळ एकाकी निष्क्रियतेत घालवला असणार. मला तिला पटवून द्यायला जरा वेळ लागला पण शेवटी तिला पटले की मी माझे रिकामटेकडेपणाने रहाण्याचे कौशल्य आता पूर्ण विकसित केले आहे आणि मला काल दिवसभर, अजिबात म्हणजे अजिबातच कंटाळा आलेला नाही.

माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझे काही नातेवाईक व मित्र, अजूनही स्वत:ला कार्यरत ठेवण्यासाठी कामाला जातात. काही बारीक-सारीक आजार किंवा इतर कारणांनी ते कामाला जाऊ शकले नाहीत तर ते प्रचंड अस्वस्थ होतात व आपण कधी एकदा परत कामावर जातो असे त्यांना होते. माझ्या मते हे लोक जेंव्हा कामाच्या जागी असतात तेंव्हा त्यांना एक प्रकारचा मानसिक आधार वाटत रहातो. कामावर जाता आले नाही की हा आधार सुटतो व त्यांना अतिशय असुरक्षित वाटू लागते. कामाच्या जागी ते ‘कोणीतरी’ असतात व कामामुळे त्यांना एक ओळख असते.

आपल्या सगळ्यांच्याच मनात, या बाबतीतला एक मानसिक अडथळा किंवा विवेकाची एक टोचणी असते. आपण कामावर न जाता नुसते लोळत पडलो की ती आपल्याला सारखी टोचत रहाते. तरूणपणी या टोचणीमुळेच आपण स्वत:साठी अनेक ध्येये ठरवतो व ती गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत रहातो. जसजसे वय वाढत जाते आणि आपण वरिष्ठ नागरित्वाची वाटचाल करायला लागतो तसतशी ही टोचणी नवीन काहीतरी करण्याची उमेद न रहाता, मनाची शांतता आणि तरलता यांच्यासाठी, एखाद्या सतत गूं गूं करणार्‍या डासासारखी, क्लेशदायक बनू लागते. ‘रिकामटेकडेपणाची कला’ आत्मसात करण्यासाठी, प्रथम या मानसिक टोचणीवर ताबा मिळवणे, अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण कामाला गेलो नाही किंवा काहीही काम केले नाही तरी आभाळ कोसळून पडण्याची सुतराम शक्यता  नाही. किंवा जगाचा अंतही होणार नाही. आपण कोणीच एवढे महत्वाचे नाही.

आपण रिकामटेकडे बसलेले असतो तेंव्हाची आपली मानसिकता ही सर्वात महत्वाची आहे. या वेळी जर आपण असा विचार करायला लागलो की आळशीपणाने असा वेळ घालवण्यामुळे आपण आयुष्यांतल्या केवढ्या सुसंधी वाया घालवत आहोत, तर आपला मनक्षोभ नक्कीच वाढल्याशिवाय रहाणार नाही आणि आपल्याला चैनच पडणार नाही. ‘रिकामटेकडेपणाची कला’ आत्मसात करण्याचा प्रयत्न करण्याचे मुख्य कारण, आपले मानसिक आरोग्य वाढवणे हे आहे, त्याला हानी पोचवणे हे नाही. अर्थातच या रिकामटेकडेपणाच्या वेळात आपण टी.व्ही. बघणे, विणकाम करणे या सारखी कोणतीही गोष्ट करता कामा नये. खरे म्हणजे तर, आदर्श परिस्थितीत, आपली विचार-शृंखलाही या वेळात पूर्ण खंडित होणे हे सर्वात उत्तम. परंतु हे एखाद्या योग्यालाच जमू शकेल. सर्वसामान्यांचे ते काम नोहे.

एकदा आपण ही अपराधित्वाची भावना मनातून काढून टाकण्यात यशस्वी ठरलो की पुढची क्रमप्राप्त पायरी गाठण्याला सुरवात करता येते. आता कोणत्यातरी अशा विषयावर आपले विचार केंद्रित करावेत ज्याबद्दल आपल्याला काही मत नाही रस नाही व आपल्याला त्या विषयाबद्दल काही भावनाही नाहीत. उदाहरणार्थ, अलीकडे शहरांच्यातून चिमण्या दिसत नाहीत पण कावळे मात्र दिसतात हा विषय. ज्या गोष्टींविषयी आपल्याला काहीतरी मत आहे किंवा तीव्र भावना आहेत असे सर्व विषय मनातून काढून टाकण्यासाठी ही पायरी महत्वाची आहे. जर तुम्ही क्लिष्ट विषय निवडलात तर तुम्हाला झोप लागण्याची शक्यता असते. ती टाळणे हे तर या कलेत फारच महत्वपूर्ण आहे कारण झोप म्हणजे सुद्धा काहीतरी करणेच असते. या कलेतला तज्ञ रिकामटेकडा व शिकाऊ उमेदवार, यांच्यातला मुख्य फरक, त्यांची असा योग्य विषय शोधून काढण्यातली कुशलता, हाच असतो.

एकदा आपण या पायरीला पोचलो की यानंतरची पायरी अतिशय महत्वाची व सर्वात अवघड अशी आहे. आता मनात दुसरा कोणताही विचार न येऊ देता फक्त आपण आधी ठरवलेल्या विषयावरच मन विचार करत राहील असे बघणे आवश्यक असते. हे एकदा साध्य झाले की या विषयावर विचार करून करून मन कंटाळते व थकते. अशा वेळी मनाला एक तरल निष्क्रियता येते. ही आली की रिकामटेकडेपणाची कला आत्मसात झाली असे म्हणता येईल कारण आपण या स्थितीत कितीही काळ राहू शकतो.

ही कला आत्मसात झाली की लक्षात येते की आपल्या आयुष्याचे संदर्भच बदलू लागले आहेत. इतके दिवस आपल्याला हवेच असलेले अमुक 5 स्टार हॉटेलातील जेवण किंवा हवाच असलेला तमुक ब्रॅंडचा शर्ट या गोष्टी खरे तर अगदी निरर्थक आणि निष्कारण आहेत हे लक्षात येऊ लागते. पै पैशाच्या मागे आपले धावणे किती अनावश्यक आहे हे ही उमजू लागते. आपल्या आजूबाजूला असलेला निसर्ग, झाडे, फुले, सूर्योदय, सूर्यास्त, पाऊस, मोकळेपणी व खळाळून हसणारी मुले या सारख्या असंख्य गोष्टी आपण फक्त त्यांना दाद द्यावी म्हणून वाट बघत आहेत हेही लक्षात येते. आपण लहान असताना, आपल्याला हव्या असलेल्या, पण आपण त्या कधीच करू न शकलेल्या असंख्य गोष्टी आपली अजूनही वाट बघत आहेत याची जाणीव होते. रोजची घरगुती कामे पण कंटाळवाणी वाटेनाशी होतात कारण नंतरच्या काळात, रिकामटेकडेपणाचे सोनेरी क्षण, आपली वाट बघत असतात.

आयुष्याचे उरले सुरले क्षण जर मजेत व आनंदात घालवायचे असतील तर त्याच्यासाठी मनाची शांतता असायलाच हवी. ती मिळवण्याचा सोपा उपाय आहे ‘रिकामटेकडेपणाची कला’ आत्मसात करणे.

26 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “रिकामटेकडेपणाची कला

 1. छान, काहीही नं करता येणं ही सुध्दा एक कलाच आहे नाही का 🙂

  Posted by अनिकेत | ऑगस्ट 26, 2009, 11:49 सकाळी
 2. कामसू स्वभाव आणि मोठ्या कंपनींचा शिक्का असलेले अनावश्यक कपडे यांचा तसा परस्पर संबंध नाही. निदान कष्ट करणारे लोक पैसा तरी उधळू शकतात. कामचुकारपणा करायचा आणि लालसा बाळगायची हे सर्वात धोकेदायक प्रकरण आणि त्याची पीडा अनेकांना होते.

  भलत्याच विषयात रस घेता येतो आणि तिथे थकल्यावर एरवीचे विषय न आठवता मनाला ‘तरल निष्क्रियता येते’ हे पटत नाही बघा.

  निरिच्छ वृत्तीचे फायदे असतात आणि थोडाफार आळस करायला हरकत नसते, हे मात्र अगदी मंजूर आहे.

  Posted by Anonymous | ऑगस्ट 26, 2009, 12:00 pm
  • माझा लेख वरिष्ठ नागरिकांसाठी आहे. तरूणांसाठी नाही. त्यांनी तर सर्व गोष्टींचा हव्यास करायलाच हवा. त्या शिवाय त्यांची आयुष्यांत प्रगति कशी होईल? प्रतिसादाबद्दल धन्यवाद

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 26, 2009, 12:03 pm
 3. आवडला!

  Posted by आल्हाद alias Alhad | ऑगस्ट 29, 2009, 2:29 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: