.
ताज्या घडामोडी Current Affairs

जालावरचे भामटे


मागच्या आठवड्यात मला एक ई-मेल आली. मिस्टर अव्होडेजी लारो या नायजेरियात रहात असणार्‍या व्यक्तीची. मी या श्री. लारोना कधीच, काळे वा गोरे हे बघितलेले नाही. पण त्यांची ई-मेल मात्र अतिशय मुद्देसूद आणि नम्रपणे लिहिलेली वाटली म्हणून वाचली. श्री.लारो यांच्या म्हणण्याप्रमाणे ते एका नायजेरियातल्या मोठ्या बॅंकेत काम करतात. त्या बॅंकेचे नाव, शाखा वगैरे सर्व माहिती त्यांनी दिलेली होती. त्या बॅंकेत अकाउंट्स रिलेशन मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांची एका वृद्ध खातेधारकाची ओळख झाली. या खातेधारकाची बॅंकेतली शिल्लक मजबूत म्हणजे मिलियन डॉलर्समधे मोजण्याजोगी होती. त्या खातेधारकाला जवळचे कोणीच नातेवाईक नसल्याने, श्री. लारो त्याला पुष्कळ मदत करू लागले. हा खातेधारक महिन्यापूर्वी अचानक निधन पावला. त्यानंतर काही दिवसांनी श्री. लारो यांना एक आश्चर्यजनक फोन आला. त्या खातेधारकाने आपल्या संपत्तीपैकी बराच मोठा भाग श्री. लारो यांना दिला होता व ते अचानक श्रीमंत झाले होते. आता हे पैसे नायजेरियाच्या बाहेर काढून दुसर्‍या कोणत्यातरी देशात जाऊन रहाण्याचा त्यांचा मानस होता व त्यासाठी माझी काही मदत त्यांना हवी होती व त्याची किंमत म्हणून काही हजार डॉलर्स ते मला द्यायला तयार होते. गंमत म्हणून, मी गूगल मॅप्सवर त्यांचा पत्ता बघितला. ज्या अपार्टमेंट्सच्या बिल्डिंगचा पत्ता त्यांनी दिला होता ती बिल्डिंग गूगल मॅप्सवर लगेच सापडली. तसेच त्यांनी मेलमधे लिहिलेली बॅन्क व तिची शाखा याही इंटरनेटवरच्या त्या बॅंकेच्या साइटवरून सापडल्या.

हे सगळे Too Good to be True  दिसत होते. आमच्या डोक्यात भिनलेले There are no free Lunches हे तत्वज्ञान लगेच धोक्याची घंटा वाजवू लागले व मी ती ई-मेल लगेच संगणकातून काढून टाकली.

nigeria1

काल जालावर शोधत असताना, ही ई-मेल म्हणजे मला एक बकरा बनवण्याचा, जालावरच्या भामट्यांचा प्रयत्न होता हे लक्षात आले. मला सांगण्यात आलेली गोष्ट त्यांच्या निरनिराळ्या हत्यारांच्यापैकी एक होती म्हणे! या भामट्यांची सर्वसाधारण कार्यपद्धती अशी असते.

* प्रथम ज्याला कोणतीही शंका सुद्धा येणार नाही अशा एखाद्या ई-मेल पत्ता धारकाला एकदम, हा संदेश हे भामटे पाठवतात.

* या संदेशात बहुदा एखादी लांबलचक व दुख;द कहाणी असते, ज्यामुळे ती मेल पाठवणार्‍याला त्याचे असलेले पैसे त्याच्या देशाच्या बाहेर पाठवता येत नसतात.

*ई-मेल धारकाला, त्याने मदत केल्यास या पैशांपैकी काही टक्के रक्कम देऊ केली जाते.

*एकदा का या पद्धतीने, या ई-मेल धारकाचा बकरा या भामट्यांना मिळाला, की ते त्याला नाना आमिषे आणि अडचणी दाखवून घोळत ठेवतात. शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दाखवतात की या ई-मेल धारकाने काही रक्कम पाठवणे अनिवार्य दिसते. ती रक्कम एकदा या धारकाच्या हातातून निसटली की हे भामटे अदृष्य होतात.

जालावरच्या या भामट्यांनी नायजेरिया देशाचे नाव आपल्या भामटेगिरीने इतके बद्दु केले आहे की नायजेरियाच्या सरकारला आता या बाबतीत काहीतरी क्रिया करणे आवश्यक झाले आहे. अमेरिकेच्या इंटरनेट गुन्हे आणि तक्रारी केन्द्राच्या माहिती प्रमाणे इंटरनेट वरच्या गुन्ह्यांत नायजेरियाचा, अमेरिका आणि इंग्लंड यांच्या खालोखाल तिसरा क्रमांक लागतो. परंतु नायजेरियन नागरिकांच्यात इंटरनेट फक्त 7% टक्केच नागरिक वापरतात. म्हणजे इंटरनेट वापरणार्‍यांत, ही भामटेगिरी तिथे किती पसरली आहे त्याची कल्पना करता येते.

Nigeria_07_16_09_Kircher-Allen_Nigeriascams_edit

फेस्टॅकमधील इंटरनेट कॅफे

नायजेरियाची राजधानी लॅगोसचे, फेस्टॅक नावाचे एक बकाल उपनगर आहे. 1977मधे जेंव्हा नायजेरियन सरकार, तेलाचे भाव भडकल्याने, एकदम श्रीमंत झाले तेंव्हा आफ्रिकन कलांचे एक प्रदर्शन भरवण्याच्या निमित्ताने आलेल्या कलाकारांची, रहाण्याची सोय करण्यासाठी, हे उपनगर प्रस्थापित केले होते व खूप सारे पार्क्स व त्यामधे सदनिकांची छोटी संकुले, असे त्याचे स्वरूप होते. प्रथम लॅगोसचे उच्चभ्रू लोक येथे रहात होते पण कालांतराने ते सोडून गेले व फेस्टॅकमधे गरिब व मध्यमवर्गातील सुशिक्षित बेकारांचा भरणा झाला. त्यांच्या पाठोपाठ अनेक इंटरनेट कॅफे या भागात उघडले गेले. या कॅफेमधूनच हा गैरव्यवहार चालतो. नायजेरियाचे Electronic and Financial Crimes Commission (EFCC)  या गैरव्यवहार उखडून टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. 2007 साली त्यांनी अंदाजे 18000 असे गुन्हे उघडकीला आणले आहेत.

इंटरनेट कॅफे चालविणारे म्हणतात की आम्ही असे जाल गुन्हेगार लगेच ओळखतो व त्यांना बाहेर हाकलून देतो. पण हे प्रकार चालूच आहेत. आता या भामट्यांना थोडे सोशल स्टेटसही मिळाल्यासारखे दिसते. नायजेरियाचा एक प्रसिद्ध पॉप गायक ‘ओलु’ याने गायलेले ‘याहूजे’ म्हणून गाणे नायजेरियात अतिशय लोकप्रिय आहे. इंटरनेटवर भामटेगिरी करून मिळालेल्या अमाप पैशांवर चैनमजा करणार्‍या एकावरचे हे गाणे आहे. आयो ओलागुन्जु हा, फेस्टॅक उपनगरात वाढलेला एक संगणक प्रणाली आणि अर्थतज्ञ आहे. तो म्हणतो की नायजेरियातल्या या भामटेगिरीने एवढे व्यापक स्वरूप धारण केले आहे की कायदेशीर आर्थिक व्यवहारात सुद्धा आता प्रथम आम्हाला आमचा सच्चेपणा सिध्द करावा लागतो.

काहीही असले तरी या भामटेगिरीचे मूळ कारण नायजेरियात असलेली सुशिक्षितांमधली प्रचंड बेकारी हेच आहे. ती समस्या सुटल्याशिवाय या भामटेगिरीवर उपाय सापडणे कठीणच आहे. म्हणूनच, ग्राहक म्हणून आपण सगळ्यांनी, नेटचा वापर करताना अत्यंत सतर्क राहणे अतिशय महत्वाचे आहे.

23 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “जालावरचे भामटे

  1. हे प्रकार हल्ली फार वाढले आहेत. मला तर एका मुलीने तिचे फोटो बिटो पाठवून ती किती प्रामाणिक आहे याचे दाखलेही दिले होते. जर कधी तुम्हाला life is beautiful या नावाने ईमेल आलं तर उघडूनही न पहता डिलीट करा. तो एक व्हायरस आहे.

    Posted by आदिती | जुलै 27, 2009, 11:42 pm
  2. मला पण असाच एक मेल आला होता…मी सरळ डीलीट करुन टाकला

    Posted by अमोल मेंढे | जुलै 31, 2010, 7:45 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: