ही कथा आहे क्लॉडियो करोलो या एका चॉकलेटवेड्या इटालियन माणसाची आणि जगातले सर्वात शुद्ध आणि उत्कृष्ट चॉकलेट बनवण्याच्या त्याच्या ध्यासाची. हा करोलो मूळचा फ्लॉरेन्स इटलीचा. तिथल्याच शेतकी कॉलेजात त्याने शिक्षण घेतले आणि 1974 मधे त्याने एका आंर्तराष्ट्रीय मदत संस्थेतर्फे, आफ्रिकेतल्या कांगो देशामधे चालणार्या, मदत केंद्रात काम करण्यास सुरवात केली. य़ा कामामुळे त्याला संपूर्ण कॉन्गो देश फिरता आला आणि विषुव वृत्तिय जंगलात कसे रहायचे याचे शिक्षणही मिळाले. या मदत कार्यातील मूलभूत विरोधाभास त्याच्या लक्षात आल्यावर त्याने ते काम सोडले व कॉफी उत्पादन करणार्या एका कंपनीत त्याने त्या कंपनीचा मुख्य म्हणून काम केले. या काळात कॉफी उत्पादनाचा चांगलाच अनुभव त्याच्या गाठीशी आला. पण जंगलात जाऊन रहाण्याची त्याची खुमखुमी त्याला स्वस्थ बसू देईना व 1979 मधे ही नोकरी सोडून त्याने स्वत:चा कोंफीचा मळा घेण्याचे ठरवले.
या दरम्यान पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे तो गेला असताना तिथले पोर्तुगीज नेव्हीचे एक म्युझियम बघायला तो गेला. त्या तिथे त्याला एक इतिहासातली छोटीशी घटना समजली. चॉकलेट ज्या कोकोच्या (cacao bean) झाडांच्या बियांपासून बनवतात ते झाड मूळचे ब्राझिल या देशातले. ब्राझिल हा देश पोर्तुगीज वसाहत असल्याने तिथे इ.स. 1800 च्या आधी कोको बियांचे मोठे मळे पोर्तुगीजांनी बनवले होते. 1822 मधे ब्राझिलने स्वातंत्र्य पुकारण्याच्या आधी एक वर्ष, पोर्तुगीज नेव्हीने, ब्राझिलमधली मूळ कोकोची झाडे मोठ्या प्रमाणात ब्राझिलहून हलवून, ‘विषुव वृत्तीय गिनी’ या आफ्रिकेतल्या देशाच्या बरोबर पश्चिमेला असलेल्या ‘साओ तोमे’ (Sao Tome) या छोट्याशा बेटावर आणली होती व तिथे कोकोचे मळे तयार केलेले होते.
कोकोचे फळ
करोलोचे असे मत झाले होते की सध्याची कोको बियांची सर्व झाडे, कमी वेळात जास्तीत जास्त पीक देतील आणि रोग प्रतिबंधक होतील अशी करण्यासाठी त्यांच्या जनुकात मोठे बदल करून हायब्रिड पद्धतीची केली गेली होती. बाकी गुण असले तरी हे सगळे करताना मूळ कोकोचा सुगंध आणि चवच नष्ट झाली होती. करोलोने मग असे ठरवले की साओ तोमे बेटावरची, पोर्तुगीजांनी आणलेली मूळ कोकोचे झाडे आपण शोधून काढायची.
साओ तोमे बेटावर, करोलोने मग एक कॉफीचा मळा खरेदी केला व आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन कॉफीचे उत्पादन चालू केले. एकीकडे मूळ कोकोचे झाड शोधण्याचे त्याचे प्रयत्न साओ तोमे बेटावर चालूच राहिले. मात्र पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा त्याच्या पदरी निराशाच आली. साओ तोमे बेटावरची सर्व कोकोची झाडे हायब्रिडच निघाली.
साओ तोमे बेटच्या दक्षिणेला, 80 मैलावर प्रिन्सिपे (Principe)म्हणून एक आणखी छोटे असलेले बेट आहे. या बेटावर, एका डोंगर उतारावर असलेल्या टेरिरो वेल्हो (Terreiro Velho)या मळ्यावर करोलो गेला होता. 300 एकरचा हा मळा गेली शंभर दीडशे वर्षे तरी कोको उत्पादन करण्यासाठी अजिबात वापरला गेला नसल्याने आता जंगलाच्छादित झाला होता. या मळ्यात, जंगलाच्या मधे, करोलोला तो शोधत असलेले कोकोच्या बियांचे (Forastero amelonado) हे मूळ झाड सापडले. करोलोने मग हा मळाच विकत घेतला. अतिशय परिश्रम करून तिथले जंगल साफ केले व तेथे या झाडाची पद्धतशीर लागवड सुरू केली.
क्लॉडियो करोलो
या झाडाच्या बिया हातात आल्यावर, करोलो जगातले सर्वात शुद्ध व उत्कृष्ट चॉकलेट बनवण्याच्या मागे लागला. करोलोच्या मताप्रमाणे सध्याच्या व्यापारी चॉकलेट्सना व्हॅनिला आणि दुधाचा वास येतो व चव साखरेची लागते. खर्या चॉकलेटला नेहमी थोडासा लाकडासारखा, थोडासा फुलांचा असा वास आला पाहिजे आणि तुम्ही ते तोंडात टाकल्यावर अनेक सुवासांची आतषबाजी करत ते चॉकलेट काहीही मागमूस सुद्धा न ठेवता विरघळून गेले पाहिजे.
भाजलेली कोको बी
या साठी करोलोने चॉकलेट बनवण्याची सर्व प्रक्रिया मोठी काळजीपूर्वक ठरवली आहे. कोकोच्या बिया प्रिन्सिपे बेटावरच्या मळ्यातच भाजून साओ तोमेवर आणल्या जातात. या नंतर त्या काळजीपूर्वक निवडून दळण्यात येतात. व त्यांची पेस्ट बनवण्यात येते. ही पेस्ट फक्त हातानी ढ्वळण्यात येते. करोलो म्हणतो की यांत्रिक ढवळण्याने चॉकलेटची चव बिघडते.
करोलोकडे आता 13 लोक कामाला आहेत. सध्या तो आपली चॉकलेट्स पोर्तुगाल, इटली, जर्मनी, स्पेन, झेकोस्लोव्हकिया, जपान आणि अमेरिकेला निर्यात करतो आहे.
रोज संध्याकाळी 5 वाजता फॅक्टरी बंद झाल्यावर करोलो पाहुण्यांचे स्वागत करतो. हे सगळे पाहुणे त्याच्या चॉकलेट्सची चव घेण्यासाठी दूरदूरहून आलेले असतात.
आता यापुढे कधीही चॉकलेट घ्यायला गेलो की करोलो आणि त्याचा जगातील सर्वात शुद्धा आणि उत्कृष्ट चॉकलेट बनवण्याचा ध्यास मला आठवल्याशिवाय रहाणार नाही हे नक्कीच.
22 ऑगस्ट 2009
very informative and very well written article.
thank you sir, keep writing such informative articles.
“आता यापुढे कधीही चॉकलेट घ्यायला गेलो की करोलो आणि त्याचा जगातील सर्वात शुद्धा आणि उत्कृष्ट चॉकलेट बनवण्याचा ध्यास मला आठवल्याशिवाय रहाणार नाही हे नक्कीच”
Me too…. Many Thanx for sharing this….
—Priya