.
Environment-पर्यावरण

नंदनवनातील भूलोक


चाळीस एक वर्षांपूर्वी, विद्यार्थीदशेत असताना, मी दोन तीन महिने, श्रीनगरमधे काही प्रशिक्षणासाठी तीन सहाध्यायींबरोबर रहात होतो. या काळात, श्रीनगर आणि काश्मिर खोर्‍यात मनमुराद भटकण्याची मिळालेली कोणतीही संधी आम्ही सोडत नसू. त्या काळात श्रीनगर खूप गजबजलेले नव्हते आणि मुख्य म्हणजे अतिरेक्यांची किंवा बॉम्बस्फोटांची वगैरे कसलीही भिती तेंव्हा नव्हती. मनात आले आणि वेळ असला की श्रीनगरच्या बस स्टॅंडवर जायचे व आपल्याला जायचे आहे तिथली बस पकडायची, असे आम्ही नेहमीच करत असू. या काळात जाण्याचे आमचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे दल सरोवराचा परिसर असे. दल गेटपासून साधारण उत्तर दिशेकडे जाणारा एक रस्ता आहे. हा रस्ता दल सरोवराच्या काठाकाठानेच जातो. या रस्त्यावरच चष्मेशाही, निशात व शालीमार ही सुप्रसिद्ध मुघल गार्डन्स आहेत. या गार्डनमधे पिकनिकसाठी जावे, कधी दल सरोवराच्यामधे जलक्रीडा करण्यासाठी असलेल्या बोटींवर जाऊन मनसोक्त पोहावे किंवा वॉटर स्कीइंग करावे, कधी शिकार्‍यावरून सहल करताना, कडेला उभ्या करून ठेवलेल्या हाउसबोटींचा दौरा करावा व उगीचच तिथे निवास करण्यासाठीच्या दरांबद्दल घासाघीस करावी( विद्यार्थीदशेत असल्यामुळे,आम्हाला तेंव्हा हाऊसबोटमधे एक रात्रही रहाता येणे शक्य नव्हते), असे उपभोगलेले आनंदाचे विविध क्षण, इतक्या वर्षांनंतरही माझ्या स्मरणात पक्के राहिले आहेत.

Dal lake map

दल परिसराचा नकाशा

परवा कोठेतरी वाचले की प्रदुषण आणि अतिक्रमण या दोन संकटांमुळे दल सरोवर राहते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामाणिकपणे मी सांगू शकतो की माझ्या  मनाला खूप वाईट वाटले. आपल्या निष्क़ाळजीपणाने आपण काय काय नष्ट करत चाललो आहोत त्याला सीमाच उरली नाहीये.

दल सरोवर माझ्या आठवणीप्रमाणे, साधारण सहा चौरस मैल आकाराचे असावे. यापैकी बराचसा भाग भर टाकून रस्ते बनविण्यासाठी वापरण्यात आला आहे व शेवाळे व तण(Weeds) आता सरोवरात एवढ्या प्रमाणात वाढले आहे की सरोवराचा आकार आता जवळपास निम्मा झाला असावा. या सरोवराच्या मध्यभागी, प्रथमपासूनच तरंगणारा एक भूखंड आहे. व्हेनिस सारख्या दिसणार्‍या या भूखंडात, काश्मिरमधले शेतकरी वांगी, टोमॅटो किंवा कमलकंद यासारखी पिके घेत असत. आता ही तरंगणारी शेती एवढी वाढली आहे की अंदाजे 40000 शेतकरी यात पिके घेतात. हे लोक या शेतीजवळच बोटींमधे रहातात. ते निर्माण करत असलेल्या कचर्‍यामुळे आणि शेवाळ्यामुळे दल सरोवराचे पाणी आता हिरवेजर्द दिसायला लागले आहे. श्रीनगरचे 10 लाख नागरिक आणि सरोवरात उभ्या असलेल्या सुमारे बाराशे हाऊसबोटी यांनी निर्माण केलेले सांडपाणी दल सरोवरातच सोडले जाते. दल सरोवराच्या आसपास असलेले इतर कॅनॉल्स आणि झेलम नदी यांच्या पात्रांना आता कॉंक्रीटचा गिलावा दिलेला आहे. त्यामुळे नैसर्गिक रित्या दल सरोवरातून या कॅनॉल्समधे झिरपणारे पाणी आता बंद झाले आहे. व नैसर्गिक रित्या होणारी जलशुद्धीप्रक्रियाच बंद झाली आहे. काश्मिरच्या मुख्य न्यायाधीशांनी, श्रीनगर डेव्हलपमेंट ऍथॉरिटीवर ताशेरे झाडताना, दल हे सरोवर आहे का फळबाग? असा मध्यंतरी प्रश्न विचारला होता.

India_07_27_09_DalLake_EDIT

दल सरोवरातील शेवाळे साफ करण्याचे प्रयत्न

1950-60 च्या आसपास चित्रित केलेल्या बॉलीवुडच्या जवळ जवळ प्रत्येक चित्रपटात, दल सरोवरात फिरणार्‍या ‘शिकारा’ बोटींचे चित्रीकरण हे असेच. आज जर तुम्ही शिकारा सफर केलीत तर खाली दिसणारे हिरवेजर्द पाणी बघून त्या पाण्याकडे बघावेसे सुद्धा वाटणार नाही. भारत सरकारने अतिरिक्त 50 कोटी रुपये, दल सरोवराचे शुद्धीकरणासाठी काश्मिर सरकारला दिले आहेत. या पैश्यांच्यातून शेवाळे काढण्याची यंत्रे वगैरे खरेदी करण्यात आली आहेत. पण दलच्या पर्यावरणाची एवढी हानी आता झाली आहे की दल सरोवराचे पूर्वीचे सौंदर्य परत आणता येईल की नाही या विषयी शंकाच वाटते.

दल सरोवर आता नष्ट होण्याच्या मार्गावरच आहे. काश्मिरला भूलोकीचे नंदनवन म्हणतात. परंतु दल सरोवराचे आताचे रूप बघून, त्याला नंदनवनातील भूलोक म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल.

31 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “नंदनवनातील भूलोक

  1. stutya likhan!

    40-50 varshapurviche saundarya punha yene naahi pan aata je aahe tyache sanvardhan naahi jhaale tar matra avghad aahe…

    aapli kaLkaL yogyach!

    environmental field madhye kam karanaryaa NGOs ithe karyarat aahet kaa?

    Posted by Nilesh | जुलै 31, 2009, 8:53 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: