.
ताज्या घडामोडी Current Affairs, History इतिहास

एक जागतिक डोकेदुखी


मागच्या आठवड्यात, जागतिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, पाकिस्तानमधील तालिबानचा एक मुख्य नेता, बैतुल्ल्हा मेहसूद हा, अमेरिकन विमानांनी केलेल्या एका रॉकेट हल्ल्यात, ठार झाल्याच्या शक्यतेचे वृत्त दिले होते. पाकिस्तान सरकारनेही या बातमीची री ओढत बैतुल्हा ठार झाल्याची शक्यता वर्तविली होती.  यानंतर तालिबानने दक्षिण वझिरिस्तान मधल्या आपल्या ताब्यातील या भागाभोवती एक सुरक्षा कवच उभारले होते व पूर्णपणे प्रवेशबंदी केली होती. त्यानंतर या भागातच असलेल्या करामा या गावात वरिष्ठ तालिबान नेत्यांची एक बैठक झाली. त्यात तालिबानच्या नव्या नेतृत्वाबद्दलचा निर्णय होऊ शकला नाही. या पदासाठी तीन दावेदार आहेत. या तिघांत वादावादी व शेवटी गोळीबार झाला व त्यांच्यापैकी एक संभाव्य नेता हकीमुल्ल्हा मेहसूद ठार झाला अशी बातमी वाचली. दुसर्‍या बातमी प्रमाणे वालीउर रेहमान हा दुसरा दावेदारही ठार झाला आहे. तिसर्‍या एका बातमीप्रमाणे, अशी बैठक व गोळीबार कधी झालाच नाही. खरे खोटे काय असेल ते कोणालाच नक्की कळलेले नाही.

350px-FATA_(8)

हे सगळे वाचून, मला शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या, औरंगजेबाने सिंहासन बळकवण्यासाठी केलेल्या आपल्या भावांच्या हत्येची आठवण झाली व पाकिस्तानच्या सीमेलगतच्या या भागात अजून एकविसावे काय पण अठरावे शतकही आले नसल्याची जाणीव झाली. या भागात बहुदा ‘कालप्रवाह’ पुढे जातच नसावा. पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर असलेला, दक्षिण वझिरिस्तान हा साडेसहा हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेला प्रांत, पाकिस्तानी सरकारच्या अंमलाखाली कधीच नव्हता. ब्रिटिशांच्या कालापासून चालत असलेली पोलिटिकल एजंटची प्रथा अजूनही चालूच आहे. आता ब्रिटिशांच्या ऐवजी पाकिस्तानचा पोलिटिकल एजंट असतो इतकेच. डोंगराळ आणि अतिशय दुर्गम असलेल्या या प्रदेशात  वझिरी, मेहसूद आणि बुर्की या तीन जमातींचे वास्तव्य असते. हे लोक अत्यंत कर्मठ आणि जुन्या परंपरांना धरून रहाणारे असल्याने या प्रदेशात सुधारणांचे वारे तर सोडाच पण साधी झुळुकही कधी येऊ शकली नाही. तालीबान सारख्या संस्थेला हे आयते कुरण मिळाल्यासारखेच झाले व येथे तालिबानचा संपूर्ण पगडा थोड्याच दिवसात बसला.

1901 साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी, ‘रिपोर्ट ऑन वझिरीस्तान” म्हणून एक अहवाल तयार केला होता. हा अहवालाला अजूनही या प्रदेशाबद्दलचा एक अधिकृत दस्तऐवज म्हणून समजले तरी चालण्यासारखे आहे. या अहवालाप्रमाणे, सर्व मापांच्या, आकारांच्या, अतिशय गुंतागुंतीच्या व सर्व दिशांना पसरलेल्या डोंगरपर्वतांच्या रांगांनी, हा प्रदेश व्यापलेला आहे. या प्रदेशांत प्रवेश करणे सुद्धा अतिशय अवघड बाब आहे. मेहसूद जमात ही या भागात रहाणारी सर्वात जुनी जमात आहे. हे लोक अत्यंत रुढीप्रिय, कर्मठ आणि स्वतंत्र्य बाण्याचे आहेत. ते गर्वाने असे सांगतात की जगात अनेक राजे आले व गेले पण आमच्या देशात कोणीही कधीही शिरकाव करू शकलेला नाही. आम्ही आमच्याच कायदेकानूंचे पालन करणार आहोत. दुसर्‍या कोणी केलेले कायदेकानू आम्हाला मान्यच नाहीत.

Pakistan_08_07_09_Paul_Mehsud

मेहसूद टोळ्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी 1860 पासून 1947 पर्यंत सतत चालू ठेवला. त्यात त्यांना अतिशय मर्यादित यश मिळाले. 1860 मधे मेहसूद टोळ्यांनी पंजाबमधील टोंक गावावर हल्ला केला व 300 सैनिकांना मृत्युमुखी धाडले. याचा वचपा काढण्यासाठी गेलेल्या ब्रिटिश सैनिकांनी मेहसूदांची घरे जाळली, पिके नष्ट केली. परंतु मेहसूद टोळीवाल्यांना काही त्यांना नमवता आले नाही. वझिरीस्तान, अफगाणिस्तान सीमेवर असलेल्या गोमल खिंडीमधे व्यापार्‍यांच्या तांड्यांवर हल्ले करणे, हिंदूंचे अपहरण करून खंडणी उकळणे वगैरे उद्योग हे टोळीवाले सतत करतच असत. 1881 मधे प्रसिद्ध झालेल्या अहवालात पंजाब सरकारने, दर महिन्याला मेहसूद टोळ्यांकडून घडणार्‍या दरोडेखोरी, अपहरणे याबाबत आपली असहाय्यता दर्शविली होती. ब्रिटिशांनी मेहसूदांचा बंदोबस्त करण्याचा एक प्रयत्न अगदी 1946 सालीही करून बघितला.

मेहसूदांच्या या प्रदेशात पाकिस्तान सरकारला सैन्य पाठवणे शक्यच नाही. त्यामुळे तालिबान आणि अतिरेक्यांचे हे एक प्रमुख केंद्र बनले आहे. स्वयंचलित विमानाने रॉकेट्सचे हल्ले करणे एवढेच या प्रदेशात शक्य आहे.

मेहसूद टोळीवाल्यांनी आता आपल्या अतिरेकी उद्योगांची कक्षा सर्व पाकिस्तानमधे वाढविण्याचे ठरवलेले दिसते आहे. पाकिस्तान सरकारला ते आपला सर्वात मोठा शत्रू मानतात. बेनझीर भुट्टो यांची हत्या या मंडळींनीच घडवून आणली होती. पाकिस्तान सरकारने त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केल्यावर त्यांनी प्रथम पाकिस्तानने अमेरिकेबरोबरचे संबंध तोडून टाकावेत अशी अट घातली व वझिरीस्तानच्या सीमेवरची मुलींची एक शाळा जमीनदोस्त करून आपला इरादा जाहीर केला.

मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात अल-जझिरा टी.व्ही. ला मुलाखत देताना मरहूम बैतुल्ल्हा मेहसूद यांनी आता आमचे लक्ष युरोप आणि अमेरिकेकडे आहे. हे सांगून आम्ही त्यांची सर्व प्रमुख शहरे नष्ट करणार आहोत असे सांगून टाकले.

पाकिस्तानची एक डोकेदुखी आता नहुतेक जागतिक डोकेदुखी ठरणार अशी चिन्हे आहेत.

12 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: