.
Health- आरोग्य

बळीचा बकरा


गेल्या काही दिवसांतल्या बातम्या वाचून असे दिसते आहे की अखेरीस भारतातही स्वाईन फ्ल्य़ू किंवा H1N1  व्हायरसने, आपले हातपाय चांगलेच पसरण्यास सुरवात केली आहे. हा फ्ल्य़ू एप्रिल महिन्यात प्रथम मेक्सिकोमधे आढळून आला व हळूहळू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका आणि युरोपमधे तो चांगलाच पसरला. त्यानंतर एशियामधले मलेशिया, सयाम सारखे देश या रोगाच्या झपाट्यात आले. इंग्लंडसारख्या छोट्या देशात सुद्धा दीड लाखापेक्षा जास्त लोकांना हा रोग झाला. अमेरिका, ऑस्ट्रेलियामधे सुद्धा प्रचंड संख्येने लोक या फ्ल्य़ूचे बळी ठरले. या बहुतेक देशात एप्रिलमधे या रोगांचे पहिले रुग्ण सापडले. ऑगस्ट महिन्यापर्यंत रोग्यांची संख्या वाढतच गेली व आता कुठे ती कमी होऊ लागली आहे. या सर्व महिन्यांच्यात, भारतात कडक उन्हाळा असल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांनी, हा रोग पसरला नाही. पावसाळा आल्याबरोबर हवामान सौम्य झाले व या व्हायरसने आपले हातपाय पसरवण्यास सुरवात केली.

हा व्हायरस सगळीकडे पसरणार अशी चिन्हे दिसू लागल्याबरोबर वर्तमान पत्रे, ब्लॉगर्स आणि अर्थातच आपले नेहमीचेच यशस्वी कलाकार म्हणजे टी. व्ही. चॅनेल्स यांनी भारतात हा व्हायरस पसरला गेला तरी कसा? व याचा दोष कोणाकडे जातो? याचा निष्फळ व निरर्थक शोध घेण्यास सुरवात केलेली दिसते आहे. वर्तमान पत्रात आलेल्या काही वाचकांच्या हास्यास्पद प्रतिक्रिया वाचून तर हसावे की रडावे तेच कळत नाही. एकजण म्हणतात पुण्याला कर्फ्यू लावा. दुसरे एक जण सल्ला देतात की पुण्याच्या लोकांना शहराच्या बाहेर जाऊ देऊ नका. भारतातून येणारी जाणारी सर्व आंर्तराष्ट्रीय उड्डाणे बंद करावी असेही काही लोकांचे मत आहे. यावर प्रतिक्रिया काय द्यायची हे मला तरी समजत नाही.पण हे स्पष्ट आहे की ही साथ का आली या साठी कोणीतरी बळीचा बकरा शोधणे चालू झालेले आहे

काही मंडळींच्या मते, हा रोग परदेश सफर करून आलेल्या लोकांमुळे पसरला आहे. हे बर्‍याच अंशी खरेही आहे. परंतु सध्याच्या जागतिकरणाच्या परिस्थितीत कोणचाही देश स्वत:ला जगापासून अलग करू शकत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे परदेशाहून आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यातील संशयित लोकांना सात ते आठ दिवसासाठी अलग ठेवणे हे आवश्यक आहे. तसेच या संशयितांमधे जर कोणी आजारी झाला तर त्याच्या जवळपास विमानात कोण लोक होते त्याचा शोध घेउन त्या लोकांपैकी कोणी आजारी आहे काय? याचाही शोध घेणे आवश्यक ठरते. भारतात सर्व विमानतळांच्यावर उतरणार्‍या एकूण प्रवाश्यांची मोठी संख्या लक्षात घेतली तर ही वैद्यकीय तपासणी ही केवढी मोठी जबाबदारी आहे हे समजू शकेल.

विमानतळांवर वैद्यकीय तपासणी करणारी ही डॉक्टर मंडळीच्, त्यामुळे स्वाईन फ्ल्यूची साथ आली, यासाठी बळीचे बकरे ठरण्याची शक्यता दिसते. आपल्यापैकी ज्या लोकांनी आंर्तराष्ट्रीय विमान प्रवास केला असेल त्यांनी हा प्रवास संपून विमानतळावर उतरल्यावरच्या आपल्या मनस्थितीची आठवण करावी. या वेळी प्रत्येक प्रवासी अत्यंत दमलेल्या व कंटाळलेल्या अवस्थेत असतो.  विमानतळावर आगमन होणार्‍या प्रवाशांना  बसण्यासाठी साध्या खुर्च्यासुद्धा विमानतळांवर नसतात. एमिग्रेशन सारख्या औपचारिकेतून जाण्यासाठी आधी बराच वेळ लागतो. या नंतर अशा वेळी जर तुम्हाला परत डॉक्टरची तपासणी होण्यासाठी बसवून ठेवण्यात आले तर ते सर्व प्रवासी किती दमतील व कंटाळून जातील याची कल्पना फक्त हा प्रवास केलेल्यांनाच येऊ शकेल. मुंबई विमानतळावर रात्री 12 ते 3 या वेळात दोन ते तीन हजार प्रवासी उतरतात. इतक्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करणे हे अत्यंत कठीण काम आहे. त्या शिवाय या आजाराचा रोगी हा त्याला कोणतेही लक्षण दिसण्याच्या एक दिवस आधीपासूनच रोग प्रसार करू शकतो. अशा आजार्‍यांना कसे अलग करायचे हा ही प्रश्नच आहे.

या वैद्यकीय तपासणीत सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे प्रवाशांचे तपमान घेणे ही असते. दोन ते तीन इंचांवर धरता येणार्‍या रिमोट सेन्सिंग तपमापकातून प्रवाशांच्या कपाळाकडे बघून त्याचे तपमान घेणे ही एक त्यातल्या त्यात जलद पद्धत आहे. परंतु हजारो प्रवाशांचे तपमान घेण्यास या पद्धतीनेही खूप वेळ लागू शकतो. जगातील आधुनिक विमानतळावर लांबवरचे थर्मल सेन्सॉर लावलेले असतात. या सेन्सॉरच्या, संगणकासारख्या दिसणार्‍या पडद्यावरच, समोरून चालणार्‍या प्रवाशाचे तपमान नॉर्मल आहे की नाही हे दिसते. आपल्या विमानतळांवर कोणती पद्धत वापरतात हे माहिती नाही. पण आपला फॅमिली डॉक्टर जशी तपासणी करतो तशी तपासणी जर या विमानतळावरच्या डॉक्टर्सना करावी लागत असली तर ते डॉक्टर स्वत: व प्रवासी या दोन्हीसाठी ही एक सत्वपरिक्षाच असणार आहे. या अडचणींमुळेच बहुदा सगळीकडे, तपमानासाठी थर्मल स्कॅनर्स व प्रवाशाकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची पद्धत आहे. व सर्वसाधारणपणे ते पुरेसे होते.

रोज हजारोंनी प्रवाशांना तपासणारी ही डॉक्टर मंडळी खरे तर संभाव्य रोग्याशी ज्यांचा संपर्क येतो अशा लोकांची पहिली फळी असते. त्यांचे काम खरोखरच अतिशय धोकादायक व कष्टप्रद आहे. अशा या डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्याऐवजी त्यांचे कौतुक करणे जरूरीचे आहे.

11 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: