.
History इतिहास

शनिवारवाडा


शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज हे सन 1707 मध्ये मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आले व इ.स. 1713 मध्ये त्यांनी बाळाजी भट यांची, पंतप्रधान पेशवा म्हणून नियुक्ती केली. इ.स. 1817 मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज, सातार्‍याचे प्रतापसिंह महाराज हे इंग्रजांच्या स्वाधीन झाले व त्यांच्याच सांगण्यावरून प्रतापसिंह महाराजांनी त्या वेळचे नियुक्त पेशवे, बाजीराव रघुनाथराव यांना पेशवेपदावरून दूर केले. या दोन घटनांमधील 104 वर्षांच्या कालखंडात, मराठी राज्याची सर्व सत्ता, बाळाजी भट व त्यांच्या घराण्यातील 5 पिढ्यांच्यातील पुरुष, यांच्याच हातात पेशवे म्हणून एकवटली होती. आपल्या कर्तुत्वाने पेशव्यांनी, अटकेपर्यंत आपले झेंडे लावले आणि सर्व उत्तर हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला होता. या कालात सर्व सत्ता सूत्रे पुण्यातून हलत असल्याने पुणे हे हिंदुस्थानचे सत्ता केंद्र झाले होते.

800px-Shaniwarwada_Pune

दिल्ली दरवाजा

मराठ्यांच्या या सत्तेला, वैभवाला साजेशी त्यांची गादी असली पाहिजे या हेतूने थोरले बाजीराव पेशवे यांनी, पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचे ठरवले व 10 जानेवारी 1730 रोजी त्यांनी या वास्तूचा भूमिपूजन समारंभ केला. अशी दंतकथा आहे की या ठिकाणी बाजीराव पेशव्यांनी एका सशाला कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिले. हे पाहिल्यावर बाजीरावांच्या असे मनात आले की या जागेत काहीतरी विशेष असले पाहिजे व त्यांनी ही जागा पेशव्यांच्या गादीसाठी मुक्रर केली. ही जागा त्यावेळी पुणे कसब्यात मोडत होती व या जागेभोवती मातीची भिंत बांधलेली होती. त्यावेळी या जागेत फक्त काही कोळी व कोष्टी वास्तव्य करून असत. बाजीराव पेशव्यांनी या लोकांना, मंगळवार पेठेत पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या व 5 एकर क्षेत्रफळाची ही जागा आपल्या ताब्यात घेतली.

ShaniwarWada

उपग्रहातून शनिवारवाडा

बाजीराव पेशव्यांच्या स्वभावानुसार त्यांनी ही वास्तू बांधून घेण्याचे काम अतिशय जलद गतीने पूर्ण करून घेतले व फक्त 2 वर्षात मराठी सत्तेला व वैभवाला साजेसा होईल असा आतल्या बाजूस 3 चौक असलेला एक दुमजली आलिशान प्रासाद तयार झाला. याच वर्षात म्हणजे शनिवार 22 जानेवारी सन 1732 रोजी बाजीरावांनी या वास्तूचा वास्तुपूजन समारंभ साजरा केला. हा प्रासाद बांधण्यासाठी 16110 रुपये खर्च आला व वास्तुपूजेनिमित्त 15 रुपये आठ आणे ब्राम्हणांना दक्षिणा देण्यात खर्च करण्यात आले. बाजीरावांच्या जीवनशैली प्रमाणे हा प्रासाद साधा पण उठावदार होता. फक्त दिवाणखाना मात्र शोभिवंत वस्तूंनी सजवलेला होता. बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी 1750च्या आसपास या प्रासादात बरेच बदल केले व अनेक नवीन इमारती बांधल्या. हे करताना त्यांनी किती पैसा खर्च होईल किंवा वेळ लागेल याचा विचार केला नाही. या बदलांनंतर शनिवारवाडा एका भव्य आणि सौंदर्यपूर्ण दिमाखाने ओळखू जाऊ लागला. आपली सत्ता व वैभव यांचे हा वाडा एक साक्ष आहे या कल्पनेने या पेशव्यांनी वाड्यातील बदलांच्यात जातीने लक्ष घातल्याने, शनिवारवाडा अत्यंत प्रेक्षणीय व देखणी अशी एक वास्तू बनला. नंतर 1780 च्या सुमारास सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी नवीन खोल्या, दिवाणखाने, गॅलर्‍या व टॉवर आणि कारंजी बांधली व शनिवारवाडा, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानावर सत्ता गाजवणार्‍या पेशव्यांच्या रुबाबाला व इतमामाला साजेसा होईल, याचे जातीने प्रयत्न केले.

800px-ShaniwarWada_Balcony

आतील भाग, जुन्या इमारतींची जोती अजून दिसतात.

शनिवारवाड्याचा मुख्य प्रासाद हा सहा मजली उंच होता. असे म्हणतात की आळंदीच्या देवळाचा कळस सहाव्या मजल्यावरून दिसत असे. पेशव्यांच्या मेघडंबरी या महालाच्यावर असलेल्या गच्चीतून पर्वती वरील देउळ आणि पुणे शहर याचे मोठे सुंदर विहंगम दृष्य दिसत असे. अजून अस्तित्वात असलेल्या दिल्ली दरवाजाच्यावर असलेल्या नगारखान्याच्या उंचीवरून या सहा मजली प्रासादाच्या उंचीची कल्पना येऊ शकते. 5 एकर आवार (कॅम्पस) असलेल्या या शनिवारवाड्यात प्रवेश करण्यासाठी 5 प्रवेशद्वारे होती. ही प्रवेशद्वारे अशी होती. उत्तरेला असलेला दिल्ली दरवाजा, कसबा गणपतीच्या देवळाजवळ असलेला गणेश दरवाजा. जांभूळ दरवाजा, खिडकी दरवाजा आणि मस्तानी दरवाजा. नाना फडणवीसांनी नंतर मस्तानी दरवाज्याचे नाव अली बहादूर दरवाजा असे बदलले. अली बहादूर हे मस्तानीचे नातू होते. त्यांनी पुढे बुंदेलखंड जिंकून तिथे बंडा या जहागिरीची स्थापना केली. दिल्ली दरवाजा हे शनिवारवाड्याचे प्रमुख प्रवेशद्वार होते. ते बांधत असताना शाहू महाराजांनी ते उत्तराभिमुख असल्याने दिल्ली बादशहाचा अवमान होतो असे वाटल्याने त्याचे काम थांबविण्याची बाजीरावाना विनंति केली. ती मानून बाजीरावांनी काम थांबवले. पुढे बाळाजी पेशव्यांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर ते काम पूर्ण केले. हा दरवाजा अजूनही उत्तम स्थितीत आहे. व त्याच्यावरून वाड्याच्या एकूण कारागिरीची कल्पना येऊ शकते.

shaniwar wada spiked gate

दिल्ली दरवाजा

वाड्याच्या बाहेर असलेल्या दोन बाजूच्या भिंती 200 फूट लांब आणि 20 फूट उंच आहेत तर उरलेल्या दोन बाजू 150 फूट लांब व 20 फूट उंच आहेत. पायाला दगडी बांधकाम व वर वीटकाम केलेले एकूण 9 बुरुज या बाहेरील भिंतीमध्ये आहेत. हे बुरुज व भिंती यावर कोणत्याही वेळी 275 सैनिक कडा पहारा करत असत. वाड्यात 4 प्रशस्त चौक होते व 8 महत्वाचे दिवाणखाने, महाल किंवा स्टॆट-रूम्स होते.

1. ग़णपती रंग महाल- मुख्य दरबाराचा महाल

2. नाचाचा दिवाणखाना

3. आरसे महाल

4. जुना आरसे महाल

5. दादासाहेबांचा दिवाणखाना- रघुनाथ बाळाजी यांचा दिवाणखाना

6. थोरल्या रायाचा दिवाणखाना- पहिल्या पेशव्यांच्या नावाचा दिवाणखाना

7. नारायणरावाचा महाल

8. हस्तीदंती महाल

याशिवाय पेशवे कुटुंबातील इतरजणांना रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या. हा भव्य प्रासाद अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियंत्रित प्रशासनाच्या पूर्ण नियंत्रणाखाली चालत असे. जवाहिरखाना, जिन्नसखाना, तिजोरीची खोली, भांडार, वाचनालय, औषधालय, शस्त्रास्त्रांची खोली, दस्तऐवज ठेवण्याची खोली आणि चित्रशाला अशी निरनिराळ्या उपयोगांसाठी असलेली स्वतंत्र दालने होती. व त्या प्रत्येक दालनावर त्या विभागाच्या कार्यासाठी व नियंत्रणासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला असे.

या एवढ्या मोठ्या घराच्या संरक्षणासाठी, 1779 मधल्या दस्त ऐवजाप्रमाणे 3144 कर्मचारी तैनात केलेले होते. त्यांची वर्गवारी अशी होती. खाशांचे संरक्षक-480 ,पुरंदर संरक्षक- 229, कानडी सैनिक- 325, घोड्यांच्या पागेसाठी रिसालदार-34, खाशांचे घोडेस्वार- 82, पायसैनिक (इनफन्ट्री)- 224, सेवकवर्ग- 76, शिलेदार व बारगीर- 1690 या शिवाय 300 घोडेस्वार सैनिक कोणत्याही क्षणी जय्यत तयार असत. ही संख्या नंतर 500 पर्यंत वाढविण्यात आली होती. पेशव्यांच्या प्रासादाची शासनयंत्रणा किती प्रभावी होती याची यावरून कल्पना येऊ शकते.

बहुतेक महाल किंवा दिवाणखाने एकाच नमुन्याचे होते. हा नमुना तेंव्हा वापरात असलेल्या शाई आणि बोरू ठेवण्याच्या पात्रासारखा दिसत असल्याने त्याला कलमदानी म्हणत असत. या नमुन्यात मध्यभागी, एक छोटे विभाग केलेला पण आयताकृती आणि सपाट छत असलेला असा, एक महाल असे. याच्या चारी बाजूंना उतरते छप्पर असलेल्या चार पडव्या असत. मुख्य महालाला आधार देत असलेले सुरूच्या झाडासारखे दिसणारे खांब, कोरीव काम केलेले असत. हे खांब एकमेकाला अत्यंत सुंदर असे कोरीव काम केलेल्या कमानींनी जोडलेले असत. छतावर लाकडी तक्तपोशी बसवलेली असे व त्यावर, पाने, फुले, वेलबुट्टी यांची नक्षी किंवा रामायण महाभारतातले प्रसंग चित्रित केलेले असत. जयराज नावाचा जयपूरहून मुद्दाम आणलेला एक कारागीर हे काम करत असे. खांबांच्या मधे रेशमी पडदे टांगलेले असत व जरूरीप्रमाणे ते खाली घेत असत किंवा बांधून ठेवण्यात येत. काही ठिकाणी अरुंद अशा खिडक्याही ठेवण्यात येत.

गणेश रंग-महाल किंवा मुख्य दरबाराचा महाल हा बाळाजी पेशव्यांनी 1755 मध्ये गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करता यावा म्हणून मुद्दाम बनवून घेतला होता. हा महाल अतिशय भव्य असाच होता. एका वेळी 100 नर्तकी सुद्धा यात नाच करू शकत असत. एका टोकाला सोन्याचा पत्रा चढवलेली संगमरवरी गणेशमूर्ती ठेवलेली असे. या मूर्तीच्या भोवती पुराणातील प्रसंगांचीच सजावट केलेली असे. महालाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या एका पाण्याच्या छोट्याशा तलावात सतत थुईथुई उडणारी कारंजी बसवलेली होती. या कारंज्यांच्या दुसर्‍या बाजूसच एक अतिशय सुंदर अशी फुलबाग होती. या फुलांचा येणारा सुगंध व कारंज्यांचा आवाज त्यामुळे या महालात बसणे हा मोठा सुखद अनुभव असे. पेशव्यांची बैठक किंवा मसनद म्हणजे एक चार ते पाच इंच उंचीची गादी असे, यावर पांढरी शुभ्र चादर अंथरलेली असे. सोन्याच्या जरीचे भरतकाम असलेल्या गर्द हिरव्या रंगाचे अभ्रे घातलेल्या 3 उशा या गादीवर ठेवलेल्या असत.

peshwa1790गणेश रंग महाल

महालांच्या बाहेर असलेल्या  चौकांच्यात कारंजी बांधण्यात आलेली होती. विशेष कारणप्रसंगी ही चालू करण्यात येत असत. गणपती रंगमहालाच्या पश्चिमेला ‘हजारी कारंजे’ या नावाने ओळखले जाणारे एक विशेष कारंजे होते. 80 फुटाचा परिघ असलेले एक 16 पाकळ्यांचे कमळ या कारंजात बनविण्यात आले होते. यातल्या प्रत्येक पाकळीवर पाणी उडणार्‍या 16 तोट्या बसवलेल्या होत्या. हे कारंजे सुरू झाल्यावर अतिशय अप्रतिम व नयनरम्य असे दृष्य दिसत असे. या कारंजात उडणार्‍या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की शेकड्यांनी इंद्रधनुष्ये दिसत असत. या शिवाय आणखी जरा खोल असलेल्या एका जलाशयाच्या भिंतीवर पाण्याच्या तोट्या इतक्या बेमालूमपणे लपवून बसवलेल्या होत्या की या तोट्यांच्यातून वहाणारे पाणी खडकामधून वहात असताना धबदब्यातून पडणार्‍या पाण्यासारखे किंवा एखादी पांढरी चादर झाल्यासारखे दिसत असे. या पाण्याच्या चादरीमागे रंगीबेरंगी दिवे लावत असत. विशेषत: रात्रीच्या वेळी या पाण्याच्या चादरीचे दृष्य़ अतिशय नेत्रदीपक असे वाटत असे. या कारंजाला पाण्याची चादर या नावानेच ओळखले जाई.

दिवाणखाने किंवा दरबार महाल हे अतिशय सुंदर फर्निचर व पडदे यांनी सजवलेले असत. जिन्नसखाना या महालात, परदेशी व मुगल पद्धतीची तैलचित्रे, निरनिराळ्या परदेशी व देशातल्या लोकांकडून मिळालेल्या भेटवस्तू कलात्मक रित्या मांडून ठेवलेल्या असत. या शिवाय निरनिराळी घड्याळे, खेळणी, दुर्मिळ हत्यारे वगैरे वस्तूही नीट जपून ठेवलेल्या असत. हे सगळेच महाल इतके सुंदर सजवलेले असत की ते पहाणारा दर्शक विस्मित होत असे. मराठी दफ्तरात दुर्दैवाने या प्रासादाबद्दल फारसे काही लिहिलेले नाही. परंतु पेशव्यांना भेटायला आलेल्या काही युरोपियन पाहुण्यांनी पेशव्यांचा थाटमाट आणि वैभव कसे होते आणि आपण काय पाहिले याचे बारकाईने वर्णन करून ठेवलेले असल्याने आज आपणाला त्याची थोड्या प्रमाणात कल्पना येऊ शकते.

पेशव्यांचा हा अत्यंत सुंदर व भव्य शनिवारवाडा,  1827 मध्ये लागलेल्या एका महाभयंकर आगीत जळून पूर्णपणे नष्ट झाला. ही आग 7 दिवस भडकलेली होती. एरवी सर्व बाबतीतील रेकॉर्ड अतिशय अचूकरित्या ठेवणार्‍या इंग्रज राज्यकर्त्यांनी या बाबतीतील कोणतीही माहिती कधीच जाहीर केली नाही. ही आग कशामुळे लागली? ती विझविण्याचे काय प्रयत्न केले? या संबंधी कोणतेही रेकॉर्ड अस्तित्वात आहे असे वाटत नाही. शनिवारवाडा, पेशवे यांच्याबद्दल पुष्कळ लिखाण उपलब्ध आहे. परंतु या कोणत्याही पुस्तकात या आगीचे कोणतेही कारण कधीच देण्यात येत नाही.

माझ्या लहानपणी म्हातार्‍या माणसांच्या तोंडून मी असे ऐकले होते की शनिवार वाड्याला आग इंग्रजांनीच लावली. आधीची 150 वर्षे स्वराज्यात, स्वातंत्र्य अनुभवलेल्या, महाराष्ट्रातील व विशेषत: पुण्यातील जनतेला, इंग्रजी अंमल व पारतंत्र्य हे कधीच सहजपणे मान्य होण्यासारखे नव्हते. आपला अंमल चालू झाल्यावर दशक उलटले तरी मराठी माणूस इंग्रजी अंमलाच्या विरुद्धच आहे याची पुण्यातील इंग्रज शासनाला बहुदा जाणीव असावी. पेशव्यांच्या मराठी साम्राज्याची आठवण जोपर्यंत शनिवारवाडा दिमाखाने उभा आहे तोपर्यंत मराठी मनातून कधीही जाणार नाही हे त्यांनी ओळखले असावे आणि म्हणूनच अत्यंत गुप्तपणे त्यांनी मराठ्यांच्या अस्मितेची ही खूण, नष्ट करण्याचा डाव आखला असावा.

पेशव्यांची ही अत्यंत सुंदर, दिमाखदार आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेली वास्तू, जळून नष्ट होण्याचे दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही.

16 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

17 thoughts on “शनिवारवाडा

 1. अतिशय माहितीपूर्ण लेख! धन्यवाद 🙂

  Posted by atul | ऑगस्ट 16, 2009, 11:16 pm
  • तुमच मराठी इतिहासा वरील काम छान आहे. हि माहिती कृपा करून जास्तीत जास्त वाचकान पर्यंत पोचवन्य्च अजून प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी विकिपीडिया वर हे माहिती इंग्लिश, हिंदी, व मराठीत पाठवा.
   हे अस सांगण्यमागे कारण लोकंच इतिहासावरील अन्यान. पश्चिमात्य लोक तर हिंदुस्तानचा इतिहास पहाताना मुघलांना भारतीय शासक मानतात. आणि मराठा राज्यला मुघ्लानाचे विद्रोही मानतात. ( मराठ्यंचा हा इतिहास महाराष्ट्राचा शालेय इतिहासाचा पुस्तकात देखील नाही)
   discovery channel व history channel वर हा रिपोर्ट दाखला गेला होता. वास्तविक महाराष्ट्राचा इतिहासाचा जाणंकराणी हा समज दूर केला पाहिजे या अंतर्ष्ट्रीय वाहिन्य वर मराठीयचा योग्य इतिहास प्रसारित झाला पाहिजे
   मागे काही वर्षान पूर्वेची गोष्ट आहे. राज ठाकरेचा विरोधात इंडिया टीवी च्या एका बेअकली पत्रकाराने रीपोर्ट दाखवला होता. म्हणे पूर्वी मुंबई व महाराष्ट्रावर एका बिहारी राजन राज्य केलं होत. म्हणून मुंबई उत्तर भारतीय लोकांची आहे. त्या बेअकली माणसाला हे माहित नव्हत कि ब्रिटीशराज
   भारतात स्तपीत होणे पूर्वे उत्तर भारतावर मराठी अमल होता. मराठीचा कृपे मूळे काशीविश्वनाथ सारखी हिंदू देवस्थान इस्लामी आक्रमणा पासून वाचू शकली…………

   Posted by राजन स. राउळ | फेब्रुवारी 23, 2010, 9:23 pm
 2. Shanivarvadyat gelya sarkhe vatale…

  Shevatacha paragraph vachun doLyat paNi aale..

  Just a correction , i think the fire incident happened in 1811 and not in 1827. it happened immediately after the demise of The Maratha empire in 1810 ..

  Posted by Jay | ऑगस्ट 17, 2009, 4:57 सकाळी
  • जय

   प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपला तारखांचा काहीतरी गोंधळ होतो आहे. प्रतापसिंह महाराजांनी बाजीराव रघुनाथ या शेवटच्या पेशव्याला 1817 मधेच पदावरून काढून टाकले व ते स्वत: इंग्रजांच्या स्वाधीन झाले. यानंतर इंग्रजांनी आपला ध्वज शनिवारवाड्यावर 1817 मधेच प्रथम लावला; 1810 मधे नाही. त्याचप्रमाणे माझ्याजवळ जे जुने संदर्भ आहेत त्याप्रमाणे शनिवारवाडा 1827 मधे जळून खाक झाला अशी नोंद आहे.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 17, 2009, 8:55 सकाळी
 3. चिरेबंदी महाल होते ना सगळे?
  मग जळले कसे? की स्फोट वगैरे घडवून आणले??

  Posted by आल्हाद alias Alhad | ऑगस्ट 17, 2009, 8:45 pm
 4. atishay detailed lekh .. parat vachnar..
  tumcha sagla blog ch sundar ahe !! 🙂

  Posted by bhagyashree | ऑगस्ट 20, 2009, 6:58 सकाळी
 5. Very Very interesting article. Shevatcha gess mala pan barach barobar wattoy, Balaji bajirao peshwyan baddal kahi mahiti asel ter plz share kara. Tyachy baddal kahich mahiti nahi!

  Posted by mandar17390 | मे 14, 2010, 11:11 pm
 6. Great blog mala khup khup avadala

  Posted by VIJAY PATADE | एप्रिल 12, 2012, 10:49 सकाळी
 7. nice info u’ve shared with us………… now i’ll again go to shaniwaarwada……… 🙂

  Posted by carolswilliams | एप्रिल 24, 2012, 3:27 pm
 8. Sir,
  I have read this artical very careful. But I felt that something is missing there. for ex. Madhavrao’s murder and Mastani was also living in Shaniwarwada. What was the political, economical and progress of maratha empire resons behind building a Shaniwarwada.
  Thanks.

  Posted by Prasad Kulkarni | मे 30, 2012, 11:02 सकाळी
  • Prasad Kulkarni —

   I feel that you need to brush up your Maratha history. Madhavrao Peshva was not murdered by anyone. Senior Madhavrao died because of T.B. and Junior Madhvarao fell down from Shaniwarwada terrace by accident. Mastani never stayed in Shaniwarwada. A separate wada was built for her near Kothrud ( a suburb of Pune.)

   My article describes the reasons behind building of Shaniwarwada.

   Posted by chandrashekhara | मे 30, 2012, 3:00 pm
 9. sir can u pls give me information about nanawada near lalmahal.

  Posted by jadhavrao varsha | ऑगस्ट 10, 2012, 8:46 pm
 10. great job , mala khup khup avadla ahe, pan shanivarwada 1827 saali bhasmasat zala , ani aag 9 divas jalat hoti asa mi sandharbh vachala ahe

  Posted by sharad damu adsul | मार्च 11, 2013, 6:17 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: