.
ताज्या घडामोडी Current Affairs

रोग चालेल पण औषध नको


दुपारी एकच्या सुमारास मी जेंव्हा रोज घरी येतो तेंव्हा घराच्या कोपर्‍यावर एक भंगारवाला त्याच्या हातगाडीसह मला दिसतो. या भंगारवाल्याच्या गाडीवर रिकाम्या बाटल्या, डबे यासारखे काहीच कधी दिसत नाही. त्याच्या हातगाडीवर असतात जुने संगणक, जुने कॅथोड रे ट्युबवाले मॉनिटर, टीव्ही आणि मोडके प्रिन्टर. रोज एवढे संगणक त्याच्याकडे येतात तरी कसे? असे कुतुहुल मला नेहमीच वाटत आले आहे. एक दिवस मी त्याच्या गाडीपाशी थांबलो आणि विचारपूस केली. त्याच्या गाडीवर असलेले संगणक, प्रिंटर वगैरे त्याने फक्त त्याच दिबशी जमा केलेले होते. तो या संगणकांचे करतो तरी काय असे त्याला विचारल्यावर समजले की एक भंगारवाला शेट फक्त संगणक आणि त्याचे भाग एवढेच खरेदी करत असतो त्या शेटला तो आपला माल रोज वजनावर विकतो.

20081215-india-e-waste

माझ्या ओळखीचा एक स्क्रॅप डीलर आहे. त्याला मी एकदा सहज या कॉम्पुटर्स स्क्रॅप बद्दल विचारणा केली. त्याच्या मताने हा सगळा जमा झालेला कॉम्पुटरचा कचरा, दिल्लीचे मोठे स्क्रॅप व्यापारी, टनाच्या हिशोबाने देशभरच्या स्क्रॅप डीलर्सकडून जमा करतात. हे लोक पुढे याचे करतात तरी काय? असे वाटल्याने जालावर थोडी शोधाशोध केली. जे काय समजले ते फारसे आल्हादकारक नव्हते.

माझ्या कोपर्‍यावरचा हातगाडीवाला जरी भंगारवाल्या शेटजीला आपला माल विकत असला तरी तो मोडके प्लॅस्टिक पार्ट घेत नाही. त्यामुळे असे पार्ट आमचा भंगारवाला सरळ जाळून टाकतो. या प्लॅस्टिकच्या भागांमधे थोड्या प्रमाणात धातू असतात व हे पार्ट अग्नीज्वालांमुळे पेटू नयेत म्हणून त्यावर कॅडमियम, शिसे,पारा व ब्रोमाइड्स यांचा वापर केलेली रसायने फवारलेली असतात. असे प्लॅस्टिकचे भाग उघड्यावर जाळण्याने आजूबाजूच्या लोकांना अतिशय हानीकारक असतात व सततच्या एक्स्पोजरमुळे या लोकांना कॅन्सर सारखे रोग होण्याची शक्यता असते.

e-waste

घाउक प्रमाणात खरेदी केलेले संगणक, दिल्लीला पोचले की त्यांचे बहुदा वर्गीकरण केले जाते. जे संगणक बर्‍यापैकी चालू परिस्थितीत असतात ते बहुदा राजस्थानातल्या भरतपुर, धोलपुर. बिकानेर आणि भरतपुर येथे पाठवले जातात. या संगणकांची, या ठिकाणी दुरुस्ती व फेरजुळणी केली जाते व नव्या संगणकाच्या किंमतीच्या फक्त 30 ते 40 टक्के किंमतीला हे संगणक छोट्या गांवातले व्यापारी किंवा शाळा यांना विकले जातात. या फेरजुळणीतून उरलेले निकामी भाग परत दिल्लीला जातात. माझी इतके दिवस अशी समजूत होती की हे निकामी भाग खड्डे खणून त्यात गाडून टाकत असावेत. पण प्रत्यक्षात काही निराळेच घडते आहे.

219501_circuit_board

दिल्लीमधल्या जुन्या संगणकांच्या व्यवसायाने आता एवढे मोठे स्वरूप धारण केले आहे की दिल्लीला देशाच्या राजधानीबरोबर ‘भंगार संगणकांची राजधानी’ असेही नाव देता येईल. दर वर्षाला सध्या 12000 मेट्रिक टन एवढा ई-कचरा दिल्लीमधे रीसायकल होतो आणि 2012 पर्यंत ही संख्या 20000 मेट्रिक टनापर्यंत बहुदा पोचेल. देशार्तंगत निर्माण झालेल्या ई-कचर्‍याशिवाय, जवळ जवळ सर्व प्रगत देशांमधून हे भंगार दिल्लीला आणले जाते. एक टन वजनाचे संगणक भंगार साधारण 20000 रुपयांपर्यंत विकले जाते. यातून 40000 रुपये किंमतीचे, निदान 10 ग्रॅम सोने, 30 ते 40 किलो तांबे आणि इतर धातू मिळू शकतात.

ही माहिती वाचून असे वाटणे स्वाभाविक आहे की वा! हा एक चांगला धंदा आहे! परंतु हे रीसायकलिंग दिल्लीला ज्या पद्धतीने होते आहे ते बघितल्यावर कोणालाही असेच वाटेल की रोग चालेल पण औषध नको.

दिल्लीच्या परिसरातल्या छोट्या छोट्या गावांमधे हे रीसायकलिंगचे काम चालते. पत्र्याच्या उघड्या शेड्समधे दहा बारा वर्षांची बहुतांशी बिहारी मुले त्यांच्या उंचीएवढ्या व ऍसिड भरलेल्या ड्रम्समधे, संगणाचे प्रिंटेड सर्किट बोर्ड हातात धरून हलवताना दिसतात. त्यांच्या हातात रबरी हातमोजे असतात परंतु कोणतेही मास्क किंवा चष्मे त्यांना दिले जात नाहीत. हे बोर्ड हलवताना ऍसिडचे बारीक थेंब या मुलांच्या अंगावर उडतात तसेच या शेड्स व आजुबाजुचा परिसर, ऍसिडच्या वाफांनी इतका दरवळलेला असतो की ही मुले खोकला व श्वसनाच्या रोगांनी सतत पछाडलेलीच असतात. या अशा परिस्थितीत काम केल्यावर, संध्याकाळी दारूचाच आधार या मुलांना वाटतो.

delhi-ewaste2

या ऍसिडच्या ड्रम्समधे तळाला साठलेला, साका काढून घेतला जातो. या साक्यातच परत मिळवलेले तांब्यासारखे धातू असतात. संगणकातले बाकीचे काचेचे व प्लॅस्टिकचे भाग दुसर्‍या अशाच झोपडपट्ट्यांमधे असलेल्या भट्ट्यांच्यात वितळवले जातात. या ठिकाणची परिस्थिती काही फारशी जास्त चांगली नसते. शहरांच्यात नियम कडक असतात त्यामुळे या शेड्स, छोट्या गावांच्यातून पसरू लागल्या आहेत. जवळ जवळ 100 टक्के नफा असलेला या सारखा दुसरा कोणताही उद्योग मिळणार नाही. त्यामुळेच पर्यावरण, मुलांचे आरोग्य वगैरे कशाचीच पर्वा न करता हा उद्योग जोराने वाढत चालला आहे.

आता या ई-कचर्‍याच्या उद्योगाला आणखी एक नवीन प्रकारचे भंगार मिळू लागले आहे. जगभरचा मोबाईल फोन्सचा खपामुळे जुने मोबाईल फोन आता दिल्लीला रीसायकलिंग करण्यासाठी येऊ लागले आहेत. जगभरची ही घाण आपल्या देशात आणून आपण आपल्या पर्यावरणाची व देशातल्या गरीब मुलांच्या आरोग्याची अपरिमित हानी करत आहोत हे बहुदा कोणाच्याच लक्षात येत नाही की काय? असे हा उद्योग बघून वाटू लागते.

24 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “रोग चालेल पण औषध नको

 1. भयानक वास्तव

  Posted by Narendra | जुलै 24, 2009, 3:26 pm
 2. bhayankar aahe he sagala..we are helpless..far far tar mobile vaparane banda karu shakto aapan ajun kaay?

  Posted by mugdhamani | जुलै 24, 2009, 3:39 pm
  • दिल्लीचे लोक नक्कीच करू शकतात. असे झोपडपट्ट्यामधले उद्योग शोधून काढून त्यासंबंधी त्या त्या ग्रामपंचायतीकडे व पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे तक्रार करून हे उद्योग बंद करणे सहज शक्य आहे.

   Posted by chandrashekhara | जुलै 24, 2009, 3:44 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक e-Waste !! « The Pause ! - जुलै 27, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: