.
Environment-पर्यावरण

पुढे काय? नॅनो का रेवा


भारतातल्या कोणालाही, जर सध्याची भारतातली सर्वात हॉट किंवा प्रसिद्धीच्या झोतात असलेली मोटर कार कोणती? असा प्रश्न विचारला तर हजारापैकी नउशे नव्याण्ण्व लोक अर्थातच नॅनो असे उत्तर देतील. य़ाला अर्थातच मुख्यत: नॅनोची किंमत हे कारण आहेच. या शिवाय नॅनो, दिसायलाही मोठी छान आहे आणि तंत्रज्ञान वगैरे एकदम लेटेस्ट आहे,  ही कारणे आहेतच. हे सगळे जरी खरे असले तरी शेवटी, नॅनो एक पेट्रोलवरच चालणारे वहान आहे. म्हणजे एकतर पेट्रोलच्या किंमतीवरच नॅनो चालवण्याचा खर्च अवलंबून रहाणार व पर्यावरणाच्या दृष्टीने नॅनो चालवणे केव्हांही हानीकारकच आहे. जरा जास्त लांबच्या काळाचा विचार केला तर पेट्रोलपेक्षा विद्युतशक्तीवर चालणारी मोटरकार हेच वाहन  केंव्हाही जास्त योग्य ठरणार आहे यात शंकाच नाही.

reva-e-car

गेली काही वर्षे बंगलोरला बनत असलेली ‘रेवा’ ही बॅटरीवर चालणारी मोटरकार आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु ही कार लोकप्रिय आहे असे अजिबातच म्हणता येणार नाही. या उलट ही कार परदेशात, जिथे मोटरकार्सची असंख्य मॉडेल्स उपलब्ध आहेत, तिथे बर्‍यापैकी विकली जाते. हे वाचून तुम्हाला कदाचित माझ्याप्रमाणेच आश्चर्य वाटले असेल. पण या लोकप्रियतेला कारणेही आहेत. आतापर्यंत उत्पादन झालेल्या 3000 रेवा गाड्यांपैकी 1000 रेवा फक्त लंडनमधेच आहेत. ही गाडी घेउन तुम्ही मध्यवर्ती लंडनमधे गेलात तर दुसर्‍या वाहनांना पडणारा 11 डॉलर्सचा दंड भरावा लागत नाही. फ्रेन्च सरकार ही गाडी घेण्यासाठी 3000 युरो अनुदान देते. नॉर्वे मधे या गाडीवरचा आयात कर माफ केला गेलेला आहे आणि या गाड्या बस लेनमधे चालवण्यास परवानगी आहे.

RevaMarbleGatesUK_550x413

काही तांत्रिक बाबींची पूर्तता होऊ शकत नसल्याने ही गाडी अजून अमेरिकेत विकली जाऊ शकत नाही. परंतु या बाबतीतले काही नियम आणि कायदेकानू बदलले गेले तर रेवा अमेरिकेतही लोकप्रिय होईल याबद्दल रेवाच्या उत्पादकांना तरी शंका वाटत नाही. अमेरिकेत 2010 साली येणारी ‘व्होल्ट’ ही विद्युतशक्तीवर चालणारी गाडी 40000 डॉलर्सना विकली जाईल असा अंदाज आहे. रेवाची किंमत 6000 डॉलर्सपेक्षा जास्त होत नाही. या कारणांमुळेच, परदेशात लोकप्रिय होत असलेली ही गाडी भारतात का विकली जात नाही? असा प्रश्न कोणासही पडेल. बंगलोरमधेच, रेवा उत्पादनासाठी एक नवीन फॅक्टरी उत्पादकांनी बांधली असून ती पूर्ण झाली की रेवाचे वार्षिक उत्पादन 30000 गाड्यांपर्यंत जाईल. यापैकी निम्मे उत्पादन भारतात विकण्याचा त्यांचा जरी मानस असला तरी ते कितपत साध्य होईल याबद्दल मला तरी शंका वाटते.

GoinGreen-gwiz

याचे प्रमुख कारण म्हणजे रेवाची किंमत. सध्या रेवाची सर्वात कमीतकमी किंमत दिल्लीला तीन लाख रुपये एवढी आहे. एवढी किंमत देऊन, ही छोटी कार किती लोक घ्यायला तयार होतील हे सांगणे कठिणच दिसते. या शिवाय रेवामधली बॅटरी चार्ज करण्यासाठी 7 तास लागतात. अपार्टमेंट्समधे रहाणार्‍या लोकांना, जे मुख्यत: आपली गाडी रस्त्यावरच ठेवतात, हे कसे काय शक्य होऊ शकेल? रेवाच्या येणार्‍या नवीन मॉडेल्समधे, लिथियम-आयॉन ही अत्यंत आधुनिक बॅटरी वापरली जाणार आहे त्यामुळे या गाडीची किंमत 7 लाखापर्यंत जाईल असे वाटते. यानंतर किती भारतीय ही गाडी घ्यायला तयार होतील हे सांगणे फारसे कठिण नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी बॅटर्‍या ग्राहकाला विकण्याच्या ऐवजी भाडेतत्वावर देण्याची उत्पादकांची कल्पना आहे.

reva-4-seater-interior

पर्यावरणाच्या आणि पेट्रोल उपलब्धतेच्या दृष्टीने जितक्या रेवा गाड्या भारतीय रस्त्यांवर किंवा कमीत कमी शहरांच्यातल्या रस्त्यांवर धावतील तेवढे चांगलेच आहे. ते करण्यासाठी कदाचित आपल्याला पोर्तुगीज सरकारचे अनुकरण करणे आवश्यक होणार आहे.

पोर्तुगालमधे लागणारे सर्व पेट्रोल आयात होते त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येतो. यातून मार्ग काढण्यासाठी तिथल्या सरकारने विद्युतशक्तीवर चालणार्‍या मोटरकार्सना प्रोत्साहन द्यावयाचे ठरवले आहे. पुढच्या 2 वर्षात, देशभर गाड्यांच्या बॅटर्‍या चार्ज करता येतील अशी 1300 चार्जिंग स्टेशन्स पोर्तुगालचे सरकार बांधणार आहे. या जागी, 30 मिनिटाच्या एक्सप्रेस चार्जपासून 4 ते 6 तासाच्या साधारण चार्जची सोय असणार आहे. रेनॉ-निसान ही कंपनी पोर्तुगीज सरकारच्या मदतीने 335 मिलियन डॉलर्स एवढी गुंतवणुक करून वर्षाला 60000 लिथियम-आयॉन बॅटर्‍या बनवण्याच्या कारखाना काढत आहे. या बॅटर्‍या वापरणार्‍या गाड्यांना करांच्यातून बरीच माफी मिळेल. पुढच्या दोन ते तीन वर्षात किमान 20 % तरी सार्वजनिक वाहने या बॅटर्‍यांच्यावर चालणारी होतील असे त्या सरकारला वाटते.

पोर्तुगीज सरकारचे अनुकरण करून भारत सरकारने जर या पद्धतीची पावले टाकली तर रेवाच काय नॅनोचेही बॅटरी ऑपरेटेड मॉडेल भारतात येऊ शकते. पुढच्या 50 वर्षांनंतर इंधनाच्या उपलब्धतेची आणि पर्यावरणाची काय परिस्थिती असेल याची कल्पना करून आजच पावले उचलणे गरजेचे आहे.

reva-electric-car-uk-01

भारत छोट्या गाड्यांची जागतिक राजधानी बनण्याच्या मार्गावर आहे असे म्हणले जाते. त्याऐवजी तो छोट्या विद्युतशक्तीसंचलित गाड्यांची राजधानी बनला तर पर्यावरणाच्या दृष्टीने ते कितीतरी जास्त उपयुक्त होईल.

24 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “पुढे काय? नॅनो का रेवा

  1. खुप छान माहिती दिली आहे तुम्ही.

    एव्हढी छोटी गाडी तीन लाखाला भारतात कोण विकत घेणार हा प्रश्नच आहे म्हणा.

    Posted by सतिश गावडे | ऑगस्ट 25, 2009, 1:51 pm
  2. respected sir
    I m a student i read this artical i like it too much i can’t purches this car but i have electric scooter from last 4 year i used it and it is too cheap than other scooters and 0 maintenence

    Posted by mayur | डिसेंबर 4, 2011, 11:01 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: