.
Science

जग आपैसेंचि वदनडोही संचारताहे//


अंधार्‍या रात्री आकाशाकडे नजर टाकली तर अनंत तारे आपल्याला चमचमताना दिसतात. या तार्‍यांच्या तेजस्वितेप्रमाणे त्या तार्‍याची प्रत ठरवली जाते. दिवसा आपल्याला भाजून काढणारा सूर्य हा तारा एक मध्यम प्रतीचा तारा आहे. व्याध, रोहिणी यांच्यासारख्या अतिशय तेजस्वी तार्‍यांना पहिल्या प्रतीचे तारे म्हणतात. चमचमणार्‍या सर्व तार्‍यांच्या अंतकरणात एक अणूभट्टी सतत कार्यान्वित असते. या अणूभट्टीत, हायड्रोजन वायूचे, हेलियम वायूत रूपांतर करण्याची प्रक्रिया सतत चालू असते. या प्रक्रियेमधून प्रचंड प्रमाणात उर्जा बाहेर फेकली जाते. हीच उर्जा आपल्याला प्रकाशरूपात दिसते. त्या तार्‍याच्या अंर्तभागात असलेले हायड्रोजन वायूचे इंधन संपुष्टात आले की तार्‍याचे उर्जा उत्सर्जन कमी होत जाते व त्याचे आयुष्य संपते. नंतर छोटे तारे अवकाशात अश्वथाम्यासारखे तरंगत रहातात. परंतु अतिविशाल तारे किंवा पहिल्या प्रतीचे तारे यांचे वस्तुमान, एवढे प्रचंड असते की स्वत:च्याच गुरुत्वाकर्षणाने हे तारे लहान लहान होत जातात. आपल्या पृथ्वीचा आकार 10 सें.मी. झाला तर तिची जी घनता(Specific Gravity) होईल तशी घनता या आक्रसलेल्या तार्‍यांची होते. एवढ्या विशाल घनतेच्या तार्‍याचे गुरुत्वाकर्षण शेवटी एवढे महाप्रचंड होते की त्या तार्‍यापासून निघालेले प्रकाश किरणही तार्‍याच्या पृष्ठभागाच्या बाहेर न पडता आत वळतात. असा तारा साहजिकच कितीही शक्तीमान दुर्बिण असली तरी दिसू शकत नाही. अशा तार्‍यांना कृष्ण विवर (Black Hole) असे नाव आहे.

असे निर्माण झालेले कृष्ण विवर, जर एखाद्या महाराक्षसी तार्‍याभोवती भ्रमण करीत असले तर त्याच्या अत्युच्य गुरुत्वाकर्षणाने, ते तार्‍यावरील  वस्तुकण आपल्याकडे खेचून घेऊ लागते. प्रथम हे वस्तुकण, कृष्ण विवराभोवती फेर धरून भ्रमण करू लागतात व त्यांचे एक प्रचंड कडे निर्माण होते.  परंतु  काही काळातच कृष्ण विवर त्यांना गिळंकृत करून टाकते.  ही क्रिया लक्षावधी वर्षे चालू रहाते व त्यामुळे त्या महाराक्षसी तार्‍याचे वस्तुमान कमी होत जाते व कृष्ण विवराचे वाढत जाते.

आकाशातील अब्जावधी तार्‍यांनी मिळून बनलेल्या तारकापुंजांना दिर्घिका(Galaxy) म्हणतात. या दिर्घिकांच्यात तार्‍यांच्याशिवाय धूलिकणांचे प्रचंड विशाल असे ढगही असतात. आपली सूर्यमाला ज्याचा भाग आहे तो तारकापुंज, आकाशगंगा(Milky Way) या नावाने ओळखला जातो.  ही एक सर्पिल(Helical) आकाराची दिर्घिका आहे. या दिर्घिकेच्या मध्यभागी एक कृष्ण विवर शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.परंतु हे कृष्ण विवर आजुबाजुंच्या तार्‍यांना गिळंकृत करताना दिसत नसल्याने शांत आहे असे शास्त्रज्ञांना वाटते.

236088main_milkyway516

Milky Way

अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्थेच्या (NASA) पॅसाडेना, कॅलिफोर्निया येथील ‘स्पाइट्झर स्पेस सेंटरच्या शास्त्रज्ञांना 5 कोटी प्रकाश-वर्षे अंतरावर असलेल्या NGC 1097 या दिर्घिकेच्या मध्यभागी असलेल्या एका अतिविशाल कृष्ण विवराचा नुकताच शोध लागला आहे. या कृष्ण विवराचे वस्तुमान 10 कोटी सूर्यांच्या वस्तुमानाइतके तरी असावे असे शास्त्रज्ञांना वाटते. याच्या पुढे आकाशगंगेतील कृष्ण विवर अगदी बच्चा आहे. या कृष्ण विवराभोवती असलेल्या दिर्घिकेचे रक्तवर्णी रंगाचे व तार्‍यांनी भरलेले सर्पिल बाहु()  अवकाशात लांबवर पसरलेले दिसतात.

galaxy-ngc-1097

NGC1097

या कृष्ण विवराचे एक वैशिष्ट्य म्हणजे याच्याभोवती अतिशय तेजस्वितेने जळणार्‍या नवजात तार्‍यांचे एक कडे आहे. हे तारे अतिशय जलद गतीने जन्म पावत आहेत. व त्यामुळे निर्माण होणार्‍या उष्णतेमुळे, धुलिकणांचे अतिशय उष्ण असणारे ढग, या दिर्घिकेच्या सर्पिल बाहुंच्यामध्ये पसरले आहेत. या उष्ण ढगांच्यामुळे हे सर्पिल बाहू रक्तवर्णी दिसत असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. दिर्घिकेतील इतर जुने तारे नीलवर्णी दिसत आहेत. चित्रात डाव्या बाजूला दिसणारा एक तेजस्वी धूसर ठिपका दुसर्‍या दिर्घिकेचा आहे.

या कृष्ण विवराचे वर्णन वाचल्यावर मला फक्त एकच आठवण झाली. ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायात, परमेश्वराच्या विश्वरूपाच्या मुखाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात.

या आघवियाचि सृष्टि/ लागलिया आहानि वदनाचां वाटी/

आणि हा जेधिंचिया तेथ मिठी देतसे उगला//

जैसे महानदीचे वोघ/ वाहिले ठाकती समुद्राचे आंग/

तैसे आघवांचिकडूनि जग/ प्रवेशत मुखी//

काय सागराचां घोंटु भरावा/ की पर्वताचा घांसु करावा/

ब्रम्हकटाहो घालवा आसकाचि दाढे//

दिशा सगळया गिळावया/ चांदिणिया चाटुनी घ्यावया/

ऐसे वर्तत आहे साविया/ लौल्य बा तुज//

जैसे तक्षकां विष भरले/ हो कां जें काळरात्री भूत संचरले/

की अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नि जैसे//

मग म्हणे हे काई/ जन्मलिया आत मोहरचि नाही/

जग आपैसेंचि वदनडोही संचारताहे//

किंवा सध्याच्या रूढ मराठीत याचा अर्थ असा होतो.

या सर्वच सृष्ट्या, मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागी त्यांस गिळून टाकत आहे. ज्याप्रमाणे मोठया नद्यांचे प्रवाह मोठया वेगाने समुद्रास येऊन मिळतात त्याप्रमाणे सर्व बाजुंनी हे जग त्याच्या मुखात शिरत आहे. सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय ? किंवा पर्वतच गट्ट करून टाकावा की काय ? अथवा हे संपूर्ण विश्व दाढेखाली घालावे की काय ? सगळया दिशांच गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटुन पुसुन घ्याव्यात अशी ही देवा तुला साहजिक हांव दिसत आहे. तक्षकाच्या तोंडात विष भरावे किंवा अमावास्येच्या रात्री पिशाच्चांचा संचार व्हावा किंवा वज्राग्नि हा जसा स्वभावाने अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्निअस्त्र धारण करावे हे काय ! जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही. सर्व जग आपोआप विश्वेश्वराच्या मुखरूपी डोहात जात आहे.”

या कृष्ण विवराचे इतके समर्पक वर्णन, ज्ञानेश्वरांशिवाय दुसरे कोण करू शकणार?

28 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: