.
ताज्या घडामोडी Current Affairs

महिषी पुराण


काही प्राण्यांच्या नशीबी फक्त हेटाळणीच का आलेली असते याचे खरे म्हणजे काहीच कारण देता येत नाही. उदाहरणार्थ गाढव, कमी बुद्धीमत्तेच्या मानवाला, गाढव म्हणण्याचे खरे म्हणजे काहीच कारण दिसत नाही. बिचारी गाढवे माणसासाठी केवढे कष्ट करतात व त्यांची बुद्धीमत्ता, त्यांच्यासारख्या इतर प्राण्यांपेक्षा फारशी कमी असते असे वाटत नाही, तरी त्यांच्या कपाळावर हा शिक्का बसलेलाच असतो. म्हैस हा तसाच दुसरा एक प्राणी. आळशीपणा, निर्बुद्धता यांचे म्हैस म्हणजे जणू काही मानकच समजले जाते. आपण दुधदुपत्याचे इतके पदार्थ खातो व पितो परंतु ज्या प्राण्यापासून हे भूलोकीचे अमृत आपल्याला मिळते त्या म्हशीला मात्र अतिशय तिरस्कारणीय स्थान दिले जाते. रस्त्यावरून म्हशी आपल्या शांत रितीने जात असल्या तरी लोक उगीचच त्यांना घाबरतात. खरे म्हणजे म्हशीइतका शांत स्वभावाचा प्राणी शोधून सापडणार नाही. नाही कुणाच्या अध्यात, नाही मध्यात. दक्षिण-मध्य एशियामधे तर म्हशी शेत नांगरणीपासून ते गाड्या ओढण्यापर्यंत सर्व कामे करतात.

इटली देशाच्या दक्षिण भागात ‘काम्पानिया’ म्हणून प्रांत आहे. इथले शेतकरी, भारताप्रमाणेच, म्हशींचे मोठ्या प्रमाणात पालन करतात. म्हशींच्या दुधापासून बनवलेल्या चीजचे या प्रांतातले उत्पादन वर्षाला अक्षरश: कोट्यावधी डॉलर्सचे होते. मंद गतीने केलेल्या प्रक्रियेमुळे या प्रांतात तयार झालेले मॉझरेला चीज, प्रथिने, खनिजे, स्निग्ध पदार्थ आणि चवी यासाठी प्रसिद्ध आहे.

ऍंटोनियो पालमिएरी हा कांपानिया मधलाच एक चीज उत्पादक आहे. त्यांचा तीन पिढ्यांचा हाच व्यवसाय आहे. म्हशीच्या दुधाचे उत्कृष्ट मॉझरेला चीज बनवण्याच्या त्याच्या अट्टाहासामुळे तो आज लाखोपती झाला आहे. म्हशी बांधण्याचा गोठा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक विविक्षित चित्र उभे रहाते. म्हशी दावणीला बांधलेल्या, मलमूत्राचे पाट, अस्तावस्त पडलेला कडबा आणि शेणाची दुर्गन्धी. परंतु यापैकी काहीच त्याच्या गोठ्यावर दिसून येत नाही. त्याचा गोठा एखादा म्हशींसाठी बांधलेले रिसॉर्ट असावे तसा दिसतो.

ऍंटोनियोचे असे म्हणणे आहे की चांगले चीज बनवण्यासाठी कुशल कामगाराबरोबरच उत्कृष्ट दर्जाच्या दुधाची आवश्यकता असते. आणि त्याच्या मताने म्हशी जेंव्हा आनंदी आणि आरामात असतात त्याच वेळी असे उत्कृष्ट दूध देतात. ठराविक वेळी दूध काढण्याच्या ऐवजी ऍंटोनियोच्या म्हशी त्यांना सोइस्कर अशा वेळी, दूध काढणार्‍य़ा यंत्रांच्या समोर एका रांगेत उभ्या राहून दूध काढून देतात. प्रत्येक म्हशीच्या गळ्यात एक इलेक्ट्रॉनिक चिप अडकवलेली असते, ज्यात त्या म्हशीची सर्व वैयक्तिक माहिती असते. दूध काढणारे यंत्र या चिपमधल्या माहितीप्रमाणे दूध काढते.

Italy_Buffalos_07-01-09_Paolocci

दर वर्षी तीन महिने, ऍंटोनियो प्रत्येक म्हशीला उघड्या कुरणांच्यावर मनसोक्त चरणे, इतर म्हशींबरोबर सोशलायझिंग करणे व तलावात डुंबणे या साठी मोकळे सोडतो. या काळात त्यांच्यावर दुध उत्पादनाची जबाबदारी नसते. त्यांच्यासाठी बांधलेल्या मसाज पार्लरमधे म्हशी आरामात मालिश करून घेऊ शकतात. त्या आजारी पडल्या तर त्यांच्यासाठी होमिओपॅथिक औषधांची सोय आहे. ऍन्टोनियोच्या मताने, म्हशी गाईंपेक्षा जास्त हुशार असतात. त्यामुळे मानवासारखेच त्यांनाही वैयक्तिक स्वातंत्र्य प्रिय आहे.

ऍन्टोनियोच्या कल्पना खर्‍या की कल्पनाच हे सांगणे मोठे कठिण आहे. एवढे मात्र खरे की आज त्याच्या गोठ्यातल्या चीजला सर्वात जास्त म्हणजे अंदाजे 16 यू.एस. डॉलर्स प्रति किलो एवढी किंमत बाजारात मिळते. त्याचे मॉझरेला चीज इटलीचे पंतप्रधान बेरलुस्कोनी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या ब्रेकफास्ट टेबलवर पोचले आहे.

भारतातल्या म्हशींना जर यदाकदा ऍंन्टोनियोच्या गोठ्याची माहिती मिळाली तर माझी खात्री आहे की त्या परमेश्वराची रोज प्रार्थना करतील की देवा काहीही कर पण मला पुढचा जन्म नक्की ऍन्टोनियोच्या गोठ्यातच दे.

22 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “महिषी पुराण

 1. आपण वर्णन केल्याप्रमाणे असा १ गोठा (नव्हे रिसॉर्ट) चितळे बंधू यांचा आहे. हा गोठा भिलवडी जि. सांगली येथे असून वर वर्णन केलेले सर्व प्रकार तेथे आहेत. प्रत्येक म्हशीच्या गळ्यात इलेक्ट्रॉनिक चिप, दुध काढायची यंत्रे, बांधून न ठेवता मुक्तपणे फ़िरणे, आरोग्य तपासणी, योग्य व पौष्टीक आहार प्रत्येक म्हशीला मिळतो.

  Posted by Aniket Vaidya | जुलै 22, 2009, 7:43 pm
  • मला कल्पना नव्हती. आपण या गोठ्यासंबंधी माहिती पाठवल्यास मी माझ्या ब्लॉगवरून ती जरूर प्रसिद्ध करीन. धन्यवाद

   Posted by chandrashekhara | जुलै 22, 2009, 7:49 pm
 2. मी एकदाच तिकडे गेलो होतो. खूप मोठा गोठा आहे तो. साधारण १००० म्हशी आहेत. केवळ म्हशींना खाण्यासाठी ८५ एकर जागेवर गवत लावले जाते.
  दूध देणार्या, न देणार्या, गर्भवती अश्या म्हशी वेगवेगळ्या बांधल्या जातात. म्हशींसाठी पाण्याचे शॉवर आहेत. स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्द असते. संपूर्ण गोठा रोज २ वेळा स्वच्छ केला जातो.
  म्हशींसठी तिथे खास रुग्णालय आहे. २४ तास डॉक्टर असतात.
  संपूर्ण आवारात अतिशय स्वछ्छता आहे. आवारात तंबाखू, पान, गुटखा, धुम्रपान यास सक्त मनाई आहे.

  Posted by Aniket Vaidya | जुलै 22, 2009, 7:59 pm
 3. चितळे आणि ऍटोनियो जिंदाबाद!
  हम्माऽऽऽऽऽ

  Posted by आल्हाद alias Alhad | जुलै 23, 2009, 1:47 सकाळी
 4. चन्द्र्शेखरजी,

  छान आहे लेख..!
  मी माझ्या भाचीला सकाळी उठवतांना रोज ‘ ए म्हशे उठ लवकर ‘असं म्हणत असते आणि तीचंही त्यावर उत्तर ठरलेलं असतं..”तु तुझा चारा खा (म्हणजे ब्रेकफास्ट)आणि मग मला उठव” …तुमचा लेख वाचुन आता वाटतंय की आम्ही दोघीही पुढ्ल्या जन्मी नक्किच ऍन्टोनीयोच्या गोठ्यातल्या सुदैवी म्हशी होऊ……!

  Posted by anjali | जुलै 23, 2009, 4:44 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: