.
ताज्या घडामोडी Current Affairs

कैफियत


काल संध्याकाळी कामावरून परत येत होतो. एका ट्रॅफिक सिग्नलच्या बाजूला पंधरा वीस लोकांचा एक घोळका दिसला. जरा डोकावून बघितले तर दोन चार पोलिस हवालदार लोकांच्याकडे ,एक पोलिस निरिक्षक पोलिसांकडे, आणि बरेच हताश लोक आशाळभूतपणॆ पोलिसांकडे, नजर ठेवून बघत बसलेले दिसले. एक सुस्कारा सोडला आणि पुढे निघालो.

अलीकडे हा प्रकार पुण्यात फारच वाढला आहे. बघावे तेंव्हा अणि कुठेही ही पोलिस मंडळी कोण काही चुकतो आहे का याच्याकडे नजर लावूनच बसलेली असतात. जरा नजरचुकीने लाल दिवा ओलांडला की धर आणि ठोठाव दंड. बर! लाल दिवा समोर दिसला म्हणून नियमाने उभे रहावे तर झेब्रा पट्ट्यांच्यावर का उभे राहिलात? कर दंड. उजवीकडे वळले तर दिसत नाही का ‘नो राईट टर्न’ आहे. कर दंड. हा दंड सुद्धा पूर्वी पाच दहा रुपये असे. आता शंभरच्या खाली पावती फाडतच नाहीत.

मी सांगतो तुम्हाला! की हे जे नवीन पोलिसांचे साहेब बदलून आले आहेत ना वाहतुक विभागाला तेच याच्या मागे कारण आहेत. पुणे तिथे काय उणे अशी म्हण आहे व तशीच आबादी आबाद होती पुण्याला याच्या आधी. आता चौकात लाल हिरवे दिवे पूर्वीही होते हे खरे पण ते शहराच्या सुशोभिकरणासाठी आहेत अशी आमची प्रामाणिक समजूत होती. तसेच त्या लाल बाण दाखवलेल्या पाट्या लावतात ना चौकात, त्या म्हणे वाहन चालकांसाठी असतात. काय नवीन नवीन शोध लागतील ते खरे.

Oman-Dont-Honk

पूर्वी कसे छान होते. चौकाशी आले की समोर काही वाहन दिसत नाहीना एवढे बघायचे आणि वळायचे. समोरून येणार्‍याला आपल्या जिवाची काळजी असतेच की तो कशाला आपल्यावर आपटायला येईल. बर रस्त्यावर दुभाजक लावलेले असले तर त्याच्यावर झाडे लावून ‘सुंदर पुणे’ करायला ते असतात हे लहान मूल सुद्धा सांगेल. त्या दुभाजकाचा वाहतुकीशी काय संबंध. मी एखाद्या दुकानात गेलो आणि समजा मला हवी असलेली वस्तू नाही मिळाली. जर ती वस्तू मिळू शकणारे दुसरे एखादे दुकान मधे वीस पंचवीस दुकाने सोडून पलीकडे असले तर मी काय तिथे चालत का जाणार आहे. आता मी वाहनावरून जाताना, समोरूनच वाहने यायला लागली तर मी तरी काय करणार. ऍड्जस्ट करून घ्यायचे सगळ्यानी. एखादी छानशी मुलगी स्कूटरवरून जात असली की आपण तिच्या डावीकडून भूर्रर करून ओव्हरटेक करायचा आणि तिला घाबरवायचे. मजा यायची.

हे नवीन साहेब आले आणि सगळी गोची झाली. शेजारच्या गल्लीत जायला वळावे तर यांचा ‘नो एन्ट्री’. पुण्यातले निम्मे रस्ते ‘वन वे’, म्हणजे मारा लांबची चक्कर. पेट्रोलचा खर्च आम्हाला येतो हे कोणाच्या लक्षातच येत नाही. मी मधे एक नवीन कार घेतली. घरी आणल्या आणल्याच आमचे कलत्र म्हणाले की “अहो! हे दोन ओढायचे पट्टे कसले लावले आहेत आपल्या कार मधे?” असतील शो साठी म्हणून मी तिला पटवले. आता हे साहेब म्हणतात की गाडी चालविण्याच्या आधी हे पट्टे पोटावर आवळा. आमचे एक मित्र आहेत अनिलसाहेब म्हणून. आता त्यांचे पोट थोडे मोठे आहे यात त्यांचा काय दोष. पोलिसांना त्याचे काहीच नाही. परवाच त्यांना शंभर रुपये दंड झाला. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे या बाबतीत आमचे कुटुंब कधी नव्हे ते आमच्या बाजूचे आहे. परवा एका रिसेप्शनला जाताना त्या कोरी कांजीवरम नेसल्या होत्या. या पोटपट्ट्याने सगळी इस्त्री गेली.

honking 1

आता आम्ही एवढे कष्ट करतो म्हणजे दोन चार दिवसांनी संध्याकाळी मित्र मंडळी जमलो आणि एखाद्याने फार आग्रह केला की घ्या की हो चार घोट! तर नाही म्हणता येते का? पण जरा रिलॅक्स करून गाडीत बसावे तर ही पोलिस मंडळी ब्रेथ ऍनालायझर घेऊन हजर. बाकी काही नाही पण प्रत्येक वेळी कुटुंबाला घेऊन जावे लागते अलीकडे, परत येताना गाडी चालवायला. सगळे स्वातंत्र्यच जाते बघा मग. आमचा तो सरदार नाहीतर काय बेस्ट डर्टी जोक्स सांगतो. आता सगळे बंद.

आता तर कहरच झाला आहे. अन्याय सहन म्हणजे किती सहन करायचा? चार दिवसांपासून एक नवीनच नियम आणला आहे या साहेबांनी. म्हणे गाडीचा भोंगाच वाजवायचा नाही. आता हा हॉर्न, गाड्या बनविणार्‍या कंपन्या उगीचच बसवतात का गाड्यांच्यावर? तो वाजविण्यासाठीच असतो ना. आणि अलीकडे हे हॉर्न तरी किती मस्त निघाले आहेत. मुलाच्या रडण्याचा आवाज, सायरनचा आवाज, खूप प्रकार आहेत. पोलिस म्हणतात की हे काही लावायचे नाहीत. फक्त फक्त पी पी हॉर्न बसवा. आयुष्यांत आम्ही काही थ्रिल आणूच नये असे वाटते बहुतेक, या आंबट तोंडाच्या लोकांना. हॉर्न असला की तो विविध प्रकारे वापरता येतो. पुढचा ड्रायव्हर लाल दिव्याला उभा असला (बावळट लेकाचा!) तर आपण मागून पी पी सारखे वाजवत राह्यचं. जरा वेळाने तो स्वत:च सिग्नल तोडतो व आपल्याला रस्ता देतो. तसेच एखादी बाई किंवा म्हातारं गाडी चालवत असले की त्यांच्यामागे जाऊन एकदम हॉर्न वाजवायचा. असले दचकतात! ग्रेट फन यार! पुण्याच्या ट्रॅफिकमधे आधी मोकळा रस्ताच मिळत नाही. तो रात्री वगैरे मिळाला तर स्पीडमधे गाडी चालवताना हॉर्नचे बटण दाबून ठेवले तर कसले भन्नाट वाटते पण हे साहेब लागले आहेत ना आमच्या मागे. आता चौकात पोलिस दिसला तर काय आपण हॉर्न वाजवणार का? म्हणून या साहेबांनी साध्या वेषातलेच पोलिस बसवले आहेत चौकातून. मागच्या चार दिवसात पोलिसांनी हजार बाराशे लोकांना दंडही केला म्हणे!

honking2l

जाऊदे! गरिबाची दुनिया नाही हेच खरे!

15 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “कैफियत

  1. फार मजा आली वाचताना … खुप छान उपहासपूर्ण लेखन झालय …

    http://asachkahitari.wordpress.com/

    Posted by inkblacknight | जुलै 16, 2009, 1:36 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: