.
ताज्या घडामोडी Current Affairs

माल्थसची घोडचूक


थॉमस रॉबर्ट माल्थस, (जन्म 1766, मृत्यु 1834) हा एक ब्रिटिश तत्ववेत्ता होता. इ.स. 1798 मधे त्याने आपले लोकसंख्या वाढीबद्दलचे, अतिशय प्रसिद्ध असे विचार, प्रथम मांडले होते. माल्थसच्या मताप्रमाणे कोणत्याही देशाची लोकसंख्या, नेहमी भूमितीय गुणोत्तराने(Geometric Ratio) वाढत जाते तर या लोकसंख्येची भूक भागू शकेल अश्या अन्नपदार्थांची त्या देशातील निर्मिती फक्त अंकगणीय गुणोत्तरानेच (Arithmetic Ratio) वाढू शकते. सोप्या शब्दात सांगायचे तर लोकसंख्या वाढीचा वेग हा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वेगापेक्षा, नेहमीच जास्त असतो. माल्थस पुढे म्हणतो की असे जरी असले तरी निसर्गाने असे काही अडथळे (दुष्काळ, रोगराई, युद्धे,पूर) या लोकसंख्यावाढीच्या मार्गात निर्माण केले आहेत की जर माणसाने या बाबतीत काहीच केले नाही(शक्य असल्यास) तर जगातली लोकसंख्या आपोआपच मर्यादित राहील. जर मानवजातीने हे अडथळे दूर करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला तरच जगाची लोकसंख्यावाढ अनियंत्रितपणे मोठी होईल.

जगाची आजची लोकसंख्या 700 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. चीन व भारत या दोन्ही देशांची लोकसंख्या 120 कोटी पर्यंत पोचली आहे. दहा वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या 600 कोटीच्या खालीच होती. म्हणजेच मागच्या 10 वर्षात 100 कोटी नवीन खाणारी तोंडे निर्माण झाली आहेत. असे असले तरी जगात अन्न पदार्थांचा अभाव निर्माण झाल्याचे कुठे दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल की भारतातील लोकसंख्येच्या एका मोठ्या हिश्श्याला, दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत पडते आहे. पण नीट विचार केला की लक्षात येते की हा प्रश्न या लोकसंख्येची गरिबी, दारिद्र्य,व कोणत्याही प्रकाराने अर्थार्जन करण्याची अक्षमता, यामुळे निर्माण झालेला आहे अन्नपदार्थाची उपलब्धता नसल्यामुळे नाही.  भारत, चीन हे दोन्ही देश, जवळ जवळ सर्व अन्नपदार्थांच्या, जगातील उत्पादकांच्या यादीत, पहिल्या तीन ते चार क्रमांकाच्या आत आहेत. अगदी मूलभूत अन्न म्हणजे तांदूळ, गहू यासारखे पदार्थसुद्धा भारतातून दुसर्‍या देशांना निर्यात होतात.

CHINA-OBESITY

अमेरिकेसारख्या देशात आज 70% लोक जरूरीपेक्षा जास्त आहाराने लठ्ठंभारती झालेले आहेत. चीनमधले याचे प्रमाण 12 % असले तरी गेल्या 10 वर्षात हे प्रमाण दुप्पट झाले आहे हे लक्षात घतले पाहिजे. भारतातील 8 ते 9 % लोकांना मधुमेहाने ग्रासलेले आहे. हा रोग होण्याचे प्रमुख कारण परत आहार हेच आहे. तुम्ही जगातल्या कोणत्याही देशात जा. खाण्याच्या पदार्थांची एवढी रेलचेल आणि उपलब्धता सगळीकडे दिसून येते की आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. अगदी 10 वर्षांपूर्वीही ही उपलब्धता या प्रमाणात दिसून येत नव्हती. भारतातील वाणीसामान विकणार्‍या कोणत्याही दुकानात बघितले तर अन्न पदार्थांचे अनेक विविध प्रकार उपलब्ध असलेले दिसतात.  या पदार्थांचे वैचित्र्य, मूळ देश किंवा प्रांत हे बघायला गेले तर सगळ्या जगाचाच दौरा करावा लागेल. सध्या जगाच्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्न जगात निश्चितच निर्माण होते आहे. आणि पुढच्या तीस चाळीस वर्षांत जर लोकसंख्या वाढीचा वेग शून्य टक्क्यावर आला तर खात्रीनेच असे म्हणता येईल की लोकसंख्या आणि त्यांना पुरेसे अन्न नेहमीच उपलब्ध राहिल.

green_revolution

हे सगळे बघितल्यावर साहजिकच असा प्रश्न पडतो की आपण माल्थसला कधी व कसे खोटे पाडले. मला तर असे वाटते की माल्थसने एक महत्वाची गोष्ट बहुदा त्याच्या सिद्धांताची मांडणी करताना लक्षातच घेतली नाही. ती म्हणजे माणसाची बुद्धीमत्ता आणि नवकल्पनानिर्मितीची कुवत. नंतरच्या काळात, अन्नधान्य उत्पादनाच्या क्षेत्रात, माणसाने असे दोन नवीन शोध लावले की ज्यामुळे अन्न व धान्य उत्पादनाच्या माणसाच्या क्षमतेला, काही मर्यादाच उरली नाही.

haberbosch2

हेबर बॉश प्रक्रियेवर आधारित खत प्रकल्प

यापैकी पहिला शोध म्हणजे 1980च्या दशकात झालेली हरित क्रांती. हायब्रिड किंवा तत्सम बियाणे उपलब्ध झाल्याने भारतातील किंवा जगभरच्याच शेतकर्‍यांना कितीतरी जास्त प्रमाणात अन्नधान्य उत्पादन करणे शक्य झाले. व जगभरच्या अन्नधान्य उत्पादनाने अक्षरश: भरारी घेतली. दुसरा महत्वाचा शोध विसाव्या शतकाच्या प्रारंभी दोन जर्मनांनी लावला. फ्रिट्झ हेबर हा एक प्राध्यापक आणि कार्ल बॉश हा एक इंजिनियर या दोघांनी, उच्च तपमान व दाब या खाली असलेला हायड्रोजन वायू व हवेतील नायट्रोजन वायू यांच्यापासून अमोनिया वायू तयार करण्याची ‘हेबर-बॉश प्रक्रिया’ शोधून काढली. ही प्रक्रिया नत्रयुक्त खतांच्या उत्पादनात इतकी महत्वाची आहे की सध्या अंदाजे 50 कोटी टन नत्रयुक्त खत या प्रक्रियेच्या द्वारे उत्पादन केले जाते व जगातील उपलब्ध उर्जेच्या 1% उर्जा केवळ या प्रक्रियेसाठी वापरली जाते. या दोन्ही जर्मन व्यक्तींना, त्यांच्या हिटलर बरोबरच्या सहकार्यामुळे (पॉयझन गॅसचा शोध) कुप्रसिद्धीही मिळाली आहे व या युद्धात बळी पडलेल्या असंख्य ज्यू नागरिकांच्या हत्येची जबाबदारी स्वत:च ज्यू असलेल्या हेबरवर थोड्याफार प्रमाणात तरी येतेच असे म्हणावेच लागते. हेबर-बॉश प्रक्रियेच्या शोधानंतर, नत्रयुक्त खतांचे उत्पादन अतिशय झपाट्याने वाढत गेले. व याबरोबरच अन्नधान्यांचे उत्पादन व लोकसंख्या, साहजिकच त्याच प्रमाणात वाढत गेले. जगातील लोकसंख्यावाढीच्या आलेखावर, म्हणूनच ही प्रक्रिया एक महत्वाचा टप्पा मानली जाते.

worldpopgrowth4

हेबर-बॉश प्रक्रियेचा शोध आणि लोकसंख्या वृद्धी

1960-60 च्या दशकात माल्थसच्या विचारावर आधारित, शोधनिबंध लिहिण्याची एक लाटच पाश्चिमात्य पंडीतांच्यामधे आली होती. या बहुतेक पंडीतांच्या मते भारत व चीन या दोन्ही देशांना, विशेषेकरून भारत, काहीच भविष्य नव्हते. त्यातली जनता, उपासमार, रोगराई व त्यामुळे उसळणारा जनक्षोभ यातच नष्ट होणार होती. वरील दोन शोध आणि भारतीय शेतकर्‍यांची नवीन कल्पना स्वीकारण्याची क्षमता व कष्टाळू वृत्ती यांनी या सर्व नाशपंडीतांना चांगलीच चपराक दिली व त्यांची सर्व भविष्ये बासनात गुंडाळून ठेवणे भाग पडले. अर्थात ही मंडळी, ग्लोबल वॉर्मिंगसारखी नवनवीन कारणे काढून, भारतातील अन्न उत्पादन कसे कमी होणार आहे याचे अंदाज बांधत असतातच पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.

माल्थसला खोटे पाडण्यात तर मानवाला विशेषेकरून भारताला यश मिळाले पण आता पुढे वाटणारे खरी काळजी ही आहे की प्रमाणाच्या बाहेर अन्न फस्त करून आपण मधुमेह, उच्च रक्त दाब वगैरेसारख्या रोगांना आमंत्रण तर देत नाहीना?

3 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “माल्थसची घोडचूक

  1. Very analytical. High quality literature.

    Posted by Arun Joshi | सप्टेंबर 8, 2009, 3:32 pm
  2. लोकसंख्या ही वाढती आहे,परंतु तिला सामावुन घेन्यासाठी जागेची कमतरता पडत आहे,हे सत्य नाकारता येत नाही,जंंगल तोडुन ईमारती बांधल्या जातात,दर्जदार जमिनिवर घरे,कंपन्या,ऊद्योग उभारले जातात,त्यामुळे सुपिक जमिनी नाश पावतात,परिणामी ऊत्पादन कमी होवुन,अन्नधान्याचा तुटवडा निर्मान होवुन माल्थसचा सिध्दांत खरा ठरन्याची परिस्थिती तयार होते कींवा झाली आहे हे सिध्द होते.

    Posted by Gautam khandagale | डिसेंबर 30, 2015, 12:07 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: